आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहानुभूती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सहानुभूती आणि सहअनुभूती यांच्यात फक्त एका कान्याचं अंतर आहे. पण मुलांना यातला फरक सांगणं आणि त्यांना सहानुभूतीकडून सहअनुभूतीकडे घेऊन जाण्याचं काम मोठ्यांचं आहे. सहानुभूती दाखवताना आपण दुसऱ्याच्या दु:खाला समजून घेतो आणि सहअनुभूतीमध्ये आपण दुसऱ्यांच्या भावनांचा अनुभव घेतो. 


महाविद्यालयाच्या मैदानावरचा फुटबॉलचा सामना रंगतदार अवस्थेत होता. संघात खेळणारे सगळेच आवेशात होते. सामना संपायला अवघं एक मिनिट बाकी होतं. फक्त एक गोल झाला तर वरचढ असणाऱ्या संघाला विजेतेपद मिळणार होतं. आणि गोल झाला. मात्र, गोल करण्याच्या नादात दुसऱ्या संघाचा खेळाडू अडखळून पडला. त्याच्या डोक्याला मोठी दुखापत झाली. त्याला मैदानाबाहेर आणलं तेव्हा त्याच्या मित्रांमध्ये बोलणं सुरू झालं. अरेरे, बिचाऱ्याला किती लागलंय, खूप रक्त येतंय. ज्या खेळाडूनं त्याला पाडलं त्यानं हे मुद्दामच केलंय. सामना जिंकण्यासाठी. फार वाईट झालं नं याच्या बरोबर. सामना राहिला बाजूला आणि हे दुसरंच काही तरी समोर आलं. अशा गडबडीत एक जण मात्र काही बोलला नाही. त्यानं ताबडतोब रुग्णवाहिका, दवाखान्याशी संपर्क साधला. अधिकाऱ्यांपर्यंत प्रसंग पोहोचवला. हे झाल्यावर तो म्हणाला, नुसतं बोलत बसून काय होणार होतं? त्याच्यावर बेतलेल्या प्रसंगाचं गांभीर्य समजून कृती करणं आवश्यक आहे. नुसती दया दाखवणं, दु:ख दाखवणं, यामुळे त्याला मदत मिळणार नाही. 


सायलीच्या मैत्रिणीच्या, अनुप्रियाच्या आईला ओव्हरीजचा कॅन्सर डिटेक्ट झाला. अनु मनातून पूर्ण ढासळली. खचून गेली. आपली आई एका असाध्य रोगानं ग्रासली आहे, तिचं फार काळ जिवंत राहणं आता शक्य नाही. हेही तिला डॉक्टर बाबांशी बोलत असताना कळालं. तिच्या मैत्रिणी तिला सहानुभूती दाखवत. काहींच्या डोळ्यात पाणी तरळायचं. अनुप्रियाला रडताना पाहून त्यासुद्धा तिच्याबरोबर रडायच्या. ‘काय गं तुझं नशीब. या वयात तुला आईची सगळ्यात जास्त गरज आहे आणि तुझ्या आईचं पण काहीच वय नाही.’ एखादी मैत्रीण म्हणायची, आम्हाला दया येते तुमची. काय झालंय नं तुमच्या कुटुंबातलं वातावरण.’ अनुप्रियाची अवस्था पाहून प्रत्येकीला तिच्याविषयी कणव वाटत होती. सायलीनं अनुप्रियाला म्हटलं, मला तुझ्या मनाची अवस्था कळते आहे. तू म्हणालीस त्याप्रमाणे, तुझ्या आईचे किमोथेरपी सेशन सुरू होताहेत. मी किमोथेरपी सेशनच्या वेळी तुझ्याबरोबर राहीन. तुला काही कारणाने घरी वा बाहेर जावं लागलं तरी मी असेन तिथे. औषधं आणणं, आईची काळजी, डबा आणणं, हे सगळं करायला मी सदैव तुझ्यासोबत आहे. अनुच्या इतर मैत्रिणींना तिची काळजी वाटत होती, मात्र सायलीला काळजी करण्यापेक्षा काळजी घेणं जास्त महत्त्वाचं वाटलं. तसं तिने बोलून आणि करून दाखवलं.


