आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘संपर्क फॉर - सत्ता’ संघस्टाइल !

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संस्कृतीरक्षणाच्या कृतीला चेहरामूल्य देऊन जोडीला विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आदी उपसंघटना जन्माला घालून धर्म रक्षणाचे आऊटसोर्सिंग केल्याने देवभोळ्या, अडाणी जनतेला संघाच्या राजकारणाचा आजवर जराही वास आला नाही. अनेक सुशिक्षित, उच्चविद्याविभूषितांना तर तो अजूनही येत नाही. तो तसा येत नाही, त्यामुळेच ‘संघ कधीही राजकारण करत नाही’ हे संघ धुरिणांचे म्हणणे अगदी सहज खपून जाते. प्रणव मुखर्जींना संघ शिक्षा वर्गाच्या समारोपाला आमंत्रण देण्याची कृती एका वर्गात अशीच खपून गेली आहे...

 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही संघटना तिच्या स्थापनेपासूनच राजकीय होती. किंबहुना, हिंदू संस्कृतीच्या नावाने हिंदुत्वाचा झंेडा खांद्यावर घेऊन सार्वजनिक होणे या कृतीतच राजकारण दडले होते. "सांस्कृतिक-सामाजिक प्रभाव टाकून राजकीय यशाकडे' हीच त्यावेळी संघाची भविष्यवेधी योजना होती. एरवी, केवळ संस्कृतीचे गुणगान करून, किंवा महारांगोळ्या घालून अखंड हिंदुस्थानचे स्वप्न कसे पूर्ण होणार होते? अगदी कालपरवापर्यत म्हणजे, वाजपेयी-अडवाणींपासून अमित शहापर्यंतच्या भाजप नेत्यांमध्ये निवडणुकांच्या अलिकडे-पलीकडे सरसंघचालकांशी झालेल्या ‘बंदद्वार’(हा खास संघाचा शब्द) चर्चेत काय शास्त्रीय संगीतावर आणि भारतीय साहित्यातल्या देशीवादावर विचारमंथन होत होते? नक्कीच नाही. 


त्याच प्रमाणे गुढी पाडव्याला शोभायात्रा काढणे, दसरा-दिवाळीत डोळे दिपवून टाकणाऱ्या रांगोळ्या काढणे, या सामान्यजनांसाठी केवळ सांस्कृतिक वा कलाविषयक घटना असतील, पण संघासाठी ती अंतिम सत्तेपर्यंत नेणारी एक राजकीय कृतीच होती. परंतु, संस्कृतीरक्षणाच्या कृतीला  चेहरामूल्य देऊन जोडीला विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आदी उपसंघटना जन्माला घालून धर्म रक्षणाचे आऊटसोर्सिंग केल्याने देवभोळ्या, अडाणी जनतेला संघाच्या राजकारणाचा आजवर जराही वास आला नाही. अनेक सुशिक्षित, उच्चविद्याविभूषितांना तर तो अजूनही येत नाही. तो तसा येत नाही, त्यामुळे ‘संघ कधीही राजकारण करत नाही’ हे संघधुरिणांचे म्हणणे अगदी सहज खपून जाते. त्यातही कुणी आरोप केले की, हे संघाचे धुरीण वनवासी कल्याण आश्रमापासून ईशान्येकडील राज्यात सुरु असलेल्या सामाजिक महाप्रकल्पांची यादीच सादर करतात.


 "संघ कधीही प्रतिक्रिया देत नाही, क्रिया करतो' हे विधान देवभोळ्या जनतेच्या मनावर बिंबवले जाते. संस्कृती रक्षणार्थ उतरलेली संघटना आहे म्हटल्यावर तिच्या मनात राजकारणाचे पाप असूच शकत नाही, यावर जनतेचा पक्का विश्वास बसतो. यामागेसुद्धा धर्म ही बाब पवित्रच असते, ही शतकांपासूनची धारणा काम करत असते. वस्तुत: लोकशाही व्यवस्थेत राजकारणाचे महत्व अनन्यसाधारण आहे. राजकारण हा सत्ता आणि व्यवस्था परिवर्तनाचा महत्वाचा मार्ग आहे. तो अवलंबण्यात पाप वाटावे, असे काहीही नाही. परंतु, या मार्गाबद्दल मध्यमवर्गीयांच्या मनात अजूनही एकप्रकारची अढी कायम आहे. अडचण म्हणजे,  संघाची सारी भिस्त याच "पापभिरु', "सत्शील' त्यातही मुख्यत: सवर्ण वर्गावर राहिली आहे. त्याला जिंकण्यासाठीच प्रारंभापासूनच संघाने सराईतपणे चेहऱ्यावर संस्कृतीकरणाचा, समाजकारणाचा मुखवटा चढवलेला आहे.
 
