आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हलकंफुलकं माध्यम स्नॅपचॅट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्नॅपचॅट हा सोशल मीडिया नसून एक नेटवर्किंग साइट आहे असे अनेकदा म्हटले जाते. इथे सदस्य फोटो शेअर करतात, व्हिडिओ शेअर करतात. इथल्या पोस्टद्वारे अनेक सदस्य एकमेकांशी संपर्क करू शकतात. त्यामुळे स्नॅपचॅट केवळ नेटवर्किंग साइट नसून त्याचा वापर सोशल मीडिया म्हणूनच होतो आहे. 

 

२०११ च्या सप्टेंबरमध्ये सुरू झालेली स्नॅपशाॅट नावाची कंपनी गेली काही वर्षे फोटो कसे हाताळायचे, त्याची मांडणी कशी करायची, यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे बदल करते आहे आहे. त्याचा एकत्रित परिणाम म्हणजे तरुणांमध्ये स्नॅपचॅट सर्वात लोकप्रिय समाज माध्यम म्हणूनही ओळखले जाते. 


स्नॅपचॅटमध्ये वेगवेगळी फिल्टर्स आहेत. वेगवेगळ्या पद्धतीने फोटोची मांडणी करता येते, २४ तासांत ते फोटो नाहीसे होतात. एक स्टोरी म्हणून ते फोटो नंतर पाहता येतात हाच एक मोठा बदल घडला आहे. स्नॅपचॅटमध्ये जिओ फिल्टर्सचा वापर एखाद्या महत्त्वाच्या घटनेविषयी, एखाद्या गंभीर मुद्द्याविषयी लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याकरता प्रभावीपणे करता येतो. ज्यांना येथील सदस्यांशी संपर्क करायचा आहे, इथे आपला जम बसवायचा आहे, जाहिरातीकरिता या माध्यमाचा प्रभावी वापर करायचा आहे त्या कंपन्यांनी वा व्यक्तींनी मार्केटिंगद्वारे त्यांच्या ब्रँडबद्दल जास्तीत जास्त मांडणी फोटोच्या स्वरूपातच करावी. इतकेच नाही तर फेसबुक, ट्विटर वा इतर कोणत्याही सोशल मीडियामध्ये अनेकदा पोस्ट करताना खूप गंभीरपणे, विचारप्रवर्तक लेखन पोस्ट केले जाते. इथे असा पवित्रा न घेता हलक्याफुलक्या पद्धतीने मांडणी व फोटो पोस्ट करणे आवश्यक आहे.


स्नॅपचॅट प्रोफाइल  : स्नॅपचॅट अॅप फोनवर डाउनलोड करावे. त्यावर आपली प्रोफाइल तयार करावी. त्यात आपल्या मित्रयादीतल्या सर्वांचा समावेश करावा.
 
स्नॅपचॅटचे क्रिएटिव्ह टूल्स : फिल्टर्स आणि लेन्सेस या दोन प्रमुख गोष्टी स्नॅपचॅटवर आहेत.

 

फिल्टर्स  : तुमचे राहते शहर, जागा किंवा ज्या प्रसिद्ध ठिकाणांना तुम्ही भेट दिली आहे अशा सर्व जागांबद्दल तुम्ही एक कम्युनिटी फिल्टर तयार करू शकता. ते तुम्ही त्या ठिकाणी घेतलेल्या फोटोंसाठी वापरू शकता. अशा रीतीने एखाद्या ठिकाणाची किंवा जागेची माहिती तुमचे फोटो देऊ शकते. तुमच्या शहरातील मुलांचे हॉस्पिटल, तुमच्या शहरातील चांगली उपाहारगृहे/रेस्तराँ याचे फिल्टर्स तयार करून वापरता येतात. असे अनेक फिल्टर्स उपलब्ध आहेत. त्यामुळे नवीन फिल्टर तयार करावेच लागते असे नाही. एखादा लग्न समारंभ आहे, कुणाचा वाढदिवस आहे, त्या प्रसंगाचे फिल्टर्स तुम्ही करू शकता. त्या फिल्टरचा वापर ठराविक फोटोंसाठी करता येतो. त्यामुळे त्या दिवशी काढलेले सर्व फोटो सापडतात, सर्जनशीलपणे वापरता येतात. फिल्टरमध्ये रंग, जागा, वेळ, वेग, तापमान इत्यादी बाबी नोंद होतात. 


