आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरुषत्वाच्या संकल्पनेचे बळी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुरुषांच्या स्वभावातला उतावीळपणादेखील त्यांच्या आत्महत्यांना कारणीभूत ठरतो आणि दारूच्या व्यसनामुळे त्यात भर पडते. खेरीज पुरुषत्वाच्या संकल्पनाही घातकच ठरतात, असं दिसून येतं.


म हाराष्ट्राचे दबंग पोलिस अधिकारी हिमांशू रॉय यांच्या आत्महत्येच्या बातमीने मागच्याच आठवड्यात खूप मोठी खळबळ उडवून दिली. त्यांच्या मृत्यूविषयी हळहळ व्यक्त करताना अनेक जण त्यांच्या धडाडीचा आणि त्यांच्या दणकट शरीरयष्टीचा उल्लेख करत होते. अशा कणखर व्यक्तिमत्त्वाचा पुरुष आत्महत्या करू शकतो, हे अनेकांना धक्कादायक वाटले होते. सर्वसाधारणपणे आपल्याला स्त्रियांच्या आत्महत्येच्या बातम्याच वाचायची सवय असते, त्यामुळे एखाद्या पुरुषाने आत्महत्या केल्याचे ऐकून आश्चर्य वाटू शकते. पण जगभरातील आकडेवारी असे सांगते की, स्त्रियांपेक्षा पुरुषच जास्त प्रमाणात आत्महत्या करतात. काही श्रीमंत देशांत तर पुरुषांच्या आत्महत्यांचे प्रमाण स्त्रियांपेक्षा साडेतीनपट जास्त असल्याचे दिसून आलेले आहे. आपल्या देशातदेखील महिलांपेक्षा पुरुषांच्या आत्महत्यांचे प्रमाण दुपटीपेक्षा जास्त असल्याचे राष्ट्रीय गुन्हे नोंदणी अहवालात दिसून आले आहे. एकीकडे सर्वच बाबतीत पुरुषांची सामाजिक स्थिती स्त्रियांपेक्षा वरचढ असूनही पुरुषांमध्येच आत्महत्यांचे प्रमाणसुद्धा जास्त असण्याच्या विरोधाभासाची संगती कशी लावायची?


आपल्या देशातल्या ‘पुरुष हक्क संरक्षण’ करू पाहणाऱ्या संघटना याच आकडेवारीचा आधार घेऊन असं सांगतात की, पुरुषांचा बायकांकडून किती मोठ्या प्रमाणात छळ केला जात असतो, त्याचाच हा पुरावा आहे! दरवर्षी हा अहवाल प्रसिद्ध झाला की, या संघटनांकडून अशी ओरड केली जाते आणि अनेक बेजबाबदार वृत्तपत्रे कुठलेही विश्लेषण न करता त्याची खमंग चटकदार बातमी छापून मोकळी होतात. पण सुदैवाने जगातले सगळेच लोक इतका उथळपणाने विचार करत नाहीत! स्त्रिया आणि पुरुष यांच्या आत्महत्येच्या प्रमाणात दिसणाऱ्या तफावतीबद्दल जगात अनेक ठिकाणी गंभीर संशोधन झालेले आहे. या अभ्यासात असे दिसून आले आहे की, स्त्रिया आणि पुरुष साधारणपणे सारख्याच प्रमाणात आत्महत्येचा प्रयत्न करतात. स्त्रियांमध्ये नैराश्याचे प्रमाण पुरुषांपेक्षा जास्त असते. काही ठिकाणी तर स्त्रिया पुरुषांपेक्षा जास्त प्रमाणात आत्महत्येचा प्रयत्न करतात असेही दिसते. अशा परिस्थितीत स्त्रियांच्या आत्महत्यांचे प्रमाण जास्त असणे कदाचित सुसंगत ठरले असते.


तरीही प्रत्यक्षात मात्र पुरुषांच्याच आत्महत्या मोठ्या प्रमाणात ‘यशस्वी’ होतात. कारण आत्महत्येचे विचार मनात येणे, आत्महत्या करायचा प्रयत्न करणे आणि तो अमलात आणला जाणे या वेगवेगळ्या टप्प्यांवर स्त्रिया आणि पुरुषांच्या सामाजिक परिस्थितीमुळे बराच फरक पडत जातो. या फरकाला कौटुंबिक कलहाशिवाय इतरही अनेक सामाजिक घटक जबाबदार असतात. आत्महत्या करण्यासाठी स्त्रिया आणि पुरुष जी साधने निवडतात, त्यातदेखील खूप फरक असतो. पुरुष जेव्हा आत्महत्या करतात तेव्हा ते गळ्यात फास अडकवणे किंवा डोक्यात बंदुकीची गोळी झाडून घेणे अशा पद्धतींचा अवलंब करतात आणि त्यामुळे तत्काळ जीव गमावण्याची शक्यता वाढते. स्त्रिया मात्र बहुतेक वेळा विषप्राशन करण्याचा मार्ग पत्करतात आणि त्यामुळेही त्यांचा जीव वाचवता येणे शक्य होते. स्त्रिया आणि पुरुष ज्या कारणांनी आत्महत्या करतात त्यातही बराच फरक असतो. बऱ्याच स्त्रियांच्या आत्महत्या लग्नातील वैमनस्यातून आणि त्यातून येणाऱ्या नैराश्यातून घडतात. तर पुरुषांच्या आत्महत्यांना जोडीदारासोबत असलेल्या वैमनस्याव्यतिरिक्त इतर कौटुंबिक कारणे जबाबदार असतात, असे आकडेवारीतून दिसून येते. या कौटुंबिक कारणांचा संबंध समाजात असलेल्या मर्दानगीच्या चुकीच्या कल्पनाशी असतो. अनेक संशोधकांना असे वाटते की, पुरुषांच्या आत्महत्यांना कारणीभूत ठरणारा हा एक महत्त्वाचा घटक आहे. 


