आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विवाहसंस्‍था आणि काळ: एक चिरंतन युगुल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

येत्या काळात संसार हा एखाद्या भागीदारी संस्थेप्रमाणे समजला जावा. आणि तो भले खंडित करायची वेळ आली तर त्यावेळी आर्थिक विभागणी कशी करावी हेदेखील रीतसर ठरायला हवे. जी प्रथा आर्थिकदृष्ट्या संपन्न असलेल्या देशांमध्ये सुरू झाली असून नजीकच्या भविष्यात ती आपल्या देशातही रुळण्याला पर्याय नाही.


'विवाहसंस्था कालबाह्य     होत चालली आहे आणि शेवटचे आचके देते आहे,' अशी एक गंभीर स्वरूपाची काळजी अधनंमधनं कानावर येत असते. विवाहसंस्था ही काही कालची पोर नव्हे, तसं पाहिलं तर ती एक जख्ख म्हातारी असायला हवी एवढी जुनी आहे. त्यामुळे तिच्या मरणाचे भाकीत हे अगदीच तकलादू म्हणता येणार नाही. पण नीट विचार केला तर कळतं की, विवाहसंस्था ही एक चिरंतन नववधू आहे, कारण तिच्या वराचे बदलते रंगरूप ध्यानात घेऊन सतत बदलत राहते. साहजिकच तिला चिरतारुण्याचा वर मिळालेला आहे. तिचा हा जोडीदार आहे, साक्षात काळ! विवाहसंस्था ही काळाच्या बरोबर अत्यंत सुरळीत वाटचाल करते आहे. पण तिचा हा जोडीदार ज्यांना दिसत नाही, त्यांना विवाहसंस्थेच्या वाटचालीची काळजी वाटत राहते.

 

हा गमतीचा भाग सोडून देऊ. विवाह जुळवणे, विवाहविधि, विवाहपश्चात सहजीवन म्हणजे संसार ते विवाहविच्छेद यांच्या पद्धतीत /स्वरूपात भले बदल होत जातील, पण विवाहसंस्था ही अक्षत राहील. कारण विवाहसंस्थेचा पाया स्त्रीपुरुषांनी एकत्र राहणे हा आहे, आणि त्याचा मूलाधार हा 'स्त्री-पुरुष' आकर्षण व 'अपत्यप्रेम' असा नैसर्गिक आहे. त्यामुळे ती समूळ नष्ट तर होणार नाहीच, उलट तावून सुलाखून निघत स्वतःमध्ये फेरफार करत अधिकाधिक निकोप होत जाईल. प्रश्न आहे तो तिच्यामध्ये होणारे फेरफार मान्य होण्याचा आणि स्वीकारण्याचा. जसं की येत्या काही वर्षांमध्ये पुरुषावर मुलीला हुंडा देऊन लग्न  वेळ तर यायची नाही ना? वास्तविक पाहता ही पद्धत थोड्याफार फरकाने तशी पूर्वापार होतीच, ज्यासाठी ' मागणी घातली' असा शब्दप्रयोग केला जायचा. विवाह जमवण्यासाठी पूर्वापार चालरीतीप्रमाणे आपल्या तोलामोलाचं स्थळ पाहून मुलीच्या घरच्यांनी सांगून जायचं. सांगून जाण्यापूर्वी त्या 'स्थळाची' जमेल तेवढी माहिती मिळवली जायची. परिणामी सांगून येणाऱ्या मुलीकडच्यांचा विचार म्हणजे पसंती साधारणपणे आधीच झालेली असायची. नंतर प्रत्यक्ष भेटीत फारच भ्रमनिरास झाला तरच मुलीकडून नकार जायचा. साहजिकच तेव्हा महत्त्वाचा असायचा तो मुलाचा होकार. त्याची मग मुलीच्या घरी आतुरतेने वाट पहिली जायची. मुलाचा होकार आला की, रीतसर बोलणी करणारी बैठक होऊन व्यवहार ठरायचा. त्यानुसार विवाहसमारंभ पार पडायचा. यामध्ये मानपान, लग्नाचा खर्च, देणीघेणी, हुंडा वगैरे आर्थिक बाबी सामावलेल्या असायच्या, ज्यामध्ये मुलीकडच्यांना म्हणजे वधूपक्षाला जास्त खर्च करावा लागायचा.


