लबाडाघरचे आवतण
एकीकडे आत्मप्रेमात आकंठ बुडालेला, स्वत: सोडून सगळं जग ‘कचरा’ समजणारा अमेरिकेचा हेकेखोर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प, तर दुसरीकड
-
एकीकडे आत्मप्रेमात आकंठ बुडालेला, स्वत: सोडून सगळं जग ‘कचरा’ समजणारा अमेरिकेचा हेकेखोर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प, तर दुसरीकडे क्षेपणास्त्रांची चाचणी घेऊन छद्मीपणे हसत सुटलेला बालिश चेहऱ्याचा पण, माथेफिरू भासावा असा उ. कोरियाचा राष्ट्राध्यक्ष किम जोंग उन. दोघांमध्ये सध्या ‘माइंड गेम’ चाललेला आहे. जग श्वास रोखून या दोन चक्रमादित्यांच्या १२ जून रोजी सिंगापूर इथे होणाऱ्या ऐतिहासिक बैठकीकडे डोळे लावून आहे. यात सगळ्यात मोठी धास्ती आहे ती अमेरिकेला. कारण उ.कोरिया आणि त्याचा ढगळ अवतारातला राष्ट्रप्रमुख हे जगावर ओवाळून टाकलेल्या द्वाड पोरासारखे आहेत. त्यात चीन, रशिया, पाकिस्तान हे महाउपद्व्यापी देश किमला सातत्याने आतून रसद पुरवताहेत, या सगळ्यांना शांत करायचे म्हटल्यावर आर्थिकदृष्ट्या गाळात गेलेल्या किम जोंगला स्वत:चा फायदा पाहून आवतण देण्यावाचून सध्या तरी अमेरिकेकडे पर्याय नाही. त्या निमित्ताने विक्षिप्तवीर किमचा आणि पोलादी पडद्याआड राहिलेल्या उत्तर कोरियाचा हा खास वेध...
सध्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन यांच्या भेटीच्या बातम्यांकडे जग लक्ष देऊन आहे. त्याहीपेक्षा जगाला धक्का बसलाय, तोे अनेक वर्षांचे हाडवैर विसरून उत्तर आणि दक्षिण कोरियाचे सत्ताधारी किम जोंग उन आणि मून जे इन भेटल्याने. ही भेट आनंदी वातावरणात झाली. दोन्ही देशांना झालेल्या उपरतीचे जगभर पडसाद उमटले.
उ. कोरियाचा हुकुमशहा किमने द. कोरियाच्या मून यांना आमंत्रण देताना, हवाई मार्गाने यायला सांगितले, कारण काय तर ‘आमचे रस्ते बदहाल आहेत. वीजेचा पत्ता नाही.' स्वभावाने विक्षिप्त मानल्या जाणाऱ्या किमने या प्रकारे वास्तवाचाच स्वीकार केला आणि एक प्रकारे हे उ. कोरियाच्या मुळावर येणारे वास्तवच भेटीमागे आहे. म्हणजे असे की, वर्षानुवर्षे अणवस्त्रे तयार करण्यावर देशाचे लक्ष एकवटल्याने उत्तर कोरिया विकासात कैक योजने पिछाडीवर राहिलाच, पण आता मंदीचे संकट आल्याने देश गाळात रुतून बसल्यासारखा झालाय. पण मग असे असताना या देशाने आपले लक्ष लष्करी सामर्थ्यावर का केंद्रित केले? नागरिकांची पोटं मारून अब्जावधी रक्कम केवळ अणवस्त्रांवर आणि लष्करी सज्जतेवर का केंद्रित केली? तर त्याचे उत्तर इतिहासात आहे.
