आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उलट-सुलट: गलबलून टाकणारा नाट्यानुभव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सरकारच्या तिजोरीत कर आपण जमा करायचा आणि सरकारनं त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन टाकायची, हे कुठवर चालणार,’ असा कृतघ्नपणाचा सूर शहरी भागातून लावला जात होता. ते आत्महत्या करतात, तर त्यात आमचा काय दोष, असेही फेसबुक, व्हॉट्सअॅपच्या दुनियेतच राहणाऱ्यांकडून विचारले गेले होते. त्यावर केवळ टोकदारच नव्हे, तर हृदयाला घरे पाडणारे उत्तर सुयोग निर्मित ‘उलट सुलट’ नाटकातून मिळते...


‘काय मागतो हो आम्ही. तुम्हालाही मिळत असलेलं पाणी आणि वीज आम्हाला द्या, एवढंच तर म्हणतोय. बरं, पाणी अन् वीज मुबलक दिली तर जे काही पिकंल ते तुमच्याच पोरा-बाळांच्या पोटात पडणार आहे. तेही थोडं स्वस्तातच. अन् आम्ही जे पिकवू ते केवढ्यात विकायचं, हे ठरवायचा तरी आम्हाला अधिकार द्या’, असं दिनवाण्या स्वरात लाखो शेतकरी म्हणत होते. तेव्हा, ‘सरकारच्या तिजोरीत कर आपण जमा करायचा आणि सरकारनं त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन टाकायची, हे कुठवर चालणार,’ असा कृतघ्नपणाचा सूर शहरी भागातून लावला जात होता.  ते आत्महत्या करतात, तर त्यात आमचा काय दोष, असेही फेसबुक, व्हॉटस्अपच्या दुनियेत रममाण होणाऱ्यांकडून विचारले गेले होते. त्यावर केवळ टोकदारच नव्हे तर हृदयाला घरे पाडणारे उत्तर सुयोग निर्मित ‘उलट सुलट’ नाटकातून मिळते. 


केवळ बळीराजाची वेदना सांगण्यापुरते ते राहत नाही, तर त्यापुढे जाऊन ‘शायनिंग इंडिया’पेक्षा ‘भारत’ कसा वेगळा आहे, तो खरंच कोणत्या अवस्थेत जगतोय, अन् प्रत्येक भारतीय माणूस शेतकऱ्याला सहज मदत करताना सुखी, संपन्न कसा होऊ शकतो, हेही अतिशय सोप्या शब्दांत मांडल्यामुळे ‘उलट सुलट’ हे नाटक एका विलक्षण उंचीवर जाऊन पोहोचते. 


एका अर्थाने, ‘उलट-सुलट’ हे मराठी रंगभूमीला मिळालेले निर्णायक वळण आहे. कारण, ज्याच्या अपार कष्टामुळं आपल्याला अन्नधान्य मिळते त्याला त्याचा योग्य मोबदला देणार की नाही? चकचकित, थंडगार मॉलमधील भाज्या पिशव्यांत ठेवताना, या भाज्या उन्हा-तान्हात उभा राहून पिकवणाऱ्याला निसर्गाशी लढणाऱ्याला जगण्याचे बळ देणे आपले कर्तव्य आहे की नाही, असे महत्त्वाचे प्रश्न आता ऐरणीवर आले आहेत. स्वातंत्र्याला ७० वर्षे उलटून गेली तरी देशातील कोट्यवधी कोरडवाहू शेतकरी आजही दारिद्र्यात का जगत आहेत? त्यांची लढाई पूर्ण भारताची लढाई का होत नाही? त्यांच्या जीवावर मोठे गबरू झालेले पुढारी त्यांनाच मातीत का मिसळत आहेत? गरीब शेतकऱ्यांच्या नावाखाली सर्व फायदे लाटणाऱ्यांना बाजूला का सारले जात नाही? मुख्य म्हणजे, या साऱ्या जीवघेण्या प्रश्नांचे काही उत्तर आहे की नाही, हा सवाल देशभर वेगाने घोंगावू लागला आहे. काही संवेदनशील कलावंत, लेखक, सामाजिक कार्यकर्त्यांना बळीराजाच्या दुःखाने अस्वस्थ केले आहे. त्यावर त्यांनी थेट मैदानात उतरून शेतकऱ्यांना मदतीचा हातही देऊ केला आहे.  


