Home | Magazine | Rasik | Shruti tambe write About Aurangabad riots

व्देषभावनेचा नाहक भडका

श्रुती तांबे | Update - Jun 17, 2018, 01:00 AM IST

२१ व्या शतकात प्रगत तंत्रज्ञानानं गरजा भागवणं सोपं होत असताना, जगाच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळे समुदाय द्वेषभावनेनं का

 • Shruti tambe write About Aurangabad riots

  २१ व्या शतकात प्रगत तंत्रज्ञानानं गरजा भागवणं सोपं होत असताना, जगाच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळे समुदाय द्वेषभावनेनं का पेटून उठत आहेत? मे महिन्यात जुन्या औरंगाबादेत दंगल झाली. पण आता सारे पूर्वपदावर आले आहे. एकोप्याचे हे वातावरण असेच कायम राहावे आणि मनात द्वेषभावना जागी होण्याआधी प्रत्येकाने आत्मपरीक्षण करावे, या उद्देशाने लिहिलेला हा लेख...


  वातली दाट वस्ती, गरीब मुसलमान लोकसंख्येची तिथली घनता, सध्याच्या विकासाच्या अजेंड्यात मात्र हे लोक कुठेही गणतीत नसणं, त्यातून आलेलं या वस्तीतल्या नागरिकांचं साचलेपण, खदखदलेपण आणि वैफल्य. राजकीय-सामाजिक वातावरणातून झपाट्यानं वजा होत चालल्याची हताशा, ते करत असलेल्या व्यवसायांना आदर आणि मान नसणं. दुसरीकडे पंचतारांकित उद्योग, पण कुशल मजूर बाहेरचा. तीन पायांची शर्यतच. वर्षानुवर्षं समीकरण असं की दंगल पेटवली, की ध्रुवीकरणाला वेग मिळतो. त्याचं हे उत्तम नेपथ्य आहे. दंगल होते ती नेमकी या जुन्या भागांतच. का? तर त्यामुळे जमिनीचे नकाशे बदलण्यापासून इतर अनेक गोष्टी साधता येतात.


  त्यातच अनेक वर्षं, नव्हे अनेक दशकं भिजत पडलेलं बेकायदा पाणीजोडण्यांचं प्रकरण सोडवणं हातघाईवर आलेलं. अनधिकृत घरं, अनधिकृत विद्युत जोडण्या, अनधिकृत पाणीजोड आता नित्याचेच म्हणून पूर्ण सरावलेलं समाजमन अचानक मे २०१८ मधल्या कारवाईमुळे चकित, बेसावध आणि भर उन्हाळ्यामुळे कावलेलं. दंगल पेटण्याचं निमित्त हे सांगितलं जातंय. मग व्हॉट्सअँप आणि इतर समाजमाध्यमांवर भरभर पसरलेले रमजानमधे अर्थातच मुस्लिम विक्रेत्याने हिंदू गिऱ्हाईकाला फसवून विकलेल्या मांसाविषयीचे व्हिडियो संदेश. शहागंजमधे नासक्या आंब्यावरून फळविक्रेत्याशी झालेली वादावादी हेही कारण. एका रात्रीत जुन्या औरंगाबादेतल्या पाचेक मोहल्ल्यांमध्ये आगीचं लोण पसरलं. पोलिसांच्या गोळीबारात, आगीनं होरपळून जीव गेले. मारहाणीचं, फुटलेल्या काचांचं, जळालेल्या फर्निचरचं, आधीच उडालेल्या एकमेकांवरच्या विश्वासाचं काळं चित्र तेवढं गावगप्पांतून, वृत्तपत्रीय चित्रणातून पुढे आलं. तरूण मुलांच्या उत्तेजित अस्तित्वातून मात्र अजून आग आणि रग दोन्ही विझल्या नाहीत, नव्हे, त्या चेतवूत ठेवल्या जातील, असा अंदाज येतोय. २०१९च्या सार्वत्रिक निवडणुकांआधी नक्की दंगल होईल, काही म्हणतायत. तर, औरंगाबादकर काही इतके दूधखुळे राहिलेले नाहीत, दंगल पेटवण्याचे प्रयत्न होतील, पण ती पेटणार नाही, असं इतर. अर्थात, औरंगाबादेत याआधीही अनेक दंगली झाल्या आहेतच.


