Home | Magazine | Rasik | Vasundhara kashikar write about father and Daughter relationship

लडकिया बैठी थी पाव डालकर...

वसुंधरा काशीकर | Update - Jun 17, 2018, 01:00 AM IST

कुणी लेक “अहो बाबा’ म्हणते. कुणासाठी तो फक्त “ए बाबा’असतो. कुणी पप्पा, पॉप्स, डॅडी, डॅडा म्हणत बापलेकीच्या नात्यातले वि

 • Vasundhara kashikar write about father and Daughter relationship
  कुणी लेक “अहो बाबा’ म्हणते. कुणासाठी तो फक्त “ए बाबा’असतो. कुणी पप्पा, पॉप्स, डॅडी, डॅडा म्हणत बापलेकीच्या नात्यातले विविधरंगी पदर उलगडत असतात. मुलगा-वडील या नात्यापेक्षा हे नातं खास असतं. त्याचाच हा मासला. आज साजरा होणारा “फादर्स डे’निमित्तमात्र...
  रवा एका कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत होते. कार्यक्रमाला माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार होते. सभागृह खचाखच भरलेले. ज्या कार्यक्रमांमध्ये हायप्रोफाइल लोक असतात त्यात वेळेवर अनेक बदल होऊ शकतात. सूत्रसंचालकाला त्याची मानसिक तयारी ठेवावी लागते. कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचल्यावर अपेक्षेप्रमाणे माझ्या भोवती सूचना देणाऱ्यांची गर्दी जमली. कार्यक्रमाची सुरूवात पावनी पांडे नावाची उदयोन्मुख पार्श्वगायिका आहे, तिच्या गाण्याने होणार होती. "सारेगामा'ची विजेती, परीक्षक आणि चित्रपटामध्ये पार्श्वगायन करते एवढीच माहिती मला तिच्याबद्दल द्यायची होती. तेवढ्यात एक लठ्ठ, पोट सुटलेला, साधारण पाच फूट सात इंच उंचीचा, चष्मा लावलेला, इन केलेला शर्ट असा पन्नाशीचा माणूस माझ्याजवळ आला.
  ‘मॅडम, वो पावनी के बारे में कुछ लिख के लाया हूँ आप ये बताईये|रईस, बरेली की बर्फी’ इन पिक्चर के नाम आने चाहिए- इति तो माणूस.
  ‘मुझे क्या बताना है ये आयोजकनों बताया है आप बेफिक्र रहिये|’. – मी
  त्यानंतरही त्यांचं इन्सिस्ट करणं सुरूच होतं. परत थोड्यावेळाने बुवा माझ्याकडे.
  ‘मॅडम, पावनी के साथ वो गिटारिस्ट है उन दोनों के नाम बताईए’.
  आता मात्र माझा संयम सुटू लागला.
  ‘सर, मेरी दरखास्त है, आप मुझे प्रेशराइज न करे, ..वैसे आप कौन है?..- मी
  त्यावर लगेच त्या माणसानं उत्तर दिलं.
  ‘मैं पावनी का डॅडी हूँ’.
  एका क्षणात माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. हा माणूस स्वत:चं नावही विसरला होता. त्याची ओळख तो ‘मैं पावनी का डॅडी’ ही देत होता. त्याचा हा आत्मविलय मोठा लोभस होता.
  त्यानंतर मी त्या माणसाच्या देहबोलीचं नकळत निरीक्षण करत राहिले. त्याचं सर्व लक्ष पावनी आणि पावनीवर होतं. तिचा परफॉर्मन्स, तिचं गाणं, साऊंड अरेंजमेंट नीट होतेय नं, गिटारिस्ट नीट बसले आहेत नं...जातीने लक्ष घालून ते बघत होते. त्यांची सगळी लगबग, तगमग, धावपळ पावनीसाठी होती. मला पावनीच्या वडिलांमध्ये माझे वडील दिसू लागले. सूत्रसंचालन विसरून काही क्षण मी भूतकाळात पोहोचले...
