आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पानगी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोकणातल्या बागेतलं लहानपण आठवलं
की, तांदळाला अगदी भरून यायचं.
वर्षांसाठी भरतेवेळी
कडुनिबांच्या वाळलेल्या पानांशी
गप्पा करत केळीच्या झाडाला
शेवटचा हात करत
मोठ्या थोरल्या डब्यात.
मग सासरी गेल्यासारखं इतकी कामात दंग,
की विविध प्रकारे शुचिर्भूत होऊन,
कोरडं होऊन, उन्हं खात बसून,
दळून तिची पिठी झाली,
आणि देशावर दुसऱ्या डब्यात बसली
तरी तांदळाला समजलंच नाही.
एक सुंदर स्वच्छ शुद्ध पंढरपुरी सकाळ.
आणि तिला तवा दिसला
आणि चपापली.
डोळ्यासमोर डाव, चटके, तव्यावर फिरणे,
काळपट सोनेरी कडा
आणि
उलथण्याने ‘चल नीघ!’
म्हणत तिला जाळी जाळी दाखवत
तेथून उचलून ताटलीत टाकणे.
पण आज तिचे ग्रह चांगले होते.
थोडेसे मीठ, बारीक चिरलेली मिरची
आणि पाणी किंवा ताक असावं;
हे सर्व मंडळी कौतुकाने तिला भेटायला;
सर्वांनी अगदी घट्ट एकरूप होणं,
आणि तिला केळीचं पान दिसताच
खूप सुखावली.
मग काय!
केळीच्या पानाला थोडेसे ओले केले,
आणि तिला छानपैकी पसरून थापले;
लाटण्याशी झटापट नाही,
आणि अंगावर काही शिंपडणे नाही;
फक्त ती आणि केळीचं पान.
एकीकडे तवा गरम होत असता,
केळीच्या पानाने अगदी जातीने तिला जवळ घेऊन,
सर्व बाजूंनी तिला झाकून,
दिलेला मानसिक आधार;
दोघांनी केलेला तव्यापर्यंत प्रवास,
आणि अतिशय सुंदर प्रकारे त्या पानात
तिची शिजलेली पानगी.
मग रोजच्या जगात पदार्पण,
दुसऱ्या एका केळीच्या पानाने केलेले
लोणी चटणीसह उत्कृष्ट स्वागत,
आणि आजूबाजूच्या लोकांच्या चेहऱ्यावरचे
समाधानाचे भाव.
तांदळा समजली.
केळीचं पानही समजलं.
जगात सगळ्यांनाच हे असं
पुन्हा भेटायचं आणि मिळून
कोणाला तरी आनंद द्यायचं
आणि स्वतः एकत्र आयुष्य
घालवायचं भाग्य नसतं.
आणि म्हणून अशा आठवणी
जपून ठेवायच्या असतात,
फेसबुकी.

 

- shelarkshama88@gmail.com

बातम्या आणखी आहेत...