तरुण मुलांना जे अत्यंत महत्त्वाचं जीवनकौशल्य आत्मसात करणं आवश्यक आहे ते म्हणजे सहानुभूती. फुटबॉलच्या मैदानावर घडलेल्या घटनेत बऱ्याचशा खेळाडू आणि इतरांनी सहानुभूती दाखवली. अर्थात ‘सिम्पथी’ दाखवणं आवश्यक असतं. सहानुभूती न दाखवता सायलीनं एम्पथी दाखवली, ते जास्त प्रगल्भ असल्याचं लक्षण आहे. एखादं माणूस अडचणीत असलं, दुर्घटना झाली तर त्याबद्दल करुणा दाखवणं, दया करणं, दु:ख झालंय असं म्हणणं किंवा झालेल्या घटनेबाबत किंवा व्यक्तीबाबत शेरेबाजी करणं, जजमेंटल होणं म्हणजे सहानुभूती. मुलं आपल्या घरात किंवा आजूबाजूच्या लोकांकडून, प्रसंगातून सहानुभूती दाखवणं शिकतात. सहानुभूती दाखवणं हे माणूसपणाचं लक्षण आहे. पण फक्त सहानुभूती हे जीवनकौशल्य पुरेसं नाही. सहानुभूतीची विकसित आणि पुढची पायरी म्हणजे सहअनुभूती. सहानुभूती आणि सहअनुभूती यांच्यात फक्त एका कान्याचं अंतर आहे. पण मुलांना यातला फरक सांगायलाच हवा. इतकंच नव्हे, तर सहानुभूतीकडून सहअनुभूतीकडे घेऊन जाण्याचं काम आपल्यासारख्या मोठ्यांचं आहे. सहानुभूती दाखवताना आपण दुसऱ्याच्या दु:खाला समजून घेतो आणि सहअनुभूती असते तेव्हा आपण दुसऱ्यांच्या भावनांचा अनुभव घेतो. असं म्हणतात की, सहअनुभूती किंवा एम्पथी म्हणजे पुटिंग युवरसेल्फ इन अदर्स शूज. सहानुभूतीत त्या व्यक्तीची काळजी घेण्याची शाब्दिक हमी दिली जाते. मुलांना या जीवनकौशल्याचा परिचय करून देताना त्यांना दुसऱ्या व्यक्तीची वेदना आणि त्रास यांचा अनुभव घेणं म्हणजे काय हे कळण्याची संधी द्यायची असते. सहानुभूती दुसरी व्यक्ती भोगत असलेलं दु:ख पाहून दाखवली जाते. तर सहअनुभूती हे शेअर करणं असतं. दोन्हींमध्ये दुसऱ्या व्यक्तीची काळजी वाटते. दोन्हीत माणुसकी असते. दोन्हींचा पाया अनुकंपाच असते. हृदयांतर चित्रपटातील एका प्रसंगात जेव्हा मोठ्या बहिणीला कॅन्सरनंतर केस गळून पडताना छोटी बहीण पाहते तेव्हा ती आपल्या बहिणीसमोर दु:ख दाखवण्यापेक्षा तिच्यासारखी पूर्ण केस काढून डोक्याचा गोटा करून घेते. आपल्या सख्या बहिणीविषयी वाटणाऱ्या सिम्पथीच्या पुढचा टप्पा एम्पथी तिने गाठला. एका पेट शॉपमधे आपल्या आईबरोबर पिलू विकत घेण्यासाठी एक छोटी मुलगी जाते. तिथली वेगवेगळी पिल्लं तिला आवडतात. मात्र एका कोपऱ्यातल्या छोट्याशा देखण्या पिल्लाला ती जवळ घेते. तेच पिल्लू हवं म्हणते. मात्र, मालक म्हणतो की, ते पिल्लू एका पायाने अधू आहे. अशा वेळी अरेरे बिचारं पिल्लू म्हणून तो हट्ट सोडून देण्याऐवजी त्या मुलीने तेच पिल्लू विकत घेतलं, तेव्हा दुकानदारानं तिला त्याचं कारण विचारलं. तेव्हा तिने फक्त पँट वर करून आपला अधू पाय त्याला दाखवला. ही होती सहअनुभूती. दर वेळेलाच आपण दुसऱ्याच्या दु:खाचा, समस्येचा अनुभव घेऊ शकू असं नाही पण इतकं नक्की समजू शकतात मुलं की, सहानुभूतीत आपण त्या व्यक्तीच्या जागी नसतो. सहानुभूतीत आपल्या जवळच्या व्यक्तीबद्दल काळजी वाटते. त्याने नेहमी सुखात राहावं अशी मनात इच्छा असते. शेअरिंगचा भाग त्यात जास्त असतो. आपल्या जवळच्या माणसांबद्दल ही भावना वाटणं हे जीवनकौशल्य आहेच. सहानुभूती हे संवेदनशीलतेचे लक्षण आहे आणि सहअनुभूती हे प्रगल्भतेचे लक्षण. अगदी दोन वर्षांपासूनही हे जीवनकौशल्य असतं आणि प्रसंगानुरूप ते विकसित करायला आपण मुलांना मदत करायची असते.  आजच्या काळात सर्व जण आत्मकेंद्री, स्वत:पुरतं पाहणारे आहेत. फक्त शाब्दिक सहानुभूती दर्शवणारे आहेत. त्यात संवेदनशीलता किंवा ज्याला भावनांक म्हणतो तोही कमी दिसतो. अशा परिस्थितीत सहअनुभूती हे जीवनकौशल्य मुलांना अधिक जाणीवपूर्वक देण्याचा नुसता प्रयत्नच नव्हे तर जबाबदारी सर्वांची आहे. शब्दाला कृतीची, अनुभूती घेण्याची, व्यक्त होण्याची जोड असली तर हे जीवनकौशल्य जगण्याला मदत करते.


- डॉ. स्वाती गानू, पुणे
ganooswati@gmail.com

बातम्या आणखी आहेत...