पुरुषसत्ताक व्यवस्थेत आईवडिलांची संपत्ती वारसा हक्काने पुरुष अपत्यांना मिळत असल्यामुळे स्त्री अपत्याला 'फूल ना फुलाची पाकळी' एकरकमी पोचावी, हा हुंडापद्धतीचा उगम असल्याचं ढोबळमानाने मानण्यात येत असे. तर त्या काळात या प्रथेला अपवाद स्वरूपात, असा उलट व्यवहारही व्हायचा की, एखाद्या ऐपतदार, सहज स्वीकारणीय, लोभस तरुणाला एखादी मुलगी आवडायची, हवीहवीशी वाटायची आणि ती बहुदा आर्थिकदृष्ट्या निम्नस्तरातील असल्यामुळे कदाचित आपल्याला आपणहून सांगून यायची शक्यता कमी वाटून विवाहाचा प्रस्ताव मुलाकडून जायचा. हे स्थळ तोलामोलाच्यापेक्षा सरस असल्यामुळे मुलीकडून नकाराचा प्रश्न सहसा उद्भवायचा नाही. मुलींची संख्या व मुलांची संख्या यातील संतुलन ढळत गेल्यास मुलाला हुंडा द्यावा लागणे हे काळाच्या ओघात घडू शकतेच! मुद्दा असा आहे की, हुंडा म्हणजे आर्थिक बाजू ही लग्नामध्ये पूर्वापार आहे. आणि भावी काळात मुलाला हुंडा द्यावा लागण्याची शक्यता भले वाढली नाही, तुरळकच राहिली तरीही 'विवाह संबंधातील' आर्थिक व्यवहार हा कालानुरूप बदलणे भागच ठरणार आहे.


मुलींच्या जोडीदाराविषयीच्या अपेक्षा वाढताहेत. सांगून जात असलेलं स्थळ वरकरणी भले तोलामोलाचं असलं तरीही मुलीचा निर्णय हा 'होकार'च असेल हे गृहीत धरण्याची शक्यता कमी होते आहे. मुलामुलींच्या प्रत्यक्ष भेटीतून /संवादातून आलेल्या अनुभवाला निर्णय प्रक्रियेत महत्त्वाचे स्थान लाभून मुलीकडून नकार यायचे प्रमाणही वाढत चालले आहे. लग्नकार्याचा खर्च हळूहळू वधू आणि वर या दोन्ही पक्षांनी विभागून घेण्याची प्रथा रुळू लागली आहे. लग्नसमारंभातील भपका, पर्यायाने खर्च वाढत चालला /जाणार आहे, हे काहीसे चमत्कारिक आहे. कारण विवाहविच्छेदाचे प्रमाण झपाट्याने वाढत असतानाही भरमसाट खर्च करण्याची जोखीम ऐपतदार मंडळी घेत आहेत. ज्या गोष्टीची शाश्वती नाही तिच्यावर खर्च करायची जोखीम घेणं हे काहीसं सामाजिक अनुकरणाचं लक्षण आहे. उलटपक्षी स्त्रीपुरुष दोघेही कमवत असलेल्या भावी काळामध्ये, संसाराच्या खर्चासाठी कुणी किती प्रमाणात योगदान द्यावं हे ठरवणं पुढच्या काळात गरजेचं ठरणार आहे.

 

थोडक्यात, येत्या काळात संसार हा एखाद्या भागीदारी संस्थेप्रमाणे समजला जाईल आणि तो भले खंडित करायची वेळ आली तर त्या वेळी आर्थिक विभागणी कशी करावी हेदेखील रीतसर ठरायला हवं. जी प्रथा आर्थिकदृष्ट्या संपन्न असलेल्या देशांमध्ये अगोदरच सुरू झालेली आहे. भविष्यात ती आपल्या देशातही सुरू होण्याला पर्याय नाही. त्यामुळे नंतरचे बरेच तंटेबखेडे कमी होतील. 'लग्न हा एक जन्मजन्मांतरीचा नातेसंबंध आहे' ही पूर्वापार भावना या पुढच्या काळात सोडावी लागणार आहे. किंबहुना आजच्या काळात विवाहविच्छेद होऊन संसार कधीही मोडू शकतो, ही शक्यता जमेस धरूनच, नवरा-बायको दोघांनीही आपले एकट्याचे व संयुक्त आर्थिक व्यवहार विचारपूर्वक करायला हवेत. हे निखळ 'व्यावहारिक वर्तन' भावनिक पातळीवर कुणाला नकोसंही वाटू शकेल. पण तसं पाहता पूर्वापार 'ठराव' हेदेखील रीतसर सह्या असलेले व्यवहार स्वरूपाचेच होते, त्याचाच हा विस्तार असला तरी सुरुवातीलाच विच्छेदाची पूर्वतयारी करणे, हे पारंपरिक मानसिकतेला 'शुभ बोल नाऱ्या' स्वरूपाचं  वाटणं साहजिक आहे. मात्र विवाहसंस्थेच्या भवितव्यासाठी जोडीदारांचा परस्परांबरोबरचा व्यवहार, त्यातल्या त्यात सुरळीत राहण्यासाठी, विवाहसंस्था काळाबरोबर बदलत जाणे, हे क्रमप्राप्त असतं आणि तशी ती सतत बदलते आहेच, हे आपल्या लहानपणचे विवाह-संसार आठवले तर ताबडतोब पटेल. बाकी या विषयाला एवढे पैलू आहेत की, तो एका पुस्तकाचा विषय व्हावा. शब्दमर्यादेत, केवळ आर्थिक पैलूला, तोही चुटपुटता स्पर्श करून आणि विवाहसंस्था व काळ या युगुलाला 'नांदा सौख्यभरे' अशा शुभेच्छा देऊन इथेच थांबतो.

 

satishstambe@gmail.com

 

 

बातम्या आणखी आहेत...