आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाताहतीतील सत्‍वशोध

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वसाहतवादाच्या क्रूर खुणा आसाम आजही वागवतो आहे. स्वातंत्र्यपूर्व आणि नंतरही या सांस्कृतिक आणि आर्थिक शोषणाच्या जाणिवा अासामी साहित्यातून टोकदारपणे मांडणाऱ्या मोजक्या, पण महत्त्वाच्या साहित्यिकांमध्ये कमल कुमार तंती हा तरुण लेखक आघाडीवर आहे. ज्या हजारो कामगारांना आपला गाव, संस्कृती आणि भाषा या सर्वांना पारखे होत ब्रह्मपुत्रेच्या काठावर गुलाम म्हणून जगण्याची नामुष्की आली, त्यांच्या या वाताहतीला ही कविता विद्रोही स्वर देते. 


आसाममधील चहाच्या मळ्यांवर इंग्रजांची व्यापारी नजर गेली त्याला आता दोन शतकांचा काळ लोटला आहे. चहा उत्पादनावरील तत्कालीन चीनची मक्तेदारी मोडून काढण्याची ही नामी संधी आहे हे इंग्रज जाणून होते. त्यातूनच त्यांनी चहाच्या उत्पादनाला योग्य असलेली बहुतांश जमीन लागवडीखाली आणली. पण अधिक उत्पादनासाठी त्यांना हवे होते काटक कामगार. त्यासाठी इंग्रजांनी तत्कालीन छोटा नागपूरमधील हजारो आदिवासी कामगारांचे सक्तीने स्थलांतर घडवून आणले. भारतामध्ये एखाद्या कामासाठी कामगारांचे सक्तीने केलेले ते सर्वात मोठे स्थलांतर होते. यातून भारत चहा उत्पादनामध्ये जागतिक स्तरावर अग्रेसर बनला. इंग्रजांनाही यातून अमाप नफा मिळाला. पण या प्रचंड उत्पादनासोबत चहा मळ्यांवर काम करणाऱ्या कामगारांची मात्र पाळेमुळे कायमस्वरूपी उखडून निघाली. या स्थलांतरित कामगारांच्या माथ्यावर कायमस्वरूपी गुलामगिरी लादली गेली. कालांतराने ब्रिटिश गेले आणि ती जागा चहाच्या मळे-मालकांनी घेतली. वसाहतीकरणातून निर्माण झालेली ही शोषणाची कहाणी तशीच राहिली. वसाहतवादाच्या या क्रूर खुणा आसाम आजही वागवतो आहे. स्वातंत्र्यपूर्व आणि नंतरही या सांस्कृतिक आणि आर्थिक शोषणाच्या जाणिवा अासामी साहित्यातून टोकदारपणे मांडणाऱ्या मोजक्या, पण महत्त्वाच्या साहित्यिकांमध्ये कमल कुमार तंती हा तरुण लेखक आघाडीवर आहे. 


‘मरांग बुरु अमार पिता’ हा त्याचा प्रकाशित झालेला पहिला कविता संग्रह. या संग्रहातील पन्नास कविता या ब्रिटिश काळापासून म्हणजे गेल्या दोनशे वर्षांपासून झालेल्या अन्याय अत्याचाराला चव्हाट्यावर आणतात. आदिवासी समाजाच्या लोककथेतील अनेक मिथकांचा आधार घेत ही कविता त्यांचे सांस्कृतिक पुनर्जीवन करू पाहते. या कवितेतील ‘मरांग बुरु’ हे असंच एक मिथक आहे. खरे तर ती वनदेवता आहे. कसलीही लिखित परंपरा अस्तित्वात नसताना प्राचीन ज्ञान एका पिढीतून दुसऱ्या पिढीत हस्तांतरित करणारा ही देवता. प्राचीन ज्ञानाने दोन पिढ्या जोडणारा तो महत्त्वाचा सांधा मानला जातो. हे मिथक भारतातील बहुतांश आदिवासी परंपरेमध्ये आढळून येते. तो आदिपुरुष नेहमीच समाजाच्या सोबत असतो ही तेथील लोकांची आदिम श्रद्धा आहे. आणि त्यातूनच चहाच्या मळ्यांभोवती झालेल्या शोषणाला आपला आद्यपुरुष ‘मरांग बुरु’ नक्कीच साक्ष असणार याची कवीला जाणीव आहे. म्हणूनच कवी सांगतो : 


हे आमचं तारुण्य नि आयुष्य 
ही भूमी आणि हे पाणी, 
आपणच करायला हवे निर्माण फक्त आपल्यासाठी 
हे मरांग बुरु माझ्या बापा, 
दाखवत राहा मार्ग आणि जागवत राहा आठवणी 
या काळाच्या नि कैक शतकातील विध्वंसाच्या... 