आंध्र प्रदेशातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांविषयी अभ्यास करणारे निलोत्पल कुमार यांचे असे निरीक्षण आहे की, आपल्या संस्कृतीत मर्दानगीच्या कल्पनेला खूप महत्त्व असते. कुटुंबप्रमुख या नात्याने पुरुषांवर खूप दडपणे असतात. मुलीच्या लग्नात हुंडा द्यायला असमर्थ ठरणे, तिचे लग्न थाटामाटात न करता येणे, अशा कारणांनीदेखील शेतकरी आत्महत्या करतात. स्वत:च्या भावना आणि व्यथा व्यक्त करणे पुरुषाला शोभत नाही, अशी समजूत असते. अनेक पुरुष स्वत:ला नैराश्यासारखे मानसिक त्रास असल्याची दखलच घेत नाहीत आणि आपल्या त्रासावर वैद्यकीय उपचार करण्याऐवजी व्यसनांचा आधार घेतात. हे दोन्ही घटक पुरुषत्वाच्या पारंपरिक संकल्पनेशी जोडलेले असतात, असेही ते म्हणतात. हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या डॉ. विक्रम पटेल यांनीही या कारणमीमांसेला दुजोरा दिलेला आहे. पुरुषांच्या आत्महत्यांच्या कारणात मर्दानगीच्या कल्पनांचा मोठा वाटा असतो, असे त्यांनाही वाटते. मर्दानगीच्या चुकीच्या कल्पनांमुळे पुरुषांमध्ये गरज नसताना जोखीम घेण्याची वृत्ती, स्वत:च्या भावना मोकळेपणाने व्यक्त न करणे आणि आपण मरणालाही घाबरत नाही हे दाखवण्याचे दडपण तयार होत जाते. जेव्हा एखाद्या पुरुषाची नोकरी जाते किंवा तो कुटुंबाच्या गरजांसाठी पुरेसे पैसे मिळवायला कमी पडतो तेव्हा त्याला असे वाटते की, जणू आपल्या मर्दानगीवरच लांछन लागले आहे.


यासोबतच पुरुषांच्या स्वभावातला उतावीळपणादेखील त्यांच्या आत्महत्यांना कारणीभूत ठरतो आणि दारूच्या व्यसनामुळे त्यात भर पडते, असे विविध सामाजिक अभ्यासांतून आढळले आहे. मनात आलेली गोष्ट मागचापुढचा विचार न करता लगेच अमलात आणायची, या मानसिकतेतून अनेकजण मृत्यूला कवटाळत असावेत, असे संशोधनातून दिसते. दिल्लीतील नावाजलेले मानसोपचार तज्ज्ञ गौरव गुप्ता यांनी असे सुचवले आहे की, समाजात विविध क्षेत्रांत स्त्रिया आणि पुरुषांमध्ये समता प्रस्थापित होणे हा आत्महत्या कमी करण्यावरच उपाय आहे. कुटुंबातले निर्णय सर्वांनी मिळून घेतले गेले की, एकेकट्या पुरुषांवर कुटुंबप्रमुख असण्याचा भार पडणार नाही. आर्थिक अपयशाचे खापर एकट्यावर फुटायची भीती कमी होईल आणि त्यामुळे त्यांचा तणाव कमी होईल. पण त्यासाठी पुरुषांना स्वत:ची एकाधिकारशाही सोडून द्यावी लागेल. ‘पुरुष हक्क संरक्षण’ करायला निघालेल्या संघटनांनी या उपायांकडे लक्ष पुरवायला हवे! पुरुषांच्या आत्महत्येच्या आकडेवारीत जरी ‘कौटुंबिक समस्या’ हे मुख्य कारण दिसून येत असले तरी त्याची सखोल कारणमीमांसा समजून घेतली पाहिजे. ‘स्त्रिया पुरुषांचा छळ करतात’ असा त्याचा वरवरचा अर्थ काढणे आता थांबवले पाहिजे. मुख्य म्हणजे समाजात मर्दानगीच्या ज्या चुकीच्या कल्पना आहेत, त्यात जाणीवपूर्वक बदल घडवून आणायचा प्रयत्न केला पाहिजे.
 

 

वंदना खरे, मुंबई

vandanakhare2014@gmail.com

बातम्या आणखी आहेत...