आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Yashwant Pople Write About Book Written By Ramchandra Guha And Translated By Sharda Satheyashwant Pople Write About Book Written By Ramchandra Guha And Translated By Sharda Sathe

सामर्थ आ‍हे विचारांचे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

घोषणाबाजी, अखंड जाहिरातबाजी आणि अस्मितांचे राजकारण यातून राष्ट्र आकारास येत नसते. राष्ट्र हे विचारांवर नि विचारांच्या सामर्थ्यावर उभे असते, या वास्तवाची सुस्पष्ट जाणीव रामचंद्र गुहा लिखित आणि शारदा साठे अनुवादित प्रस्तुत पुस्तक करून देते...


साव्या शतकातील भारतीय उपखंडात सर्व स्तरांवरील आधुनिक विचारांच्या  वादळ - वाऱ्यांनी वेग घेतला होता. भारतातील केवळ देशांतर्गत स्वातंत्र्य चळवळीच्या आवेगातूनच या आधुनिक विचारसरणीचा स्वीकार होत होता, असे नाही. किंबहुना, स्वातंत्र्योत्तर काळात भारतात प्रामुख्याने औद्योगिक आणि राजकीय आधुनिकतेच्या वैचारिक लाटांनी सामाजिक वातावरण ढवळून निघत होते. त्यामागे अनेक भारतीय विद्वानांच्या ठायी असलेल्या वैचारिक सामर्थ्याच्या प्रेरणा कारणीभूत  होत्या. त्यापैकी निवडक एकोणीस प्रज्ञावंताच्या वैचारिक भूमिका आणि त्यावरील अभ्यासपूर्ण भाष्य प्रख्यात इतिहासतज्ज्ञ आणि स्तंभलेखक रामचंद्र गुहा यांनी आपल्या ‘मेकर्स ऑफ मॉडर्न इंडिया’ इंग्रजी ग्रंथात केले आहे. या मूळ इंग्रजी ग्रंथाचा मराठीत ‘आधुनिक भारताचे आधारस्तंभ’ या नावाने अनुवाद लाल निशाण पक्षातील कामगार चळवळीच्या सक्रीय कार्यकर्त्या आणि स्त्री मुक्ती संघटनेचे मुखपत्र ‘प्रेरक ललकारी’ मासिकाच्या मुख्य संपादक शारदा साठे यांनी केला आहे. रोहन प्रकाशन संस्थेने हा ग्रंथ २०१८ च्या प्रजासत्ताकदिनी प्रकाशित केला आहे.


 ग्रंथातील पहिल्या भागात भारतीय मनोदर्शनाची यथार्थ चिकित्सा करण्यात आली आहे. त्यात भारतातील पहिले उदारमतवादी राममोहन रॉय यांच्या काळातील स्त्री-पुरुष संबंध, वृत्तपत्र स्वातंत्र्याचे महत्त्व आणि आधुनिक शिक्षणाची गरज या पैलूंचे दर्शन घडते. दुसऱ्या भागामध्ये भारतातील समाज सुधारक आणि क्रांतिकारकांचा उहापोह करण्यात आला आहे. आधुनिकतेचे मुस्लिम पुरस्कर्ते सय्यद अहमद खान यांचे मुस्लिमांचे शिक्षणविषयक विचार, आधुनिक अभ्यासक्रमआदींची उकल समर्पकपणे करण्यात आली आहे. उदारमतवादी सुधारक गोपाळ कृष्ण गोखले यांनी भारतातील दबलेल्या समूहाच्या उत्थापनासाठी, हिंदू - मुस्लिम  सौहार्दासाठी आणि समाजसेवेसाठी केलेल्या आवाहनाच्या प्रयत्नांची समर्पक मांडणी करण्यात आली आहे. बाळ गंगाधर टिळक यांचा प्रखर राष्ट्रवादी दृष्टिकोन हा त्यांच्या राष्ट्रीय नायक प्रतिभेला कालसुसंगत कसा ठरला, याची नोंद तपशीलवार करण्यात आली आहे. त्यातूनच टिळकांचा लढाऊ राष्ट्रवाद  पुढे आला आहे. भारतीय इतिहासात दुर्लक्षित राहिलेल्या स्त्रीवादी प्रवाहातल्या अग्रणी ताराबाई शिंदे यांच्या स्त्री -पुरुष विषमतेच्या तुलनेबाबत लिहिलेल्या दुर्मिळ निबंधाची इथे नोंद घेण्यात आली आहे. तिसऱ्या भागामध्ये राष्ट्राची जोपासना या अनुषंगाने मोहनदास गांधी यांच्या अहिंसेचे सामर्थ्य, सत्तेशी असहकार, अस्पृश्यता निर्मूलन, हिंदू-मुस्लिम ऐक्य आणि त्यांचा आंतरधर्मीय संवाद, स्त्रियांचे स्थान, जातींचा पुनर्विचार, हिंदू-मुस्लिम सहकार्याविषयी पुनर्विचार, ग्रामविकास आणि राजकीय विकेंद्रीकरण या मुद्द्यांमधील  विचारांची ओळख करून देण्यात आली आहे.
 
