आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भीमसेन नावाचे भारतीयत्व

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 देश स्वतंत्र झाल्यानंतर अनेक प्रवाहांना - धर्मांना, जातींना, भाषांना - ‘भारत’ म्हणून एकत्र घेऊन जाण्याचे कार्य देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी केले. ते साधून त्यांनी ‘The Idea of India’ अर्थात, भारताचे संकल्पनाचित्र प्रत्यक्षात  आणले. नेमकी हीच प्रक्रिया कंठ-संगीतात पंडित भीमसेन जोशी यांनी साध्य केली. शास्त्रीय गायकीतील वेगवेगळी घराणी स्वातंत्र्यपूर्व काळापासून  अस्तित्वात होतीच आणि त्यांचे कार्य अगदी उत्तम होतेच. परंतु देशातील जनतेला सुराने एकत्र जोडणारा ‘भारतीय’ गायक म्हणून भीमसेन जोशींनीअत्यंत महत्वाची भूमिका बजावली. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात अनेक दिग्गज होऊन गेले, परंतु त्या सर्वांचे स्वागत दाक्षिणात्य संगीताच्या प्रदेशात झालेच, असे नाही. तीच गोष्ट दाक्षिणात्य कलाकारांची! या प्रांतीय सीमारेषा ओलांडून नेहरूंना अपेक्षित असलेल्या भारतीयत्वाचे खऱ्या अर्थाने प्रतिनिधित्व भीमण्णा ऊर्फ बुवांनी केले. त्यांच्या अभावाने चर्चिल्या गेलेल्या या कर्तृत्वाचा हा पुनर्शोध. आज ४ फेब्रुवारी रोजी साजऱ्या होणाऱ्या ९६ व्या जयंती दिनानिमित्त... 

 

परिपूर्णता किंवा अचूकता या अशा गोष्टी आहेत, ज्या मोजता येत नाहीत. पण त्या तशा आहेत हे जाणवतं मात्र नक्की. त्यांच्याभोवती रसिकता निर्माण होते, ती याच कारणामुळे. हे रसिक संबंधित क्षेत्रातील जाणकार असतीलच, असं नाही. कधी कधी ती सामान्य जनतादेखील असते. पण समोर घडणाऱ्या क्रियेत परिपूर्णता आणि अचूकता असली की, त्याचा प्रभाव सर्वत्र पडतो. संगीत क्षेत्रात स्वर्गीय पंडित भीमसेन जोशी हे असे नाव आहे, ज्यांचे गाणे या दोन गुणांमुळे खुलले, बहरले आणि देश-विदेशातील अनेक श्रोत्यांपर्यंत अगदी सहजरीत्या पोहोचले. या श्रोत्यांमध्ये सगळेच जाणकार होते, असं अजिबात नाही. उलट, मैफलीत बसलेल्या शेवटच्या श्रोत्यालादेखील हे गाणे आपल्यासाठी आहे असं वाटावं, अशी अफाट क्षमता त्या गायकीत होती. म्हणूनच त्याचं गाणं स्वातंत्र्य मिळाल्यापासून पुढे जवळजवळ सहा दशकं श्रोत्यांना समृद्ध करीत राहिलं. 


४ फेब्रुवारी ही भीमसेन जोशी यांची ९६ वी जयंती. या निमित्ताने संगीतक्षेत्रात त्यांच्या फारशा चर्चिल्या न गेलेल्या योगदानाबद्दल इथे लिहिण्याचा एक प्रयत्न आहे. हे योगदान समजून घेण्यासाठी भीमसेन यांनी आपली कला सादर करायला सुरुवात केली, तो काळ समजणे गरजेचे आहे. अर्थात, देशाला स्वातंत्र्य मिळाले तो हा काळ होता. त्या अर्थाने, भीमसेन यांची कारकीर्द देशाच्या कारकीर्दीबरोबर सुरू झाली आणि बहरत गेली होती. 


