आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माझा मान्‍सून दोस्‍त

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदी चित्रपटसृष्टीत नैसर्गिक अभिनयाचा वारसदार म्हणून आणि नाट्यचळवळीचा पालक म्हणून आपला ठसा उमटवलेले शशी कपूर यांच्या जाण्याचे अनेकांनी  अनेक अर्थ लावले. पण, ज्येष्ठ चित्रकार सुभाष अवचट यांच्या आयुष्यात आलेले शशी कपूर हे एक काहीसे गूढ असलेले, काहीसे विरक्त आणि समाधिस्थ असे व्यक्तिमत्त्व होते. त्यांचेच हे मनोवेधक शब्दचित्र... 
 
महिना डिसेंबरचा आणि बाहेर पाऊस पडतोय. मान्सूनातल्या सारखा. शहरी झमेल्यात मनाला कातावून टाकणारा. या पावसात शशी कपूर अखेरच्या प्रवासाला निघालाय. डिसेंबरात कधी पाऊस कोसळतो का? पण तो कोसळला. बहुधा, शशी कपूरशी असलेलं आपलं नातं सांगतच कोसळला... 

शशी कपूर. माझा मान्सून दोस्त. महाबळेश्वरच्या माझ्या किती तरी भेटी अविस्मरणीय करणारा. माझ्या दृष्टीने कपूर घराण्यातला हा एकमेव थिंकर. दिसायला एकदम राजबिंडा. निळे डोळे. लाघवी हसू. सभ्य नि सुसंस्कृतपणाचा आदर्श ठरावं असं चारचौघातलं वागणं-बोलणं.  तरीही जगाच्या गुंत्यातून बाहेर पडत, त्याच्या ठायी असलेली विरक्तीची ओढ, अधिक लक्षवेधी. काहीशी गूढ. काहीशी हेवा वाटायला लावणारी.  १९७२-७३ च्या सुमारास थिएटर अॅकॅडमीशी जोडलेल्या नाट्यकर्मींच्या वर्तुळात तेंडुलकरांच्या “घाशीराम कोतवाल’च्या निमित्ताने घुसळण सुरु होती. त्याच सुमारास कधी तरी मी पहिल्यांदा शशीला भेटलो. त्या भेटीत नेमकं काय झालं ते फारसं ठळकपणे आठवत नाही. एक मात्र, नक्की आठवतं. ते म्हणजे, शशीचं नाट्यकलेविषयीचं झपाटलेपण. त्यानंतर पुन्हा आम्ही दोघे भेटलो. या वेळी निमित्त होतं, “बंद होठ’ नावाच्या सिनेमाचं. माझ्या मते, प्रयोग आणि आशय अशा दोन्ही अंगाने हा त्या काळचा फ्युचरिस्टिक सिनेमा होता. इंडस्ट्रीतल्या लोकांना या सिनेमाबद्दल प्रचंड कुतूहल होतं. शशी या सिनेमाचा नायक होता. असा प्रवाहाबाहेरचा सिनेमा करण्याची हिंमत त्याच्याशिवाय इंडस्ट्रीत फार कमी लोकांकडे होती. सिनेमाची गोष्ट मला नेमकी आठवत नाही, पण विषय साधारण असा होता-एक घटना घडते. दहशत निर्माण होते. पण घटनेसंदर्भात जी व्यक्ती तोंड उघडते, ती कालांतराने गायब होत जाते, त्या गायब होण्याभोवती सिनेमा फिरत राहतो. या सिनेमाचा निर्माता होता, विजय ढोलकिया. आम्ही त्याला बटुकभाई म्हणून ओळखायचो. या बटुकभाईने “बंद होठ’चं डिझाईन आणि पोस्टर करण्याचं काम मला दिलं होतं. प्रचंड उत्साहात मी ते केलं होतं. त्याच दरम्यान शशीची पुण्याला फेरी झाली होती.  मी केलेली डिझाइन आणि पोस्टर्स बघायचीत, म्हणून तो प्रचंड उत्साहात होता. 
 