त्याची सुरवात चार वर्षांपूर्वी प्रख्यात अभिनेते, मराठी चित्रपटसृष्टीचे सुपरस्टार मकरंद अनासपुरेने ‘नाम फाऊंडेशन’च्या माध्यमातून केली. जे काम सरकारतर्फे पन्नास वर्षांपूर्वी होणे अपेक्षित होते, ते ‘नाम फाऊंडेशन’ने केले. पण केवळ मुबलक पाणी उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न सुटणार नाहीत. तर कोट्यवधी छोट्या शेतकऱ्यांचे नेमके काय प्रश्न आहेत, हे शहरी लोकांना एक कलावंत म्हणून समजावून सांगणे गरजेचे होते. त्याचवेळी किरण मानेंनी लिहिलेल्या या नाटकाची संहिता मकरंद यांच्याकडे आली. त्यावर माने आणि मकरंद तसेच दिग्दर्शक कुमार सोहोनी यांनी अक्षरशः झपाटून जात काम केले. ‘नाम’च्या निमित्ताने वाड्या-तांड्यावरील शेतकऱ्यांच्या जाणून घेतलेल्या वेदनांचे प्रतिबिंबही आवश्यक त्या बदलांसह संहितेत उमटले. दिग्दर्शक सोहोनी यांनी संहितेतील शब्द न् शब्द परिणामकारकरित्या रंगमंचावर अविष्कृत केला.  


प्रस्तुत नाटक शेतकऱ्यांविषयी असले तरी ते प्रामुख्याने शहरी लोकच पाहणार आहेत. अशा प्रसंगी शेतकऱ्यांचे प्रश्न मध्यम, उच्च मध्यमवर्गापर्यंत पोहोचवणे हाच, हे नाटक उभे करण्यामागचा प्रमुख उद्देश आहे. ते साध्य करताना सादरीकरण एकतर्फी झाले, तर ते केवळ प्रचारकी थाटाचे होईल आणि त्यात व्यावसायिक मूल्य राहणार नाही, याची कल्पना मकरंद, किरण आणि सोहोनी यांना होतीच. त्यामुळे त्यांनी काही प्रसंगांत शेतकऱ्यांमधील त्रुटींकडेही लक्ष वेधले आहे. शिवाय पुढील काळात बळीराजाने काय करायला हवे, अशी अपेक्षा व्यक्त करताना तथाकथित शेतकरी नेत्यांवर आसूडही चालवला आहे. त्याच वेळी तमाम शहरी लोक शेतकऱ्यांचे शत्रूच आहेत, हा विषारी प्रचार योग्य नाही. वस्तुत: शेतीशी काहीही संबंध राहिला नसलेले लोकं शेतकऱ्यांसाठी त्याग करण्याची तयारी दाखवत आहेत, हेही या नाटकात आवर्जून, लक्षात येईल इतक्या ठळकपणे मांडले गेले आहे. म्हणून `उलट सुलट`चे कथानक ‘असं होणं कसं शक्य आहे,’ असे वाटत असतानाही गुंतवून ठेवतं आणि अखेरच्या टप्प्यात तर  गलबलूनही टाकते. 


मुंबईतील धनाढ्य वकील आणि अन्न-धान्य आयात करणाऱ्या कंपनीचा मालक असलेला अभय देशमुख (किरण माने) आणि त्याचा मित्र विश्वजित (समीर देशपांडे) सरकारी यंत्रणेचा वापर करून तूर डाळ आयात करतात. यामुळे लाखो शेतकऱ्यांचे जीवन उद्ध्वस्त होते. त्यात सदानंद मानूरकर या शेतकऱ्याची (मकरंद अनासपुरे) बायको आणि मुलगी विष पिऊन आत्महत्या करतात. अडीच एकरचा मालक सदानंद शेतीत काही खरं नाही, असं म्हणून मुंबईत टेंपो चालवण्याचं काम करू लागतो. एक दिवस देशमुखची बायको आणि दोन मुलं हायवेवर जात असताना त्यांची कार सदानंदच्या टेंपोला धडकते. अब्जाधीश देशमुखचं जीवन उद्ध्वस्त होतं. देशमुखच्या तूर डाळ आयातीमुळं आयुष्यातून उठलेला सदानंद आणि सदानंदच्याच टेंपोला कार धडकल्यामुळे बायको-मुलांना गमावलेला देशमुख यांचा आमना-सामना होतो. पुढं काय होतं? ज्याच्यामुळं आपल्या बायको-मुलीनं विष प्यायले तो नेमका कोण, हे सदानंदला कसं कळतं, ते कळल्यावर तो काय करतो, याचे उत्तर नाटक पाहताना मिळते.