देशाला स्वातंत्र्य तर मिळाले, पण ‘संगीत’ या विषयावर या स्वातंत्र्याचा कोणता परिणाम झाला? तर, देशाला एक स्वतंत्र राजकीय अस्तित्व मिळाल्यामुळे त्याची ‘भारतीय’ ही ओळख विविध भागांतील भिन्न सांगीतिक प्रभावांना सामावून घेऊन तयार होत गेली. याचाच अर्थ असा की, आता भारतीय शास्त्रीय संगीत म्हणजे, उत्तर हिंदुस्थानी संगीतातील अनेक घराणी ही आलीच, पण त्यात दाक्षिणात्य संगीतदेखील आले. शिवाय स्वातंत्र्यपूर्व काळात शास्त्रीय संगीताला राजाश्रय होता, जो अर्थातच स्वातंत्र्यानंतर संपला. अशा वेळेस तेव्हाच्या कलाकारांसमोर संगीताला खऱ्या अर्थाने लोकांपर्यंत नेणे, हे सर्वात मोठे आव्हान होते. म्हणजे, स्वातंत्र्यपूर्व काळात सामान्य जनता संगीत ऐकतच नव्हती, असं नाही. पण त्याची व्याप्ती वाढविणे गरजेचे होते. या पार्श्वभूमीवर पंडित भीमसेन जोशी हा असा एक अलौकिक गायक कलाकार होऊन गेला, ज्याने देशातील जवळजवळ प्रत्येक राज्यात आपले गाणे सादर केले आणि या नवनिर्मित देशाला शास्त्रीय कंठ संगीताची ओळख करून दिली. कसे काय साध्य झाले हे?  
भीमसेन यांच्या संगीतातील सर्वात जमेची बाजू म्हणजे त्यांचा सूर, आणि तो प्रकट करणारा बुलंद पण तितकाच मधुर आवाज. या आवाजाला एक विशिष्ट गोलाई तर आहे, पण तो तितकाच लवचिकदेखील आहे. या सर्व गोष्टींमुळे कदाचित, तो मैफलीतल्या सर्व श्रोत्यांना - त्यांच्या भिन्न सांगीतिक ज्ञाना आणि पार्श्वभूमीसकट - आपलासा वाटतो. मग ते ख्याल, ठुमरी, अभंग, नाट्यगीत किंवा भावगीत काहीही गावो, श्रोत्यांना आपल्यातलाच कुणीतरी व्यासपीठावर जाऊन बसला आहे, असंच वाटत राहतं. सुरुवातीचे धीर-गंभीर आलाप असो, नंतरच्या जलद ताना आणि बंदिशी असो, अगदी शेवटच्या भैरवीपर्यंत श्रोते भीमसेनांची मैफल सोडत नसत. परंतु त्यांनी हे सारे कसे काय सिद्ध केले हे समजून घेण्यासाठी भीमसेन जोशी हा परिपाक तयार कसा झाला, हे समजून घेणेही गरजेचे आहे.  


भीमसेन हे मूळ किराणा घराण्याचे गायक असले, तरी त्यांनी आपल्या संगीतात इतर घराण्यांच्या प्रवाहांचा समावेश केला. कदाचित त्यांना ही प्रेरणा त्यांच्या गुरूंच्या - सवाई गंधर्वांच्या - गुरूंकडून, म्हणजेच अब्दुल करीम खां यांच्याकडून मिळाली असावी. अब्दुल करीम खां हे उत्तर प्रदेशातील कैरानाचे. परंतु त्यांच्या सांगीतिक प्रवासात त्यांनी बडोदा, मुंबई, पुणे, धारवाड ते थेट मैसूर इथपर्यंत आपला लौकिक पसरविला. इतकेच नव्हे, तर दाक्षिणात्य शास्त्रीय संगीताच्या विद्वानांशीदेखील त्यांनी चर्चा केली आणि त्यांचे प्रभाव आपल्या गाण्यात आत्मसात केले. योगायोग असा की, याच खांसाहेबांची ‘पिया बिन नही आवत चैन’ या ठुमरीची रेकॉर्ड भीमसेन यांनी त्यांच्या गावी एका दुकानात ऐकली आणि इतके प्रभावित झाले की, वयाच्या अकराव्या वर्षी गुरूच्या शोधात धारवाड, पुणे, ग्वालियर, कलकत्ता, दिल्लीपासून ते थेट जालंधरपर्यंत पोहोचले. हा केवळ प्रवास नव्हता, तर त्यात तिथे भेटलेल्या गुरूंकडून घेतलेली संगीत विद्यादेखील होती. शेवटी जालंधरला असताना त्यांना आपल्याच गावाच्याजवळ, कुंदगोळला राहणाऱ्या सवाई गंधर्व यांच्याबद्दल सांगितलं गेलं, जे अब्दुल करीम खां यांचेच शिष्य होते. ज्यांचे गाणं ऐकून गुरुशोधात निघालो होतो, त्यांच्याच शिष्याकडे शिकायचं म्हणून भीमसेन पुन्हा त्यांच्या घरी परतले. पण या प्रवासात त्यांनी ग्वालियरला विख्यात सरोदवादक उस्ताद हाफिज अली खां यांच्याकडून ‘राग मारवा’चे शिक्षण घेतले, त्याचबरोबर जालंधरला भक्त मंगतराम यांच्याकडून धृपदचेही शिक्षण त्यांनी घेतले. सवाई गंधर्वांकडून अधिकृत शिक्षण सुरू करण्याआधी त्यांचे भारत भ्रमण झाले होते आणि त्यांच्या गायकीत हे सारे प्रभाव नंतर समाविष्ट झाले. इतकेच नाही, तर पुढे जवळजवळ सहा महिने उत्तर प्रदेशात राहून त्यांनी ठुमरीचे शिक्षण घेतले आणि तो गायनप्रकार देखील आत्मसात केला. याच जोरावर पुढे त्यांनी या नवनिर्मित देशातील लोकांना, राज्यांना आणि संस्कृतींना एकमेकांशी जोडण्याचे काम केले. तेही अर्थातच, सुराने!  


