आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक सशक्त हस्ताक्षर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बाजारूमूल्याने वस्तू ठरवलेल्या बाईची करूण किंकाळी त्यांच्या कवितेत तीव्रतेने आकार घेते आहे. त्यांच्या कवितेतील प्रत्येक शब्द हा आजूबाजूच्या कोलाहली अनुभवातून आकाराला आलेला आहे. थेट शोषित वर्गाशीच बांधिलकी ठेवणारी त्यांची ही कविता आपल्या नजरेपल्याडचे एक काळेकुट्ट विश्व आपल्यासमोर उभे करताना दिसत आहे...

 

गेल्या दोन दशकांत कवितेच्या माध्यमातून आदिवासी जगताचे ताणेबाणे भारतीय साहित्यात नोंदविणाऱ्या नामांकित कवयित्री म्हणजे, निर्मला पुतुल. अन्यायाने दबून गेलेल्या बाईचा प्रागतिक पण संघर्षशील आवाज आपल्या कवितेतून नोंदविणाऱ्या आघाडीच्या साहित्यिकांमध्ये आपणाला निश्चितच निर्मला पुतुल यांचे नाव घ्यावे लागते.


निर्मला पुतुल यांचा जन्म झारखंडच्या संताल परगण्यातील दुधावी कुरुवा या एका लहानशा खेडेगावातला. राज्यशास्त्राचा पदवीधर असूनही त्यांनी नर्सिंगचा कोर्ससुद्धा केलेला. मात्र, वयाच्या तेराव्या वर्षी मनाविरुद्ध लग्नाला सामोरे जाव्या लागलेल्या, या कवयित्रीचे अनुभवविश्व आपल्याला अक्षरश: पिळवटून काढते. सध्या त्या ‘जीवन रेखा' या संघटनेच्या माध्यमातून सामाजिक स्तरावर सक्रीय आहेत. खरंतर निर्मला पुतुल या प्रत्यक्ष संघर्षभूमीवर काम करणाऱ्या कवयित्री आहेत. त्या पूर्णवेळ कार्यकर्त्या असूनही त्यांची कविता मात्र कुठेही आवाजी नाही. या कवितेत वाचकाला कोणतीही पोझ घेतलेली आढळून येत नाही. खरंतर आजूबाजूला अजागळ पद्धतीने वाढणारा शोषक समूह त्या पाहताहेत. आपल्या जमिनी, पिढीजात संपत्ती आणि संस्कृती मागे टाकून उपरे बनण्याची सक्ती त्या जवळून अनुभवताहेत. या सोबतच बाजारशरण मनोवृत्तीने अधिकच विकृतीकडे झुकणारा त्यांचा भवताल त्यांना दिसतोय. अशा वेळी त्यांच्या कवितेची प्रेरणा ही मोडून पडलेला शोषित वर्ग आहे. पुरुषी व्यवस्थेसोबतच बाजारूमूल्याने वस्तू ठरवलेल्या बाईची करूण किंकाळी त्यांच्या कवितेत तीव्रतेने आकार घेते आहे. त्यांच्या कवितेतील प्रत्येक शब्द हा आजूबाजूच्या कोलाहली अनुभवातून आकाराला आलेला आहे. थेट शोषित वर्गाशीच  बांधिलकी ठेवणारी त्यांची ही कविता आपल्या नजरेपल्याडचे एक काळेकुट्ट विश्व आपल्यासमोर उभारताना दिसत आहे.


मूळ संथाळीमधून कविता लिहिणाऱ्या निर्मला पुतुल यांचा ‘अपने घर की तलाश में’ हा संथाळी-हिंदी असा द्विभाषिक संग्रह २००४ मध्ये रमणिका फाऊण्डेशनने प्रकाशित केला. याच संग्रहातील बहुतांश कविता एकत्रित करत ‘भारतीय ज्ञानपीठ' ने २००५ मध्ये त्यांचा मूळ हिंदीतून ‘नगाड़े की तरह बजते शब्द' या नावाने काव्यसंग्रह प्रकाशित केला. अलीकडे २०१४ मध्ये त्यांचा ‘बेघर सपने’ हा संग्रह प्रकाशित झालेला आहे. त्यांची कविता इंग्रजीसोबतच अनेक भारतीय भाषांमध्ये भाषांतरित झालेली आहे. आपल्याकडे मराठीमध्ये कविता महाजन यांनी ‘नगाऱ्याप्रमाणे वाजणारे शब्द' या नावाने त्यांचा कवितासंग्रह भाषांतरित केलेला आहे. निर्मला पुतुल यांच्या कवितेची शक्तीस्थळे मार्मिकपद्धतीने नोंदवित कविता महाजन यांनी या काव्यसंग्रहात मांडलेली ‘भूमिका' निश्चितच महत्वपूर्ण अशी आहे. ‘मनोविकास प्रकाशना’ने प्रकाशित केलेल्या या संग्रहात कवयित्रीच्या भाषांतरीत कवितेसोबाबतच ‘मुक्ती त्यांना मिळते, ज्यांना हवी आहे' या शीर्षकाखाली त्यांची एक मुलाखत समाविष्ट करण्यात आलेली आहे. निर्मला पुतुल यांच्या कवितेने एकंदरीतच आदिवासी जीवन वा त्याच्या परंपरांकडे आणि विशेषत्वाने स्त्री जगताकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्यास मोठी मदत केली आहे.  त्यांची कविता आपल्यासमोर एकाचवेळी प्रश्नांचे डोंगर उभे करत असतानाच, समाजाचे हिणकस रूप दाखवत आहे. यासाठी त्यांच्या ‘क्या तुम जानते हो' या कवितेचा विचार करायला हवा.


