आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लेखकाने झगडावे, झगडत लिहावे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

समकालीन मराठी साहित्यातच नव्हे तर भारतीय साहित्यातही श्याम मनोहर या नावाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्या साहित्यातून अतिसामान्य माणसांपासून असामान्य माणसांपर्यंतच्या जगण्याचा समग्र वेध घेत मानवी जगण्याचे नवनवे संदर्भ शोधत राहणे व त्यासाठी साहित्यनिर्मितीच्या अनेकविध पद्धती शोधून काढणे यात ते कायम गढलेले असतात. बडोदा (गुजरात) येथे होऊ घातलेल्या ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात श्याम मनोहर यांचा सत्कार आयोजित करण्यात आला आहे. शिवाय त्यांच्या ‘प्रेम आणि खूप खूप नंतर’ आणि ‘लोचना आणि आलोचना’ या दोन पुस्तकांचं प्रकाशनही होणार आहे. त्यानिमित्तानं वाचन संस्कार, मराठी साहित्यात लेखकाला अनुभवास येणारे अंतर्बाह्य दबाव, अभिव्यक्तीची होणारी आणि स्वत:हून लादून घेतली जाणारी गळचेपी याविषयीचं त्यांचं हे प्रकट चिंतन. 


असं म्हटलं जातं, की महाराष्ट्रात नाटकाची, कवितेची दीर्घ परंपरा आहे. कादंबरी, ही त्या मानानं नवागत आहे. तिची परंपरा आहे, असं काही ठामपणे बोललं जात नाही. माझं असं निरीक्षण, एक कच्चा सिद्धांत आहे म्हणा की, मराठीत कथात्म वाङ््मयाची म्हणजेच कादंबरी, कविता, नाटक इत्यादींची परंपरा नाही, तर इतिहास आहे. माझं त्यावरचं असं म्हणणं आहे की गावोगावी सुंदर समृद्ध अशी वाचनालये हवीत. जिथे मराठीतल्या पहिल्या पुस्तकापासून आताच्या पुस्तकांनी सर्व कपाटं भरलेली असतील आणि वाचकांना ती कळतील. एकूण मराठी कविता काय आहे, याचे इतिहास आहेत, कादंबरीचे इतिहास आहेत, कथेचे इतिहास आहेत. असे इतिहास, जर तिथे असले तर ते वाचकाच्या ध्यानात येईल. मग ते ती पुस्तकं बघू शकतील आणि त्यांतली कुठली वाचायची हे त्यांना कळू शकेल. अशा प्रकारे परंपरा व्हायला हवी आहे. वाचावे कसे, वाचनाची कौशल्ये काय याचीही वाचकांना जाण द्यायला हवी, असं मला वाटते. कादंबरीचे पॅरेग्राफ वाचायचे, संवाद वाचायचे, याचं वळण वाचकांना अजून पडायचेय. नाटक वाचायचं असेल, तर कंसात काही सूचना दिलेल्या असतात, त्याच्यावरनं काही कल्पना करावी लागते आणि मग पुढचा संवाद वाचला जातो. नंतर एका वाक्यापासनं दुसऱ्या वाक्यापर्यंत, एका पॅरेग्राफपासून दुसऱ्या पॅरेग्राफपर्यंत, काही तर्कशास्त्र वाचायचं आहे, अशावर भर देऊन वाचनाची कौशल्ये, यावर खूप संशोधन व्हायला हवे आणि ते वाचकापर्यंत पोहोचले पाहिजे. कथात्म साहित्य म्हणजे काय? याच्यामागे तत्त्वं काय असतात? त्याच्यामागे हेतू काय असतात? कादंबरी आहे, तर तिचा घाट काय असतो? रूप काय असतं? तिच्यात जी प्रकरणं पाडलेली असतात, तिच्यामागे काय योजना असते? ही जी रचनेची तत्त्वं आहेत, त्यामागे काय तत्त्व असतं? साहित्याचा मूळ हेतूच काय असतो? कशासाठी कविता लिहिली जाते? कादंबरीपेक्षा कविता कशी वेगळी असते? ती कविता का लिहिली जाते? असं तत्त्वज्ञानात्मक लिखाण खूप व्हायला हवं.  


