आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चले चलो

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वर्तमानातून भविष्याकडे वाटचाल सगळेच करतात. या प्रवासात अनेकदा अपयशही येऊ शकतं. नव्हे, ते येतंच. पण या नकारात्मकतेतून काहीच मिळत नाही. अशा गोष्टी मनाला न लावून घेता पुढं चालत राहणं हे कौशल्य आहे.


अभय शाळेत पहिलीपासून दहावीपर्यंत सर्व तुकड्यांमधून सतत पहिला यायचा. मात्र दहावीचा निकाल लागला आणि अभय शाळेत तिसऱ्या क्रमांकावर आला. त्या दिवसापासून अभयचा मूड गेला. त्याच्या मनाची अवस्था फारच वाईट झाली. ही गोष्ट त्याच्या मनाला फार लागली. त्याने तो स्वत:चा मोठा अपमान मानला आणि आता शिक्षणव्यवस्थेवरचा विश्वासच उडाला असं तो सारखा म्हणतोय. आपलं दु:ख, अपमान, अपयश तो सारखं उगाळतोय. झालेली गोष्ट खचितच त्याच्यासाठी त्रास देणारी होती पण ती विसरून किंवा त्याबाबत कारणमीमांसा करून त्याने ती सोडून द्यायला हवी होती. पण अभयने उच्च शिक्षणाकडे पाठ फिरवायचं ठरवलं. केवळ शास्त्र, गणितच नव्हे तर सर्व भाषांवर उत्तम प्रभुत्व असणारा, सुरेख कविता लिहीणारा, प्रत्येक वक्तृत्त्व स्पर्धा गाजवणारा, उत्कृष्ट हस्ताक्षराने सर्वांना मोहवणारा अभय, अपयशामुळे एकाच जागी अडकून पडला आहे.


निहिराने भारतीय नृत्यप्रकारात उत्तम नैपुण्य मिळवलं. पुढेही नृत्य हेच करिअर करण्याची तिची इच्छा होती. घरातून तिच्या या निर्णयाला फारसा पाठिंबा नव्हता. मुलीने डॉक्टर, इंजिनिअर वा आर्किटेक्ट व्हावे असे त्यांना वाटत होते. पण ते निहिराच्या धडपडीला विरोध करत नव्हते इतकीच काय ती समाधानाची बाब. पुढच्या शिक्षणासाठी विशेषत: नृत्याच्या करिअरसाठी शिष्यवृत्ती मिळावी यासाठी ती प्रयत्न करत होती. तिला शिष्यवृत्ती मिळेल अशी सगळ्यांनाच खात्री होती. ज्या दिवशी शिष्यवृत्ती धारकांची यादी फळ्यावर लागली तेव्हा निहिरा अतिशय उत्साहानं यादी पाहायला गेली. ४-५ वेळा यादी पाहूनही तिला तिचे नाव सापडेना. मात्र तिच्यापेक्षा बऱ्याच मागे असणाऱ्या सुरभीला शिष्यवृत्ती मिळाली. ते पाहून निहिराचा खूप संताप झाला. चिडचिड झाली. अतिरागाने तिला रडू कोसळले. आपल्यात असलेल्या नृत्यकौशल्याची घरातल्यांना आणि बाहेरही कुणाला किंमत नाही. पूर्णपणे भेदभाव झालाय. आता यापुढे मी नृत्य करणार नाही, असं तिने सांगितलंय. कुणाचं काही ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत ती नाही. आपण डावललो गेल्याची खंत आणि दु:ख यात ती पूर्ण बुडाली आहे.


आवडीच्या क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असणाऱ्या तरुण मुलांना बऱ्याचदा अशा अडचणींना, अपयशाला सामोरं जावं लागतं. तरुणच नव्हे तर प्रगल्भ व्यक्तींच्या बाबतीतही सगळं काही मनासारखं होतं असं नाही. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीबाबत मनात काही स्वप्नं पाहिलेली असतात. काही अपेक्षा असतात. मात्र कधीकधी काही कारणामुळे अपयश येतं. मन दुखावतं. विश्वास उडतो. अशी गोष्ट सतत आठवत राहायची की, तिला सोडून आयुष्यात पुढे जायचं हे अत्यंत आवश्यक जीवनकौशल्य आहे. जे वापरता येणं फार महत्त्वाचं आहे. शाळेत, कॉलेजमध्ये, नोकरीत, प्रत्यक्ष आयुष्यात आपल्या स्वप्नांच्या गोष्टी आणि प्रत्यक्ष जीवनात खूप अडथळे येतात. मनासारखं घडलं नाही की एकटं पडल्यासारखं वाटतं, जे अगदी स्वाभाविक आहे.


अशा वेळी हा विचार करायला हवा की, रोज सकाळी आपण उठतो तेव्हा एक नवा दिवस आपलं स्वागत करत असतो. हा नवा दिवस आपण बघू शकतो आहोत हे आपलं केवढं भाग्य आहे. विचार करायला हवा की आपण जर अडचणींवर लक्ष दिलं तर त्यातून आणखीन अडचणी निर्माण होतात. आपण उपायांवर लक्ष केंद्रित केलं तर निश्चितच उपाय शोधून काढता येतात. अशा वेळी letting go and holding on (सोडून देणं आणि धरून ठेवणं) हे जीवनकौशल्य वापरायचं असतं. हे लक्षात घ्या की, कोणताही प्रश्न सोडवण्याचे तीन मार्ग असतात. एक मान्य करणं, दुसरा बदल करणं आणि तिसरा सोडून देणं. अडचण आली आहे तेव्हा ती आलीच आहे हे मान्य करणं. त्यासाठी जी मदत मिळवायची आहे त्याकरता आपल्या विचारात बदल करणं. आपण अपयशी ठरलो याची लाज वाटून घेण्यापेक्षा किवा अपयश, दु:ख, अपमान या भावनांना अजिबात थारा न देतात त्या गोष्टी सोडून देणं हेच श्रेयस्कर ठरतं.


