Home | Magazine | Rasik | sushilkumar shinde write on journalist nirupama dutt

आत्मभानातून स्फुरलेला झगडा

सुशीलकुमार शिंदे | Update - May 13, 2018, 02:00 AM IST

निरुपमा दत्त गेल्या तीन दशकांपासूनचे भारतीय पत्रकारितेतील एक महत्त्वाचे नाव आहे. त्यासोबतच त्यांचे पंजाबी साहित्यामध्ये

 • sushilkumar shinde write on journalist nirupama dutt

  निरुपमा दत्त गेल्या तीन दशकांपासूनचे भारतीय पत्रकारितेतील एक महत्त्वाचे नाव आहे. त्यासोबतच त्यांचे पंजाबी साहित्यामध्ये कथा, कविता आणि अनुवादाच्या माध्यमातून लक्षवेधी योगदान राहिलेले आहे. कोणत्याही प्रकारचं दुय्यम जगणं नाकारत आत्मभानातून न्याय हक्कांशी झगडणारा विस्तृत साहित्यपट त्यांनी पंजाबी वाचकांसमोर ठेवला आहे...

  पंजाबी साहित्यातील कैक पिढ्यांचं उदरभरण करणाऱ्या अमृता प्रीतम यांच्या सहवासातून अधिकाधिक बंडखोर अभिव्यक्तीकडे वळत गेलेल्या निरुपमा दत्त यांच्या लेखनात सुरुवातीपासूनच स्त्रीवादी तत्वज्ञानाची एक दांडगी समज आहे. त्यांच्या कवितेने स्त्री म्हणून समाजाने लादलेली बंधने सहजपणे उडवून लावली आहेत. पंजाबी साहित्यात वर्ज्य असलेल्या कित्येक गोष्टी त्यांनी कवितेतून बेधडकपणे मांडल्या आहेत. तसं तर महाविद्यालयीन काळापासूनच त्यांच्या इंग्रजीमधील कविता विविध मासिकांमधून प्रकाशित होत होत्या. त्यासोबतच एकदा त्यांनी काही कविता ‘नागमणी' या पंजाबी मासिकासाठी पाठवून दिल्या. या मासिकाचे संपादन अमृता प्रीतम करीत होत्या. निरुपमा यांच्या कवितेने प्रभावित झालेल्या अमृता प्रीतम यांनी त्या कविता प्रकाशित तर केल्याच, पण सोबतच निरुपमा यांच्यातील कवयित्री अधिकाधिक विकसित होत राहावी, यासाठीही त्या नेहमीच प्रयत्नशील राहिल्या.


  निरुपमा यांचा ‘एक नदी सांवली सी' हा पंजाबीमधून प्रकशित झालेला पहिला कविता संग्रह. या संग्रहातील कवितेने संपूर्ण पंजाबी साहित्यविश्वाचे लक्ष्य वेधून घेतले. फाळणीच्या माध्यमातून झालेल्या हिंसेचे असंख्य ओरखडे या कवितेला व्याकुळ करत होते. त्यानंतर खलिस्तानी चळवळ, वेळोवेळी झालेल्या रक्तरंजित दंगली आणि सोबतच आजूबाजूच्या परिवेशातील विरोधाभास त्यांच्या कवितेला अधिक प्रखर करत होता. त्याचमुळे पंजाबमधील व्याकुळ समाजविश्व शब्दबद्ध करणारी त्यांची कविता साहित्यविश्वाने अधिक गंभीरपणे घेतली, ती आजतागायत.

  ‘जे तुसी मेरे शहर आवोगे / तो बुरी औरोतदिन फेहरिस्त विच / मेरा नाम वि पावोगे’ अशाप्रकारची ‘बुरी औरत' सारखी कविता लिहिणाऱ्या निरुपमा साहित्यव्यवहारातील गोरखधंदा माहित असल्याने स्पष्टपणे बोलत असतात. आपल्याकडे पुरुषी व्यवस्थेने, पुढे केलेले स्त्रीवादी साहित्य हे कसे सामान्य वकुबाचे आहे हेसुद्धा त्या आवर्जून सांगतात. कारण, या तथाकथित स्त्रीवादी साहित्यिका पुरुषी वर्चस्वाच्या कॅम्पमध्ये आतून सामील आहेत, याची त्यांना जाणीव असते. म्हणून त्यांची साहित्यनिर्मितीची प्रेरणा तथाकथित साहित्यव्यवहारातील राजकारण नाकारून सामान्य माणसाच्या जगण्यापर्यत पोहचते, हे आपणाला सहज जाणवते.


