आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सौहार्दाकडून संहाराकडे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माणसाचे माणूसपण का हरवते - एवढे धर्म, एवढ्या देवदेवता, एवढ्या पूजाअर्चा, यज्ञयाग सारे सारे चालूच राहते, पण माणसातल्या ‘माणूस’पणाशिवाय? माणूस फक्त जातीने, धर्माने, पंथाने, रंगानेच ओळखला जाऊ लागला तर मग त्याला इतर सारे होतात अनोळखी. ती माणसे राहत नाहीत, ती होतात फक्त शिकाऱ्यांची लक्ष्ये.  मला नंतरच्या काळात या माणुसकीने पछाडले आणि मग या विषयावरील भरमसाठ पुस्तके, मासिके, कात्रणे, चित्रपट यातच माझे डुंबणे सुरू झाले. त्यामुळे आतून वाटू लागले ‘नाझी नरसंहार’ पाहायला पाहिजे - पोल पॉटची किलिंग फिल्ड्स पायाखालून तुडवायला पाहिजेत... आणि मग मनोमन वाटू लागले - तो संहार प्रत्येकाने पाहायलाच पाहिजे. आपण ‘माणूस’ होण्याकरता. दुसऱ्यामध्ये फक्त ‘माणूस’ पाहण्याकरता - त्याची जात-पात-धर्म सारे बाजूला सारण्याकरता. 


भारतीय संस्कृती ही हजारो वर्षांच्या परंपरेची, उज्ज्वल नीतिमूल्यांच्या निर्मिती-संवर्धनाची आहे. कंबोडियाच्या सांस्कृतिकतेवर भारताची छाप आहे, पण तो कंबोडिया दुराग्रही विचारांच्या आहारी जाऊन रसातळाला गेला. इतिहास म्हणून त्याची कारणमीमांसा केली तर वाटते, आपण यातून काही बोध घ्यावा, ‘सौहार्दाकडून संहाराकडे’ न जाण्याकरता... 


कंबोडिया 
- सौहार्दाकडून संहाराकडे 
- लेखक : कुमार नवाथे 
- प्रकाशन : ग्रंथाली  
- मूल्य : १००/- 

 

मोराची बायको 
अगदी अलीकडच्या काळात, मराठी कथेचे क्षितिज विस्तारणारे जे मोजके कथालेखक स्वत:ची वैशिष्ट्ये घेऊन दर्जेदार कथालेखन करीत आहेत, त्यामध्ये किरण येले यांचे नाव घ्यावे लागते. कथा आणि कविता या दोन्ही प्रांतांमध्ये किरण येले यांनी दुर्मिळ असे स्पृहणीय यश मिळवले आहे. कथेमध्ये शब्दातीत असे दुष्कर काही सांगण्यासाठी स्थितीस्थापकत्व साधणारी लवचिक आणि जमिनीखालील आगटी पेटवू शकणारे भुयार खोदण्याची क्षमता असणारी तीक्ष्ण लेखणी लेखकाजवळ असावी लागते. त्याच्या देहातील अतिसूक्ष्म रक्तवाहिन्या सर्वकाळ तप्त आणि वाहत्या असाव्या लागतात. विषयनिवडीपासून संपूर्ण बजावणीपर्यंत किरण येले यांचा जो कथाप्रवास चालतो, त्याला उत्तम सामाजिक ग्रहणशक्तीचे अधिष्ठान लाभलेले आहे. त्यांच्या कथेतील पात्रे सर्वसामान्य स्तरावरची आणि विशिष्ट परिस्थितीत कुंचबलेली, असहाय्य असली, तरी ती काठाला लागण्यासाठी सकारात्मकतेने धडपडताना दिसतात. एखाद्या पीतस्फटिकातून पिवळ्या रंगाच्या असंख्य छटा निर्माण होतात, तसा विविध स्तरांवरील माणसांच्या, स्त्री-पुरुषांच्या कथा सांगणारा ‘मोराची बायको’ हा कथासंग्रह एका अनोखा ‘टोपाझ’ आहे.  - आनंद अंतरकर 

मोराची बायको  
- लेखक : किरण येले 
- प्रकाशन : ग्रंथाली
- मूल्य :  १८०/- 


- संकलन : सुमेधा कुवळेकर

बातम्या आणखी आहेत...