तन के भूगोल से परे
एक स्त्री के
मन की गाँठे खोल कर
कभी पढ़ा है तुमने
उसके भीतर का खौलता इतिहास?
असा प्रश्न उभा करून कवयित्री सांगते - अगर नहीं! / तो फिर जानते क्या हो तुम / रसोई और बिस्तर के गणित से परे / एक स्त्री के बारे में...? पितृसत्ताक व्यवस्थेच्या हिंस्र स्वरुपांना प्रश्नांकित करतानाच, ही कविता मानवी मूल्यांची पेरणी करू पाहते आहे.


कदाचित समाज म्हणून पराकोटीचे मौन बाळगण्याचा हा काळ असावा. सामाजिक किंवा सांस्कृतिक विरोधाभासावर नेमकेपणाने बोलायचे टाळून राजकीयदृष्ट्या बरोबर (Politically Correct) राहणाऱ्यांचे कळप सगळीकडेच तयार होत आहेत. अशा वेळी संथाळी  जनजीवन आणि त्याची होरपळ साहित्यात मांडणारे आणखी एक महत्वाचे नाव म्हणजे, हंसदा सोवेन्द्र शेखर. इंग्रजी ललित साहित्यात आदिवासी जगण्याचे असे ताणेबाणे क्वचितच आढळून येतात. ज्यापद्धतीने विकासाचे आखूड कातडे पांघरून उद्ध्वस्तीकरणाच्या मागे लागलेल्या शासनाला प्रश्न विचारणारे लोक नको असतात. अगदी असेच सामाजिक विरोधाभासावर नेमकेपणाने बोट ठेऊन त्यातील रानवाटपणा उघड करणारा लेखक तरी कुठे हवा असतो? शेखर यांचा ‘आदिवासी कांट डान्स' हा कथासंग्रह प्रकाशित झाल्यानंतर ‘नोव्हेंबर इज फॉर मायग्रेशन’ या कथेने संपूर्ण झारखंड ढवळून निघाला. सरकारने काही काळासाठी या संग्रहावर बंदीसुद्धा घातली. छोट्या छोट्या आमिषांना बळी पडून लैंगिक शोषण झालेल्या आदिवासी पोरींची ही गोष्ट आहे.

 या सर्व प्रकरणाची तीव्रता जाणून घ्यायची असेल यवतमाळच्या कुमारी मातांसंदर्भात ‘इकॉनॉमिक अॅण्ड पॉलिटिकल विकली’मधील प्रा. प्रशांत बनसोडे यांचा लेख आवर्जून वाचायला हवा. हाकेच्या अंतरावर घडणाऱ्या या घटितांचे अस्तिव आणि दायित्व समाज कोणत्याच काळी मान्य करत नसतो. मग या सत्याला सामोरे जाणाऱ्या लेखकाला मात्र संस्कृतीरक्षकांच्या रोषाला सामोरे जावे लागते. अशा कोणत्याच तथाकथित संस्कृतीरक्षकांची भीडभाड न बाळगता निर्मला पुतुल यांची कविता शब्दरूप घेताना दिसते आहे. त्यांच्या कवितेचा नगारा आपल्याच तंद्रीत जगणाऱ्या या मुक्याबहिऱ्या जगाशी हुज्जत घालतो आहे. झोपलेल्यांचा निद्रानाश करू पाहतो आहे. मानवी भावभावनांची आणि सामान्य माणसांच्या जगण्यासाठीच्या संघर्षाची नोंद घेणाऱ्या निर्मला पुतुल यांच्या कवितेचा पसारा आणि परीघ विलक्षण मोठा आहे.


