आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुमशान आलंया !

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फुटबॉल से बढकर कोई खेल नहीं...फुटबॉल से बडा कोई तुफाँ नहीं...जागतिक सत्तास्पर्धेत दांडगाई करणाऱ्या व्लादिमीर पुतीन यांचा एकछत्री अंमल असलेल्या रशियात येत्या १४ जूनपासून विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचा थरार सुरू होत आहे...हा थरार अर्थातच सर्वव्यापी, सर्वसाक्षी असणार आहे. फुटबॉलच्या भाषेतच महिनाभर जग एकमेकांशी संवाद साधणार आहे. फ्री किक, पेनल्टी, शूट आऊट आणि गोल केल्यानंतरचा गगनभेदी कल्लोळ हे दृश्य या काळात सर्वत्र व्यापून असणार आहे.  तमाम क्रीडाप्रेमींना खात्रीचा आनंद देणाऱ्या या स्पर्धेच्या निमित्ताने फुटबॉलच्या वैश्विक प्रभावाचे, खेळात अधिराज्य गाजवणाऱ्या खेळाडूंच्या क्रीडाशैलीचे आणि खेळात दडलेल्या अंगभूत सौंदर्याचे पैलू उलगडणारा हा खास लेख...


जमैकाच्या युसेन बोल्टनं २००९मध्ये बर्लिनमध्ये अवघ्या ९.५८ सेकंदांत शंभर मीटर अंतर कापलं तेव्हा अख्ख्या जगानं तोंडात बोटं घातली. एरवी, तालुका-जिल्हा स्तरावरचे धावपटूसुद्धा अकरा-साडेअकरा सेकंदांत शंभर मीटर अंतर तोडतात. बोल्ट आणि या धावपटूंमधला फरक जेमतेम दीडदोन सेकंदांचा असतो, पण हेच अंतर असतं ‘सार्वकालिक महान' आणि इतर सर्वसामान्यांमध्ये. खरं तर शंभर मीटरची स्पर्धा सरळ रेषेतली, विनाअडथळ्याची. त्या तुलनेत पाडायला-अडवायला अंगावर येणाऱ्यांना चुकवत, चेंडूवर नियंत्रण राखत, कोणत्याही कोनातून, कसंही वळत गोलपोस्टवर वेगवान झडप मारण्याची कामगिरी अधिक आव्हानात्मक ठरते. 


अव्वल फुटबॉलपटू हे आव्हान लीलया पेलतात. गॅरेथ बॅलेसारखा रियाल माद्रिदचा स्ट्रायकर ताशी ३६.९ किलोमीटरच्या वेगानं फुटबॉलच्या मागं धावतो, तेव्हा पाहणाऱ्याची पापणीसुद्धा हलत नाही. एखाद्याला हातानंदेखील खेळवता येणार नाही, अशा सहजतेनं फुटबॉल खेळवणारे ख्रिस्तियानो रोनाल्डो, मेस्सी नागमोडी वळणं घेत ताशी ३२-३३ किलोमीटर वेगाने पळतात, तेव्हा ते बोल्टपेक्षा कमी वेगवान वाटत नाहीत. नव्वद मिनिटांच्या खेळात सरासरी ११ ते १५ किलोमीटर पळवणारा आणि कित्येकदा वेगात जमिनीवर आदळवणारा फुटबॉल हा खेळ  शारीरिक क्षमतेचा पुरता कस पाहतो. 'किक' मारल्यानंतर फुटबॉलला ताशी १८० किलोमीटरपेक्षा अधिक गती देणारा डेव्हिड हर्स्ट, सहजी ताशी दीडशेचा वेग देणारे डेव्हिड बेकहॅम, अॅलन शिअरर, रॉबर्टो कार्लोस यांच्या पायांमधली ताकद-तंदुरुस्ती अफलातून असते. म्हणून तर अशा फुटबॉलपटूंच्या फक्त पायांचा कोट्यवधी रुपयांचा विमा उतरवला जातो.