  कविता आणि कथालेखनासोबतच त्यांनी पंजाबी आणि हिंदी साहित्याचा विपुल अनुवाद इंग्रजीमध्ये केलेला आहे. पंजाबी साहित्यातील क्रांतिकारी कवी लाल सिंग दिल यांच्यापासून पाश, अमृता प्रीतम ते संत राम उदासी अशी कितीतरी नावे आपणाला सहज घेता येतील. पण भाषांतराच्या प्रत्येक कृतीमागे त्यांचा एक सृजनशील हस्तक्षेप वाचकाला स्पष्ट जाणवतो. त्या भाषांतराच्या निवडीबाबत अतिशय गंभीर आहेत. त्यांनी लाल सिंग दिल आणि संत राम उदासी यांच्या कवितेला इंग्रजीत अनुवादित करून पंजाबमधील दलित समूहाचा संघर्ष व आक्रोश भारतभर पोहचविला. ‘मातृभूमी, आणखी अनेक चंद्र तुझ्या मांडीवर येऊ दे. हे प्रकाशमान सूर्या, तू असाच चमकत रहा, माझ्या कामगारांच्या झोपड्यावर...’ या संत राम उदासी यांच्यावरील कवितेवरून आपणाला याची जाणीव होत राहते. मुळातच निरुपमा दत्त यांना भाषांतर करत असताना ‘प्रोटेस्टिंग पोएट्री' खूप महत्वाची वाटत आलेली आहे.


  अलीकडेच प्लुटो या ग्रहाचे नाव वैज्ञानिकांनी नऊ ग्रहातून वगळून टाकले. त्याचवेळी भारतातील एक संवेदनशील कवी सांगत होता - मेरा रुतबा तो बहुत पहले ही छिन गया था, जब घर वालों ने कह दिया - ‘बिजिनेस फॅमिली में ये ‘मिरासी' कहाँ से आ गया' .


  खामोशी कहती थी - तुम हम में से नहीं हो. अब प्लुटो कि उदासी देखकर, मेरा जी बैठ जाता हैं. बहुत दूर हैं... बहुत छोटा हैं... मेरे पास जितनी छोटी छोटी नजमें थी, सब उसके नाम कर दी... आणि या संवेदनशील भावनेतूनच आकाराला आला गुलझार यांचा ‘प्लुटो' नावाचा कवितासंग्रह. हा हिंदीतील कवितासंग्रह निरुपमा यांनी इंग्रजीमध्ये अनुवादित केलेला अतिशय उत्तम कवितासंग्रह होय.


  गेल्यावर्षी अवतारसिंह संधू उर्फ पाश यांच्या कविता एनसीईआरटीच्या अकरावीच्या अभ्यासक्रमातून वगळण्यात आल्या. म्हणजे तीस वर्षांपूर्वी खलिस्तानी आतंकवाद्यांनी केलेल्या त्याच्या हत्ये इतकीच ही भयानक घटना आहे, असे लेखिकेला वाटते. पाशच्या बहुतांश कविता त्यांनी इंग्रजीमध्ये भाषांतरित केलेल्या आहेत. या सोबतच त्यांनी ‘स्टोरीज ऑफ सॉईल' या नावाने पंजाबी कथालेखकांच्या एक्केचाळीस कथा भाषांतरित आणि संपादित केलेल्या आहेत. अमृता प्रीतम यांच्यापासून ते प्रेम गोरखी यांच्यापर्यंत व कर्तारसिंह दुग्गल ते अहमद सलीम आणि वीणा वर्मा अशा कैक लेखकांच्या कथेच्या माध्यमातून त्यांनी पंजाबच्या माती-माणसांची कहाणी समर्थपणे मांडलेली आहे. त्यासोबतच त्यांनी पाकिस्तानातील ‘अर्धेमुर्धे आभाळ' या नावाने त्यांनी पाकिस्तानी लेखिकेच्या कथा संपादित केलेल्या आहेत. एका राजकीय निर्णयाने दोन देशाची फाळणी झाली, पण दोन्हीकडच्या स्त्रीचे भोग समान आहेत. सीमेपार स्त्रीच्या वाट्याला आलेले हे अर्धेमुर्धे जगणे या संपादनातून त्यांनी समर्थपणे मांडलेले आहे.


