आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आगरायन - ‘ब’ बोलीची काव्यचळवळ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहिराणी किंवा मालवणीसारख्या बोलीभाषा साहित्याच्या मूळ प्रवाहात बऱ्यापैकी बस्तान बसवून असताना तितकाच गोडवा ठासून भरलेली आगरी मात्र अजूनही मराठी साहित्याच्या परिघाबाहेरच राहिली आहे. म्हणूनच आगरीवरचा ‘फक्त विनोद निर्मितीसाठी’ हा शिक्का पुसून गंभीर साहित्य निर्मितीच्या दिशेने तिची वाटचाल व्हावी, यासाठी जोरकस प्रयत्न केले जात आहेत. आगरायन हा असाच एक दखल घेण्याजोगा प्रयत्न. त्याची ही गोष्ट... 


आता विश्वाचे र देवा। 
यो सबुत होम मानून झ्यावा । 
परसन व्हवून मना द्यावा ।  
पसाबं दान यो॥ 
खलांचा वाकरेपना जांव्दे ।  
त्याना चंगली जाण येंव्दे । 
समद्यांवी आता व्हवूंदे ।  
जीवाचं मयतर ॥ 
वाईटाचा कालोख जाव्दे।  
स्व धरमाचा सूर्य उंगवू दे। 
ज्याना पाजे त्या मिलूंदे।  
समदे जीवा ॥  
झोर झे पुरूथ्वीवं आयशी ।  
देव भक्तांची जत्रा जयशी। 
जगान भेटतील तयशी।  
जीवाची लोखा।। 
चालते सत्वाचा डोंगर । 
वली चिंतामनीं जागर। 
ज्यांची बोली गोर गोर। 
आमरूता वानी॥  
चांदावं ज्या डाग नसंल ।  
सूर्याचा ज्या ताप नसंल । 
ते म सज्जन सदाकाल।  
सोयरं व्हती॥ 
नय तरी समदी सुखी । 
पूरी व्हवून तिन लोकी । 
भजंल जो आदिपुरूशी ।  
आख्खे येला॥ 
ना ग्रंथाला जागून या । 
लोखावी खास आया । 
वायटा सायटावं म या।  
जिकाला पाजे।। 
तवा बोल्ला श्री विश्वेशर । 
व्हल यो दान परसाद र । 
या वरान ज्ञानदेव र ।  
सुखी यो झयला ।। 

 

संत ज्ञानेश्वरांनी भावार्थ दीपिका म्हणजेच, ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायाच्या शेवटी, सर्व विश्वाच्या कल्याणासाठी देवाकडे पसायदान मागितले. तेच हे पसायदान. फरक फक्त इतकाच की ते लिहिलेय, आगरी बोली भाषेत. भाषा बदलली तरीही, विश्व कल्याणाचा भाव मात्र तोच आहे. मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघर, रायगड आणि नाशिकच्या काही भागांत पसरलेल्या आगरी पट्ट्यात मिठागरांमध्ये काम करणाऱ्या आगरी समाजाची ही, मायबोली... ‘थर्टी एट नॉनस्टॉप कोळीगीते’, वेसावकर मंडळी आणि गेला बाजार जॉनी रावत किंवा अरूण नाईक सारख्या स्टँडअप कॉमेडियन्सचे गल्लाभरू परफॉर्मन्सेस एवढाच काय, तो आपला या आगरी बोलीशी असलेला संबंध... अहिराणी किंवा मालवणीसारख्या बोलीभाषा साहित्याच्या मूळ प्रवाहात बऱ्यापैकी बस्तान बसवून असताना तितकाच गोडवा ठासून भरलेली आगरी मात्र अजूनही मराठी साहित्याच्या परिघाबाहेरच राहिली आहे. म्हणूनच आगरीवरचा ‘फक्त विनोद निर्मितीसाठी’ हा शिक्का पुसून गंभीर साहित्य निर्मितीच्या दिशेने तिची वाटचाल व्हावी, यासाठी जोरकस प्रयत्न केले जात आहेत. “आगरायन’ हा असाच एक दखल घेण्याजोगा प्रयत्न.  