असं पाहा की, एखादी गोष्ट मनात धरून ठेवली तर शिकणं, छंद जोपासणं, करिअर करणं अगदी जगणंही कठीण होऊन बसेल. या जगात प्रत्येकालाच कधी ना कधी अपमानास्पद बोलणी खावी लागलेली असतात. संधी हातून निसटलेल्या असतात. मृत्यूमुळे आपल्या जीवनातून माणसं गमावलेली असतात. गैरसमजापोटी दुरावे निर्माण झालेले असतात. या गोष्टीपैकी कोणकोणत्या गोष्टी किती काळ धरून ठेवायच्या आणि कोणत्या बाबी सोडून द्यायच्या, हे आपल्याला कळायला हवं. जमायला हवं. यासाठी त्रासदायक ठरणाऱ्या गोष्टी सोडून देणं याचाच अर्थ अडचणींमधून बाहेर कसं पडायचं, हे अचूक माहिती असणं असतं, हे विसरायला नको.


अडचणी वॉशिंग मशीनसारख्या असतात. जसे कपडे मशीनमध्ये टाकल्यावर ट्विस्ट आणि स्पिन होतात, जेव्हा मशीन थांबतं आणि कपडे बाहेर काढले जातात तेव्हा ते स्वच्छ आणि चकचकीत होऊन आपल्यासमोर येतात. अगदी तसंच अडचणींशी झुंज दिली की आपण त्यातून अधिक स्पष्ट, स्वच्छ, आणि उजळ होऊन बाहेर पडतो. म्हणूनच जी अडचण आहे त्याच्याशी झुंजायला लागणार आहे. आयुष्यात घडणाऱ्या दु:खद, अपेक्षाभंग करणाऱ्या गोष्टींचा सामना करताना हिंमतीनं सामोरं जावं लागतं. कारण जे मागं घडून गेलं ते आपण बदलू शकत नाही. जुन्या दु:खाला, अपमानाला, त्रासाला सारखं सारखं आठवत न बसता ते सोडून देऊन बाजूला सारून पुढे जायला हवं. जगत असताना अडचणी, ताणतणावांशी दोन हात करावे लागतात. अशा वेळी हे जीवनकौशल्य खूप उपयुक्त ठरतं.


अभय व निहिरासारख्या व्यक्तींच्या बाबतीत जे झालं तसं जेव्हा आपल्या बाबतीत होतं तेव्हा पहिली प्रश्न मनात हा येतो की, मीच का? देवाने माझ्याच बाबतीत असं का घडवलं? माझ्याच नशिबात हा अन्याय का? मी का अपयशी झालो? हा प्रश्न मनाला सारखा छळत राहतो. आणि या प्रश्नांच्या गुंत्यातून बाहेर येणं म्हणजेच letting go. हे प्रश्न फेकून द्यायचे असतात. कोणीतरी असं टाकून बोलणं, संधी हातातून कुणी हिसकावून घेणं, यशस्वी कारकीर्दीला अपयशाची ठोकर बसणं यासारख्या कठीण प्रसंगी खंबीर सैनिकाप्रमाणं लढावं लागतं. आणि म्हणून बिनमहत्त्वाच्या गोष्टी सोडून द्यायला हव्या.


letting go सारखीच holding on ही बाजूही सांभाळायची असते. कोणत्या गोष्टी सांभाळून, जपून ठेवायच्या असतात? तर आईवडिलांचे आशीर्वाद, मोठ्यांचे उपदेश, कौतुकाचे शब्द मनात साठवून ठेवायचे असतात. जपायची असतात नाती. मैत्री, जे प्रेरणादायी आश्वासक शब्दांनी पुढे जायला मदत करतात, धैर्य देतात अशा गोष्टी हृदयाशी धरून ठेवायच्या असतात. यासाठी आपल्याजवळचा विवेक उपयोगात आणायचा. जे मनात ठेवून काही सृजनशील घडू शकत नाही ते सोडून द्यायचं असतं. आणि नवनिर्माण करण्याचा मार्ग दाखवणाऱ्या गोष्टी आयुष्यात साथीला घेऊन जायच्या असतात. तरुणांना आपापसातील स्पर्धा, असूया, द्वेष, ईर्षा, गैरसमज, अपमान या साऱ्यातून पुढे जावं लागतं. यशस्वी जीवन जगताना हे जीवनकौशल्य हुशारीनं वापरायचं असतं. गंमत म्हणजे आयुष्यातील चढउतार हे अनुभवच जगायला शिकवत असतात. राजहंस जसा नीरक्षीर वेगळं करताना विवेकाची बुद्धी वापरतो अगदी तसंच मुलांनीही करायचं असतं. पाण्यातली बोट जशी वल्हं मारून पाणी मागे सारून पुढे पुढे जात राहते तसंच नकोशा गोष्टी मागे सोडून पाय रोवून उभं राहायचं, प्रगतीच्या मार्गावर पुढे जायचं आहे. 


-  डॉ. स्वाती गानू, पुणे 
ganooswati@gmail.com

बातम्या आणखी आहेत...