आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्‍तास्‍थापनेसाठी निमंत्रण तर मिळू दे...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रामीण भागात लग्न जुळवायला उत्सुक शेजारी-पाजारी, नातेवाईक जसे असतात तसे एखाद्याचं जुळत आलेलं तोडायलाही टपून बसलेले लोक असतात. आपले आमदार सांभाळून सत्ता स्थापन करेपर्यंत राजकीय पक्षाची जी अवस्था असते तीच अवस्था लग्न ठरवताना नवरदेव आणि त्याच्या घरच्या लोकांची असते.


साधारणतः उन्हाळ्याची सुटी जशी लहानपणी मजेशीर       असते तशी ती तरुणपणीही असतेच. त्याच सुटीत वार्षिक निकाल लागत असतो. सुटी तर असतेच, शिवाय लग्नसराई असल्याने आपल्याला त्या त्या ठिकाणी सहकुटुंब जावं लागतं. तिथे काही नातेवाईक, जे सगळ्याच लोकांचे असतात, ते लहानपणी - काय झालं निकालाचं? किती टक्के मिळाले? पुढे काय करायचा विचार? असे प्रश्न हमखास विचारणारे असतात. तरुणपणी पैपाहुणे विचारतात ते प्रश्न असे असतात - काय बघायला सुरुवात केलीय काय? की कुठं बघून ठेवलीय? काय अपेक्षा? बायोडाटा- फोटो असला तर द्या. (बऱ्यापैकी लोक बायोडाटा-फोटो घेऊन फिरत असतातच) अशा प्रश्नांना उत्तरं देण्याची ही वेळ प्रत्येकाला येतेच. त्यातून सुटका नाही.
हे नातेवाईक, पाव्हणे, घरचे, शेजारचे, मित्रमैत्रिणी, अॉफिसातले मित्र अशा सगळ्या लोकांना आपल्या लग्नात रस असतो की ते डिवचत असतात हे कळत नाही.

 

आजघडीला लग्न ही स्वतःच्या जिवावर करण्याची गोष्ट राहिली नाही. ते मग ठरवून केलेलं किंवा प्रेमविवाह. या दोन्ही प्रकारांत आर्थिक, सामाजिक मदत लागतेच. खेड्यात सामाजिक मदत ही महत्त्वाची म्हणजेच गरजेची असते.
लग्नाबद्दल जोवर ती वेळ येत नाही तोवर आपल्या कल्पना वेगळ्या असतात आणि जेव्हा ती वेळ येते तेव्हा वास्तव वेगळं असतं.
आज बऱ्यापैकी प्रश्न असतो तो म्हणजे मुलाचं लग्न. मुलीचं लग्न हाही असेल, पण सामान्य पालकांना मुलीच्या लग्नापेक्षा मुलाचं लग्न अवघड वाटतं. आता सध्याच्या मार्केटमध्ये लग्नाच्या, १९९० आणि नंतर जन्मलेले लोक उतरलेत. या १९९०च्या आसपास लिंगभेद निवड प्रचंड झाल्याने लिंग गुणोत्तर असमान झालं, ते आजही सुधारत नाही. मुलांपेक्षा मुलींचं प्रमाण कमी.
त्याचबरोबर पूर्वी ग्रामीण भागातून शहराकडे नोकरी आणि इतर निमित्ताने होणारे स्थलांतर आज वाढले. दळणवळणाची साधनं वाढली असल्याने शहर आणि ग्रामीण हे अंतर तसं कमी झालं. शहरातील युवकाला असणाऱ्या समस्या, अडचणी ग्रामीण भागातही आहेत, अधिक सामाजिक अडचणीचा बोनस त्याला मिळतो.

 

सध्या शिक्षण सर्वदूर पोहोचलंय. रोजच्या जीवनात टीव्ही, मोबाइल याद्वारे सोशल मीडियातून विविध विचार सर्वांकडे पोहोचत असतात. सोशल मीडिया रुळण्याआधी आणि आताची जर परिस्थिती बघितली तर साहजिकच या गोष्टी लक्षात येतात. या सगळ्या गोष्टींचा परिणाम म्हणजे स्वतंत्र मत तयार होऊ लागलं. पूर्वी आईबाप म्हणेल ती बायको, म्हणेल तो नवरा, हे दिवस गेले. आता प्रत्येक मुलीच्या अपेक्षा असतात, तशाच मुलाच्या अपेक्षा असतात. मी नोकरी करतो, माझ्या बायकोने घर सांभाळावं. मी नोकरी करतोय, बायकोने जरी नोकरी केली तरी मला मदत होईल, वगैरे. पण मी घर सांभाळतो, बायको नोकरी करू दे, असं म्हणणारे कुणी सहसा दिसत नाहीत. बायकोच्या जिवावर जगतोय, असा शिक्का बसू शकतो, त्यामुळे बिचारी पोरं समाजाला घाबरून काही तरी उद्योग करत राहतात.
या सगळ्यापलीकडे जाऊन ग्रामीण भागातील तरुणांना वेगळ्या समस्येला सामोरं जावं लागतंय आणि त्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतच जातंय. परिणामी वय ३६-४० वर्षं झाली तरीही तो अजून मुलगी बघत असतो.
गेल्या काही वर्षांत शेती सहसा फायद्याची राहिली नाही, पण शेतीच्या नावाखाली किंवा आधाराखाली बरेच लोक शिक्षण घेऊ शकले नाहीत. हमीभाव ठरलेल्या पिकाचे पैसे जर व्यवस्थित मिळत नसले तर फायद्याचं गणित घालण्यात अर्थ राहत नाही.


मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातील एका मुलाचं लग्न जर व्यवस्थित पार पडायचं झालं तर, पाच एकर बागायती शेती (वैयक्तिक), नवऱ्या मुलाला किमान १० ते १२ हजारांची नोकरी, चारचाकी गाडी, सर्वसोयींनी युक्त घर, सामाजिक प्रतिष्ठा इ. गोष्टी त्याच्याकडे असणं आवश्यक आहे.
एवढी सुबत्ता प्रत्येकाकडे नाही. या वर्गात युवकांची संख्या भरपूर आढळून येते. आलेलं संकट ही काही लोकांना संधी असते, या उक्तीप्रमाणे काही टोळ्या सक्रिय झाल्या. विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात. या टोळ्यांना KA पासिंग टोळ्या म्हणतात. तर यांचं काम असं की, एक लाख ते चार लाखापर्यंत रक्कम घेऊन कर्नाटक भागातील मुलीशी लग्न लावून देणे. पर्याय नसल्यावर लोकही या टोळ्यांना प्रतिसाद देऊन वय सरण्याआधी लग्न उरकून घेऊ लागले. लग्न झालेल्या लोकांपैकी काहींचे संसार व्यवस्थित चालू आहेत, तर काहींच्या बायका पळून गेल्यात. त्या पळून जाण्याची भीती टाळण्यासाठी लाखाचे आकडे वाढवावे लागतात. ज्याची आर्थिक परिस्थिती असते तो करू शकतो.
चारेक दिवसांमागे सातारा जिल्ह्यातील युवकाने लग्न जमत नाही म्हणून आत्महत्या केली, अशी बातमी वाचली, बघितली. त्याच्यापुढेही वरच्या सगळ्या प्रश्नांची मालिका येऊन गेली असेलच. लग्न ठरत नसेल तर किंवा तुम्ही वधुसंशोधन करत असाल तरीही रोज जाईल तिथं तुम्हाला काय लग्नाचं कुठवर आलं? औंदा जमतंय काय? लाडू कधी देणार? हे असे प्रश्न येत राहतात. अगदी तुम्ही एखाद्या पाचसहा तासाच्या बस प्रवासात अनोळखी व्यक्तीबरोबर बसला असाल तरीही ती व्यक्ती गप्पा मारू लागल्यावर पहिल्या तासात ‘लग्न झालंय तुमचं?’ हा प्रश्न विचारू शकते. नाही विचारतेच. हा प्रश्न विचारला नसल्यास त्याच्यात सामाजिक बांधिलकी नसते असे समजावे.

 

या एवढ्या लोकांना तोंड देत हा बिचारा जगत शोधत असतो. जेव्हा या कार्यक्रमात मुलगा उतरतो तेव्हा तो अपेक्षित गोष्टींची यादी करतो. म्हणजे मुलगी रंगरूपाने अशी असावी, तिचा स्वभाव असा असावा, तिचं वागणं असं असावं, तिचं शिक्षण एवढं असावं, वगैरे. ही यादी ते ‘कशीही असली तरी चालेल’ इथवरचा प्रवास म्हणजे आजरोजीच्या वधुसंशोधनाची सुरुवात होय.
ग्रामीण भागात लग्न जुळवायला उत्सुक शेजारी-पाजारी, नातेवाईक जसे असतात तसे एखाद्याचं जुळत आलेलं तोडायलाही टपून बसलेले लोक असतात. आपले आमदार सांभाळून सत्ता स्थापन करेपर्यंत राजकीय पक्षाची जी अवस्था असते तीच अवस्था लग्न ठरवताना नवरदेव आणि त्याच्या घरच्या लोकांची असते.
या सगळ्या सीनमध्ये वधुपक्षाकडून होकार येणे म्हणजे सत्तास्थापनेला राज्यपालाचं निमंत्रण येणेच होय. एकदा होकार आला की, ते लग्न पार पडतं. त्याला काही वेगळी व्यवस्था लागत नाही.
लग्नात नवराबायको स्टेजवर असतात. म्हणजे जमिनीपासून वर असतात, लग्न झाल्यावरही ते तसेच काही दिवस जमिनीपासून वर असतात. हारातील सुगंधी फुलांचा वास तसाच दरवळत राहतो, आजूबाजूला स्टेजवरचे लोक जरा काही मागितलं तर आणून देत असतात. तेही थोडं दिवस चालतं. स्टेजवरून जमिनीवर येणे म्हणजे संसाराला सुरुवात.लग्न होणे हा प्रश्न होता म्हणून नोकरी धरली. आता पुढच्या लग्नाळू माणसाला ती जागा देणे हे कर्तव्य समजून तो नोकरी सोडतो. मग इकडे ही बिचारी माहेरला जाते. हा फोन करतो, कधी येणार? ती विचारते, तुम्ही नोकरीवर कधी जाणार? अशा रीतीने एक चक्र पुन्हा सुरू होतं.
एकंदरीत समाजाने, लग्नसंस्थेने पोरांना आणि त्याच्या घरच्या लोकांना बनावट वागायला भाग पाडले.


shreniknaradesn41@gmail.com

 

 

बातम्या आणखी आहेत...