  निरुपमा दत्त यांनी लिहिलेल्या ‘गाथा बंत सिंहची' या चरित्रग्रंथाचे एकंदरीतच भारतीय साहित्यात मौलिक योगदान आहे.या चरित्र ग्रंथाच्या माध्यमातून त्यांनी वाचकांसमोर बंत सिंह यांची हिम्मत आणि संघर्ष तर मांडलाच, पण सोबतच शीख समूहातील अमानवी जातीय अस्मिताही अधोरेखित केल्या आहेत. या चरित्र ग्रंथाच्या माध्यमातून त्यांनी पंजाबच्या दलित आणि क्रांतिकारी साहित्याच्या घेतलेल्या परामर्षाला एकूणच संदर्भमूल्य प्राप्त झालेले आहे. पंजाबच्या बुर्ज झब्बार या गावात राहणाऱ्या एका दलित शेतमजुरावर जाट समूह जीवघेणा हल्ला करतात. त्यात त्याचे दोन हात आणि एक पाय कायमचा तोडला जातो. का तर, तो त्याच्या मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्काराचा न्याय पंचायतीला नाकारून न्यायालयात मागतो आहे. अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या या महानायकाला जातीय अस्मितेतून एका भयानक शिक्षेला सामोरे जावे लागते. तो तरीही मोडून पडत नाही. त्याचा संघर्ष अजून तीव्र करतो. काळजाचा ठाव घेणाऱ्या आपल्या गीतातून आणि असामान्य धाडसातून हजारो लोकांना प्रेरणा देतो. या ‘गाणारे शिल्प' अर्थात बंत सिंह यांच्या चरित्रग्रंथाच्या माध्यमातून लेखिकेने पंजाबातील अनेक अमानवी चालीरीतींना जाब विचारलेला आहे. पराग पोतदार यांनी मराठीत भाषांतरीत केलेला हा चरित्रग्रंथ विश्वकर्मा प्रकाशन यांनी याचवर्षी मराठीत प्रकाशित केलेला आहे.


  आपल्यासाठी गुरुमुखीसोबत मराठी भाषेचे एक आत्मिक नाते आहे. या दोन्ही भाषकांना सांस्कृतीकरित्या जोडण्याचे काम सातशे वर्षांपूर्वी संत नामदेवांनी केले. त्यांच्या आयुष्यातील तब्बल दोन दशके ते पंजाब मधील समाजजीवनाशी एकरूप होऊन राहिले. गुरू नानकदेवांनी शीख धर्माची स्थापना करण्याआधी सुमारे २०० वर्षे त्यांनी पंजाबी समाजात समतेचे, मानवतेचे अंकुर फुलवले. त्यांच्या नामदेव बाणीचा आजही तिथल्या जनमानसावर प्रचंड प्रभाव दिसून येतो. महाराष्ट्रात संतकृपेने उभ्या राहिलेल्या इमारतीला भाषिक आणि प्रांतिक सीमेच्या मर्यादा ओलांडून ‘गुरु ग्रंथ साहिब' पर्यंत पोहचवणारे नामदेव महाराज निश्चितच ‘नामा तयाचा किंकर । तेणे केलासे विस्तार' या ओळी सार्थ ठरवतात.


  निरुपमा दत्त यांच्या साहित्यात आपल्याला कपोकल्पित कहाण्या आढळत नाहीत. त्याची जागा वास्तवाने घेतलेली स्पष्टपणे दिसते. वरवर शांत वाटणाऱ्या पण आतून जातीय, धार्मिक अभिनिवेशाने भेंडाळून गेलेल्या समाजाचे चित्र त्या समर्थपणे उभे करतात. यात त्यांच्यात आपसूक असलेल्या पत्रकारितेचा त्यांना फायदा होत असेलही. पण वर वर वाटणाऱ्या बातमीच्या किंवा घटनेच्या पलीकडे डोकावणारी व समग्र चित्र रेखाटणारी एक नजर सृजनशील लेखकाला हवी असते. आपल्याकडे अरुण साधू यांच्या राजकीय कादंबऱ्यांमध्ये किंवा आसाराम लोमटे यांच्या कथेमध्ये आढळून येणारी सृजनशील पत्रकाराची समज निरुपमा यांच्या संपूर्ण साहित्यामध्ये डोकावत राहते. म्हणूनच सामान्य माणसांच्या असामान्य संघर्षाच्या कहाण्या त्यांनी त्यांच्या साहित्यातून अजरामर केल्या. पंजाबी साहित्यामध्ये अमृता प्रीतम आणि मनजीत तिवाना यांच्यानंतरचा गेली तीन दशकातील एक महत्वाचा आवाज म्हणून आपणाला निरुपमा दत्त यांना वगळून पुढे जाताच येत नाही.


  - सुशीलकुमार शिंदे
  shinde.sushilkumar10@gmail.com
  लेखिकेचा संपर्क : ९६१९०५२०८३

 • sushilkumar shinde write on journalist nirupama dutt

Trending