आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समतेच्‍या कोणत्‍या टप्‍प्‍यावर?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘तु म्ही फार एकांगी मांडणी करता बुवा, सगळ्या बायकांवर कुठे इतका अन्याय होत असतो?’
‘किती दिवस महिलांवरच्या अन्यायाची रडगाणी गाणार आहात, तुम्हाला पुरुषांवरचे अन्याय दिसतच नाहीत का?’  ‘आता कुठे पूर्वीसारखं राह्यलंय, हल्ली उलट बायकाच पुरुषांना त्रास देत असतात!’‘स्त्रियांवर जशी सामाजिक दडपणं असतात तशी पुरुषांवरसुद्धा असतातच की!’ 


या आहेत मला सतत ऐकाव्या लागणाऱ्या काही प्रतिक्रिया! लिंगभाव समतेविषयी कुठल्याही मंचावरून मांडणी करायला लागलं की, या अशा प्रतिक्रिया हमखास येतात. पूर्वी मला अशा प्रतिक्रियांचा फार वैताग येत असे. ही माणसं समाजातलं वास्तव असं नाकारू कसं शकतात, असा प्रश्न पडायचा. मग मी अशा लोकांना त्यांच्या म्हणण्याला आधार देणारी उदाहरणे विचारायला सुरुवात केली. पण असं उदाहरणासहीत स्पष्टीकरण विचारलं की, लोक बहुधा गडबडून जातात. नाहीतर अनेकदा आपल्या कुटुंबातले किंवा मित्रमंडळींचे अनुभव सांगतात. कारण त्यांच्या माहितीचा परीघ फक्त तेवढाच असतो. बऱ्याच माणसांना प्रामाणिकपणे असं वाटत असतं की, आपल्या आजूबाजूला दिसणाऱ्या बायका शाळाकाॅलेजात जातात, लहानमोठ्या नोकऱ्या करतात, काहीजणी स्कूटर किंवा क्वचित कारसुद्धा चालवतात, स्मार्टफोन वापरतात, आत्मविश्वासाने वावरतात किंवा कधीमधी पुरुषांशी हुज्जतदेखील घालतात. याचा अर्थ जगातल्या सगळ्याच बायकांनी सगळ्या बाबतीत पुरुषांशी बरोबरी केलेली आहे, अशी त्यांची समजूत असते! म्हणून ते म्हणतात की, काही कारणाने महिलांवर हिंसाचार होतात तसे निराळ्या कारणाने पुरुषांवरसुद्धा होतात. दररोज कित्येक पुरुष अपघातात किंवा दंगलीत मरतात, कित्येकजण आत्महत्या करतात मग कधीतरी कुठेतरी एखाद्या बाईलाही जाळलं जात असेल किंवा एखाद्या दीडशहाण्या बाईवर बलात्कार होत असेल तर अशा तुरळक घटनांना किती महत्त्व द्यायचं?


पण स्त्रियांवरचे अन्याय म्हणजे फक्त नवऱ्याने बायकोला केलेली मारहाण नव्हे किंवा दूर कुठल्या तरी एखाद्या कोपऱ्यात होणारा बलात्कार नव्हे! आपल्या कुटुंबात किंवा शेजारीपाजारी जे दिसतं, तेवढ्यापुरतंच जग मर्यादित नसतं! आपलं गाव, आपलं शहर यापलीकडे जिल्हा, राज्य आणि देशसुद्धा असतो! जगात वेगवेगळ्या आर्थिक वर्गाचे आणि सांस्कृतिक पार्श्वभूमीचे लोक राहात असतात. जगातल्या विविध देशात स्त्रिया आणि पुरुषांना मिळणाऱ्या सोयीसुविधांचे  प्रमाण किती आहे, त्यांना असणाऱ्या हक्कांमध्ये काय फरक आहे, त्यांना कोणकोणती साधने किती प्रमाणात उपलब्ध आहेत, हेदेखील समजून घ्यायला पाहिजे. 