दुसरे महायुद्ध संपल्यावर जपानच्या ताब्यात असलेला कोरिया स्वतंत्र झाला. पण उत्तर कोरियावर रशियाने प्रभाव राखला, दक्षिण कोरियाला अमेरिकेने पाठबळ दिले. त्या संघर्षात अमेरिका-रशिया स्वतःलाच पूर्ण प्रदेशाचा मालक समजू लागल्याने, त्यांच्यात २५ जून १९५० मध्ये युद्ध पेटले .अमेरिकेने त्यात दक्षिण कोरियाच्या बाजूने प्रचंड नरसंहार केला. मग शांतिकरार झाल्यावर दोन्ही राष्ट्रात प्रचंड बंदोवस्त असलेली सीमा आखण्यात आली आणि किम सुंग म्हणजे,आताच्या किमचे आजोबा राष्ट्राध्यक्ष बनले. त्यांनी स्टॅलिनिस्ट पद्धतीचे साम्यवादी सरकार आणले. या सरकारचे सर्वोच्च प्राधान्य लष्कराला आणि लष्करी सामर्थ्य वाढवण्याला होते. त्यामुळे आजही जेमतेम ३ कोटीच्या आसपास लोकसंख्या असलेल्या या देशात १२-१३ लाखांचे सज्ज सैन्य आहे. म्हणजे, हे जगातले जवळपास चौथे-पाचव्या क्रमांकाचे सैन्यदल आहे. या दलाची एकूण संख्या राजधानी असलेल्या प्योनग्वांग शहराच्या लोकसंख्येपेक्षा मोठी आहे. किम सुंगचा नातू म्हणजेच आताचा हुकुमशहा त्यांची गादी तितक्याच आक्रमकपणे चालवतो आहे.
परिणामी, एकीकडे शीतयुद्ध संपले आहे असे वाटत असतानाच किमच्या उ. कोरियाने जगासमोर एक नवे आव्हान उभे केले. ते होते,अणूयुद्धाचे. हिरोशिमा- नागासाकीवर बॉम्ब टाकल्यावर, नंतर कधी अणुबॉम्बचा वापर झाला नाही, पण त्यानंतर बनवले गेलेले अणुबॉम्ब शेकडो पटीने अधिक संहार करू शकतात. अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स इतकेच काय पण भारत, पाक या देशांकडे या घडीला अणुबॉम्ब आहे. पण हे देश काही एक अंतरराष्ट्रीय संकेत नियम मानणारे आहेत. त्यामुळे एका बाजूला धास्तावलेले चित्र निर्माण होऊनही जग आता आतापर्यंत बऱ्यापैकी नियंत्रणाखाली होते. मात्र तिकडे अमेरिकेत ट्रम्प नावाचे धंदेवाईक गृहस्थ राष्ट्राध्यक्ष झाले. निवडून आल्यावर यांनी उत्तर कोरियाविरुद्ध ‘प्रिव्हेन्टिव्ह वॉर’ची घोषणा केली. याला कोरियाने उत्तर दिले, ते आंतरखंडीय क्षमतेच्या क्षेपणास्त्राने. कोरियाने ४ जुलै २०१७ रोजी या क्षेपणास्त्रांची चाचणी घेतली. त्याला उत्तर म्हणून अमेरिकेने कडक निर्बंध जरी केले. तिथूनच खेळ बिघडायला सुरुवात झाली.
तसे पाहता, उत्तर कोरिया हे एक गूढ राष्ट्र आहे. त्याचे राजदूतावास, अगदी अमेरिकेतही नाहीत. त्या देशात कोण पत्रकाराला किंवा प्रवाश्यास सहजासहजी जाऊ दिले जात नाही.मागे न्यू यॉर्कर या नावाजलेल्या साप्ताहिकाचे पत्रकार इवान ओस्नोस यांनी त्या देशाचा दौरा केला. त्यात त्यांनी केलेली निरीक्षणे आण्विक युद्धाची चाहूल देणारी होती. हा एक अतिसावध देश आहे, त्या देशाचे प्रतिनिधी जेव्हा बाहेर काम करत, तेव्हा त्यांना जोडीने काम करावे लागते. जेणेकरून एकाने हेरगिरी करू नये म्हणून किंवा फितूर होऊ नये म्हणून. अमेरिकेत या प्रकारे दोन अधिकारी काम करत त्याला ‘न्यूयॉर्क चॅनेल’ असे नाव होते. अनेक किचकट राजनैतिक विषय या चॅनेलतर्फे हाताळले जात. इवान यांनी त्या चॅनेलशी संपर्क करून त्यांना कोरियाची राजधानी प्योनग्वांग भेट द्यायची आहे, असे सांगितले. अनेक दिवसाच्या प्रतीक्षेनंतर त्यांना ही परवानगी मिळाली.