  ज्या वेळी कॉलेजमध्ये असताना वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये मी भाग घेई, माझे वडिल असेच माझी भाषणं, मुद्दे, त्याची तयारी, मग बक्षिस मिळाल्यावर त्याची चर्चा यात हरवून जात. त्यांचं अवघं मन माझ्या सादरीकरणात असे. अशाच प्रकारची देहबोली आणि प्राणांतिक भावना मी फुटबॉलच्या मॅचेसमध्ये टीमच्या कोचची बघितली आहे. मॅच सुरू असताना खेळाडूंचा खेळ बघण्याइतकंच कोचला बघणं हासुद्धा अनुभव असतो. सर्व जगाचा त्या क्षणाला त्याला विसर पडलेला असतो. वेगळ्या अर्थाने ते आध्यात्मिक अद्वैत असतं, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.
  बाप आणि मुलीचं नातंही मला असंच अनोखं वाटतं. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, हे प्रसिद्ध वाक्य आहे. तसंच प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या मागे तीचा बाप असतो असं म्हटल्यास वावगं होणार नाही. मुलगा आणि बाप यांचं नातं बहुतांश वेळा हे संघर्षाचं असतं असं दिसतं. त्यामागे मानसशास्त्रीय आणि जैविक कारणंही आहेत. हा संघर्ष सत्तेचा असतो. जनावरांमध्येही दोन नर एकत्र राहत नाहीत. पण बाप आणि मुलगी हे नातं मात्र फार गोड असतं. बापाचं मुलीवर जास्त प्रेम असतं, म्हणतात ते उगीच नाही. अगदी पहिलं उदाहरण डोळ्यासमोर येतं ते इंदिरा गांधींचं. इंदिरा गांधींना तुरूंगातून पं. नेहरूंनी जी पत्रे लिहिली ती अभ्यासण्यासारखी आहेत. त्यात त्यांनी इंदिरेला गालिब, फैज असे अनेक उत्तमोत्तम उर्दू शायर समजावून दिले. भारताचा समृद्ध वारसा सांगितला. शांतीनिकेतनला शिकायला पाठवलं. या सगळ्याचा अर्थ, मुलीकडून नेहरूंच्या मोठ्या अपेक्षा होत्या. म्हणूनच फिरोजशी लग्न करते म्हटल्यावर त्यांना धक्का बसला होता. आणि संपूर्ण भारतातले कितीतरी प्रतिभावंत तरुण माझ्यासोबत काम करायला आसूसले आहेत. तू सोबत काम करुन शिकावंसं असं वाटत असताना, हे काय खूळ? अशा धर्तीचं संभाषण नेहरु आणि इंदिरा गांधींमध्ये त्या वेळी झालं होतं. (संदर्भ : इंदिरा-पुपुल जयकर)
  मानसशास्त्रज्ञांचं असं संशोधन आहे की, जिथे जिथे वडील आणि मुलीचं नातं हे आरोग्यपूर्ण असतं, तिथे तिथे मुली या स्वयंपूर्ण होतात. कुठल्याही मुलीच्या आयुष्यात तिने पाहिलेला पहिला पुरूष म्हणजे, वडील असतात. ते तिच्यासाठी रोल मॉडेल असतात. सिग्मंड फ्रॉइडची "ओडिपस कॉम्प्लेक्स' ही मांडणी या संदर्भात ध्यानात घ्यावी लागेल. मुलीला वडिलांबद्दल, तर मुलाला आईबद्दल एक लैंगिक आकर्षण असतं,असं तो म्हणतो. त्यामुळेच वडिल-मुलगी या नात्यावर तिच्या पुढच्या सगळ्या नातेसंबंधांची वीण ठरते.
  आपल्याकडे दुर्गा भागवत आणि कमला सोहनी ही उदाहरणं प्रसिद्ध आहे. ‘तू दगडावर टाकलीस तरी रुजून येशील’ हे दुर्गाबाईंच्या वडिलांचं वाक्य त्यांना आयुष्यभरासाठी आत्मविश्वास देऊन गेलं. दुर्गाबाईंनी विवाह केला नव्हता. आयुष्यभर त्यांना व्यासंग करता यावा आणि सन्मानानं जगता यावं यासाठी त्यांच्या वडिलांनी त्यांच्यासाठी काही रक्कम ठेवली होती.
  प्रसिद्ध टेनिस प्लेअर स्टेफी ग्राफ हिच्या करिअरमध्ये तीच्या वडिलांचा(पापा मर्सिलेस असले तरीही) खूपच मोठा वाटा होता. टेनिसमधले तीचे पहिले गुरू तीचे वडीलच. करिअरच्या अगदी सुरूवातीला एकदा सोबत स्टेफी मॅच हरली होती. त्या स्पर्धेत परंपरा अशी होती की, जिंकलेल्यास घोड्याच्या सुंदर बग्गीत सर्वांना अभिवादन करत फिरवून आणलं जाई. स्टेफी म्हणाली, मी बसू या बग्गीत ? विजेत्या मुलीनं मोठ्या मनाने तिला बस म्हणले, स्टेफी बसायला जाणार, तो तिच्या वडिलांना तिचा चट्कन हात धरला. म्हणाले, ती विजेत्यासाठी आहे.आज तू पराभूत आहेस, तुला त्यात बसण्याचा अधिकार नाही.