 
धार्मिक-सांस्कृतिक मुखवटा चढवून भारतीय राजकारणावर प्रभाव टाकणाऱ्या अशा या संघाने काँग्रेसी परंपरेतून पुढे येत आणि प्रसंगी सर्वोच्च नेतृत्वाला उपद्रवमूल्य दाखवत राष्ट्रपतीपद भूषवलेल्या प्रणव मुखर्जींना आमंत्रित करून आणखी एक राजकीय खेळी आपली सांस्कृतिक आयडेंटिटी कायम ठेवून पूर्ण तयारीनिशी खेळली आहे. ‘अखंड हिंदुस्थान’च्या स्वप्नाला आडवे जाणाऱ्या गांधी-नेहरूंपासून आजच्या राहुल गांधी-सोनिया गांधींपर्यंतच्या विरोधी विचारधारेच्या पक्षांना वेळोवेळी खिंडीत गाठण्याची संघ-भाजपाची क्षमता  इथे दिसली आहेच, पण काँग्रेसचे मानसिकदृष्ट्या खच्चीकरण करण्याचे, काँग्रेसला मानसिकदृष्ट्या अस्वस्थ करण्याचे संघ भाजपाचे डाव  इथे  काही प्रमाणात यशस्वी होताना दिसताहेत.


‘संपर्क फॉर समर्थन’ ही भाजपाची २०१९ लोकसभा निवडणूक नजरेपुढे ठेवून आखलेली प्रचारतंत्रात्मक योजना आहे. यात भाजपा नेते, कपिलदेव-सलमान खान-माधुरी दीक्षितपासून रतन टाटांपर्यंतच्या सेलेब्रिंटीना सदिच्छा भेटी देऊन मतदारांवर प्रभाव टाकताना दिसताहेत. परंतु  संघानेही समांतरपणे हे तंत्र अवलंबून थेट माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींना आपल्या दरबारी बोलवून मतदारांबरोबरच विरोधी पक्षांनाही संभ्रमित करण्याचे विहित कार्य पूर्ण केले आहे. संघ-भाजपच्या दुहेरी रणनीतीचाच हा भाग आहे. वरवर या कृतीला उदामतवादाचा, सहिष्णूतेचा मुलामा दिलेला असला तरीही प्रणव मुखर्जींना संघाने आमंत्रित करण्याचा निर्णय राजकीय गणिते नजरेपुढे ठेवूनच झालेला आहे. संघ उपराष्ट्रपती हमीद अन्सारींनाही बोलवू शकला असता, पण प्रतिकात्मकरित्या का होईना, मुस्लिम समाजाला सकारात्मक संदेश देण्यापेक्षा काँग्रेसला अंतर्बाह्य संपवण्याला भाजपाचे प्राधान्य आहे आणि त्याच प्राधान्यक्रमातून काँग्रेसी शिक्का असलेल्या प्रणव मुखर्जींच्या घरी आमंत्रण पोहोचले आहे.