या व्यवस्थने पुन्हा पुन्हा नाकारलेल्या स्त्रीच्या अस्तित्वाची कवयित्रीला पूर्णतः जाण आहे. म्हणूनच ती लिहिते - दौड़ती-हाँफती-भागती तलाश रही हूँ सदियों से निरंतर / अपनी ज़मीन, अपना घर / अपने होने का अर्थ! या समाजाने कोणत्याही इतिहासाच्या पुस्तकात आपली नोंद घेतलेली नाही, याची त्यांना जाणीव आहे. म्हणूनच आपला इतिहास आपल्यालाच लिहावा लागेल, असे त्या ठामपणे सांगताहेत. त्यांच्या कवितेचा आसपास हा झारखंडच्या पार्शवभूमीवरच आकाराला आलेला आहे. म्हणूनच त्यांची कविता आदिवासी समूहावर बळजबरीने लादल्या जाणाऱ्या इतिहासाला प्रश्न विचारते आहे. 


अगर हमारे विकास का मतलब
हमारी बस्तियों को उजाड़कर / कल-कारखाने बनाना है / तालाबों को भोथकर राजमार्ग / जंगलों का सफाया कर आफिसर्स कॉलोनियाँ बसानी हैं / और पुनर्वास के नाम पर हमें / हमारे ही शहर की सीमा से बाहर हाशिए पर धकेलना है / तो तुम्हारे तथाकथित विकास की मुख्यधारा में / शामिल होने के लिए / सौ बार सोचना पड़ेगा हमें।. त्यांच्या पिढीजात संस्कृतीला नाकारून नफ्यातोट्याच्या जोरावर आकारात जाणाऱ्या विकासाला त्यांच्यावर लादणे हा अन्याय आहे, असे त्या ठामपणे आपल्या कवितेतून सांगत आहेत.


निर्मला पुतुल ज्या संथाळी भाषेत लिहितात, त्या भाषेच्या लिपीत लोभस वैविध्य आहे. कवी रामदास टुडू यांचे महाकाव्य ‘खेरवाड़ बोंशा धोरोम पुथी' हे संथाली साहित्यातील प्रारंभीचे साहित्य मानले जाणारे साहित्य हे बंगाली लिपीतून लिहिलेले आहे. त्यासोबतच बरेच साहित्य हे देवनागरी आणि उडिया लिपीतूनसुद्धा लिहिले गेलेले आहे. विसाव्या शतकाच्या प्रारंभी पंडित रघुनाथ मुरमु यांनी परिश्रमपूर्वक ‘ओल चिकी' या लिपीची निर्मिती केली. एकंदरीतच काही शतकांची पार्श्वभूमी असलेल्या संथाळी साहित्यावर लोकसाहित्याचा प्रभाव दिसून येतो. निर्मला पुतुल यांच्या संघर्षशील कवितेत आपणाला निश्चित अशी लोकगीतांची लय सापडत आहे. एकाच वेळी पारंपरिक शब्दकळा आणि विवेकी मांडणी पुतुल यांच्या कवितेला समकाळात अधिक प्रभावी करतो आहे.


आपल्या कवितेचे शब्द नगाऱ्यासारखे वाजावेत आणि माणसाने डोळे उघडे ठेऊन घराबाहेर पडावे, अशी अपेक्षा निर्मला पुतुल त्यांच्या कवितेकडून करत आहेत. जीवनाच्या ओबडधोबड  वाटेवरून चालताना आलेल्या भल्याबुऱ्या अनुभवांनी कवितेची भाषा रुक्ष  केली आहे, असे त्या मोकळेपणाने सांगतात. जमिनीवर कोसळलेला माणूस या पृथ्वीतलावरची सारी ऊर्जा आत्मसात करत अडखळत्या पायाने पुन्हा आपला प्रवास सुरू करेल, अशी विजिगीषा त्यांच्या कवितेत आहे. हा प्रवास त्याला ‘त्याच्यासारख्याच माणसांवर' चर्चा करत राहणाऱ्या माणसांच्या ठेप्यावर घेऊन जाईल, याची त्यांना खात्री आहे. म्हणूनच त्या कवितेकडे भाषेचा किंवा आपल्या समूहजगण्याचा ‘थकला हरला प्रवास' मानतात. जो अद्याप कवी वा कवयित्रीने थांबवलेला नाही. आपल्या आदिम मुळांशी प्रामाणिक राहून व्यवस्थेला जाब विचारणाऱ्या, या कवितेने आदिवासी परिवेष केव्हाचाच ओलांडलेला आहे. ही कविता आता प्रत्येक संवेदनशील माणसाच्या दारात उभी आहे. ती हरएक माणसाला एकाचवेळी समृद्ध आणि अस्वस्थही करते आहे. भूगोलाच्या सर्व मर्यादा नाकारून पुतुल यांची कविता केव्हाचीच निघालेली आहे, इतिहासाच्या पानावर एक  सशक्त हस्ताक्षर उमटविण्यासाठी, यात कसलीही शंका मनात राहिलेली नाही...

 

- सुशीलकुमार शिंदे

लेखकाचा संपर्क - ९६१९०५२०८३
shinde.sushilkumar10@gmail.com

 

बातम्या आणखी आहेत...