साधारणपणे कुठल्याही हुकुमशाही देशातल्याप्रमाणेच उ.कोरियात जागोजागी (आणि ६० वर्षे वय ओलांडलेल्या प्रत्येक नागरिकांच्या छातीवरही)राष्ट्राध्यक्षाचे फोटो आढळतातच. पण अगदी शाळांमधूनही मुलांना अमेरिकेपासून आपल्याला धोका आहे, हे बिंबवण्यात येते. त्यालाही एक इतिहास आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर १९५०मध्ये दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरियाचे युद्ध झाले, त्यात ४० लाख सैनिक मारले गेले. अमेरिका तेव्हापासून दक्षिण कोरियाच्या बाजूने होती आणि आजही आहे. दक्षिण कोरियात अमेरिकेचा सैनिकी तळ आहे, ज्यात अमेरिकेचे दोन लाख सैनिक आहेत, आणि जपानमध्ये ४० हजार. ही दोन्ही ठिकाणे अर्थातच उत्तर कोरियापासून जवळ आहेत. तेव्हापासून दुखावल्या गेलेल्या उत्तर कोरियाने अमेरिकेशी वैरभाव कायम ठेवला. जशास तसे उत्तर म्हणून अणुबॉम्ब बनवण्याचे प्रयत्न चालू ठेवले. ऐंशीच्या दशकात सोविएत रशियाचे विभाजन झाल्यावर अनेक शास्त्रज्ञांनी उत्तर कोरियाची वाट धरली. या प्रकाराने उ. कोरियाला अधिकच बळ मिळाले.
मात्र, कोरियाचा अणुप्रकल्प खूप मंद गतीने चालू आहे, त्याला अणुबॉम्ब बनवायला २०२० किंवा कदाचित २०२२ साल उजाडावे लागले, असे अमेरिकन हेरखाते सांगत राहिले, प्रत्यक्षात २०१७ मध्येच दीर्घ पल्ल्याच्या आयसीबीएम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी कोरियाने केली, पण पुढे दोनच महिन्यात अण्वस्त्र चाचणीही घेतली, हा अणुबॉम्ब हिरोशिमावर टाकल्या गेलेल्या बॉम्बपेक्षाही भीषण शक्ती असलेला बाँब होता. उ. कोरियाच्या या आगळिकीने जग सटपटले. महासत्तांनी थयथयाट केला. अपेक्षेप्रमाणे अमेरिकेने आणि संयुक्त राष्ट्रसंघाने इंधन, लोह, कोळसा आणि अनेक जीवनोपयोगी वस्तू कोरियात आयात करण्यावर निर्बंध आणले. हे जेव्हा घडत होते, तेव्हा एकीकडे उत्तर कोरियात दुष्काळसदृश स्थिती होती. तर दुसरीकडे हे निर्बंध. हे सारे किम जोंग उनच्या दु:साहसातून घडले. पण हे दु:साहस केवळ वेडाचारातून आलेले नव्हते तर त्यामागे लष्करी-राजकीय डावपेच होते.