आता समजा, पन्नास वर्षांपूर्वी कादंबरीचं तत्त्वज्ञान म्हणजे, कादंबरीची रचना, भाषा, लिहिण्याचा हेतू, याच्यासंबंधी एक पुस्तक प्रसिद्ध झालं आहे. नंतर लेखकाला ते वाचून वाटतं, की साहित्याचं तत्त्वज्ञान यानं असं लिहिलं आहे का? मग माझं असं असेल. तो बंड करतो. म्हणतो की, मी हे आता मोडणार आणि नव्यानं लिहिणार. मग काय होतं की, अशी नवीन कादंबरी आली, नवीन कविता आली, की त्याच्यावरनं परत तत्त्वज्ञानात्मक ग्रंथ तयार होतात. ते परत मोडले जातात. अशा पद्धतीने लेखकांनाही उत्तेजना मिळतं, आणि वाचनाच्या तत्त्वज्ञानाची परंपरा तयार होते. त्यांतून कथात्म साहित्याचे सतत ताजे संबंध निर्माण होत जातात. कथा, कादंबरी, नाटक, कविता अशा सगळ्यांची परीक्षणं होत राहिली पाहिजे. जुन्या कथात्म साहित्याचीही नव्यानं परीक्षणं व्हायला पाहिजे. काय लायकीची आहेत ती? त्यांत आता मला आवडेल असं काय आहे? असेल तर काय हवं? नसेल तर काय असायला हवं? त्यात काही कालातीत असतं का किंवा असू शकतं का? हा प्रश्न तरी सगळीकडे पसरायला हवा. त्यांतून परंपरा अधिक बळकट होतील. नुस्तीच पुस्तकातनं विधानं नाही करायची, तर ती सिद्ध करायला पाहिजेत. म्हणजेच आधी परंपरा तयार करणे, मग ती बळकट करणे, मग मोडणे, मग पुन्हा नव्यानं नवी परंपरा तयार करणे, अशी ही प्रक्रिया व्हायला हवी. त्यामुळे लेखकालाही असं वाटायला हवं, की कादंबरी इथपर्यंत प्रवास करून आली का? मग मला आता याच्यापुढे ती लिहायला हवी.  


कादंबरीत काय विशेषणं, क्रियाविशेषणं हवीत, कवितेत काय अलंकार हवेत, याचे नवे शोध लेखकानं लावायला पाहिजेत, जे वाचकाला चकित करू शकतील. वाचनीयतेसाठी लिखाणात उत्सुकता असायला हवी. तो माणसाचा गुणधर्म आहे. केवळ ‘उत्सुकता’ या एका शब्दावरदेखील ग्रंथ असायला हवेत. माझ्या डोक्यात असं आहे की कोणताही विषय फिक्शनसाठी असलाच पाहिजे. आपल्याकडे श्रेष्ठ हा शब्द सर्रास कशासाठीही आणि कोणासाठीही वापरला जातो. तसंच कोणालाही जेष्ठ लेखक, ज्येष्ठ गायक, ज्येष्ठ नाटककार म्हटलं जातं. ज्येष्ठ म्हणजे श्रेष्ठ असंच मानलं जातं. मला स्वतःला असं वाटतं की लेखक तरुण असो वा म्हातारा असो, त्याला ज्येष्ठ किंवा कनिष्ठ अशी विशेषणं लावण्याची गरजच नाही. या ‘श्रेष्ठ’ शब्दावर तत्त्वज्ञानात्मक ग्रंथ तयार करून त्यांत श्रेष्ठत्वाची सखोल सर्वंकष चर्चा व्हायला हवी. त्यावरची प्रमेये बनायला हवीत. पद्धती लिहिल्या गेल्या पाहिजेत. या सोबतच ‘प्रतिभावंत’ हा शब्दही सरसकट वापरला जातो. पण या देशातील तीन प्रतिभावंतांची नावे सांगा असं म्हटलं तर मात्र ती कोणाला सांगता येत नाही. कारण प्रतिभावंत शब्दाचा अर्थच कोणाला माहीत नसतो. 