मुखर्जी आणि काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्यांमधला दुरावा संघाने कधीच हेरला आहे.हा दुरावा राजीव गांधी यांच्या काळापासूनचा आहे. इंदिरा गांधींची हत्या झाल्यानंतर पंतप्रधानपदाच्या स्पर्धेत मुखर्जींचे नाव उधळले गेले होते. मात्र ते पद राजीव गांधींकडे गेले. नाराज मुखर्जींनी राष्ट्रीय समाजवादी काँग्रेसची स्थापन केली. तिथूनच मुखर्जी आणि गांधींमधला दुरावा वाढला. पुढे नरसिंह रावांनी मुखर्जींना पुन्हा मुख्य प्रवाहात आणले. आघाडीची सरकारे संपून पुन्हा काँग्रेसप्रणित यूपीएचे सरकार स्थापन झाले, पण दोन्ही टर्म डॉ. मनमोहन सिंगांकडेच पंतप्रधान राहिले. हा इतिहास पाहता, मुखर्जीच्या राष्ट्रपतीपदाच्या अखेरच्या काळात पंतप्रधान मोदींना ‘वडिलधाऱ्या’, ‘मार्गदर्शक’ प्रणवदांबद्दल उफाळून आलेले हे प्रेम हा नैसर्गिक भावदर्शनाचा भाग नाही, त्यात राजकारण अधिक प्रबळ आहे. त्यात पुन्हा घटनेच्या तत्वानुसार राष्ट्रपती हे पद पक्षविरहीत आहे. त्यामुळे संघाने कुणा पूर्वाश्रमीच्या पक्षीय नेत्याला नव्हे, राष्ट्रपतींना आवतण दिलेले आहे, हा घटनात्मक बचाव संघाकडे आहेच.


अर्थातच, या साऱ्याचा अपेक्षित परिणाम झालेला आहे. संघाच्या उचकावण्याला काँग्रेसचे काही आततायी नेते बळी पडले आहेत. संयम, सबुरी ही संघाची बलस्थाने आहेत. काँग्रेसकडे हे गुण असले तरीही या प्रकरणात खूपच कमी ते पडले आहेत. आधी जयराम रमेश, मग प्रणव मुखर्जींची कन्या शर्मिष्ठा मुखर्जी आणि अखेरीस मीडियाच्या म्हणण्यानुसार, सोनियांच्या सागण्यावरून अहमद पटेल यांनी प्रणव मुखर्जींच्या संघ भेटीवर नाराजी, संताप, उद्वेग व्यक्त केला आहे. थेट काँग्रेसमधूनच वाग्बाण आल्याने संघ-भाजपाचा एक उद्देश सफल झालेला आहे. काँग्रेस आणि प्रणव मुखर्जींमधली भगदाडे या निमित्ताने जनतेसमोर आली आहेत. याची पुढची पायरी, ‘कृतघ्न’ काँग्रेसने सरदार पटेल, आंबेडकर आदी नेत्यांप्रमाणेच प्रणवदांचाही कसा अपमान केला, अवहेलना केली, त्यांच्या निष्ठेचा अनादर केला हे पसरवण्याची आहे. काँग्रेसला पुरते बदनाम करण्यासाठी हाही मार्ग संघ भाजप अवलंबणार, हे सांगायला कुणा राजकीय विश्लेषकाची आवश्यकता नाही. काँग्रेसची अडचण ही आहे, मुखर्जींवर काँग्रेसचा शिक्का असला तरीही, मनाने ते कधीच उजवीकडे वळलेले आहेत. 
 
 
खरं तर राष्ट्रपतीपदावर राहिलेल्या माणसाला खालच्या पदाची अभिलाषा असण्याचे काही कारण नाही. पंतप्रधान हे पद सर्वात ताकदवान असले तरीही प्रणव मुखर्जींच्या बाबतीतही ते सध्याच्या राजकीय व्यवहारात संभवत नाही. पण सोनिया, राहुल, चिदंबरम आदींविषयीची अढी मुखर्जींच्या मनातून पूर्ण गेलेली नाही. संघाने दिलेले निमंत्रण त्यांनी स्वीकारणे नेमके हेच सुचित करते आहे.