सध्याचा हा गबदूल राष्ट्राध्यक्ष वडील किंवा आजोबांप्रमाणे कधीच सैन्यात नव्हता. त्याचे शिक्षण स्वित्झर्लंडमध्ये झाले. तिथल्या मुलांना तो कोण हे कळू नये, म्हणून त्याचे त्यावेळी पॅक उन असे नाव बदलण्यात आले. तो राजदूतावासातल्या अधिकाऱ्यांचा मुलगा आहे, असे तिथे मुलांना सांगितले गेले. शिकत असताना एका परिचयाच्या महिलेकडे तो राहत असे. हा किम लहानपणापासून हट्टी होता. त्याचा स्वभाव एकलकोंडा होता. त्यामुळे तो इतरांच्यात मिसळत नसे, की त्यांच्याशी फारसा बोलत नसे. आज याच एकलकोंड्या पण धोकादायक अध्यक्षाकडे उ. कोरियाच्या जनतेने युद्धाचे सारे अधिकार सोपवले आहेत. (ते ‘सुप्रीम’ असा शब्द वापरतात.)
किम सोंग उन हा खरे तर किम सोंग-२ यांच्या सात मुलांपैकी शेवटून दुसरा. किम सोंग २ यांना २०११ मध्ये हृदयविकाराचा झटका आला. आपला तारणहार गेला म्हटल्यावर कित्येक दिवस शोक पाळण्यात आला. रस्तोरस्ती नागरिकांनी ओक्साबोक्शी रडून आपल्या संवेदना प्रकट केल्या. अंत्ययात्रेच्या वेळी किमसुद्धा रडत होता. पण कमकूवत भासणाऱ्या या वारसाने नंतर काही दिवसांतच गुप्तहेर यंत्रणा प्रमुख आणि इतर अधिकारी यांच्याबरोबर बैठक घेऊन सत्ता ताब्यात घेतली. सत्तेआड येणाऱ्या अनेक नातेवाइकांना त्याने ठार केले. तीन अधिकाऱ्यांना सोबत घेऊन त्याने देशाचे गाडे हाकायला सुरु केली. तेव्हा तो फार काळ टिकू शकणार नाही, कदाचित जेरबंद होईल आणि इतर अधिकारी सत्ता ताब्यात घेतील, असे अमेरिकी तज्ज्ञांनी जाहीर केले, पण सारी भाकिते त्याने खोटी ठरवली.
मधल्या काळात कोरियाने अण्वस्त्रे बनवली आणि क्षेपणास्त्रांचे तंत्रज्ञानही मिळवले. आता जवळपास शिकागो शहरापर्यंत पोहोचतील अशी क्षेपणास्त्रे त्यांच्याकडे आहेत. दोन्ही तंत्रज्ञान एकत्र करून यशस्वी करायला फार जड जाणार नाही. त्यामुळे आता निर्बंध घालण्याबरोबरच बचावाची तयारीही बलाढ्य अमेरिका करते आहे. ज्यात क्षेपणास्त्र परतवणे इथपासून तो सायबर हॅकिंगपर्यंत आणि बाबापुता करून किमला ट्रम्पबरोबर चर्चेला बसवणे असे अनेक मार्ग आहेत. खरं तर अगदी वीस वर्षापासून कोरियाच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला पायबंद घालण्याचे अमेरिकेचे प्रयत्न चालू आहेत. क्लिंटन यांच्या कारकीर्दीत दोन्ही देशात यशस्वी बोलणी झाली होती आणि कोरियाने आपला कार्यक्रमही थांबवला होता. बुश यांच्या काळात बोलणी होऊन सहा वर्षे अण्वस्त्र कार्यक्रम स्थगितीचा करार करण्यात आला, पण कोरिया तो पाळत नाही असे लक्षात आल्यावर तो बारगळला. दरम्यान अणुभट्टी उध्वस्त करावी, किंवा कोरियावर थेट हल्ला करावा,अशा अनेक मार्गांचा विचार झाला. मुळात कोरियात कुणाला सहजी प्रवेश नसल्यामुळे आणि तो एक बंदिस्त समाजव्यवस्था असल्याने, तिथली माहिती मिळवणे कठीण होते, त्यामुळेच भट्टी उध्वस्त करणे किवा हल्ला करणे दोन्ही मार्ग टाळले गेले आहेत.