 
हिंदुस्थान आणि पाश्चिमात्य जग, राष्ट्राभिमानाचा अतिरेक आणि असहकाराची समस्या या पार्श्वभूमीवर रवींद्रनाथ ठाकूर यांचा, या मातीत रुजलेला विश्वमानव अशा अर्थाने वेध घेण्यात आला आहे. जाती व्यवस्थेच्या विरोधात भीमराव आंबेडकर यांनी केलेली क्रांती, मुस्लिम अलगतावादी महंमद अली जीना यांच्या भूमिकेवर विस्तृत भाष्य करण्यात आले आहे. देशातील धर्माच्या गौडबंगालाची अभ्यासपूर्ण चिकित्सा करणारे क्रांतिकारी सुधारक ई. व्ही. रामस्वामी यांनी विधवांच्या हक्क, संतती नियमनाचे समर्थन, लग्नामुळे येणारी बंधने अशा स्त्रियांच्या प्रश्नांविषयी केलेल्या कार्याचा आढावा घेण्यात आला आहे. समाजवादी स्त्रीवादाच्या अभ्यासक कमलादेवी चटोपाध्याय यांचे स्त्री चळवळीचे परिप्रेक्ष्य आणि समाजवादी दृष्टिकोन याचा वेध घेण्यात आला आहे. 


चौथ्या भागामध्ये लोकशाहीवर चर्चा करण्यात आली आहे. त्यात भीमराव आंबेडकर यांचे भारतीय संविधानाचे समर्थन आणि अन्वयार्थ याविषयी मांडणी करण्यात आली आहे. मोहनदास गांधीप्रमाणे जवाहरलाल नेहरू यांच्या बहुआयामी विषयपत्रिकेतील अल्पसंख्याकांबरोबरची वागणूक, नियोजन आणि आर्थिक धोरण, आशियाचा गाभा, जगामध्ये भारत, चीनशी संघर्ष आणि स्त्रियांच्या हक्काबाबत मांडलेल्या विचारांचा उहापोह करण्यात आला आहे. हिंदुत्वाचे समर्थक एस. एम. गोळवलकर याचे हिंदू राष्ट्र आणि त्यांचे शत्रू, मुसलमानांचा धोका, ‘समाजवाद नव्हे, तर हिंदू राष्ट्र’ या अनुषंगाने घेतलेल्या भूमिकेवर चर्चा करण्यात आली आहे. अंग्रेजी  हटावाचे समर्थक समाजवादी राममनोहर लोहिया यांच्या जात आणि वर्ग या घटकांशी मांडलेल्या विचारांचा वेध घेण्यात आला आहे. समाजवादी नेते जयप्रकाश नारायण यांनी, राजकीय विकेंद्रीकरणासाठी केलेले आवाहन, तिबेटची शोकांतिका, काश्मीरसाठी आखलेली उपाययोजना, नागालँडची समस्या याविषयींच्या भूमिकांचाही पुस्तकात वेध घेण्यात आला आहे. त्याशिवाय गांधीवादी उदारमतवादी चक्रवर्ती राजगोपालचारी यांच्या मागासवर्गीयांच्या समस्या, भारतीय निवडणूक पद्धतीत सुधारणा, मुक्त अर्थव्यवस्थेविषयीचे विचार विस्तृतपणे मांडले आहेत.


 पाचव्या भागात शेवटचे आधुनिकतावादी हमीद दलवाई यांच्या धर्मनिरपेक्षतेसमोरील आव्हाने आणि उदारमतवादी विचारवंतांची एकजुटीची आघाडी याबाबतच्या भूमिकावर चर्चा करण्यात आली आहे. 
 
 
ग्रंथाच्या शेवटी, जगामधील भारताचे स्थान या पैलूवर रामचंद्र गुहा यांनी प्रकाश टाकला आहे. पाचही भागाच्या आरंभी दिलेल्या स्वतंत्र प्रस्तावनेमुळे प्रतिभावंतांच्या संकलित साहित्याच्या आकलनाचा मार्ग वाचकांना सुलभ झाला आहे. एक स्वाभाविक राष्ट्र आणि एक स्वाभाविक लोकशाही प्रत्यक्षात येण्यासाठी या निवडक एकोणीस प्रतिभावंतांची वैचारिक मांडणी कशी कारणीभूत ठरली, याचा उलगडा करून देणारा हा ग्रंथ संग्राह्य आणि संदर्भमूल्य म्हणून महत्त्वाचा आहे.


- यशवंत पोपळे,
yashwant.pople@gmail.com

बातम्या आणखी आहेत...