आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कानडी-मराठी सेतू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कानडीतून मराठीत विपुल साहित्य अनुवादित करणाऱ्या उमा कुलकर्णी यांच्या ‘संवादु अनुवादु - आत्मकथन’ या पुस्तकाला नुकताच मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार मिळाला आहे. बव्हंशी मराठी वाचकांना कानडी साहित्याची ओळख त्यांनीच करून दिली, असं म्हटलं तर त्यात अतिशयोक्ती नाही. या पुरस्काराच्या निमित्ताने उमाताईंशी मारलेल्या गप्पा.


प्रश्न : उमाताई, संवादु अनुवादु हे तुमचं आत्मकथनात्मक पुस्तक नुकतंच प्रकाशित झालं आहे. आपलं काम, आयुष्य, आणि वेगवेगळ्या निमित्तानं भेटलेली लहानथोर माणसं यांकडे अतिशय सकारात्मक अन् सहृदयतेनं पाहात तुम्ही लेख केल्याचं जाणवतं. या पुस्तकाची सुरुवात कशी झाली?
उत्तर : आसपासची अनेक मंडळी मला हे लिहिण्यासाठी सुचवत होती. एका कार्यशाळेत भालचंद्र नेमाडे भेटले, तेव्हा तेही म्हणाले, तुमचे अनुवादावरचे विचार मांडायची वेळ आता आली आहे. मला अनुवाद कसा करावा, कसा करू नये, हे लिहायचं नव्हतं. मग मी काय लिहू शकते, तर मी अनुवाद करत असताना माझ्या आयुष्यात काय काय घडलं, मला अनुवादानं काय दिलं, हे मला लिहिता येईल. तसं लिहायला सुरुवात केली आणि मग मी का लिहितेय, हा प्रश्न पडला. पुस्तक लिहून पूर्ण केलं. जो काही ऐवज आहे तो मी वाचकांना दाखवू शकले. ही माझी एक प्रकारची श्रीमंती आहे आणि बायकांना आवडते ती दाखवायला. वाचकांना ती किती पाहता आली, आवडली, हे माहीत नाही. मात्र मला मी लिहिल्याचं पूर्ण समाधान मिळालं.
प्रश्न :  तुम्ही अनेक वर्षं केलेलं स्वतंत्र/अनुवादित लेखनाचं काम आणि आयुष्याच्या विविध टप्प्यांवर तुम्हाला भेटलेली माणसं यांचा सुंदर गोफच या पुस्तकात गुंफला आहे. हे काम आणि तुमचं जगणं याचा नेमका मेळ कसा साधलात?
उत्तर : ते तसं आहे म्हणून आलं आहे. मला जशी अक्षरओळख झाली, तसा वाचन हा माझ्या जीवनाचा एक भाग आहे. मला असंही वाटतं की, ज्या गोष्टीमुळे आपण आयुष्यात एखादं जरी पाऊल पुढे गेलो, मग ते वाचन असो, एखादी कलाकृती वा एखाद्या माणसाबरोबरच्या गप्पा; अगदी वाचकांच्या पत्रव्यवहारातलं एखादं वाक्य असलं तरी ते आपण जिथं आहोत तिथून एक पाऊल पुढे नेतं. त्यामुळे या सगळ्याविषयी माझ्या मनात एक कृतज्ञता आहे. ऋणाची भावना आहे, आणि हेच सगळं मी पुस्तकात मांडत गेले आहे.
या पुस्तकातल्या प्रत्येक प्रसंगानं, माणसानं, मला आयुष्यात एक पाऊल पुढे नेलं आहे. यामध्ये लेखक आहेत, साहित्यकृती आहेत, चित्रपट आहेत, मी लिहिलेल्या मालिका आहेत. हे सगळं करत असतानाच माझं आयुष्य पुढे गेलं. प्रत्येकाच्या आयुष्यात काही फार मोठं उड्डाण नसतं, जे काही छोटं छोटं घडतं त्यातूनच बनतं आणि त्यालाच तू गोफ म्हणते आहेस. मी १९८२पासून अनुवादाचं काम करते आहे. ज्यांनी हे काम केलं आहे, त्यांना कल्पना आहे की, सुरुवातीच्या काळात हे काम पुन्हापुन्हा करावं लागतं. हे काम करत असताना तुमचं कुटुंब असतं, येणाऱ्याजाणाऱ्या माणसांनाही वेळ द्यावा लागतो. मी तो वेळ देते. मी एक गृहिणी असल्यानं हीसुद्धा माझी कर्तव्यंच होती. शिवाय माणसं घरात येणं, त्यांच्याशी गप्पा मारणं, हे मलाही आवडायचं. कर्तव्यभावनेनं मी हे सगळं करत असे. जसं एखादा पुरुष नोकरी करत असताना नोकरीतल्या जबाबदाऱ्या सांभाळून लेखन करतो, त्या वेळी त्याला त्याच्या कुटुंबाचा पाठिंबा लागतो, तसा मलाही माझ्या कुटुंबाचा पाठिंबा मिळत गेला. शिवाय मी अनुवाद करत होते, त्यामुळेही मला हे जमलं असावं.