चर्चा आणि वाटाघाटी करून आणि मदतीचा हात देऊन कोरियाचे मन वळवणे शक्य आहेे का? याचे उत्तर अमेरिकन तज्ज्ञ या क्षणी तरी नकारार्थी देतात, याचे कारण लिबियाच्या कर्नल गदाफीशी अशाच वाटाघाटी करण्यात आल्या, आणि त्याने आपली रासायनिक, आणि इतर शास्त्रे शरणागतीत नष्ट केल्यावरही अमेरिका आणि नाटोने त्याची सत्ता उलथून टाकली, त्याला ठार केले. या पार्श्वभूमीवर आता किम जोंगने अमेरिकेसमोर आव्हान उभे केले आहे. आश्चर्यकारकरित्या आपला सूर आणि नूर बदलला आहे, याचे कारण देशाची ढासळती आर्थिक स्थिती. शेजारच्या चीन आणि रशिया यासारख्या साम्यवादी देशांनाही आपले धोरण बदलावे लागले, यानेही किम सावध झाला आहे. नुकत्याच किमने केलेल्या दक्षिण कोरियाच्या दौऱ्यात असे आढळले की, किम यांनी सारी प्रश्नांची उत्तरे स्वत: कोणालाही न विचारता दिली. एकूणच पत्रकारांना आणि निरीक्षकांना तोे प्रगल्भ झाल्याचे वाटले.
पुढे जाऊन पत्रकारांच्या उपस्थितीत त्यांनी अणवस्त्रेही नष्ट केली. पुढची पायरी ट्रम्प भेटीची आहे. ट्रम्प हा ट्रान्झॅक्शनल वृत्तीचा नेता आहे. त्याच्यासाठी लोकशाही, राष्ट्र यापेक्षा व्यवहार, तोही फायद्याचा व्यवहार सर्वोच्च आहे. समोर उपद्व्यापी किम आहे, म्हणून हे ट्रम्प महाशय सूट द्यायचे नाहीत. अशा वेळी ट्रम्प, किम जोंग उन आणि त्याच्या देशाला किती शिताफीने जागतिक बाजारपेठेच्या जाळ्यात अडकवतात, अडकवताना किती शिताफीने त्याला नि:शस्त्र करत जातात, यावर आंतरराष्ट्रीय राजकारण अवलंबून असणार आहे. अशा रितीने एक विक्षिप्तवीर दुसऱ्या विक्षिप्ताकडून किंमत वसूल करत असल्याचे चित्र जग श्वास रोखून या घटकेला अनुभवते आहे. म्हटले तर हे एका लबाडाने दुसऱ्या लबाडाला दिलेले आवतणही आहे. यात जगाचा फायदा होईल हे केवळ गृहितक आहे.सिक्रेट हुकुमशहा
पाक-उन या भलत्याच नावाने किमचे स्वित्झर्लंडमध्ये शिक्षण झाले. त्या काळात तो एकलकोंडा विद्यार्थी म्हणून ओळखला जायचा. त्यावेळी अमेरिकन कल्चरचा त्याच्यावर प्रभाव होता आणि पॉप रॉक संगीताचेही त्याला आकर्षण होते. तासनतास तो अमेरिकन बास्केटबॉलपटू मायकेल जॉर्डनची रेखाचित्रे काढत घालवत असे.