कमल कुमार याची कविता एक प्रकारे कैक शतकांतील शोषणाचा या व्यवस्थेला जाब विचारते आहे. ज्या हजारो कामगारांना आपला गाव, संस्कृती आणि भाषा या सर्वांना पारखे होत ब्रह्मपुत्रेच्या काठावर गुलाम म्हणून जगण्याची नामुष्की आली, त्यांच्या या वाताहतीला ही कविता विद्रोही स्वर देते . आर्थिक, सांस्कृतिक आणि सामाजिक स्तरावर दबलेल्या व पूर्णतः दुर्लक्षित असलेल्या समाजाची घुसमट टोकदारपणे हा कवी आपल्या कवितेतून मांडतोय. आसामच्या आदिवासी भागात ‘चल मिनी असाम जबो’ हे लोकगीत फार प्रसिद्ध आहे. चहाच्या मळ्यावर मिळणाऱ्या रोजगाराच्या आशा दाखवून आणलेल्या नायकाचे किती भयाण शोषण होते हे दाखवणारे हे लोकगीत आहे. त्यामध्ये  कामासाठी अक्षरश: डांबून ठेवले कामगार आहेत. त्यांची आजूबाजूला खपाटपोटाने रडणारी चिल्लीपिल्ली आहेत आणि अक्षरश: घाम शिपडून चहाचे मळे फुलवणारा कामगार मात्र दुर्दैवाने घोटभर पाण्यासाठी मोताद होताना या लोकगीतात दिसतो. हे लोकगीत आपल्याकडील दया पवार यांच्या ‘धरण’ या कवितेची आठवण करून देते. वर्षाकाठी करोडोंची उलाढाल असलेल्या या उद्योगात दिवसभर राबणाऱ्या कामगाराच्या हातावर मात्र दिवसाचे शंभर रुपयेसुद्धा टेकवले जात नाहीत. हा शोषणाचा ढाचा आपणाला निश्चितच वसाहतीकरणाच्या जास्तीतजास्त नफा या तत्त्वाकडे घेऊन जातो. आणि म्हणूनच वसाहतीकीकरणाच्या रचिताचा विद्रूप चेहरा कमल कुमार यांच्या कवितेत आपणाला प्रामुख्याने आढळतो. 


आसाममध्ये चहाच्या मळ्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांना ‘ट्री ट्राइब’ म्हणून ओळखले जाते. कवीला त्याच्या समूहाची अशा प्रकारे होणारी ओळख ही अमानुष वाटते. त्याच्या मते एखाद्या समाजाच्या ओळखीशी वस्तू जोडली जाण्याची ही एकूण जगातच एकमेव घटना असावी. मानवी मूल्यांना नाकारत व्यक्तीचे ‘कमोडिटिफिकेशन’ करणे ही या काळातील बाजाराची मिळकतच म्हणावी लागेल. आणि हे नाकारायचे असेल तर आपल्याला आपल्या मुळाशी जावे लागेल या भावनेतूनच ही कविता स्वत्वशोधाच्या प्रवासाकडे निघालेली दिसते. 


आसामचा प्रदेश हा नेहमीच अशांत राहिलेला आहे. कवी त्याचा उल्लेख युद्धभूमी असा करतो. विविध प्रवाहाच्या जोरदार संघर्षातून नावीन्यपूर्ण अभिव्यक्तीची माध्यमे अलीकडे या भूमीत निर्माण होत आहेत. यासंदर्भात आपणाला मिया पोएट्री चा उल्लेख करायलाच हवा. एकेकाळी ‘डोंट इन्सल्ट मी एज मियाँ’ असे सांगणाऱ्या अब्दुर रहीम यांच्यापासून ‘जे अमी मिया, अमी गोरबितो’ असा आत्मविश्वास सांगण्यापर्यंत हा प्रवास येऊन पोहचला आहे. या ‘मिया पोएट्री’ ने संपूर्ण आसामध्ये धार्मिक भेदभाव करणाऱ्यांना सर्जनशील पद्धतीने चपखल उत्तर दिलेले आहे.

