Home | Magazine | Madhurima | Vandana Khare writes about discrimination

निरोप

वंदना खरे, मुंबई | Update - Jun 05, 2018, 01:26 AM IST

जेंडर गॅप या काहीशा क्लिष्ट विषयाचा दैनंदिन घटनांच्या आधारे आढावा घेणाऱ्या, या विषयाचे वेगवेगळे पैलू वाचकांसमोर आणणाऱ्या

 • Vandana Khare writes about discrimination
  जेंडर गॅप या काहीशा क्लिष्ट विषयाचा दैनंदिन घटनांच्या आधारे आढावा घेणाऱ्या, या विषयाचे वेगवेगळे पैलू वाचकांसमोर आणणाऱ्या लेखांच्या या सदराचा आजचा समारोपाचा लेख.


  काल-परवाच बारावीच्या परीक्षांचे निकाल जाहीर झाले आणि पुन्हा एकदा ‘यंदाही मुलींनीच बाजी मारली’ अशा हेडलाइन्स झळकताना दिसायला लागल्या, तेव्हा आठवण झाली की, मागच्या वर्षी मी अशाच बातम्यांच्या निमित्ताने माझ्या या सदरातला एक लेख लिहिला होता. आता पुन्हा त्याच अर्थाच्या बातम्या दिसू लागल्या म्हणजे ‘भेदाभेद अमंगळ’ हे सदर लिहायला लागून एक वर्ष झालं. एक वर्तुळ पूर्ण झालं! गेल्या वर्षभरात या सदरातून मी ‘जेंडर गॅप’ या विषयाचे वेगवेगळे पैलू मांडले. शिक्षण, आरोग्य, कौटुंबिक हिंसाचार, कामाचा आर्थिक मोबदला अशा ढोबळ मुद्द्यांपासून विवाहांतर्गत बलात्कार, गर्भनिरोधनाची साधने आणि अगदी आत्महत्यांसारख्या काहीशा नाजूक मुद्द्यांचादेखील या सदरातून वेध घेतला. प्रत्येक लेखाला वाचकांकडून वेळोवेळी मिळालेल्या प्रतिक्रियामुळे माझा लिखाणाचा उत्साह टिकून राहिला. पण जूनमध्ये या सदराला सुरुवात करताना मात्र ‘जेंडर गॅप’सारखा काहीसा क्लिष्ट विषय वृत्तपत्रीय लिखाणातून मांडायचे आव्हान आपल्याला झेपेल की नाही, याची थोडीशी काळजीच वाटली होती!

  मला अजून जेंडर या शब्दाला चपखल असा मराठी शब्द सापडलेला नाही. अनेकजण जेंडरसाठी ‘लिंगभाव’ हा पर्यायी शब्द वापरतात, पण हा शब्द कामभावनेविषयी आहे की काय, अशी वाचकांची समजूत होईल अशी मला भीती होती! अशा परिस्थितीत, मी जेंडर गॅप ही संकल्पना कशी मांडणार, हा माझ्या समोरचा पहिला प्रश्न होता. मी जर शब्दाला प्रतिशब्द शोधत राहिले असते, तर मला हे सदर लिहिणे खूपच अवघड होऊन बसले असते. त्यापेक्षा रोजच्या जगण्यात येणारे अनुभव संदर्भाला घेऊन ही संकल्पना स्पष्ट करणे सोपे जाईल असे वाटले. म्हणून मी वेगवेगळ्या घटनांच्या निमित्ताने समोर येणाऱ्या निरनिराळ्या मुद्द्यांचा आधार घेत या विषयाचे वेगवेगले पैलू मांडायचे ठरवले आणि मला दर पंधरवड्याला काही ना काही घटनांचे संदर्भ वर्षभर मिळतच राहिले! कधी नवरात्र किंवा दहीहंडीसारखे सण तर कधी ‘तुम्हारी सुलू’सारखा सिनेमा आणि बरेचदा स्त्रियांच्या संदर्भातल्या बातम्या किंवा कोर्टाचे वेगवेगळ्या विषयांवरचे निकाल – अशा निरनिराळ्या निमित्तांनी मला या विषयाचे विविध पैलू तुमच्यासमोर ठेवता आले.