त्याला कॉम्पुयटर गेमचेही वेड होते. २०१३मध्ये किमने अमेरिकन एनबीए टीमचा प्रसिद्ध कृष्णवर्णीय खेळाडू डेनिस रोडमॅन याला आमंत्रित केले. एका बेटावर त्याने डेनिसला ठेऊन त्याची सरबराई केली. डेनिस रोडमॅनचे म्हणणे असे की त्याने २०१७ ला किमला वाढदिवसाला ट्रम्प यांचे आर्ट ऑफ डिल हे पुस्तक भेट दिले आणि त्याचे ट्रम्पबद्दल मत बदलले. अनेक हुुकुमशहांप्रमाणे किमचा स्वभावही पॅरानॉईड म्हणजेच, सतत संशयी असण्याचा आणि सावध असण्याचा आहे. नुकत्याच झालेल्या दक्षिण कोरियाच्या दौऱ्यात किमने स्वतःसाठी टॉयलेट नेले होत. जेणेकरुन कुणालाही मलमूत्र परीक्षण करून त्याच्या आरोग्याचे निदान करता येऊ नये. याचसाठी तो ज्या वस्तूंना हात लावी,तो भाग त्याचे सहकारी सतत पुसून टाकत जेणेकरून हाताचे ठसे किंवा घाम वगैरेचा नमुना मागे राहू नये.पराकोटीचा दुस्वास
प्योंनग्वांग हे आशियातील सर्वात शांत शहर आहे. शहरात उंची कार क्वचितच दिसतात असे न्यूयॉर्करचा पत्रकार इवान ओस्नोस सांगतो, १९९४ च्या आसपास देशातील अन्न उत्पादन थांबले आणि जवळपास ३० लाख माणसे उपाशीपोटी मरण पावली. त्यानंतर अनेक नागरिकांनी चीनमध्ये आसरा घेतला.त्यानंतर अनेक नागरिकांनी पैसे मिळवण्यासाठी जोडधंदे सुरु केले. अनेक नागरिक नोकरी सांभाळत नुडल्स वगैरे विकून अतिरिक्त पैसे कमवू लागले. मात्र, आता चीन आणि रशियाकडून असलेल्या मदतीमुळे उत्तर कोरियाने गेल्या काही वर्षात वेगाने प्रगती केली. २०१६ मध्ये देशाचा राष्ट्रीय सकल उत्पन्न (जीडीपी)वाढीचा वेग ३.९ होता. हा गेल्या वीस वर्षातील सर्वोच्च वेग आहे. आता रस्त्यांवर आधुनिक फॅशनचे कपडे घालणारी मुलेमुली दिसतात. पण जीन्स दिसत नाही. कारण ती अमेरिकन आहे, आणि अमेरिकेबद्दल उ. कोरियाच्या नागरिकांमध्ये पराकोटीचा दुस्वास आहे...सर्वव्यापी प्रभाव
एक शाळेला भेट द्यायचे ओस्नोसने सांगताच त्याला तिथे एका अनाथ विद्यार्थ्यांच्या शाळेत नेण्यात आले. त्याला काय दिसले तर, काही काळापूर्वी राष्ट्राध्यक्ष किमने शाळेला भेट दिली होती. तेव्हा त्याने स्पर्श केलेल्या वस्तू तशाच ठेवण्यात आल्या होत्या. तो ज्या खुर्चीत बसला होता. ती खुर्ची आता चौकोनी काचेत जपून ठेवण्यात आली होती.आणि व्हरांड्यात जिथे त्याने फेरी मारली, तिथे त्याच्या पावलांवरून खुणा करण्यात आल्या होत्या. मुले तिथे त्या पाऊलखुणांवरून चालत जात आहे. शाळेत गेल्यावर दहा- अकरा वर्षाच्या विद्यार्थ्यांशी ओस्नोसचा संवाद झाला. तेव्हा प्रश्नोत्तराच्या कार्यक्रमात एका मुलाने विचारले, ‘अमेरिका आमच्याशी युद्ध छेडू का पाहत आहे आणि आमचा आण्विक कार्यक्रम थांबवण्याचा त्यांना काय अधिकार आहे?’- शशिकांत सावंत
shashibooks@gmail.com(लेखक संपर्क:९८२१७ ८५६१८)
-
-
-
-