आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेंगदाणे आणि कूट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गा वरान शेंगाशयातून बाहेर पडलेल्या
वसुंधरेच्या लेकी,
आणि वयात आल्यावर त्यांच्यावर झालेले संस्कार.
आपली नैसर्गिक मंद गुलाबी त्वचा,
रंगरंगोटीच्या जगाच्या पद्धती;
कधी समुद्राच्या वाळूत
एका मोठ्या कढईत,
आरामात उबदार होणे ,
आणि मधूनच स्वतःला झटकून बाहेर पडणे;
कधी एखाद्या भट्टीत
शौर्य गाजवून
युद्धाच्या खुणा दाखवत बाहेर पडणे;
कधी एका पारंपरिक लोखंडी कढईत
विहार करत
घरातल्या गृहिणीकडे बघत
हट्टाने डावाशी दोन हात करणे,
आणि मग कधीतरी
भाजक्या सुगंधात गुंग होऊन
नकळत आयुष्यातल्या चकमकीची फळे
स्वतःवर लेऊन
परातीत विश्रांती घेणे.
आजकाल
वसुंधरेच्या लेकींना जागतिकीकरण
समजलंय.
थोडा थोडा फेअर आणि लव्हलीचा ही
असर पडलाय.
आधुनिक लेकी
मायक्रोवेव्ह फेशिअल करतात,
एका चिनी मातीच्या भांड्यात पडून राहतात,
जास्त चौकशा करणाऱ्या
काचेच्या सटातून डोळे फाडून बघतात,
आणि अगदी
डागविरहित बाहेर पडतात .
आणि मग एकीकडे भिशीसाठी
जमलेल्या साबुदाणाकाकू,
वरेआजी, राताळेमावशी, काकडीताई
आणि शिंगाडाबेन
एकमेकींकडे बघत म्हणतात,
“काय आहे,
आजकालच्या दाण्यांना नं,
नवीन प्रयोग करायला आवडतात;
पण कसं असतं,
आम्ही साधी माणसं;
मनात काय आहे,
अथवा
आयुष्यातल्या अनुभवाचे रंग
तोंडावर जर दिसले
तर आमचा विश्वास वाढतो”
आणि एकीकडे
एक आधुनिक कूल
निष्कलंक दाणाई
कोरेलच्या सटातून
एक जळजळीत कटाक्ष टाकते
आणि म्हणते,
“इतकं सगळं फेअर आणि लव्हली करून
शेवटी मिक्सरमध्ये
आयुष्याचा चुराडाच होणार,
हे माहीत नव्हतं...’


- सुरंगा दाते, मुंबई
suranga.date@gmail.com

बातम्या आणखी आहेत...