आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फरफटीचा कोलाज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

किंफम यांच्या कवितेतून मेघालयाच्या राजकारणासोबतच आपणाला उत्तर ईशान्य भारतातील सामाजिक नि सांस्कृतिक जगण्यातील ताणेबाणे पाहायला मिळतात. वर्षानुवर्षे सुरू असलेल्या हिंसक परिवेशाचा तळ समजतो. त्यांच्या कविता या प्रामुख्याने राजकीय व्यवस्थेला यासाठी जबाबदार धरतात. त्यांना जाब विचारतात...


आजमितीस आपल्याकडे लिहिल्या जाणाऱ्या साहित्यामध्ये उत्तर ईशान्य भारतातील कवितेचे योगदान खूप मोठे आहे. या प्रदेशात कित्येक दशके सुरू असलेल्या अघोरी हिंसक काळाच्या मुळाशी अनेक कवी जाऊ पाहताहेत. या व्यवस्थेला आव्हान देताहेत. त्याची उत्तरे शोधू पाहताहेत आणि जमेल तशा संवादाच्या जागाही प्राणपणाने जपून ठेवताहेत. त्यांचे साहित्य हेच या हिंसाप्रवण भागात सामान्य माणसांसाठी प्रेरणा बनत आहे. असेच गेली तीन दशके खासी या भाषेत आत्मनिष्ठेने कविता लिहिणारे महत्त्वाचे नाव म्हणजे किंफम सिंग नोंगकिंरिह हे होय.

 

किंफम हे मूळचे चेरापुंजीचे. सध्या ते शिलाँगच्या नॉर्थ ईस्टर्न हिल युनिव्हर्सिटीमध्ये प्रकाशन विभागात उपसंचालक म्हणून कार्यरत आहेत. आजमितीस त्यांचे खासी भाषेमधून पाच, तर इंग्रजीमधून तीन काव्यसंग्रह प्रकाशित झालेले आहेत. त्यासोबतच त्यांनी उत्तर ईशान्य भागातील कवितांचे व कथांचे इंग्रजीमधून संपादन केलेले आहे. त्यांचा ‘का समोइ जोंग का लियर' हा खासीमधील अतिशय लक्षवेधी काव्यसंग्रह समजला जातो. त्यांनी कवितेसोबतच कथालेखनही केलेलं आहे. त्यांच्या कथा अनेक नामांकित नियतकालिकांत प्रसिद्ध झालेल्या आहेत. त्यासोबतच त्यांनी विविध भाषांतील साहित्य खासीमध्ये भाषांतरित केलेलं आहेच, पण बालसाहित्यसुद्धा लिहिलेले आहे. त्यांचा ‘टाइम्स बार्टर' या नावाने इंग्रजी हायकू कवितांचा संग्रह ‘हार्पर कॉलिन्स’कडून प्रकाशित झालेला आहे.
किंफम त्यांच्या ‘चेराचे प्राचीन खडक' या कवितेत सांगतात की - ‘इथं उल्लेखनीय असं काहीच नाही / या अतुलनीय नापीकपणाशिवाय’. म्हणजे, ‘जेव्हा सारा देश एका विकासाच्या उन्मादी अवस्थेत भंजाळून गेलेला असतो. जगभर अतुलनीय भारताचा डांगोरा पिटत असतो. तेव्हा आपल्याच भूमीतील एक कवी मात्र, या देशातील अतुलनीय नापिकीविषयी प्रश्न उभा करत असतो. हा प्रश्न फक्त दगड-माती किंवा शेती-भातीतून आलेला नसतो, तर वर्षानुवर्षे त्यांची भाषा व संस्कृती दुय्यमत्वाच्या ओझ्याखाली जगत असते. माणसं गुलामागत दहशतीच्या वरवंट्याखाली आला दिवस ढकलत असतात, तेव्हा हे सारे नापिकीपण हे कवीला मनुष्यनिर्मित वाटू लागते. राजकीय सूडशक्तीतून घडत आहे, असे वाटत राहते. यासाठी त्यांची तत्कालीन पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल यांनी मेघालयाला दिलेल्या भेटीनंतर लिहिलेली कविता पाहायला हवी. इथली राजकीय शक्ती एका राजकीय अपरिहार्यतेतूनच आपल्याशी सौहार्दाने वागतेय, हेसुद्धा हा कवी ओळखून आहे. म्हणूनच पंतप्रधानांचा उल्लेख ते ‘सायरनच्या आवाजात फिरणारा प्रवासी’ असा करतात. तो सायरनचा आवाज त्यांना युद्धकाळातल्या बेधुंद बॉम्बमारी सारखाच वाटतो. त्यांनी भेट दिली खरी, पण इथल्या माणसाची दुःख, अडचणी किंवा त्यांचे जीवनमान तरी त्यांना समजले असेल, का असा प्रश्न ते करतात. माननीय पंतप्रधानांच्या भेटीनंतर मागे उरलेलं मेघालय कवीला ‘डिफ्फुज्ड बॉम्ब'सारखे वाटत राहते.