  
दिग्दर्शक कुमार सोहोनी यांनी संहिता आत्मसात करून सादरीकरणाचा प्रवाह, प्रसंगांमधील नाट्यमयता काही क्षणानंतर टोकाला पोहोचेल याची योग्य काळजी घेतली आहे. प्रसंगांच्या मांडणीवरील त्यांची पकड पक्की आहे. फक्त सदानंद आणि देशमुख मद्य प्राशन करून एकूण शेतकरी प्रश्नाची उलगड करतात, या प्रसंगाची लांबी आणि दोघांच्या हालचाली किंचित कमी व्हाव्यात, असे वाटते.  


मराठी चित्रपटसृष्टीचाच नव्हे तर तमाम शेतकऱ्यांच्या जीवनातील खराखुरा नायक मकरंद अनासपुरे हा ‘उलट-सुलट’चा केंद्रबिंदू आहे. विनोदी भूमिकांच्या चक्रातून बाहेर पडत आपण प्रसंगी गंभीर व्यक्तिरेखा लीलया सादर करू शकतो, हे त्याने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. मुळातच, मकरंद हा ग्रामीण भागातून आलेला आणि गावकुसांशी नाळ जोडलेला, ‘नाम’च्या निमित्ताने शेतकऱ्यांची दुःखे काळजात खोलवर रुतलेला संवेदनशील कलावंत. त्याने विविधांगी पदर असलेला सदानंद अक्षरशः जिवंत केला आहे. तो रंगमंचाची चौकट तोडून रसिकांशी थेट बोलतो. त्याचा रंगमंचावरील वावर, व्यक्तिरेखेवरील पकड, मुद्राभिनय आणि शब्दांमध्ये दडलेले अर्थबीज बाहेर काढून लोकांच्या मनात पेरणे सारेच ‘उलट-सुलट’चा परिणाम गडद करत जाते. त्याला तेवढीच चांगली साथ किरण मानेंकडून मिळाली आहे. गडगंज पैसेवाला, कुटुंबच दैवगतीला प्राप्त झाल्याने कोलमडलेला, ज्याच्यामुळे आपले कुटुंब संपले, तोच आपल्यासमोर उभा असल्याचे कळल्यावर संतापलेला आणि आपले कुटुंब संपवणाऱ्याचे कुटुंब आपल्यामुळेच कधी काळी आयुष्यातून उठले, असे कळल्यावर हादरलेला अभय देशमुख त्यांनी अप्रतिम उभा केला आहे. मकरंद यांच्यासारख्या कसलेल्या अभिनेत्यासमोर उभे राहताना, किरणचे पाय रंगमंचावर घट्ट रोवलेले असल्याने सर्व प्रसंग रंगतदार झाले आहेत. समीर देशपांडेचा विश्वजित तेवढाच महत्त्वाचा आहे. कोट्यवधींची उलाढाल करणारा, महिलांच्या वर्तुळात वावरत महिलांचा योग्य प्रसंगी वापर करायचाच असतो, असं म्हणत ते अंमलातही आणणारा विश्वजित त्यानं देखणेपणाने उभा केला आहे. कृतिका तुळसकरने इशिताची भूमिका साकारली आहे. एक स्वैर, बिनधास्त बाई ते ग्रामीण भागातील जीवन जाणून घेऊ इच्छिणारी, स्वतःच्या आयुष्यात बदल घडवू पाहणारी महिला, असा दीर्घ पल्ल्याचा प्रवास तिने मोजक्याच प्रसंगांत स्मरणात राहील असा केला आहे. तन्वी पंडितने श्वेताच्या भूमिकेला न्याय दिला आहे. प्रदीप मुळ्ये यांचे नेपथ्य डोळ्यात भरणारे. अभय देशमुख या अब्जाधीशाचे घर आलिशान, दोन मजली घर उभे करताना त्यातील सारे तपशील त्यांनी अचूकपणे प्रेक्षकांच्या मनावर ठसवले आहेत. भुषण देसाईंची प्रकाश योजना, राहुल रानडेंचे संगीत संहितेला उठाव देणारे आहे. एकूणच, नियतीच्या उलट-सुलट फेऱ्याची नाटकरूपातली ही मांडणी जाणिवा समृद्ध करणारी ठरली आहे. 


- श्रीकांत सराफ 
sarshrikant68@gmail.com
लेखकाचा संपर्क - ९८८१३००८२१ 

बातम्या आणखी आहेत...