त्याने मला कुतूहलाने त्याच्या सिनेमातल्या कामाबद्दल विचारलं होतं आणि मी त्याला रश प्रिंट्स बघितल्यानंतरची मनात उमटलेली प्रतिक्रिया सांगितली होती. त्या तासाभराच्या भेटीत त्याचा उत्साह आणि ऊर्जा तेवढी मला भारून राहिली होती. पण, दुर्दैवाने “बंद होठ’ पडद्यावर कधी आलाच नाही. शशीचं मला आवडलेलं ते काम कुठे तरी हरवून गेलं, कायमचं.  ४०-४५ वर्षांपूर्वीचा तो काळ होता. त्याकाळी दर पावसाळ्यात स्कुटरवरून महाबळेश्वरला जाण्याचं मला अक्षरश: वेडं लागलं होतं. आला पावसाळा की पळ महाबळेश्वरला, हे माझं ठरलेलं असायचं. तिथे गेलो की, “दीना’ नावाच्या हॉटेलात उतरायचो. हॉटेलचा पारसी मालक महाबळेश्वरवाला, आम्ही त्याला अंकल  म्हणायचो, त्याचा मुलगा हर्मोस. माझं हे पर्वतावरचं कुटुंबच होतं. तिथं गेलो की, अवघ्या १२ रुपयांत खोली मिळायची. मनात आलं तर चित्र काढायचं, नाही आलं तर नुसतंच भटकायचं. लांबवर. किती तरी वेळ. तेव्हाचं पावसाळ्यातलं महाबळेश्वर म्हणजे, प्रचंड पाऊस, पन्नास फुटांवरचंही दिसू नये, इतकं घनदाट धुकं आणि निर्मनुष्य रस्ते. मेन मार्केटात तर एक-दोनच दुकानं होती. त्यातल्या एका छोट्याशा दुकानात मी तासनतास वेळ घालवायचो. समोर पावसात थरथरत्या अंगासह  एखादी गाय उभी असायची. दुकानात छत्र्या टांगलेल्या असायच्या आणि आत स्टोव्ह कायमचा पेटता असायचा. कळायचंच नाही. दिवस काय, दुपार काय, रात्र काय. काळाचा सगळा फरक जणू संपलेला असायचा. मी एका तंद्रीत “टाइमलेस’ क्षणांत जगत असायचो. सगळं कसं स्तब्ध झालेलं असायचं. त्या स्तब्धतेत जगण्याचा समग्र वेध घेता यायचा.  “स्लिपिंग टाऊन’ सारख्या चित्रांतून मग ती कधी तरी व्यक्त व्हायची. 


याच स्वप्नदृश्यात्मक चौकटीत एक दिवस शशी अवतरला. माझा मुक्काम नेहमीप्रमाणे दीना हॉटेलातल्या रुम नंबर वनमध्ये, शशीचा रुम नंबर सहामध्ये. एवढा मोठा स्टार, पण एकटाच १५-१५ दिवस हॉटेलात राहायचा. सोबत भरपूर पुस्तकं आणलेली असायची. त्याचं जेवणाचं टेबलही ठरलेलं असायचं. जेवताना अजिबात बोलायचा नाही. संध्याकाळ झाली की, कधी तरी ड्रिंक घ्यायचा. नंतर तेही बंद. मग तासनतास सोडा पीत समोर जे काही घडतंय ते, फक्त बघत बसायचा. सोबत ना मित्र, ना स्टाफ. एक ड्रायव्हर तेवढा हाताशी. पण तोही चार हात लांब.  मग मीच काही तरी विषय काढायचो. सोबत अंकल आणि हर्मोस असायचे. त्यावर शशी काही बोलायचा.  त्याचा मूड असला तर मराठीतही संवाद चालायचा. पण तोही मोजकाच. कधी तरी ड्रायव्हरला बोलावून तो गाडीने गावात चक्कर मारायचा. तेही अपवादाने. एकदा मी त्याला मेन मार्केटमधल्या चहाच्या दुकानात घेऊन गेलो. तो खुश झाला. पण तेवढाच. इतर वेळी त्याने कधी हॉटेल सोडलं नाही. एखादी कुंद संध्याकाळ, समोर ढग पसलेले, टेबलावर पुस्तक, सोबत चहाची किटली आणि चहा घेणारा शशी हे माझ्या नजरेत साठलेलं त्याचं चित्र कधी पुसलं गेलं नाही... 