प्रश्न :  अनुवाद करत असताना कादंबरीच्या अाशयात तुम्ही कितपत गंुतत होतात?
उत्तर : मी कादंबरीच्या आशयात खूप गुंतते. किंवा एखाद्या कादंबरीतल्या उत्तम आशयासाठीच मी त्या कादंबरीचा अनुवाद करते, असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती होणार नाही. एका भाषेतलं पुस्तक दुसऱ्या भाषेत अनुवादित करतो तेव्हा त्या भाषेचा मोह ठेवण्यात अर्थ नाही. त्याचा आशयच अनुवादित पुस्तकात यायला हवा. मला असं वाटतं की, गंभीरपणे लेखन करणारा एखादा लेखक पुस्तकाच्या नावापासून शेवटाच्या पानापर्यंत एक व्यूह रचत असतो, त्यातून तो आपल्याला काही सांगू पाहात असतो. आणि याच गोष्टीचं मला आकर्षण वाटतं. मी तोच आशय मराठीत अनुवादित करते.
प्रशन :  तुम्ही स्वतंत्र लेखनही केलंत आणि अनुवादही केलेत, यापैकी कोणती गोष्ट तुम्हाला जास्त आनंददायी वाटते?
उत्तर : स्वतंत्र लेखन आणि अनुवाद या दोन्ही गोष्टींनी मला तितकाच आनंद दिला आहे. माझा असा अनुभव आहे की, स्वतंत्र लेखन खूप लवकर लिहून होतं. संवादु अनुवादु हे पुस्तक मी जवळपास अडीच महिन्यांत लिहून संपवलं. याच आकाराची म्हणजे ४२६ पानांची कादंबरी अनुवादित करायला मला याच्या जवळपास तिप्पट वेळ लागला असता. कारण अनुवादाचं काम करताना खूप सावध राहावं लागतं. स्वतंत्र लेखनात स्वत:चं असं काही सुचणं आणि या मांडणीवर काम करण्याचा विचार पक्का झाला की, लिहायला वेळ लागत नाही. खरं तर मला स्वतंत्र लिखाण करायचं आहे, पण यासाठी वेगळा वेळ मिळत नाहीये. तुलनेत अनुवादाचं काम सोपं वाटतं. लेखकाची परवानगी घेतली की, काम सुरू करता येतं. पुस्तक आवडलं या एका निकषावर अनुवाद वेळेत पूर्ण होतो.
प्रश्न : अनुवादाचं खूप मोठं काम तुम्ही केलंय, म्हणून स्वतंत्र लिखाण मागे पडलं का?
उत्तर : मला असं वाटत नाही. जर माझी लेखनाची गरज तीव्र उत्कट असती तर मी लेखन केलं असतं. पण मला वाटतं मी यासाठी थोडी आळशी आहे. लेखनाचा आनंद अनुवादाच्या कामानं दिला त्यामुळे मी याच कामात रमत गेले.
प्रश्न :  अनुवाद करण्याचं काम सेमी क्रिएटिव्ह समजलं जातं. जो सन्मान, आदर मूळ लेखकाला मिळतो, तितका अनुवादकाला मिळत नाही, असं दिसतं. तुमचा काय अनुभव आहे?