 

कोणत्याही काळात सामान्य माणसांना शांतता हवीच असते. हिंसाप्रवण भागात जगणाऱ्या माणसांना तर ती फारच अत्यावश्यक असते. पण ही शांतता प्रस्थापित करण्यासाठी आपण नेमका कोणाचा बळी घेतो आहोत, हा प्रश्न या कवीसमोर उभा आहे. कडक सुरक्षेत जेव्हा प्रजासत्ताक दिवस साजरा केला जात असतो, तेव्हा आजूबाजूच्या वातावरणातील तणाव कवीला अधिकच अस्वस्थ करतो. ती शांतता अंगावर येणारी असते, असे कवी सांगतो. दहशतीतून येणारी कोणतीही शांतता आवाज दाबणारी असते. कवी लिहितो - ‘या दहशतीच्या भीतीने / सारेच आवाज होत राहिले मूक.’ कवी सांगतोय, की हे शहर पूर्वी इतके गप्पगार कधीच नव्हते. सामान्य माणसं आता या हिंसेच्या मागून येणाऱ्या दहशतीची शिकार बनत चाललेले आहेत. त्यांचे आवाज दाबले जाताहेत. गळे चिरले जाताहेत. एकेकाळी भारतातील नैसर्गिकदृष्ट्या संपन्न असलेल्या या भागात आज मात्र फक्त रक्ताचे पाट किंवा किंकाळ्या मागे उरताहेत. आपली संस्कृती, भाषा, निसर्ग किंवा आणखी कोणत्याही गोष्टीपेक्षा जिवंत राहणे, तगून राहणे हेच इथल्या सामान्य माणसासमोर आव्हान आहे. अशा अत्यंत कठीण काळात किंफमसारखे कवी मात्र आपल्या शब्दांच्या जोरावर या इथल्या मूक समाजाच्या व्यथा-वेदना अक्षरवाङमयात नोंदवित आहेत.

 

किंफम ज्या खासी भाषेत लिहितात, ती मेघालयची शासकीय भाषा नाही. किंवा तिचा वाचकही मर्यादित स्वरूपाचा आहे. काही काळासाठी, तर वेगाने नष्ट होणाऱ्या भाषांच्या यादीत युनेस्कोने खासीची नोंद केलेली होती. तरीही किंफमसारखे साहित्यिक त्यांच्या मातृभाषेतूनच व्यक्त होत राहतात. त्यांनी त्यांच्या साहित्यातून उभारलेले भावविश्व हे पराकोटीचे वास्तवादी आणि तितकेच आशावादीसुद्धा आहे. एकाच वेळी हरवलेला भूतकाळ आणि बिघडत चाललेला वर्तमान या तानपेचातून ही कविता आकाराला आलेली आहे. किंफम यांची कविता ही निव्वळ राजकीय नाही. त्यात भू-सामाजिक आणि सांस्कृतिक संदर्भांना विशेषत्वाने स्थान आहे. त्यांच्या  कवितेत लोककथेत आढळून येणारी कैक मिथके आहेत. या कवितेत आढळून येणारी गीतबद्धता परिणामकारक आहे. त्यांची कविता मौखिक परंपरेत सापडणारी आदिवासी समूहाची जीवनधारा आत्मसात करते आहे. तिला पुसल्या गेलेल्या भूतकाळाची जाणीव आहे. शांतता हिरावून संपूर्ण मानवजातीला विनाशाकडे ढकलणाऱ्या राजकीय शक्तींना ती स्थानिक मिथकातून आव्हान देते आहे. ही कविता आपल्याकडे लिहिल्या जाणाऱ्या मुख्य प्रवाहातील कवितेपेक्षा पूर्णतः वेगळी आहे. ती धार समजून घ्यायची असेल तर आपणाला त्यांचा विनाशमुखी वर्तमान समजून घ्यावा लागेल. त्यांचा रक्तरंजित आणि आतंकित असा वर्तमान समजून घ्यावा लागेल.