सुरूवातीला फक्त कवितांच्या कार्यक्रमापुरता मर्यादित असलेला हा कार्यक्रम, आता मायबोली संवर्धनाची एक चळवळ होऊ पाहतोय. गजानन पाटील, सर्वेश तरे, प्रकाश पाटील, मोरेश्वर पाटील यांच्यासारख्या आगरी भाषेतून कविता करणाऱ्या कवींची ही बहारदार मैफल आहे. गंमत म्हणजे, या मैफलीस रंगमंचाचेही बंधन नाही. कारण ती एखाद्या महाविद्यालयाच्या बंद सभागृहात जशी रंगते, तशीच ती कधी अरबी समुद्रात एखाद्या होडीतही तरंगते. म्हणजे, एका बाजूला खारा वारा अंगाखांद्याशी झोंबाझोंबी खेळत असतो. समुद्राच्या लाटा उसळी मारत असतात. त्या उसळी मारणाऱ्या लाटांवर होडी मस्त हेलकावे खात असते आणि त्या हेलकावणाऱ्या होडीत कधी वाऱ्यावर उडणारे केस सावरत, कधी शरीराचा तोल सांभाळत एकेक कवी आहे,त्या जागी उभे राहून आपापल्या कवितांचे सादरीकरण करत असतो. सोबतीला अर्थातच वारा-लाटारूपी वाद्यवृंद पार्श्वसंगीत देत असतो. येत्या २७ फेब्रुवारी रोजी भाषा दिनानिमित्त, तर या काव्य मैफलीचे मुंबईतील भांडुपजवळच्या एका मिठागरात आयोजन करण्यात आले आहे. काळ्या मातीची शेतं ही जशी शेतकऱ्याची कर्मभूमी  तशी  मिठाचं जणू शेत असलेली शुभ्र मिठागरं ही आगरींची कर्मभूमी. ‘आपण ज्या संस्कृतीतून आलो आहोत, तिच्याशी नाळ जोडलेली रहावी, म्हणून होडी, शेत, मिठागर यांसारख्या ठिकाणी आम्ही ‘आगरायन’चे आयोजन करतो’, आगरायनच्या गजानन पाटलांनी मंच वैविध्यामागची भूमिका स्पष्ट केली. 


राज्य शासनाच्या ग्राहक संरक्षण विभागात कार्यरत असलेले गजानन पाटील हे ‘जागो ग्राहक जागो’ या प्रकल्पाचे प्रमुख आहेत. ‘आगरायन’ ही फक्त आगरी कवितांची मैफल नसून, आमच्यासाठी ते प्रबोधनाचेही माध्यम असल्याचे पाटील आवर्जून सांगतात. म्हणूनच ‘घात झयला न डावा डोला लवला’, ही त्यांची वात्रटिका आगरी समाजातील शिक्षणाच्या अभावामुळे काय परिणाम होतात, त्यावर नेमकेपणाने बोट ठेवते. 
मुंबई, ठाण्यासारख्या शहरांच्या आसपासच्या जमिनींची मालकी असल्याने बहुतांश आगरी बांधवांकडे बेफाट पैसा आला. अनेकांनी त्याचा विनियोग उत्तमरित्या केला, तर अनेकांनी तो चैनीत उडवला. 


‘मी जर बोल्लू तं माझा टोंड दिसतं
सुकटीचे निसोटाबरबर बापूस 
चार चार भाकऱ्या तुरवाचा 
आनं येके दमान भाताची गोन 
कचकून डोक्यावं घेवाचा 
पुन पोऱ्या आता चायनीज खातंय 
नं म्हयन्यानशी तीनदा डॉक्टरकं जातंय 
मी जर बोल्लू तं माझा टोंड दिसतं’ ... 


प्रकाश पाटील यांच्या प्रस्तुत कवितेतून पैशामुळे अचानकपणे बदललेल्या आगरी समाज जीवनातील बदल जसा अचूक टिपलाय, तसाच तो ‘त्यांच्या ‘वाटोला’ या कवितेतूनही प्रतीत झाला आहे. शिक्षक असलेल्या प्रकाश पाटील यांच्या कवितांप्रमाणेच आगरी समाजातील अशा लहान मोठ्या घडामोडींची नोंद घेत ‘आगरायन’ची कविता समाज प्रबोधन, बचतीचे महत्व, पैशाचा विनियोग, शिक्षणाचे महत्व, देशप्रेम अशा सामाजिक, राजकीय आणि आर्थिक मुद्यांवर भाष्य करते. 