उत्तर : माझा अनुभव वेगळा आहे. मला असं वाटतं की अनुवादकानं मूळ लेखकाला आणि त्याच्या लेखनाला ज्या पद्धतीचा मान मिळतो, तशा सन्मानाची अपेक्षा का करावी? मुळात अनुवादकाला माहीतच आहे की, तो अनुवाद करतो आहे. लेखक आणि त्याच्या पुस्तकाविषयी आदर वाटल्याने, ती साहित्यकृती आवडल्याने त्याचा अनुवाद अनुवादकानं केला आहे. मग अनुवादकानं त्याचं काम उत्तम करायला हवं. अनुवादकानं समीक्षकासारखं स्वत:चं वेगळं स्थान निर्माण करावं, आणि तिथं मानानं काम करावं. अनुवाद उत्तम असेल तर त्याला सन्मान मिळतोच. मी ज्या लेखकांच्या साहित्यकृती अनुवादित केल्या, ते सगळे लेखक माझ्याशी अतिशय बरोबरीच्या नात्यानं, काही वेळा जास्त सन्मान देऊन वागतात. मराठीतले काही चांगले लेखकही तुम्ही इतकं चांगलं साहित्य मराठीत आणल्यानं आम्हाला वाचता आलं, असं आवर्जून सांगतात. मनापासून वाचणारे वाचक एक वाक्य आवर्जून म्हणतात, उमाताई, आम्ही तुमचे ऋणी आहोत, तुमच्यामुळे ही पुस्तकं वाचता आली. त्यामुळे अनुवादकानं स्वतंत्र जागा तयार करणं योग्य वाटतं.
प्रश्न :  उमाताई, तुम्ही कानडीतल्या खूप मोठ्या साहित्यिकांची पुस्तकं मराठीत अनुवादित केली आहेत. भैरप्पा, शिवराम कारंथ, अनंतमूर्ती, वैदेही, गिरीश कर्नाड, यांसारखे बरेच. यांची वैशिष्ट्यं काय आहेत?
उत्तर : या साहित्यिकांची वेगळी वैशिष्ट्यं आहेत, त्यांची बौद्धिक धाटणी वेगळी आहे. यामधले बहुतेक लेखक कानडीतल्या नव्य-नव्योत्तर कालखंडातले आहेत. मुळात या कालखंडाची वेगवेगळी वैशिष्ट्यं आहेत. हे सगळे त्यांच्या कालखंडातले उत्तम लेखक असल्याने काळाची म्हणावीत अशी वैशिष्ट्यं त्यांच्या लेखनात दिसतात. हे साहित्यिक वेगवेगळ्या विचारधारेतून बनलेले आहेत. एस.एल. भैरप्पा यांचा भारतीय परंपरा आणि तत्त्वज्ञानाचा अभ्यास आहे. शिवराम कारंथ हे खूप प्रवास करणारे लेखक. त्यामुळे त्यांचं व्यक्तिमत्त्व वेगळं आहे. पूर्णचंद्र तेजस्वींसारखे साहित्यिक आयुष्यभर म्हैसूरला राहिले मात्र नंतर त्यांनी त्या भागातलं एक जंगल विकत घेतलं. आणि तिथे काम करत ते एका खेड्यात स्थायिक झाले. या प्रत्येक लेखकाला वेगवेगळं वातावरण मिळत गेलं.
या साहित्यिकांचा भूप्रदेश वेगळा आहे. शिवराम कारंथ हे करावळी प्रदेशातले. म्हणजे समुद्रकाठच्या प्रदेशाचे. पूर्णचंद्र तेजस्वी मलेनाड प्रदेशातले म्हणजे डोंगरावरच्या प्रदेशाचे. करावळला गरिबी मोठ्या प्रमाणात दिसते. तुलनेत मलेनाड श्रीमंत भाग आहे. त्यामुळे या भागातली संस्कृती वेगळी आहे. वैदेहीसारखी लेखिका मूळ करावळ प्रांतातली, पण तिचं सासर मलेनाड भागात आहे. त्यामुळे तिला या दोन्ही भागांतले अनुभव आहेत. भैरप्पा जरी म्हैसूर जवळपासच्या भागातले असले तरी त्यांचं लेखन जेव्हा बहरात येत होतं तेव्हा ते गुजरातला बडोद्याला होते. दिल्लीतही काही काळ होते. त्यामुळे लेखक म्हणून त्यांची दृष्टी व्यापक होत गेली. मात्र लेखनाचा विषय आणि पात्रं मात्र कर्नाटकातलीच आहेत.