 

बिजोया साविअन यांची ‘शॅडो मेन' ही कादंबरी मेघालयातील रक्तरंजित वर्तमान समजून घेण्यासाठी पुरेशी आहे. दिल्लीमध्ये स्थायिक असलेली एक महिला आपल्या मैत्रिणीला आणि तिच्या कुटुंबाला भेटण्यासाठी शिलाँगला येते. आणि या परिसरात घडणाऱ्या हिंसक गोष्टी पाहून ती हादरून जाते. एकाच वेळेस निसर्गाने मुक्तहस्ताने केलेली पाखरण, तर दुसरीकडे मानवनिर्मित हिंसाचाराचे थैमान शब्दबद्ध करत ही नायिका आपल्याला शिलाँगच्या वर्तमानाची ओळख करून देते. एकामागून एक घडणाऱ्या हत्या आणि त्यामागची सूडसूत्रे इथले सामान्य माणसाचं जीवन उद्ध्वस्त करताना दिसून येतात. म्हणूनच वास्तवाचा वेध घेणारी किंफम यांची कविता वाचकाला जवळची वाटायला लागते. या हिंसाप्रवण भागात जगताना कवी म्हणून असलेले किंफम यांचे भान कमालीचे आश्वासक आहे. या कठीण काळात कला-साहित्यच  इथल्या माणसांच्या वेदनेचा स्वर असेल, याची त्यांना ठाम जाणीव आहे. म्हणूनच ते सांगतात की - ‘त्या रात्री, जेव्हा भाषा हरवून बसते तिचे नादमाधुर्य / आणि कोणताच मंत्री देत नाही आश्वासन की करत नाही भाषण / तरीही कवी मात्र बोलत राहतो आपल्याच नादात.’ या आत्मविश्वासातूनच त्यांची कविता निर्माण होते आहे. यासाठी आपण ‘सुंदरी' ही कविता पाहू शकतो. कवी सांगतो -

हे माझ्या प्रिय सुंदरी
काल माझ्या एका माणसानं
मारलं  आहे तुझ्या एका माणसाला
आणि तुझ्याही एका माणसानं मारलंय माझ्या एका माणसाला
आज तर ते शपथबद्ध झालेत मारण्यासाठी एकमेकांना
आणि तरीही यात ना तू आहेस, ना मी.
या संतप्त उन्हाळी पुरातच
आपण भेटायला हवं उमखरा नदीच्या काठावर
विसरून सारा वेडसरपणा.
हा निरोप मी तुला पाठवतो आहे
या भयाण मध्यरात्री, तू मात्र  
तुझी खिडकी उघडीच ठेव.   
या अशा संवादाच्या वेगवेगळ्या जागा कवी शोधतो आहे. हिंसेवर, तिरस्कारावर संवादाने मात करू पाहतो आहे. उग्रवादी शक्तींना संवाद नको असतो. तिरस्कारावर आणि वर्चस्ववादावरच त्यांचे राजकीय पीक फोफावत असते. काश्मीरमध्ये मागील आठवड्यात झालेली पत्रकार सुजाद बुखारींची हत्या हा योगायोग नसतो. आणि तरीही किंफम मात्र आपली सर्व शक्ती पणाला लावून ही संवादवेल वाढवू पाहताहेत. या अशा कठीण काळातही ‘संवादासाठीची खिडकी' जपून ठेवणे, हेच त्यांच्या समग्र साहित्याचे मुख्य सूत्र आहे, असे मला वाटते.
किंफम यांच्या कवितेतून मेघालयातील जनसामन्याचं आयुष्य अधोरेखित होत जातं. त्यांचा राग-लोभ, त्यांच्या अपेक्षा, हालअपेष्टा त्यांच्या कवितेतून मुखर होत जातात. त्यांच्या कवितेची भाषा तिथल्या रोजच्या चाली-रितीतुन विकसित झालेली दिसून येते. त्यातूनच तिला जनमानसाची प्रचंड मान्यता पाहायला मिळते. म्हणूच ही कविता वरवरची बौद्धिक चमत्कृती किंवा राजकीय विधान न राहता, आजूबाजूच्या परिवेशाच्या इच्छाआकांक्षाचे समग्र चित्र बनत जाते. किंफम यांची कविता ही जनसामान्यांच्या फरफटीचा कोलाज आहे. दडपशाहीच्या जोरावर मुक्या केलेल्या कैक पिढ्यांच्या संवेदनेचा आक्रोश ही कविता शब्दबद्ध करते आहे. आजमितीस जर उत्तर-ईशान्य भारताच्या वेदनेचं महाभारत समजून घ्यायचं असेल, तर किंफम सिंग नोंगकिंरिह यांची कविता आपण वाचायलाच हवी.

 

shinde.sushilkumar10@gmail.com

लेखकाचा संपर्क : ९६१९०५२०८३

बातम्या आणखी आहेत...