अर्थातच संघाने फासे टाकले म्हणून मुखर्जींसारखा सहा दशकांहून अधिक काळ राजकारणात मुरलेला राजकारणी त्यात फसण्याची शक्यता नाही. त्यामुळे ते संघ आणि काँग्रेसच्या मनासारखा नव्हे तर स्वत:ला हवा तोच संदेश देतील हे स्पष्ट होते. काहीअंशी झालेही तसेच. मुखर्जींनी शिष्टाचाराला जागून (खरे तर खाल्ल्या मिठाला जागून) संघ निर्मात्यांचे गौरवगान केले आणि घटनेचा दाखला देऊन कोणत्याही व्यक्तीचा नामोल्लेख न करता भारतीयत्वाची सैद्धांतिक मांडणी केली. अशाने धर्म, संस्कृतीचे उघड राजकारण करणाऱ्यांच्या दारी जाऊनही जातीयवादाचे पाप त्यांच्या अंगाला चिकटले नाही आणि संघाच्या हातचे ते बाहुले बनल्याचा संदेशही जनतेत गेला नाही. पण अंतिमत: जे काही घडले, बहुतांशी संघ-भाजपाच्या मनासारखे घडले. काँग्रेसने आततायी होत प्रतिक्रिया दिलीच नसती तर कदाचित या घटनेला राष्ट्रीय महत्व आले नसते. जी टीव्ही चॅनेल्स २६ जानेवारी वगळता राष्ट्रपतींची दखल घेत नाहीत, आणि ज्या चॅनेल्सना विद्यमान राष्ट्रपतींमध्ये न्यूज व्हॅल्यू सापडत नाही, त्यांनी एका माजी राष्ट्रपतींचे भाषण लाइव्ह दाखवलेही नसते. गेल्या एक-दीड वर्षांपासून यशवंत सिन्हा, अरूण शौरी, शत्रुघ्न सिन्हा प्रभृति विरोधी पक्षांशी हातमिळवण करून थेट मोदी-शहांना लक्ष्य करताहेत, पण त्यांच्या कुठल्याच वक्तव्याबाबत संघ-भाजपाकडून शब्दाचीही प्रतिक्रिया आजवर आलेली नाही. खरे तर त्यांची केवळ एक प्रतिक्रिया विरोधकांच्या हाती कोलित देणारी ठरू शकते. इथेच काँग्रेसचे सटपटलेपण उघड झाले आहे.


या सगळ्या वादाच्या ढिगाऱ्यांवर मुखर्जींची कन्या शर्मिष्ठांचे विधान खऱ्या अर्थाने भविष्यवेधी म्हणता येईल, असे आहे. तिचे म्हणणे, मुखर्जींनी संघदरबारी केलेली विधाने विस्मरणात जातील, प्रतिमा तेवढी लक्षात राहील. अर्थातच ती लक्षात राहावी अशी नेपथ्य रचना इतर संघ-भाजपच्या इव्हेंटप्रमाणेच संघशिक्षा वर्गाच्या समारोपात केलेली होती. वर्तमानपत्रात जे काही फोटो छापून आलेत, त्यात प्रणव मुखर्जीं भाषण आणि सत्कारासाठी उभे आहेत. त्याच्याबरोबर पार्श्वभागी एका कोनातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यातले ‘स्वयंसेवक’ हा शब्द ठळकपणे दिसतो आहे. म्हणजे पुढे प्रणव मुखर्जी त्यांच्या पाठीमागे स्वयंसेवक हा शब्द. ही शब्द-प्रतिमांची रचना जितकी प्रणव मुखर्जींच्या विरोधकांना कामी येणार आहे, त्याहीपेक्षा अधिक ती संघ भाजपच्या उपयोगात येणार आहे.


या रचनेनुसार आयुष्यभर काँग्रेसी राजकारणाचे भाग असलेले प्रणव मुखर्जी "स्वयंसेवक मुखर्जी ठरणार आहे. नव्हे ते ठरलेच आहेत. संघ मुख्यालयातली भेट आटोपून मुखर्जी घरी परतण्याआधीच उजवा हात छातीला टेकवून "नमस्ते सदा वत्सले' म्हणणाऱ्या मुखर्जीचे फेक छायाचित्र सोशल मीडियात व्हायरल झाले आहे. प्रतिमेची ही ताकद आहे. फेक छायाचित्र कुणी तयार केले? भाजपच्या की काँग्रेसच्या आयटी सेलने, हा सवालच इथे बिनमहत्वाचा आहे. कारण, महत्व दारुगोळा पुरवण्याला आहे. तो व्यवस्थित पुरवला गेला आहे आणि कुणी तरी त्याचा स्फोट घडवून आणला आहे. स्फोट घडवून आणणारा कोण? हा सरळसरळ दिशाभूल करणारा प्रश्न आहे.

 

- शेखर देशमुख
divyamarathirasik@gmail.com

बातम्या आणखी आहेत...