अनंतमूर्तींसारखे लेखक दिल्लीत प्राध्यापक होते. इंग्रजी विषयातले वेगवेगळे विचार त्यांना माहीत होते. त्यांच्या साहित्यात वेगळा व्यापक दृष्टिकोन आहे. आणि तो मांडण्यासाठी त्यांनी मलेनाड प्रदेश निवडला. हे सगळे लेखक आपल्या बौद्धिक ताकदीनं वेगवेगळा कर्नाटक दाखवतात. त्यासाठी साहित्याच्या वेगवेगळ्या प्रकारांवर लेखन केंद्रित करतात. कर्नाड नाटकांतून व्यक्त होतात. भैरप्पांनी कादंबऱ्याचा फॉर्म निवडला. वैदेही तिचे अनुभव कथेतून मांडते. सर्वांनीच आपापल्या दृष्टिकोनातून कर्नाटक पाहिला. तिथला समाजही पाहिला आणि त्यातूनच कलाकृती साकारल्या.
प्रश्न :  कानडी साहित्याचा प्रवास आणि मराठी साहित्याचा प्रवास याविषयी तुम्ही काय सांगाल?
उत्तर : हा विषय मोठा आहे. फक्त एक मुद्दा सांगावासा वाटतो. मधल्या काळात मराठी साहित्यिकांची त्यांच्या प्रदेशाशी असलेली मूळं तुटलेली वाटतात. त्यामुळे त्या काळात नागरी संवेदना तर चांगल्या मांडल्या गेल्या मात्र मुळाशी जाऊन शोध घेण्याचे प्रयत्न कमी झाले. असं त्या काळातलं चित्र होतं. कानडीमध्ये मात्र त्यांचे लेखक हे जगभराच्या अनुभव घेत असले तरी आपल्या मातीशी, आपल्या मुळाशी बांधलेले आहेत. उदा. कर्नाडांसारखे लेखक शिक्षणाच्या निमित्तानं परदरेशात गेले. पण त्यांच्या सिरसी या गावाशी  असलेले भावबंध त्यांच्या लेखनातून दिसतात. भैरप्पाही कर्नाटकातून बाहेर होते पण लेखनातून कर्नाटक दिसत गेला. आता मात्र मराठीतूनही वेगवेगळ्या भागातून अनेक जण त्यांच्या भागातले त्यांचे अनुभव लिहीत आहेत.
प्रश्न : अनुवादक म्हणून अनुवादासाठी कादंबरी निवडताना तुमचा दृष्टिकोन कसा असतो?
उत्तर : मी एक मराठी वाचक आहे. त्यामुळे मराठी पुस्तकांचं वाचन सुरू असतं. वाचताना माझ्या काही अपेक्षा असतात. त्या अर्थात व्यक्तिगत असतात. कारण मी काही समीक्षक नाही. त्या पुस्तकानं माझं समाधान करावं असं वाटतं. कानडी पुस्तकाची निवड करतानाही मी मराठी वाचक असते. त्यामुळे विरुपाक्षांनी एखादं पुस्तक दिलं आणि ते मला ‘अपील’ झालं तरच मी निवडते. मराठी वाचकांनाही हे आवडेल असं समजून निवडते. आतापर्यंत तरी असं वाटतंय की, मराठी वाचक माझ्याबरोबर आहेत. त्यांना माझी निवड आवडते.
प्रश्न : आतापर्यंतच्या कोणत्या अनुवादानं तुम्हाला आनंद दिला आहे? समाधान दिलं आहे?
उत्तर : भैरप्पांच्या पुस्तकांच्या अनुवादानं मला खूप आनंद दिला आहे. त्यामागचं कारण असं आहे की, सुरुवातीच्या काळात मी शिवराम कारंथ यांच्या कादंबऱ्यांचा अनुवाद करत होते. त्यांच्या कादंबऱ्या अप्रतिम आहेत. परंतु मी नवखी होते. कारंथांचं माझ्यावर खूप दडपण होतं. त्या कामात काही राहता कामा नये, चुकता कामा नये असं वाटायचं. खूप ताण येत असे. भैरप्पा यांच्या कादंबऱ्या अनुवादित करताना मात्र कामात मोकळेपणा येत गेला. भैरप्पा यांच्याशी संवादही होत गेला. कामाविषयी मनात येणाऱ्या शंका त्यांना विचारू शकत असे. आणि मुख्य म्हणजे अनुवाद करणं ही फार आनंददायी प्रक्रिया आहे. या निमित्तानं आपण साहित्यिक क्षेत्रात काही काम करतो आहोत, असा आनंददायी अनुभव या काळात येत होता. भैरप्पा यांच्या पुस्तकांच्या अनुवादानं हा आनंद भरभरून दिला. त्यांच्या पर्व या कादंबरीनं सगळ्यात जास्त दिला.
