आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळा हे का शिकवत नाहीत?

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनेक शाळांमधून लैंगिक शिक्षण देण्यात येते. मात्र, ते खूप निरर्थक पद्धतीने शिकवले जाते. लैंगिकतेबद्दल विद्यार्थ्यांच्या मनात कुतूहल असतं, तशीची भीतीसुद्धा असते. मात्र यावर शाळेकडून कुठलंच गांभीर्य दाखवलं जात नाही. त्यांना शरीररचना नीट समजावून सांगणे, शरीरात होणारे, मनात होणारे बदल याबद्दल योग्य मार्गदर्शन तर दूरच, मात्र विज्ञानाच्या पुस्तकातील शरीररचना शिकवतानाही जननेंद्रियांचा भाग स्वयंअध्ययनावर टाकून दिला जातो, जे कुणीही विद्यार्थी करत नाही.


घरात आजही लैंगिक चित्रं, व्हिडिओ, अगदी शैक्षणिक का असेना, बघायला भीती वाटते. कुणी बघितलं तर काय म्हणेल याची. घरातून, संस्कारांतून लैंगिकता हद्दपार करण्यात आलेली असते. अगदी लहान मुलालाही सांगताना शिस्नाला ‘मामा’ किंवा लघवीची जागा असे शब्दप्रयोग डोक्यात भरवून फसवलं जातं. सगळ्यात जास्त कपड्यांखाली सुरक्षित असणाऱ्या जननेंद्रियांना कपड्यावरून काही कारणाने हात लागलाच तर तो हात निषिद्ध होतो. लहान मुले निरागसपणे जननेंद्रिय खाजवतात, खाज ही शरीरावर कुठेही येऊ शकते, मात्र त्या वेळीही त्यांना रोखलं जातं, रागावलं जातं. वयात आल्यावरही स्वतःला मुले लपवायला, कोशात टाकायला सुरुवात करतात याचं मुख्य कारण हेच की, त्यांच्या लैंगिक आरोग्याबद्दल इतरांना वाटणारी घृणा. ही एक नैसर्गिक गोष्ट आहे हे पालक त्यांना जाणवू देतच नाही. हेच आकर्षण मग बालपणात दमून जाते.

 

मध्यमवर्गीय शाळेत जाणाऱ्या मुलांना सहावी-सातवीनंतर एकदम विचित्र भाषा ऐकायला मिळते. त्यात शिस्न, योनी, उभार, छाती, वृषण, नितंब, संभोग याऐवजी प्रचलित असे शिव्यांसारखे शब्द कानावर पडतात. त्याच वयात त्यांचे याबद्दल आकर्षण वाढत जाते. लहानपणी कधी न ऐकलेलं हे सगळं आपल्याच शरीराशी संबंधित आहे हे समजल्यावर त्यांना वयाचे भान राहत नाही. या गोष्टींतून मिळणाऱ्या सुखाची त्यांना लालसा उत्पन्न होते. यानंतर मग ही लहान मुले पोर्न बघण्या-वाचण्याकडे ओढली जातात.


वय वर्षे तेरापासून तेवीसपर्यंत सातत्याने पोर्न बघितल्याने मुलांची सकस मानसिकता तयार होण्यावर परिणाम होतो. लैंगिकतेबद्दल चुकीच्या माध्यमातून वाईट पद्धतीने दाखवली गेलेली लैंगिकता खरी हे समजण्याची चूक ही कुमारावस्थेतील मुले करू लागतात. यातून त्यांना सावरणे कठीण होते. हस्तमैथुनही अनाठायी, अतिशय जास्त वेळा ही मुले करायला लागतात. त्यामुळे त्यांच्यामार्फत स्व तसेच समाज विघातक विकृत विचार पेरले जातात. याचा मुलांच्या अभ्यासावरही परिणाम दिसून येतो. अनेकदा नैराश्यही येऊ शकते. सतत पोर्न पाहण्याची सवय लागल्यास मैदानी खेळ, मित्र याबद्दलचे वेड कमी होऊ लागते.

 

याचमुळे योग्य लैंगिक शिक्षण देणे ही मुलांच्या शिक्षणातील अत्यंत आवश्यक बाब आहे. इतर प्रगत देशांत याची सुरुवात अगदी बालवाडीपासून आहे. अगदी लहानांना थेट लैंगिकतेबद्दल सांगितले जात नाही, तर आपण ज्याला मूल्य शिक्षण म्हणतो तिथपासून सुरुवात केली जाते. चांगल्या वागणुकीसाठी, नागरिक घडवण्यासाठी त्यावर भर दिला जातो. योग्य वयात आवश्यक लैंगिक ज्ञान देण्यात येते.


या सर्व गोष्टींकडे सकारात्मकतेने बघितल्यास देशात आदर्श पिढी विकसित होण्यास नक्कीच मदत मिळणार आहे. यासाठी गरज आहे ती मनुष्यऊर्जा, सजगता आणि जबरदस्त इच्छाशक्तीची. मुले चुकल्यावर त्यांचं समुपदेशन कोणीही करतंच, मात्र ती चुकू नयेत यासाठी मुळापासून प्रयत्न व्हायला हवेत. हेच इष्ट ठरेल.

 

lonari.v@gmail.com

बातम्या आणखी आहेत...