  मलिक अंबरच्या काळापासून उपप्रादेशिक ठाणं, सैन्याची छावणी अशी ओळख असणारं औरंगाबाद एक विकसनशील औद्योगिक शहर म्हणून पुढे आलं, ते दूरदर्शी नेतृत्वामुळे. १९६० च्या दशकाच्या शेवटी भारतभर ज्या शहरात मुस्लिम लोकसंख्या डोळ्यात भरण्याजोगी होती, अशा सर्व शहरात दंगली झाल्या. अनेक भारतीय आणि परदेशी विद्वानांनी हे सप्रमाण सिद्ध केलंय. या बहुतेक दंगलींचं वेळापत्रक हे बरोबर स्थानिक किंवा प्रादेशिक निवडणुकांशी जुळणारं होतं. अर्थातच औरंगाबादही याला अपवाद नव्हतं. औरंगाबादमध्ये १९६८ मध्ये झालेली दंगल ही "ध' चा "मा' प्रकारात मोडणारी होती. गाय हाकलली होती, पण ‘गाय मारली’ ची हाकाटी पिटली गेली आणि शहागंज भाजीबाजारातून पेटलेली दंगल यथावकाश शहरभर पसरली.


  १९६८ ची दंगल ‘गाईला मारलं‘ या अफवेनी सुरू झाली.१९८६, १९८८ तल्या दंगली पूर्वनियोजित वाटाव्या अशा होत्या, असं तेव्हाच्या वृत्तपत्र अहवालांतून प्रतीत होतं. १९८६ मध्ये "बजाज'मधील संपादरम्यानही वातावरण पेटलं, दुकानांवर दगडफेक, आगी लावणं हे घडलं. १९९२ डिसेंबर आणि १९९३ च्या सुरुवातीला बाबरी मशीद उद्ध्वस्त केल्यानंतर भारतभर प्रतिक्रियास्वरूप ज्या दंगली झाल्या, त्यात औरंगाबादचंही नाव होतं. तेव्हाही जुन्या औरंगाबादेत घरं दुकानं खाक झाली होती.


  १९८० च्या दशकाची सुरुवातच नामांतर आंदोलन, त्याची प्रतिक्रिया अशा दलित-सवर्ण संघर्षांच्या मालिकेतून झाली. परंतु मराठवाडा जनता विकास आंदोलनाच्या माध्यमातून गोविंदभाई श्रॉफ आणि सहका-यांनी नव्या औरंगाबादचं स्वप्न पुढे आणलं. १९७३-७४ मध्ये या शहराला झकेरियांसारखं दूरदर्शी नेतृत्व लाभलं. त्याचवेळी शहराचे नेते म्हणून त्यांनी नव्या औरंगाबादचं स्वप्न हे केवळ राजकीय साठेमारीचं जुमलावजा साधन म्हणून न वापरता शासकीय योजना औरंगाबादेत प्रत्यक्षात उतरवून दाखविल्या. गेल्या चाळीस वर्षात औरंगाबादची जी काही वाढ झाली, त्याचं श्रेय सिडको, हडको योजनांमार्फत श्रमिकांना जी परवडण्याजोगी घरे मिळवून दिली, त्याला जातं. एमआयडीसी आल्यावर संपूर्ण महाराष्ट्रातून जो कुशल, अकुशल कामगार स्थलांतरित होऊन आला, त्याला सामावलं गेलं, ते केवळ सिडको, हडको-नवीन औरंगाबाद योजनांमुळेच.


  दै. मराठवाडातील वृत्तानुसार १९८६ च्या जानेवारीत हिंदू मुसलमानांना एकच समान नागरी कायदा असावा, या मागणीसाठी काढलेला मोर्चा जुन्या औरंगाबादेत शिरला, तोच समान नागरी कायद्याच्या मागण्यांच्या घोषणा नाही, तर मुसलमानविरोधी भडक घोषणा देत. मग जुन्या औरंगाबादेत मुस्लिमबहुल भागात दोन्ही समुदायांची दुकानं, घरं पेटवली गेली. २१ जानेवारी १९८६ ला सर्वच राजकीय पक्षांचे नेते एकत्रितपणे जुन्या भागातून नुकसानीचा अंदाज घेत पायी हिंडले, पाहणी केली. लोकांना शांत करत असताना कॉ. व्ही. डी. देशपांडेंचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दु:खद अंत झाला. पुन्हा मे महिन्यामधेही दंगल पेटली.


  नॉर्वेमधील जहाल उजव्या पंथाच्या युवकाने केलेला बेछूट गोळीबार, की अमेरिकेत नियमितपणे व्देषभावनेतून केल्या जाणाऱ्या हत्त्या, किंवा शाळांमध्ये अचानक घुसून तरूणांनी केलेले बेछूट शूटआऊट असतील- जपानमध्ये बंदी घातलेल्या गुप्त पंथाच्या सदस्यांनी केलेल्या हत्त्या असतील-असं हे हिंसेचे एकांडं किंवा संघटित स्वरूप अनेक प्रश्न आणि आव्हाने उभी करतंय. समाजशास्त्रात दंगलीचा अभ्यास अनेकप्रकारे करतात. हिंसेचे समाजशास्त्र, आणि राजकीय समाजशास्त्र या शाखांत तो केला जातो. २१ व्या शतकात प्रगत तंत्रज्ञानानं गरजा भागवणं सोपं होत असताना, जगाच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळे समुदाय द्वेषभावनेनं का पेटून उठत आहेत, हा खरा प्रश्न आहे. त्याची उत्तरं अनेक आहेत. कधी हा एखाद्या समूहाच्या रोजीरोटीचा प्रश्न असतो, परंतु त्याला धार्मिक संघर्षाचं रूप दिलं जातं. कधी हा राजकीय चढाओढीवरचा उपाय म्हणून योजला आणि घडवला जातो. कधी दैनंदिन संघर्षामुळे चिरडीला आलेला सामान्यांचा समूह संधी मिळताच हिंसक झुंड बनून आधी ज्यांच्याविषयी पूर्वग्रह आहेत, अशा कोणावरही हल्ला करतो, असंही दिसतं.