लिंगभाव समता आणि महिला सक्षमीकरणासाठी काम करणाऱ्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या शाखेने म्हणजेच यूएन विमेनतर्फे १५ फेब्रुवारी रोजी “टर्निंग प्राॅमिसेस इन्टू अॅक्शन” या नावाची एक कार्यपत्रिका प्रकाशित केली आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने जी शाश्वत विकास उद्दिष्टे निश्चित केली आहेत ती गाठायची असतील तर जगात आधी लिंगभाव समता प्रस्थापित होणे गरजेचे आहे, असे या पत्रिकेत म्हटलेले आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने ठरवलेल्या १७ शाश्वत विकास उद्दिष्टांच्या संदर्भात जगातील स्त्रियांची परिस्थिती कशी आहे ते या पत्रिकेत नमूद केलेलं आहे. शिक्षण, आरोग्य, गरिबी, पर्यावरण, पाणीपुरवठा, इंटरनेट, उद्योग, व्यापार या सगळ्या बाबतीत पुरुषांना आणि स्त्रियांना कायकाय आणि किती मिळतं त्याची आकडेवारी इथे मांडलेली आहे. या पत्रिकेत दिलेली आकडेवारी वाचली तर स्त्री-पुरुष समता प्रत्यक्षात येण्यापासून आपण किती लांब आहोत, त्याचा अंदाज येईल.


पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये गरिबीचे प्रमाण ४ टक्क्यांनी जास्त आहे. स्त्रिया पुरुषांपेक्षा २.६ पट जास्त घरगुती आणि बिनपगारी कामे करतात.
स्वयंपाकासाठीच्या इंधनामुळे होणाऱ्या प्रदूषणामुळे ४० लाख लोकांचा अकाली मृत्यू झाला त्यापैकी ६०% व्यक्ती स्त्रिया होत्या.
जगातील १८ देशांमध्ये आपल्या बायकोला घराबाहेर काम करायला प्रतिबंध करायचा नवऱ्याला हक्क आहे. महिलांचा श्रमशक्तीमधील सहभाग ६३% आहे. 


महिलांकडे जगातल्या फक्त १३% शेतजमिनीची मालकी आहे.
जगातल्या ३९ देशांमध्ये मुली आणि मुलगे यांना वारशाचा समान हक्क नाही. ४९ देशांमध्ये महिलांचे कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण करणारे कायदे नाहीत. पन्नाशीच्या आतील वयाच्या २०% महिलांनी गेल्या वर्षभरात आपल्यावर नवरा किंवा प्रियकराकडून हिंसाचार झाल्याचे सांगितले. संसदेत फक्त २४% महिला प्रतिनिधी आहेत.


पुरुषांपेक्षा स्त्रियांकडून इंटरनेटचा वापर करण्याचे प्रमाण ६ टक्क्यांनी कमी आहे. जगातल्या ७५ कोटी मुलींचे लग्न वयाची १८ वर्षे पूर्ण होण्याच्या आतच केले जाते.


ही आहे स्त्रिया आणि पुरुष यांच्या बाबतीतल्या जागतिक आकडेवारीची झलक. या आकडेवारीचे भौगोलिक विभागानुसार आणखी दहा तपशीलवार भाग आहेत. त्यापैकी मध्य आणि दक्षिण आशिया या भागात आपल्या देशासोबत पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश, भूतान, नेपाल, ताजिकिस्तान, मालदीव, श्रीलंका असे इतर देश आहेत. आपल्या बरोबरच्या या देशामधल्या आकडेवारीतून दिसणारा स्त्रीपुरुषातला भेदभाव अनेक बाबतीत जागतिक आकडेवारीपेक्षा अधिकच टोकदार आहे. उदाहरणार्थ, मध्य आणि दक्षिण आशियातल्या महिला संसद प्रतिनिधींचं प्रमाण फक्त १८.५ टक्के आहे. श्रमशक्तीमधील महिलांचा सहभाग १९९७पासून कमी होत चाललेला आहे आणि २०१७ मध्ये तो ३७% झालेला आहे. पाकिस्तानातल्या स्त्रिया पुरुषांच्या तुलनेत ११ पट जास्त बिनपगारी आणि घरगुती कामे करतात. आशिया खंडातल्या वेगवेगळ्या देशात निरनिराळ्या आर्थिक वर्गानुसार ही तफावत बदललेली दिसते. तरीसुद्धा समतेच्या वाटेवर अजून खूप मोठा पल्ला आपल्याला गाठायचा आहे, हे यातून उघड होते आहे!


- वंदना खरे, मुंबई
vandanakhare2014@gmail.com

बातम्या आणखी आहेत...