आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनोबल विकासासाठी उपयुक्त 'साधने'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्यक्तिमत्त्व विकासासाठीची पुस्तकं हल्ली गल्लोगल्ली मिळतात. मात्र, यातली बहुतांश पुस्तकं तांत्रिक, बोजड आणि उपदेशात्मक भाषेतल्या तत्त्वज्ञानानं भरलेली असतात. डॉ. जयश्री गोडसे अनुवादित साधने हे पुस्तक मात्र याला अपवाद आहे. रुग्णाची मन:शक्ती वाढवण्यावर भर देणाऱ्या या पुस्तकाचा अनुवाद अनुवादिकेनं तितक्याच सहज, सोप्या भाषेत केला आहे. 

 

वै यक्तिक विकासाबाबत बाजारात इंग्रजी भाषेतली भरपूर पुस्तकं मिळतात. त्यातील लोकप्रिय पुस्तकांचे मराठीत अनुवादही बऱ्यापैकी खपतात. डॉ. जयश्री गोडसे अनुवादित साधने हेही असेच एक पुस्तक आहे. मानसोपचार तज्ज्ञ म्हणून अमेरिकेत व्यवसाय करणाऱ्या फिल स्टुट आणि बॅरी मायकेल्स या जोडीने लिहिलेल्या ‘द टूल्स’ या पुस्तकाचा हा अनुवाद आहे. डॉ. जयश्री या गृहशास्त्र विषयाच्या प्राध्यापिका आणि तज्ज्ञ. त्या विषयात त्यांची अनेक पुस्तकं आहेत.

 

शिवाय त्या एक ज्येष्ठ रंगकर्मीही आहेत. नाट्यस्पर्धांतून त्यांना आजवर अनेक पुरस्कारही मिळालेले आहेत. औरंगाबाद इथल्या स्पर्धा परीक्षा केंद्राच्या त्या संचालकही होत्या. महिला सक्षमीकरण, विशाखा समिती, अशा सामाजिक कार्यातूनही त्यांचे मोठे योगदान आहे. मानसशास्त्र हाही त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. अनुवादिकेचा हा सविस्तर परिचय आरंभीच सांगायचे कारण म्हणजे त्यांच्या या पृष्ठभूमीचा त्यांना द टूल्स हे पुस्तक अनुवादित करण्यासाठी साहजिकच अप्रत्यक्षपणे उपयोग झालेला आहे.

 

अनुवादिकेची परिपक्वता या अनुवादातून झळकते. आज ताणतणावांमुळे मानसिक आजार बळावत चालले असले तरी त्यावर उपचार घेण्याची सवय लोकांना लागलेली नाही. वेड लागणं, या शब्दसमूहात सर्व मानसिक आजार एकत्र झालेले दिसतात. हे सर्व लक्षात घेता, साधनेसारखं पुस्तक केवळ वाचनीयच नाही तर अत्यंत उपयुक्तही आहे, हे आवर्जून नमूद केले पाहिजे. प्रत्येक प्रकरणाची सुरुवात एखाद्या रुग्णाच्या उदाहरणाने होते.

 

त्या प्रकरणाचे बारकावे आणि तपशील देऊन लेखकद्वय तिचे विश्लेषण करतात. हे विश्लेषण रूढ मानसोपचार पद्धतीपेक्षा काहीसे हट के आहे. आणि म्हणून सुचवलेली, अंमलात आणलेली उपाययोजनाही हट के अशीच आहे. रुग्णाचा भूतकाळ, त्यातल्या घटना घडामोडींवर पारंपरिक पद्धतीत मानसोपचार तज्ज्ञ भर देत असतात. परंतू, स्टुट-मायकेल्स यांचा भर रुग्णाची  स्वत:ची मन:शक्ती कशी वाढवता येईल यावर अधिक आहे. प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी त्याचा सारांश दिलेला आहे. त्यामुळे वाचकाची मोठी सोय होते. भारतीय तत्त्वज्ञान, अध्यात्म चिंतन आणि मन:शांतीबाबतचा दृष्टिकोन याचाही या लेखकद्वयाने भरपूर वापर केलेला आहे, हेही या पुस्तकाचे वैशिष्ट्य. स्वत:च या पुस्तकात दिलेल्या साधनांचा वापर करीत स्वत:वर उपचार करायचे, मनोबल वाढवायचे असे वास्तव मार्गदर्शन प्रस्तुत पुस्तक करते. 


स्वमदत प्रकारच्या पुस्तकांचे बहुतांश अनुवाद व त्याची भाषा तांत्रिक, कृत्रिम, अपरिचित, अवघड अशी असते. या पुस्तकात तो दोष टाळण्याचा प्रयत्न आहे. परंतु आणखी सुबोध, ओघवत्या भाषेचा उपयोग नक्कीच करता आला असता ज्याने पुस्तकाची रंजकताही वाढली असती. तरीही, द टूल्स या जगप्रसिद्ध इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद करून डॉ. जयश्री गोडसे आणि प्रकाशक मेहता यांनी स्वमदत पुस्तकांच्या दालनात एक मोलाची भर टाकली आहे एवढे नक्की.

 

सुधीर सेवेकर, औरंगाबाद
sevekar.sr@gmail.com 

 

बातम्या आणखी आहेत...