  जगभरच्या विश्लेषकांच्या मते, राजकीय साठमारीचं सगळ्यात सोपं आणि तातडीचं साधन म्हणून धार्मिक विद्वेष पसरवून सामूहिक हिंसा केली जाते. उपासमारीवर काहीसं नियंत्रण मिळवल्यावर, पुरेशी तांत्रिक प्रगती झाल्यावर हे एक नवं खेळणं जणू काही अनेक राष्ट्रं वापरत आहेत, असंही दिसतं आहे. संपत्तीचं कमालीचं विषम वाटप असणाऱ्या समाजात, कुटुंब ही अंतिम अधिकार असणारी यंत्रणा असते.अशा समाजात हिंसा भडकवणं सोपं असतं, असंही निरीक्षण आहे. मुळात हिंसा कोणीही भडकवली, तरी त्या समाजातल्या विविध क्षेत्रातल्या धुरिणांवर ती चालू राहणार की विझणार, हे अवलंबून असतं, असा जगभरचा अनुभव आहे. अगदी शासनकर्त्यांना हिंसा भडकवत ठेवून त्यावर पोळी भाजायची असेल, तरीही सामान्य लोक आणि व्यापारी, उद्योजक, ग्राहक, शिक्षक, वकील, डॉक्टर हे पूर्णपणे दूधखुळे नसतात आणि असहाय्यही. त्यांच्या मूक किंवा कृतीशील संमती-सहभागाशिवाय कोणत्याच गावात-शहरात हिंसेचा यज्ञ चालू राहू शकत नाही, हे विसरता कामा नये, असं अनेक अभ्यासातून दिसून आले आहे.


  आशिया, आफ्रिकेतल्या राष्ट्रात जातीय, वांशिक, भाषिक, आणि आर्थिक विषमता, सरंजामी वातावरण असणारी कुटुंबं यात हिंसेला पोषक वातावरण असतंच. विशिष्ट वेळापत्रकावर, महिन्या-तिथ्यांवर आधारित व्रतं-प्रार्थना, एकाधिकारशाहीचं आकर्षण ह्या दैनंदिन आयुष्यात स्वाकारलेल्या गोष्टीही भडका उडवू शकतात. नेतृत्वाच्या हुकूमशाहीचं आकर्षण हे कारण नाझी जर्मनीतही दिसून आलं होतं. औरंगाबादच्या या वेळच्या दंगलीनंतरची एक आश्वासक गोष्ट म्हणजे, नव्या औरंगाबादमध्ये राहणाऱ्या तिशी-चाळिशीतल्या विशेषत: कॉर्पोरेट क्षेत्रात कार्यरत व्यक्तींनी या हिंसेच्या राजकारणाविषयी व्यक्त केलेली तीव्र नापसंती. आम्हाला या शहराची दंगलींचे शहर ही ओळख नको आहे.


  आता कुठे औरंगाबादेत मोठे परदेशी कंपन्यांचे प्रकल्प येत आहेत. धर्माचे राजकारण पुरे, आता नव्या व्यावसायिक संधींचे राजकारण करा, असा त्यांचा सूर होता. आम्ही उच्चशिक्षित तरूण नव्या भविष्याची स्वप्ने पाहात आहेत, त्यात दंगलींच्या राजकारणाला स्थान नाही, हे शहर संधींचे शहर आहेच, तीच त्याची ओळख असावी. सुप्रसिद्ध महाविद्यालये, जागतिक दर्जाची आरोग्यसेवा, जागतिक दर्जाचा पर्यटनउद्योग, इतर सेवा, उद्योगधंदे यातील गुणवत्ता टिकावी, वाढावी यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे, असे या नव- व्यावसायिकांचे आग्रहाचे म्हणणे आहे. अशा प्रसंगी औरंगाबादेतील सर्वच धुरिणांना कोणती ओळख घडवावीशी वाटते आणि कोणती संपवाविशी वाटते, हे महत्वाचे आहे.
  (लेखिका सावित्रीबाई फुले विद्यापीठात समाजशास्त्र विभागाच्या प्रमुख आहेत.)


  - श्रुती तांबे
  shruti.tambe@gmail.com

 • Shruti tambe write About Aurangabad riots

Trending