 प्रतिस्पर्ध्यांची फळी भेदून फुटबॉलला गोलपोस्टमध्ये विश्रांती घ्यायला लावण्याची अचूक नेमबाजी, तीही पायानं साधायची तर शरीराचा प्रत्येक स्नायू आणि बुद्धी यांचा ताळमेळ असावा लागतो. म्हणून तर ज्या अरनॉल्ड श्वाजनेगरचं बलदंड शरीर पाहून जगातल्या काही कोटी माणसांनी आयुष्यात कधी ना कधी डंबेल्स उचललेली असतात, तो स्वतः अरनॉल्डसुद्धा रोनाल्डो हा जगातला आजघडीचा सर्वात तंदुरुस्त, चपळ माणूस आहे असं म्हणतो. भारत हा क्रिकेटवेडा देश. इंग्रजांचे गुलाम देश सोडल्यास फारसं कोणी क्रिकेटच्या नादी लागलेलं नाही. पुढच्या वर्षी इंग्लंडमध्ये क्रिकेट वर्ल्ड कप खेळला जाईल. दहा देश पात्र ठरलेत, त्यासाठी. पण या दहा देशांची निवड जगातल्या किती देशांमधून झाली तर फक्त १४ देशांमधून. तर येत्या १४ जूनपासून सुरू होणाऱ्या फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये २१० देशांमधून फक्त ३२ संघांना संधी मिळाली आहे. इथं तुलना दोन खेळांची नव्हे तर खेळाच्या व्याप्तीची आणि टोकाच्या चुरशीची करायची आहे. दर चार वर्षांनी होणारा फुटबॉल वर्ल्ड कप म्हणजे, फक्त क्रीडा स्पर्धा नव्हे. हे ‘जागतिक पातळीवरचे महाभारत' आहे. 
 
 खेळाडूंची कमाई, जाहिराती-प्रायोजकांचे करार, टीव्ही वितरणाचे हक्क, पारितोषिकं आणि जगातल्या प्रत्येक कोपऱ्यातल्या न मोजता येणाऱ्या प्रेक्षकांची संख्या (२०१४ ला ब्राझीलमध्ये झालेला वर्ल्ड कप जवळपास चार अब्ज लोकांनी टीव्हीवर पाहिला.) या माध्यमातून किती अब्जावधी डॉलर्सची उलाढाल इथे होत असते, त्याचा केवळ अंदाज बांधणं शक्य असतं. ‘फुटबॉल वर्ल्ड कप' हा जगातला सर्वाधिक लोकप्रिय, सर्वाधिक पाहिला जाणारा ‘इव्हेंट' असतो. जगातल्या सर्वात श्रीमंत पहिल्या पाच क्रीडापटूंमध्ये मेस्सी, रोनाल्डो, नेयमार हे तीन फुटबॉलपटूच असतात. 


फेसबुक-ट्वीटरवर सर्वाधिक पंधरा कोटी फॉलोअर्स असणारा खेळाडू फुटबॉलपटू रोनाल्डोच असतो. म्हणूनच ‘खेळांचा राजा’ ही बिरुदावली फुटबॉलला मिळणं स्वाभाविक ठरतं. ब्रिटिश लेखक एच. ई. बेट्स यांनी १९५२ मध्ये ‘ब्रेन्स इन द फीट’ या शीर्षकाचा लेख लिहिला होता. त्यात त्यांनी फूटबॉलमधलं सौंदर्य उलगडलं होतं. या खेळाचं वैशिष्ट्य म्हणजे, जर्मनीप्रमाणं अत्युच्च दर्जाचा तांत्रिक खेळ करुनही वर्ल्ड कप जिंकता येतो, आणि ब्राझिलसारखा नैसर्गिक, सहजसुंदर खेळ करुनही जिंकता येतो.”खेळात सौंदर्य, नजाकत पहिल्यांदा येतं, आणि विजय नंतर, “ही ब्राझिलियन फुटबॉलची शिकवण आहे. हळूवारपणे चेंडूला खेळवत, प्रतिस्पर्ध्याला हूल देत आणि सहजपणे चेंडू गोलपोस्टमध्ये ढकलणं, ही मेस्सीची खासियत आहे.

 

ब्राझिलच्या नेयमारची जास्त चर्चा होत राहिल्यानं त्यांचा गॅब्रियल जीझस हा वीस वर्षाचा हुन्नरी खेळाडू झाकला जातो. कोणत्याही कोनातून गोल करण्याची क्षमता या स्ट्रायकरकडे आहे. कोस्टारिकाचा गोलकीपर केलोर नवास म्हणजे ‘चीनची अभेद्य भिंत’ आहे. गेल्या वर्ल्ड कपमध्ये केलोरनं इटली, इंग्लंड आणि नेदरलँडविरुद्ध एकही गोल स्वीकारला नव्हता. हे पाहून रेयाल माद्रिदनं लागलीच त्याला कोरा चेक देऊ केला होता. एरवी, रेड कार्ड-यलो कार्डाचं तिखट-मीठ फूटबॉलची रंगत वाढवतं. अब्जावधी प्रेक्षक आपला खेळ पाहात असल्याची जाणीव दोन गोलपोस्टमध्ये जीवतोड धावणाऱ्या खेळांडूमध्ये कमालीची ईर्षा पैदा करते. 