प्रश्न :  या अनुवादाच्या कामात अडचणी आल्या असतील, त्या कोणत्या?
उत्तर : अनुवाद करताना अडचणीही खूप येतात. इतक्या की असं वाटतं, का स्वीकारलं हे काम? अशी कामं मीही सोडून दिली.
एकदा महाकवी द.रा. बेंद्रे यांच्या कवितांचा अनुवाद करण्याचा प्रयत्न केला. त्या वर्षी त्यांची जन्मशताब्दी होती. बेंद्रे यांच्या कविता अनुवादित करण्यासाठी वाचत होते. तेव्हा एक लक्षात आलं, त्यांच्या कवितेत एक ठळक विभाग आहे ज्यात ते तत्त्वज्ञानाविषयी लिहीतात. ज्या काव्यसंग्रहासाठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला त्या ‘ना कोतंती’ या कविता संग्रहात तत्त्वज्ञानावर खूप कविता आहेत. मला त्या समजून घेणं खूप अवघड जात होतं. दुसरं म्हणजे त्यांच्या कवितेत शाब्दिक खेळ खूप आहेत. कानडीमध्ये त्या वाचताना, ऐकताना मजा येते पण त्याचा अनुवाद मात्र तसा करणं शक्य होत नव्हतं. या दोन्ही प्रकारच्या कविता सोडून इतर कविता इतक्या साध्या होत्या की, त्या अनुवादित करून मराठी वाचकांपर्यंत पोचवल्या तरी खरे बेंद्रे पोहोचवल्याचं समाधान मला मिळालं नसतं. हे लक्षात घेऊन मी या कामातून माघार घेतली.
प्रश्न :  उत्तम अनुवादक म्हणजे कसा अनुवादक असावा, असं तुम्हाला वाटतंय?
उत्तर : मला वाटतं मूळ कानडी साहित्यकृतीविषयी जशी समीक्षा लिहून आली तशीच समीक्षणं मराठी अनुवाद केलेल्या कादंबरीवर आली तर तो अनुवाद उत्तम समजावा. समीक्षा येणं हाच मापदंड ठरेल.
प्रश्न :  उमाताई, तुमच्या ‘संवादु-अनुवादु ’ या आत्मकथनाची अर्पणपत्रिका आहे - ‘आमच्या न जन्मलेल्या अपत्यास, कृतज्ञतापूर्वक.’ अतिशय छोटी, साधी वाटणारी हीओळ वाचकांच्या काळजाला भिडणारी आहे. याविषयी काय सांगाल?
उत्तर : हा प्रश्न विचारला ते फार बरं झालं. काळजाचा ठाव घेणारं, भिडणारं वगैरे आयुष्यात एका टप्प्यावर येऊन गेलं आहे. त्या वयात. त्या पद्धतीनं. त्यानंतर या वस्तुस्थितीची आम्ही लवकरच स्वीकार केलेला आहे.
आज वयाच्या सत्तरीला सामोरं जाताना मागे वळून बघते तेव्हा असं लक्षात येतं की, समजा माझ्या संसारात दोन-चार मुलं असती तर मी त्यांच्यामध्ये रमले असते. माझ्याकडून इतकं काम झालं नसतं. यावर काहीजण असं म्हणू शकतील की, मुलंबाळं असणाऱ्या बायका काही करत नाहीत का? तर त्याही बायका खूप काम करतात. समजा, माझ्या आयुष्यात मुलं असती तर त्या मुलांना मी हे पुस्तक अर्पण केलं असतं. पण त्या मुलांनी न जन्मून माझ्यावर उपकार करून माझ्याकडून एवढं काम करून घेतल्यावर मी कृतज्ञतापूर्वक का नाही त्यांचं स्मरण करायचं? पुस्तकाचं काम पूर्ण झाल्यावर वाटलं, एवढं सगळं काम माझ्याकडून झालं? कसं झालं? तर मला वेळ मिळाला. म्हणून माझी अतिशय व्यक्तिगत, प्रामाणिक भावना मी त्या अर्पणपत्रिकेत व्यक्त केली आहे.


- स्नेहा अवसरीकर, पुणे
snehhaavasarikkar1@gmail.com
(वाचक उमाताईंशी virupaxuma@gmail.com या मेलवर संपर्क साधू शकतात.)

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, फोटो... 

 

बातम्या आणखी आहेत...