 
अगदी त्याच पार्श्ववभूमीवर कमल कुमार यांच्या कवितेतील सांस्कृतिक संघर्ष समजून घेण्यासाठी आसामधील दीर्घकाळ चाललेल्या भाषिक आणि सांस्कृतिक संघर्षाचाही विचार करावा लागेल. बंगाली आणि आसामी भाषेच्या संघर्षाची पायाभरणी तर ब्रिटिशकाळापासूनच झाली. त्यातूनच आसामीच्या मान्यतेसाठी साठीच्या दशकात बाराक व्हॅलीमध्ये मोठे हिंसक आंदोलन उभे राहिले होते. मातृभाषेसाठीच्या आंदोलनात ‘चिरो सेनेही भाषा जाणोनि’ अर्थात आमची मातृभाषा आम्हाला प्रिय आहे असा प्रखर स्वर त्यातून निघाला होता. तर ऐंशीच्या दशकात अस्तित्वात आलेल्या ‘आसाम मोव्हमेंट’ आणि सोबतच निर्माण झालेल्या उल्फा या उग्रवादी संघनेमुळे हा प्रदेश अधिकच हिंसाप्रवण बनला. त्यामध्ये मारल्या गेलेल्या लोकांची संख्या ही काही लाखांमध्ये आहे. हा रक्तरंजित इतिहास जाणून घ्यायचा असेल तर अरुणी कश्यप या युवा लेखकाची ‘द हाऊस विथ थाउजंड स्टोरीज’ ही कादंबरी वाचायलाच हवी. या प्रदेशाच्या शांततेसाठी ज्ञानपीठ विजेत्या इंदिरा गोस्वामी आणि सुप्रसिद्ध विचारवंत हिरेन गोहेन यांनी वेळोवेळी प्रयत्न केले पण त्याला अद्यापही फारसे यश आलेले नाही. दुसरीकडे आसामधील बहुतांश आदिवासी समूहाचे आर्थिक आणि सामाजिक शोषण अद्यापही सुरूच आहे. त्यातूनच हा शोषित समाज आपल्या सांस्कृतिक आणि सामाजिक प्रतिष्ठेसाठी धडपडताना दिसतो आहे. म्हणूनच कमल कुमार यांचा २००७ मध्ये प्रकाशित झालेल्या ‘निम्नबोर्गो सोमाज ओइतिज्य’ (सबाल्टर्न सोसायटीज लीगसी) या वैचारिक निबंध संग्रहाला विशेष महत्व आहे. या ग्रंथामधील वीस निबंधातून लेखकाने आसाममधील वसाहतिक आणि उत्तरवसाहतीक इतिहासासोबतच सर्वहारा समाजाच्या परिप्रेक्ष्यातून इतिहासाची पुनर्मांडणी करण्याचा आश्वासक असा प्रयत्न केलेला आहे. 


कमल कुमारच्या साहित्यात आढळणारा उत्तर-वसाहतवाद हा फक्त काळाच्या संदर्भात आपणाला मर्यादीत करता येणार नाही. त्यासाठी आपणाला अल्बर्ट वेन्ड या अभ्यासकाचे पुढील मत ध्यानात घ्यावे लागेल. For me, the post in post-colonial does not just mean after, it also means around, through, out of, alongside, and against. पर्यायाने कमल कुमार या तरुण कवीच्या माध्यमातून निश्चितच उत्तर-वसाहतवादी साहित्याच्या अभ्यासाचे आसामच्या परिप्रेक्ष्यातून एक नवे दालन खुले झाले आहे याची जाणीव त्याचे निबंध वाचत असताना होत राहते. 


एकंदरीतच कमल कुमार यांची कविता वास्तव आणि मिथकांची सरळमिसळ करत आकाराला येते. त्यामध्ये आपणाला लोकगीते आणि लोककथांचे संदर्भ सापडतात. काही शे वर्षांपासून स्वतःच्या भूमीला पारखे झालेल्या आदिवासी जीवांची आपल्या मुळांकडे परतण्याची तडफड दिसून येते. त्यांच्या कवितांना इतिहासाची पूर्वपिटीका असल्याचेहि जाणवत राहते. वसाहत आणि उत्तर-वसाहतिक काळात वरचढ असलेल्या इतर सांस्कृतिक आणि भाषिक संघर्षातून निर्माण होऊ पाहणाऱ्या संकरित रचिताला ती आत्मसात करते आहे. त्यासोबतच आपला भूप्रदेश, स्वभाषा आणि संस्कृतीकडे या कवितेला विशेषत्वाने ओढ आहे. म्हणूनच सुमारे दोनशे वर्ष वसाहतिक रचनेत बेदखल केलेल्या समाजाच्या सत्त्वशोधाची ही कविता आहे. आसाममधील चहा मळ्यातील कामगारांची उत्तर वसाहतिक वाताहत समजून घ्यायची असेल तर कमल कुमार तंती या तरुण लेखकाला वाचावेच लागेल. 


- देशीकार लेणे, लेखकाचा संपर्क - ९६१९०५२०८३
shinde.sushilkumar10@gmail.com 

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, आणखी फोटो... 

बातम्या आणखी आहेत...