पेले यांनी म्हटल्याप्रमाणं, “वर्ल्ड कप हे असं ठिकाण आहे, जिथं ‘चांगला’ खेळाडू आणि ‘महान’ खेळाडू यांची पारख होते.” मेस्सी, नेयमार, रोनाल्डो हे आजघडीचे ‘महान’ फुटबॉलपटू वर्ल्ड कपमध्ये अजूनतरी ‘महान’ ठरलेले नाहीत. विविध लीगमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या मेस्सीला दिएगो मॅराडोनाप्रमाणं अर्जेंटिनाला वर्ल्ड कप जिंकून देता आलेला नाही. कोपा स्पर्धेत चिलीकडून अर्जेंटिनाचा पराभव झाल्यानंतर तर मेस्सीनं निवृत्तीच जाहीर करुन टाकली होती. देशवासीयांपुढे वर्ल्ड कप आणि स्वतःची मान उंचावण्याची शेवटची संधी त्याला आहे. ३४ वर्षाच्या रोनाल्डोपुढचं आव्हान हेच आहे. अफलातून ‘बायसिकल कीक’ मारत रियाल माद्रिदला रोनाल्डोनं नुकतीच युरोपीय चॅम्पियन लीग जिंकून दिली. पोर्तुगालला वर्ल्ड कप मात्र तो देऊ शकलेला नाही. स्पेनचा भरवशाचा आंद्रेस इनिएस्टा पुढच्या वर्ल्ड कपमध्ये दिसणार नाही. गोलच्या संधी शोधण्यात, मोक्याचे पास देण्यात इनिएस्टा माहीर आहे. स्पेनला आणखी एक वर्ल्ड कप जिंकून देऊन निवृत्त होण्याचा त्याचा इरादा असेल. एकदम भरात असलेल्या रोमेलू लुकाकामुळं बेल्जियमची स्थिती भक्कम आहे. त्याच्या आक्रमक खेळाच्या जोरावर बेल्जियमही मुसंडी मारु शकेल.


 वैयक्तिक कामगिरीच्या जोरावर १९९० नंतर पहिल्यांदाच इजिप्तला वर्ल्ड कपमध्ये नेणारा मोहम्मद सलाह ऐनवेळी दुखापतग्रस्त झालाय. इजिप्तचा सगळा डोलारा सलाहवर अवलंबून आहे. अँटोनियो ग्रीझमनमुळं फ्रान्सचे सामनेही रंगतदार ठरतील. जेम्स रॉड्रिग्जसारखा धोकादायक खेळाडू असलेला कोलंबिया, सुआरेझचा उरुग्वे धक्कादायक निकाल, नोंदवण्याची क्षमता राखून आहे. जर्मनीकडं वैयक्तिक करिश्मा असणारे खेळाडू कदाचित नसतील; परंतु, संघ म्हणून त्यांच्याइतकं जबरदस्त संतुलन क्वचितच कोणाकडं असेल. आक्रमण-बचावातला तांत्रिक सफाईदारपणा आणि प्रतिस्पर्ध्यांच्या हुकमी खेळाडूंची अडवणूक करण्यामुळं जर्मनीचं पारडं नेहमी जड असतं.

 

ब्राझीलखालोखाल चारवेळा जर्मनीनं वर्ल्ड कपवर नाव कोरलंय. सातत्यपूर्णै खेळ ही जर्मनीची खासियत आहे. उपांत्य फेरीचा अडसर तर ते सहज ओलांडतात. उपांत्य फेरी गाठण्यात जर्मनीला अपयश आलं त्यालाही आता वीस वर्षं होऊन गेली आहेत. सर्वाधिक पाचवेळा वर्ल्ड कप जिंकणारा ब्राझील कोणत्याही स्पर्धेत ‘हॉट फेव्हरीट’च असतो. ब्राझील, जर्मनी, फ्रान्स, स्पेन, पोर्तुगाल, अर्जेंटिना आणि बेल्जियम हे स्पर्धेतले बलवान आहेत. स्पर्धेचा यजमान रशिया विजेतेपदाच्या शर्यतीत नाही. एवढंच काय, पहिल्या दहा संघात स्थान मिळवता आलं तर रशियाचं यजमानपद सत्कारणी लागेल. वेगवान युरोपीय संघ, ताकदवान आफ्रिकी संघ, शैलीदार लॅटिन अमेरिकी संघ यांच्यापुढं टिकाव धरण्याची स्थिती अजून भारताची आलेली नाही. पात्रता फेरीतच दमछाक होत असल्यानं फूटबॉल वर्ल्ड कप भारतासाठी अजून खूप लांबचा पल्ला आहे. पण म्हणून भारतीय प्रेक्षकांसाठी हा निराशेचा क्षण नाही. त्याच्यासाठी हा अविस्मरणीय ठरावा असा थरारक सोहळा आहे. यातला आनंद तो आकंठ मिळवणार आहे... 

 

सुकृत करंदीकर

sukrut.k@gmail.com

बातम्या आणखी आहेत...