लेन्सेस : लेन्सेस आणि स्नॅपचॅट फिल्टर्स या दोन वेगळ्या बाबी आहेत. लेन्सेस हे व्हिडिओ आणि फोटोंना दिलेले स्पेशल इफेक्ट आहेत. त्यात प्राण्यांचे कान, डोळे, फुलांचे गुच्छ यांचा समावेश असतो. म्हणजे यात प्रामुख्याने अॅनिमेशनचा उपयोग होतो. लेन्सेसने तुमचा चेहरा/ फोटो बदलतो. फिल्टरने मूळ फोटो बदलत नाही. 

 

व्यक्तिगत वापर : आपले नातेवाईक, मित्र-मैत्रिणी, सहकारी यांच्याशी संपर्क करण्याकरता अनेक जण स्नॅपचॅट वापरतात. इतर सोशल मीडियामध्ये जेवढे हलकेफुलके घटक पोस्ट होत नाहीत तेवढ्या विनोदी किंवा हलक्याफुलक्या, गमतीदार गोष्टी तुम्ही इथे स्नॅपचॅटवर शेअर करू शकता. थोडक्यात सांगायचं तर ऑफिसमध्ये अगदी गंभीर चेहऱ्याने वागणारा बॉस इथे एखाद्या लहान मुलासारखा गमतीजमती करू शकतो. व्यक्तिगत स्वरूपाचा स्नॅपचॅट उपयोग करताना हे ध्यानात असावे. 


ब्रँडकरिता वापर : लोगो, प्रोफाइल फोटो, स्नॅपकोड तयार करणे हे बिझनेस वा ब्रँड अकाउंटकरिता विशेष काळजीपूर्वक करावे. ज्या उत्पादनाच्या जाहिराती तयार करायच्या आहेत त्याबाबत विशेष खबरदारी घ्यावी. स्नॅपचॅट जाहिरातींचा पर्याय जरूर विचारात घ्यावा.
साधा सोपा फोटो पोस्ट करणे आणि फार विचार करायला लावणारे फोटो टाळणे हा नियम ब्रँडला लागू आहे. स्नॅपचॅटचा वापर करताना तुम्ही तुमचे इतर सोशल मीडिया चॅनल आहेत त्यापेक्षा वेगळ्या व हलक्याफुलक्या पोस्टस करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. उदाहरणार्थ तुमचे पुस्तकांचे दुकान आहे. या महिन्यांमध्ये किंवा एखाद्या आठवड्यात सर्वात जास्त खरेदीच्या व्यक्तीने केली आहे तिची पुस्तके, तिचे फोटो वा तिचे सर्वात आवडते लेखक अशी वेगळी माहिती देणारी, व्यक्तिकेंद्रित पोस्टही इथे शेअर करावी.  काहीतरी नवे, वेगळ्या पोस्टस, शेअर केलेली हलकीफुलकी माहिती जर तुम्ही स्नॅपचॅटमध्ये दिली तर लोकांना त्या उत्पादनाविषयी उत्सुकता वाटते. 


विशेष दिवस म्हणून काही तुमचे उपक्रम असतील तर त्याची माहिती द्यावी. विशेष व्यक्ती ग्राहक म्हणून आली असेल किंवा तुमच्या शाळेचा बक्षीस समारंभ असेल तर असे सर्व प्रसंग लाइव्ह टेलिकास्ट करता येतात, तसे तुम्ही त्याच्याविषयी खास फोटोही स्नॅपचॅटवर पोस्ट करू शकता. सोशल मीडियावर डिस्काउंंट कूपन्स मिळाली, काही विशेष सूट मिळाली तर ते सर्वांनाच हवं असतं. अशा पद्धतीची स्पर्धा, कूपन्स इत्यादी तुम्ही तुमच्या स्नॅपचॅटवर जाहीर करू शकता. स्पर्धा देऊ शकता. तुमचे ग्राहक असतात, त्यांना एखादे उत्पादन कसे वाटले त्याविषयी फोटो पोस्ट करण्याचे आवाहन करू शकता. अनेकांना फोटो वा व्हिडिओपेक्षा लेखी मांडणी करणारी माध्यमे पसंत असतात. पण तरुणांना उद्देशून काही करायचे असेल, तरुणांना आकर्षून घ्यायचे असेल तर तुमच्या इन्स्टाग्रामसारखाच स्नॅपचॅटवर वावर असणे अत्यावश्यक आहे इतके ध्यानात असू द्यावे. जाहिरातीकरिता स्नॅपचॅट आर्थिकदृष्ट्या नक्की जास्त फायद्याचे आहे.

 

सोनाली जोशी
sonali.manasi@gmail.com

बातम्या आणखी आहेत...