  आपल्या रोजच्या जगण्यात आपल्याला सर्वांनाच अनेक ठिकाणी विषमता जाणवत असते. कधी ही विषमता आर्थिक बाबतीतली असते, कधी जात-धर्म अशा संदर्भातली असते. स्त्रिया आणि पुरुष यांना समाजात मिळणाऱ्या वेगवेगळ्या वागणुकीच्या स्वरूपातूनसुद्धा ही विषमता जाणवते. आपल्या वैयक्तिक आयुष्यात कधी आपण या विषमतेचे बळी ठरतो तर काही वेळा त्यामुळेच आपल्याला काही फायदेही मिळतात. एकमेकांशी बोलताना आपण अनेक प्रकारच्या सामाजिक विषमतेचा उल्लेख करतो, एकमेकांवर ताशेरे मारतो किंवा कधीकधी अगदी हमरीतुमरीवर देखील येतो. खासकरून स्त्री-पुरुषांमधल्या भेदभावाविषयीच्या अनेक बाबी तर आपल्या इतक्या अंगवळणी पडलेल्या असतात की त्यांना आपण नैसर्गिकच समजतो. याशिवाय, ‘सध्याच्या काळात स्त्रियांनाच भरमसाठ सोयीसवलती मिळतात आणि स्त्रियांपेक्षा पुरुषांवरच अन्याय होत असतो,’ अशीही एक समजूत लोकप्रिय झालेली आहे. बरेचदा या अशा मतांना केवळ वैयक्तिक अनुभवांचाच आधार असतो. जर एखादी व्यक्ती स्त्रियांविषयी होणाऱ्या भेदभावाचा उल्लेख करताना दिसली तर बहुधा तिची खिल्लीच उडवली जाते. पण त्याच वेळी अनेक महिलांना पदोपदी संधी नाकारली जाण्याचे, अपमानाचे, हिंसेचे अनुभवदेखील येत असतात. या सगळ्याची संगती कशी लावायची, असा अनेकजणींना प्रश्न पडतो. पण विषमतेच्या अनुभवांना निव्वळ व्यक्तिगत हेव्यादाव्यांच्या पलीकडे सामाजिक परिमाण देखील असते. माझ्या या सदरातून स्त्री-पुरुषांमधल्या विषमतेचे हे सामाजिक परिमाण वाचकांच्या लक्षात यावे, असा माझा प्रयत्न होता.

  स्त्री-पुरुषांमधल्या विषमतेच्या वेगवेगळ्या पैलूंबद्दल अनेक संस्था, संघटना संशोधन करीत असतात. राज्याच्या आणि देशाच्या पातळीवरची या संदर्भातली आकडेवारी सरकारतर्फे देखील वेळोवेळी प्रसिद्ध केली जात असते. पण सामान्य माणसांपर्यंत अनेक संशोधने आणि राष्ट्रीय कुटुंब सर्वेक्षणासारखे अहवाल पोचतच नाहीत. मग आपण फक्त आपल्या आसपास दिसणारी काही मोजकी उदाहरणे बघतो आणि त्यातून स्वत:च्या सोयीचे निष्कर्ष काढतो. ‘जगात सगळीकडे स्त्रियांची भरभराट सुरू आहे आणि गरीब बिच्चारे पुरुष नुसते मार खात आहेत,’ अशा गैरसमजुती त्यातूनच वाढीला लागतात. आपण हे विविध अभ्यास आणि सर्वेक्षणे समजून घेतली तर आपल्या अनेक समजुती पारखून घेता येऊ शकतात. म्हणून वेगवेगळ्या विषयांच्या संदर्भात वेळोवेळी प्रसिद्ध झालेले जागतिक आणि स्थानिक संशोधनांचे अहवाल तुमच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न केला. निरनिराळ्या संशोधनातून समोर आलेल्या आकडेवारीमुळे रोजच्या व्यक्तिगत अनुभवाला असलेले व्यापक समाजिक संदर्भ मला मांडायचे होते. काही वेळा शिक्षण, आहार, आरोग्य यांच्या संदर्भातल्या मुद्द्यांचा माझ्याकडून पुन:पुन्हा उल्लेख झाला असेल. त्याचबरोबर विषमतेची उदाहरणे दिल्यावर त्याची कारणे स्पष्ट करताना पितृसत्तेच्या मुद्द्याचा मी अनेकदा उल्लेख केलेला होता. पिढ्यानपिढ्या आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक अशा अनेक बाबतीत निर्णय घेण्याची आणि अमलात आणायची सत्ता पुरुषांच्या हातात असण्यामुळे स्त्रियांच्या स्थितीवर अनेक दुष्परिणाम झालेले आहेत. स्त्री-पुरुषांमधल्या विषमतेची दरी त्याच सत्तेच्या बळावर टिकलेली आहे. आर्थिक, शैक्षणिक, भाषिक, जातीय, धार्मिक आणि लैंगिक भेदभाव कोणत्या न कोणत्या स्वरूपात एकमेकांशी जोडलेले असतात. एका विषमतेमुळे दुसऱ्या घटकांना बळ मिळत असते, हे वेगवेगळ्या उदाहरणांतून लक्षात आणून द्यायचे होते. वर्षभर माझ्या लेखांमधून विषमतेचे वेगवेगळे पैलू आणि कारणे दाखवायचा प्रयत्न करीत होते. वाचकांना स्वत:च्या आयुष्यातल्या अनुभवांकडे बघायला या लेखांचा उपयोग झाला असेल, अशी आशा आहे!

  vandanakhare2014@gmail.com

Trending