 

एका वर्षी अंकलच्या मुलीची नवज्योत झाली, त्या कार्यक्रमाला शशीसुद्धा आला होता, खास शूटिंगमधून वेळ काढून. पण एकटाच बसला होता, सगळ्यांपासून दूर. अंगाभोवती शाल पांघरलेला. शून्यात गेलेला. लौकिक जगात असून नसल्यासारखा. कळायचं नाही, याला नेमकं झालंय तरी काय? आज इतक्या वर्षांनंतरही ती प्रतिमा माझा पिच्छा करतेय, सारखी. खास लाकडी बांधकाम असलेल्या दीना हॉटेलच्या व्हरांड्यात शाल पांघरलेला शशी गर्दीतही एकटाच बसलाय. शापित गंधर्वासारखा... मला प्रश्न पडायचा, इतका मोठा स्टार, चित्रपटसृष्टीत त्याचा हा बोलबाला, त्याचा इतका मोठा गोतावळा, फिमेल फॅनचा मोठा भरणा, तरीही हा एकटा कसा? मायावी दुनियेतली सगळी सुखं सोडून हा इथे वारंवार येतो कसा? एका रात्रीत हा अमिताभसोबत शूटिंग करतो आणि पुढच्या सकाळी महाबळेश्वरला येऊन स्वत:त हरवून जातो. त्याला शोध आहे तरी कशाचा? मला त्याला खोदून खोदून प्रश्न विचारायचा असायचा. बाबा रे, तू इथे येतोस तरी कशाला? नंतर माझं मलाच उमगलं, शशी हिंदी चित्रपटसृष्टीतला यशस्वी नट असला तरीही, मला भेटणारा शशी जेनिफर गेल्यानंतरचा शशी आहे.  हा शशी स्वत:ला जगाच्या पाशातून सोडवू पाहतोय. स्वत:हून विरक्त होऊ पाहतोय. समाधीवस्था अनुभवू पाहतोय... 


मध्ये बराच काळ गेला. आमच्या भेटीगाठी कमी झाल्या. मात्र, त्याची मुलगी संजना माझ्या संपर्कात आली. तोवर तिने “पृथ्वी’ला नवा आकार देत, शशीचं स्वप्न पूर्णत्वास नेलं होतं. आता शरीरानं सुटलेला शशी पृथ्वी थिएटरमध्ये दिसू लागला होता. नित्य नेमाने तिथे जाऊन बसू लागला होता. इथेसुद्धा त्याची जागा ठरलेली. त्याची खुर्ची ठरलेली. मला आठवतंय, तेव्हा त्याला सिग्रेटच्या धुराचाही खूप त्रास होऊ लागला होता. तो असायचा, तोवर असंख्य नवशिके यायचे त्याच्या पाया पडायचे. हा हलकेच हसायचा. मग निर्विकार त्यांच्याकडे पाहून फक्त तेवढे हात उंचावायचा.  आपलं असणं फारसं जाणवू न देणारा शशी, एक दिवस व्हिलचेअरमध्ये बसून पृथ्वी थिएटरमध्ये आला. पुढे अनेक दिवस-महिने येत राहिला. मग तो मला थेट अमिताभ बच्चनच्या ७० व्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात दिसला. मी माझ्या या मान्सून दोस्ताला जाऊन भेटलो, पण त्याने मला ओळखलंच नाही. मलाच काय, कुणालाच ओळखलं नाही. दीना हॉटेलात एकटाच, स्वत:भोवती एकांताचं जाळं विणून बसलेला शशी आता, जगाची ओळखही विसरला होता. अल्झायमरने त्याला जगापासून तोडलं होतं.  


परवा, शशी शरीरानेही संपला. पण, मनाने तो जेनिफर गेली तेव्हाच पैलतिरी पोहोचला होता. जेनिफर त्याचा श्वास होती. त्याचा प्राण होती. विरक्त होण्याची त्याची प्रक्रिया महाबळेश्वरच्या त्या दिवसांतच बहुदा सुरु झाली होती.  दोन महिन्यांपूर्वी मिलिंद गुणाजीसोबत महाबळेश्वरला गेलो होतो. दीना हॉटेलात न जाऊन कसं चालणार होतं, शशीच्या सोबतीने घालवलेले दिवस न आठवून कसं राहवणार होतं...  बाहेर पडताना, व्हिजिटर्स बुकात लिहून गेलो- 
Shashi was not in verandah, room was empty like his blue eyes... 

 

- सुभाष अवचट,  ( लेखक प्रख्यात चित्रकार आणि समाजअभ्यासक आहेत. लेखकाचा संपर्क : ९८२०१ ४१९१७ ) 

subhash.awchat@gmail.com 

बातम्या आणखी आहेत...