आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अॅना मोन अमोर: दांपत्‍यनात्‍याची गुंतागुंत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गोव्यात नुकत्याच पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात, अर्थात ‘इफ्फी’त पाहिलेल्या तीन लक्षवेधी चित्रपटांबद्दल लिहिताहेत ज्येष्ठ चित्रपट अभ्यासक. आजचा पहिला लेख एका रोमानियन चित्रपटाविषयीचा.


गोव्यात नुकत्याच संपन्न झालेल्या अठ्ठेचाळीसाव्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पाहिलेल्या चित्रपटांपैकी रोमानियाचा ‘अॅना, मोन अमोर’ नामक चित्रपट मनात घर करून राहिला. शब्दमाध्यमातून तो वाचकांपर्यंत पोचवावा वाटला. अॅना आणि टोमा हे विश्वविद्यालयात साहित्यविषयाचे विद्यार्थी, तरुण, सुंदर, संवेदनशील. दोघांमध्ये प्रेम जमते. एकमेकात ते गुंतत जातात. टोमा पालकांच्या विरोधाची पर्वा न करता अॅनाशी विवाहबद्ध होतो. आणि हळूहळू टोमाच्या असं लक्षात येतं की, अॅना कसल्याशा न्यूरॉटिक डिसऑर्डरने ग्रस्त आहे. त्यामुळे तिला अधूनमधून त्याचे झटके येत असतात. त्या वेळी तिचा स्वत:च्या शरीरावर, हालचालींवर ताबा राहात नाही. तोलही सांभाळता येत नाही. शिवाय ती विलक्षण खचल्यासारखी, हरल्यासारखी, जीवनाबाबत टोकाचे वैफल्य आल्यासारखी बडबडत राहाते. त्या वेळी तिची अवस्था विलक्षण दयनीय, केविलवाणी होत असते. टोमा त्यामुळे वैतागून जात नाही किंवा अॅनापासून विभक्त होत नाही. तो तिची सर्वतोपरी काळजी घेतो. वैद्यकीय उपचारही चालू असतात. अॅनात सुधारणाही होत जाते. त्यांना एक गोड मूलही होते. पण त्या आजाराचा झटका आला की, टोमाला अॅनाची शीशू साफ करण्यापासून, आंघोळ घालण्यापासून सगळं काही करावं लागत असतं. आणि ते तो न चिडता न कंटाळता करीत असतो. वर्ष सरत जातात. ते मूलही मोठे होते. त्याला मोठे करण्यात टोमाचाच मोठा वाटा असतो. अॅना आणि मुलगा या दोघांचीही टोमा सर्वतोपरी काळजी घेत असतो. आणि एके दिवशी अॅनाला मोठा झटका येतो. आणि त्यात ती चिडून बडबडू लागते. टोमाला खूप शिव्याशाप देते. तू माझी काळजी घेतोस वगैरे सगळं ठीक आहे. पण मुळात तुझं माझ्यावर प्रेमच नाही, असं वारंवार म्हणू लागते. टोमा तिच्या या त्राग्याने व्यथित होतो. ती असं का म्हणतेय ते त्याला कळत नाही. वर्षांनुवर्षे आपण अॅनाची काळजी घेतली, ती बरी व्हावी म्हणून सतत आपण झटत राहीलो. मुलालाही मोठं केलं, तो आता शाळेतही जातोय, आणि जीवनाच्या या टप्प्यावर आपल्या बायकोनं तुमचं माझ्यावर प्रेमच नाही असा त्रागा करावा, हे त्याच्या आकलनापलिकडचं असतं. अॅनाच्या या अशा बोलण्यानं, वागण्यानं विलक्षण व्यथित झालेला टोमा हताशपणे, असहायपणे तिच्याकडे पाहात राहातो...


सिनेमा संपतो पण प्रेक्षकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण करून जातो. नवरा-बायको या नातेसंबंधात किती गुंतागुंत असू शकते, त्याची जाणीव आपल्याला होते. सतत काळजी घेऊनही, खस्ता खाऊनही बायको म्हणते तुमचं माझ्यावर प्रेम नाही! अरे, मग प्रेम म्हणजे नेमकं काय असतं? प्रेमात काय अभिप्रेत असतं? प्रेम दाखवण्यासाठी कसं वागायचं असतं? स्त्रीच्या मनाचा थांग कुणालाच लागू शकत नाही असं म्हणतात, ते खरंच आहे की काय? की मानसिक गंडापायी अॅना असं बोलतेय? केअरिंग आणि लव्हिंग यांच्या व्याख्या कशा करायच्या? टोमाच्या जीवनात कुणी अन्य स्त्री अालेली नाही तरी अॅना असे का बोलतेय? टोमाचे काही चुकले का? अॅनाचे बरोबर आहे की टोमाचे? पराकोटीची सहनशीलता दाखवून अॅनाची काळजी घेणाऱ्या टोमाला तिचे हे बोलणे ऐकून काय वाटत असेल याची अॅनाला काहीच जाणीव असू नये?


असे कितीतरी प्रश्न कितीतरी पदर दर्शकांच्या मनात हा चित्रपट फडफडत ठेवतो. रोमानिया हा युरोपातील अन्य देशांच्या तुलनेत आर्थिकदृष्ट्या तसा गरीब देश आहे. पण निसर्गसुंदर आहे.  फुटबॉल या खेळासाठी जगात प्रसिद्ध आहे. सुमारे दोन कोटी लोकसंख्येच्या या देशांचे चित्रपट आंतरराष्ट्रीय महोत्सवातून नेहमीच लक्षवेधी ठरत असतात. दिग्दर्शक कॅलिन पीटर नेत्झर हा आजच्या घडीचा रोमानियाचा एक महत्त्वाचा आणि गुणी चित्रकर्मी मानला जातो. यापूर्वीची त्याची मारिया, मेडल ऑफ ऑनर, चाइल्ड फेज ही चित्रे अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातून गाजलेली आहेत. पुरस्कार मिळविणारी ठरलेली आहेत, प्रस्तुत ‘अॅना, मोन अमोर’ या चित्रानेही अलिकडेच बर्लिन महोत्सवात रजतपुरस्कार मिळविलेला आहे. स्त्री-पुरुष संबंधाचे अतिसूक्ष्म पैलू आणि पदर समजून घेण्याच्या संदर्भात हे चित्र महत्त्वाचे ठरते.


- सुधीर सेवेकर, औरंगाबाद
sevekar.sr@gmail.com

बातम्या आणखी आहेत...