लक्षवेधी बाब म्हणजे, ‘आगरायन’च्या सदस्यांपैकी कुणी आंतरराष्ट्रीय ख्यातीचा चित्रकार आहे, तर कुणी सिव्हिल इंजिनियर किंवा खाजगी कंपनीतील नोकरदार, कुणी क्लास वन अॉफिसर, तर कुणी शिक्षक... पण ‘आगरायन’च्या मैफलीत मात्र यातला प्रत्येक जण आगरी संस्कृती आणि चालीरीतींचे विविध पैलू उलगडून दाखवणारा आणि समाजातील अनिष्ट प्रथा किंवा चुकांवर नेमकेपणाने बोट ठेवणारा, विशेष म्हणजे काळाचे भान अधोरेखीत करणारा फक्त एक कवी असतो. म्हणूनच ‘विद्रोही साहित्यात आता फक्त अन्यायाची भाषा करून चालणार नाही, तर जागतिकीकरणामुळे मिळालेल्या संधीचे मूल्यांकनही झाले पाहिजे ’ असा प्रगल्भ विचार जेव्हा जे.जे.स्कूल ऑफ आर्ट्समधून फाइन आर्ट््स शाखेचे पदवीधर असलेले आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार मोरेश्वर पाटील मांडतात, तेव्हा आगरी साहित्यही सकसपणे मूळ प्रवाहात येईल, याची खात्री वाटू लागते. ‘आगरायन’च्या होऊ घातलेल्या २५व्या प्रयोगात याच मोरेश्वर पाटलांनी आगरी भाषेत अनुवादीत केलेल्या पसायदानाची संंगीतमय भेट रसिकांना ऐकायला मिळणार आहे. कोकण पट्ट्यातल्या मालवणीप्रमाणेच मुंबई-ठाणे परिसरात खणखणणाऱ्या आगरी बोलीमध्येसुद्धा इरसालपणा ठासून भरलाय, म्हणून कदाचित ‘आगरायन’ला  प्रामुख्याने तरूण  श्रोतावर्ग आहे. त्यामुळेच सर्वेश तरेसारख्या ‘आगरायन’मधील तरूण कवीला हा कार्यक्रम म्हणजे, बोलीभाषेबद्दल तरूणांमध्ये असलेला न्यूनगंड कमी करण्याचे एक प्रभावी माध्यम वाटतो आहे. ‘आजही आगरी समाजातील तरूण आगरी भाषा बोलायला लाजतात, त्यांच्या मनातील भाषेबद्दल असलेली कमीपणाची भावना आम्हाला काढून टाकायची आहे. प्रमाण भाषा ही शुद्ध आणि बोलीभाषा ही अशुद्ध हा, समजच आम्हाला संपवायचा आहे,’ पेशाने सिव्हील इंजिनियर असलेला सर्वेश सांगतो. “जर ‘नव्हता’ हा शब्द प्रमाण भाषेत मान्य आहे, तर त्याच्या विरुद्ध अर्थाचा ‘व्हता’ हा शब्द वर्ज्य का.” 


तसेच आपले हे प्रयत्न फक्त आगरी पुरतेच मर्यादीत नसून इतर बोलीभाषांच्या संवर्धनासाठी ‘आगरायन’ कटीबद्ध असल्याचेही तो नमूद करतो. ‘आगरायन’च्या आजपर्यंतच्या २४ कार्यक्रमात आगरी व्यतिरिक्त कोळी, अहिराणी, मालवणी, वऱ्हाडी, माणदेशी, मराठवाडी, सामवेदी, कुपारी, वाडवळी, भोजपुरी, वारली, कादोडी आणि अगदी संस्कृत अशा बारा बोली भाषेतील पन्नासपेक्षाही अधिक कवींनी हजेरी लावली आहे. आगरी भाषा संवर्धनाचा प्रयत्न हा फक्त कवितांपुरताच नसून आगरी लोकसंस्कृतीही पुढे आणण्याचा प्रयत्न, हे कवी करत आहेत. त्यातूनच मग फक्त पन्नास शब्दांत कथा सांगण्याचा इंग्रजीत बऱ्यापैकी रुळलेला ‘मायक्रो टेल’ हा कथा प्रकार ‘बोध्या’ या नावाने थेट आगरीत आणण्याचे धाडस ही मंडळी करू पाहतात, तेव्हा कौतुक वाटते. बोध्या म्हणजे, अत्यंत लहान अशी खेकड्याची जात, जी अत्यंत खायला चविष्ट असते. तशीच ही कथा म्हणून तीचं नाव बोध्या. या शिवाय ‘ब बोली’ नावाचं संपूर्ण आगरी कोळी भाषेतील मासिक ही मंडळी सुरू करत आहेत. आगरीत आईला ‘ब’ असे संबोधले जाते. थोडक्यात काय तर आपल्या ‘ब’ बोलीला साहित्याच्या मूळ प्रवाहात ‘अ’ दर्जा कसा मिळेल, यासाठीची ही धडपड निश्चितच कौतुकास्पद ठरली आहे.


-  विनोद तळेकर
vinod.talekar@dbcorp.in
लेखकाचा संपर्क - ९९३०३६०५४९

बातम्या आणखी आहेत...