  असंही दिसून आलं आहे की, मुलगी आणि वडिलांचा संवाद आणि मुलगा आणि वडिलांचा संवाद यात भावनिकदृष्ट्या वेगळा असतो. मुलीशी बोलताना वडिल जास्त भावना व्यक्त करतात हे दिसून आलं आहे. मुलींना खेळवताना वडील जास्त गाणी गातात, हावभाव करतात असंही दिसून आलं आहे. मुलीशी बोलताना भाषेमध्येसुद्धा फरक पडतो, असं जेनिफर मॅसॅक्रो, ही अमेरिकेतल्या अटलांटा इथल्या इमोरी विदयापीठातली संशोधक म्हणते. म्हणजे मुलांशी बोलताना वडिलांच्या भाषेत अभिमान, जिंकणे, पहिले येणे असे यशाशी संबंधित, उपलब्धीशी संबंधीत शब्द येतात. भाषासुद्धा काहीशी कठोर किंवा कडक असते. तर मुलींशी बोलताना विश्लेषणात्मक आणि भविष्यातल्या शैक्षणिक यशाशी संबंधित भाषा असते. जेनिफर यांचे असेही निरीक्षण आहे की, मुलगी रडली तर वडिलांचा त्वरीत प्रतिसाद असतो.मुलगा रडला तर तुलनेने उशीरा. त्यांनी मुला-मुलींच्या वडिलांचे एमआरआय करुन ब्रेन मॅपिंग केले. त्यात असे दिसले की, मुलीचा फोटो बघितल्यावर वडिलांच्या चेहऱ्यावरचे भाव हे आनंदी होतात, तर मुलाचा फोटो बघितल्यावर तटस्थ असतात.
  बाप आणि मुलीच्या नात्याचं सगळ्यात सुंदर वैशिष्ट्य म्हणजे, स्पर्धात्मकतेचा अभाव. मुलगा आणि बाप यामध्येही खूपदा स्पर्धात्मकता आढळते. नवरा-बायको या नात्यामध्ये तर स्पर्धात्मकता असतेच असते. बायको आपल्यापेक्षा पुढे गेली, तर पुरूषांमध्ये प्रचंड नकारात्मकता येऊ शकते. पत्नीच्या यशामुळे द्वेष किंवा इर्ष्या वाटू शकते. पण मुलीच्या बाबतीत ते घडत नाही. मुलीच्या यशात बापाला शेतकऱ्याला जसा शेत बहरुन आल्याचा आनंद होतो,तसा आनंद वाटतो. आज अनेक मध्यमवर्गीय घरांमध्ये एकाच मुलीवर थांबणाऱ्यांची संख्या वाढतेय. स्वाभाविकच मुलीवरच लक्ष केंद्रित करणाऱ्यांचे प्रमाणही वाढतेय. यातून बाप आणि मुलगी हे नातं अनेकांगाने बहरण्याची शक्यता दिसतेय.
  पण, ज्यांना सगळ्या मुलीच आहे आणि मुलगा नाही, त्या वडिलांची आपल्या मुलींप्रती असलेली संवेदनशीलता परत वेगळी असते. किरण बेदी, सानिया मिर्झा ही त्याची उदाहरणं होतं. अनिल अवचट, दिनकर कर्वे (महर्षी कर्वे यांचे पुत्र गौरी देशपांडे यांचे वडील) यांनी ज्या पद्धतीने मुलींना वाढवले, अगदी वेण्या घालून देण्यापासून मुलींना वाढवण्यात यांनी ज्या प्रकारे सहभाग घेतला तो आदर्श आहे. रा.चिं.ढेरे आणि अरुणा ढेरे तसेच दया पवार-प्रज्ञा पवार ही उदाहरणं पण फार बोलकी आहेत. ज्या मुलींना मोठा भाऊ नाही किंवा भाऊच नाही,अशा मुली या जास्त बिनधास्त, बंडखोर आणि मुक्त दिसतात. थोडक्यात, बहुपदरी आणि अतिशय गोड असं वडिल आणि मुलीचं नातं आहे. मुलींबद्दल एका शाईरेचा शेर आठवतोय. ती म्हणते,
  लड़कियाँ बैठी थी पाँव डालकर, रोशनी सी हो गयी तालाब में...
  या ओळींमधलं सौंदर्य वडिलांइतकं कोण चांगलं समजू शकेल...?
  - वसुंधरा काशीकर
  vasu.rubaai@gmail.com

 • Vasundhara kashikar write about father and Daughter relationship

Trending