मी फार वर्षांपूर्वी गणिती रामानुजन यांच्याविषयीचं एक पुस्तक वाचलं होतं. जी. एच. हार्डी या केंब्रिज विद्यापीठाच्या गणितज्ञानं ते पुस्तक लिहिलं आहे. त्यांत ते म्हणतात, की रामानुजन हे कालातीत प्रतिभावंत आहेत. त्यांत त्यांनी प्रतिभावंत म्हणजे, काय आणि कोणाला म्हणायचं याची चिकित्सा केली आहे. त्याविषयीचा काही भाग माझ्या नूतन प्रकाशित ‘प्रेम आणि खूप खूप नंतर’ या कादंबरीत आला आहे. रामानुजन यांनी आयुष्यभर फक्त गणितातच काम केलं. कारण तेच त्यांना येत होतं. ते केवळ गणितच जगले. म्हणजे, इतकी जर तुमच्या आत पॅशन असेल, तर तेच करायचं. शिल्पकलेची पॅशन असेल तर ते करावं. लिखाणाची पॅशन असेल तर ते करावं. ‘प्रेम आणि खूप खूप नंतर’ या कादंबरीतलं एक पात्र म्हणतं की, ‘सर्व चांगले लेखक, कवी, कलावंत, तत्त्वज्ञ नोकऱ्या करून निर्मिती करताहेत. एकही लेखक, कवी, कलावंत, तत्त्वज्ञ पूर्ण वेळ निर्मिती करून जगू शकेल, अशी स्थिती पंतप्रधान देशात निर्माण करू शकले नाहीत, हे पंतप्रधानांचे फेल्युअर आहे. करमणूक करणारे कलावंतच फक्त पूर्ण वेळ कलावंत आहेत. सर्व शास्त्रज्ञांना तंत्रज्ञ बनवले गेलेय, किंबहुना तंत्रज्ञांनाच शास्त्रज्ञ म्हणायची पद्धत पडलीय. सृष्टिरहस्याचा वेध घेणे, जीवनाचा अर्थ शोधणे, माणूस काय आहे, हे शोधणे ही माणसाची मूळ कुतूहले नष्ट झालीत. हे सर्व धोकादायक आहे.’ आता याचा निर्मितीशी संबंध आहे.  


पण कोणताही काळ, मला वाटतं की निर्मितीसाठी कधीही चांगलाच असतो. अडचणी असो, नसो लेखकानं आपली निर्मिती सोडू नये. रुढींमुळे किंवा राजकीय कारणांमुळे बाहेरुन सेन्सॉरशिप येते. लेखकाची स्वतःचीच एक सेन्सॉरशिप असते. त्याने पण अडचणी येतात. तर या दोन्ही सेन्सॉरशिपमधून मार्ग काढायचा. आतही काम करायचं आणि बाहेरही काम करायचं. आतल्या सेन्सॉरशिपशी झगडत आधी निर्मिती करायची. बाहेरचं वातावरण कठोर असेल तर तुम्ही केलेली निर्मिती राहू द्या तशीच. तुम्हाला झगडता येत असेल त्याच्याविरुद्ध तर नक्की झगडा. पण झगडता येत नसेल तर निदान निर्मिती तरी करून ठेवा. इतिहासात अशी अनेक उदाहरणं आहेत की निर्मिती करून ठेवली आहे, जी नंतर प्रकाशित झाली किंवा निर्मिती केलेली आहे, प्रकाशितही झाली पण वाचकांच्या लक्षात येत नाहीय. 


त्याचं दुःख होत असेल तर माणूस म्हणून लेखक रडू शकतो. रडायला लाजायची काही गरज नाही. खंत वाटणार आहे पण त्यामुळे निर्मिती थांबायला नको. ही आतली ताकद पाहिजे व निर्मितीच्या आधी पाहिजे. आपल्या निर्मितीवर आपली व्यक्तिगत सेन्सॉरशिप नको. वाट्टेल ती परिस्थिती आली तरी निर्मिती चालू राहायलाच हवी. त्याच वेळी श्रेष्ठ निर्मिती म्हणजे काय याची सतत चर्चा चालू राहिली पाहिजे. कठोरपणे चर्चा झाली पाहिजे. तुमची निर्मिती कशी होते त्याचीही चर्चा व्हायला हवी. लेखक अडून बसलाय एखादं वाक्य लिहिण्यासाठी तीन तीन महिने, ही गोष्टदेखील लोकांना समजायला हवी किंवा नाही मी तडजोड केली, यासाठी केली, तेही समाजात पसरायला हवं. खरंतर निर्मितीसंबंधीच्या अशा गोष्टी, आतल्या सेन्सॉरशिपचा आणि बाहेरच्या सेन्सॉरशिपचा लेखकाला नक्की काय त्रास होतो, हे सारं यायला पाहिजे, पसरायला पाहिजे समाजात. जेव्हा असं मोठ्या प्रमाणात घडेल तेव्हाच मराठीच्या परिघात लिखाणाची-वाचनाची परंपरा तयार व्हायला सुरुवात होईल. 


- श्याम मनोहर 
- शब्दांकन : प्रतीक पुरी

pratikpuri22@gmail.com
लेखकाचा संपर्क - ०२०-२४२२ ४६०२ 

बातम्या आणखी आहेत...