भीमसेन यांच्या या कार्याचे वर्णन वसंत पोतदार यांनी त्यांच्या चरित्रात खूप समर्पकरीत्या केले आहे. मुंबई आणि पुण्याव्यतिरिक्त त्यांनी तीन अशा शहरांची नावं सांगितली आहेत, जिथे भीमसेन यांची लोकप्रियता सर्वाधिक होती. ती म्हणजे मंगळूर, कलकत्ता आणि जालंधर. ही शहरं भारताच्या तीन टोकांना तर होतीच, पण प्रत्येक शहराची सांगीतिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमीदेखील निराळी होती. 


देशाच्या एका भागातून दुसऱ्या भागात जेव्हा एखादा कलाकार हा आपली कला सादर करायला जातो, तेव्हा तो त्याच्या भागातील संस्कृतीची ओळख दुसऱ्या भागाला करून देत असतो. म्हणूनच जेव्हा पंजाबातील श्रोते भीमसेन यांना ‘वो विठ्ठल का अभंग सुनाइए’ अशी फर्माईश करायचे, तेव्हा त्यांना महाराष्ट्रातून आलेल्या विचारांचा परिचय होत असे. त्याचबरोबर काही शतकांपूर्वी तिथल्या ‘ग्रंथसाहिब’मध्ये समाविष्ट केलेल्या संत नामदेवांच्या अभंगांशीदेखील त्यांची नाळ अप्रत्यक्षपणे जोडली जायची. हे आणि असे अनुभव इतर सर्व शहरांमध्ये, गावांमध्ये श्रोत्यांना येत. पण ही गोष्ट झाली त्या शहरांमधली, जिथे प्राधान्याने हिंदुस्थानी संगीत ऐकले जाते. मात्र, भीमसेन यांनी चेन्नई या शहरात जाऊन दाक्षिणात्य संगीताच्या विद्वानांसमोर आणि श्रोत्यांसमोरदेखील आपली कला सादर केली. तिथले श्रोते हे अतिशय कर्मठ मानले जातात. आजदेखील देशात उत्तर-दक्षिण ही भिन्नता अनेकदा अधोरेखित होत असते. परंतु स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भाषा, संस्कृती, विचारसरणी यांचा आधार घेऊन उत्तर भारत आणि दक्षिण भारत यांच्यात निर्माण झालेल्या ताण आणि घर्षणाच्या पार्श्वभूमीवर ही घटना अतिशय सुखद होती. 


दाक्षिणात्य शास्त्रीय गायक डॉ. एम. बालमुरलीकृष्ण यांची आणि भीमसेन जोशी यांची जुगलबंदी हा त्या सगळ्याचा परिपाक होता. पुढे पोतदार अजून एक विलक्षण उदाहरण देतात. पुण्याचे सतारवादक उस्मान खां एकदा बिहार आणि उत्तर प्रदेशच्या सीमारेषेवर असलेल्या एका गावी कार्यक्रम करायला गेले होते. तिथल्या लोकांना जेव्हा खांसाहेब पुण्याचे आहेत, असं कळलं, तेव्हा त्यांनी तडक प्रश्न केला, “आप पूना से हैं, हमारे भीमसेनजी कैसे हैं?’ ही किमया इलेक्ट्रॉनिक किंवा अगदी आजच्या घडीचा सोशल मीडिया बहरून येण्याच्या खूप आधीची होती, हे इथे लक्षात घेतले पाहिजे. 


वाद्यसंगीताला भाषेची मर्यादा नसते. त्यामुळे नवख्या श्रोत्याला ते पटकन आपलंसं करू शकतं. तसंच देशात कुठेही ते सादरदेखील होऊ शकतं. शिवाय, तबलावादकाला अधूनमधून बढत करायला दिलेली संधी, समाप्तीच्या वेळेस वाढती लय, या सर्व गोष्टी वादनाच्या लोकप्रियतेला कारणीभूत ठरतात. अशा पार्श्वभूमीवर एका गायकाने केवळ सूराच्या ताकदीने देशभरात केलेले कार्यक्रम आणि सर्व देशाला संगीत या समान धाग्याने जोडण्यासाठी केलेले परिश्रम हे नक्कीच अद््भुत आहेत. खूप वर्षांपूर्वी ‘ऑर्कुट’ या सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्मवर जेव्हा ब्राझीलच्या एका व्यक्तीकडून ‘तीर्थ विठ्ठल’ आवडतं असं वाचण्यात आलं होतं तेव्हा या गोष्टीची खात्री पटली.  पुढे नव्वदच्या दशकात दूरदर्शनवर प्रसारित होणाऱ्या ‘मिले सूर मेरा तुम्हारा’मुळे भीमसेन जोशी हे अनेक घरांमध्ये रोज दिसू लागले. परंतु वर लिहिलेली सर्व उदाहरणं त्याच्या आधीची आहेत. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर चित्रपट संगीतानेदेखील देशाला एका सामान धाग्याने जोडण्याचे प्रयत्न केले आहेत. परंतु व्यासपीठावरच्या कलांचा जर विचार केला, तर भीमसेन जोशींचे कार्य हे अगदी मोलाचे मानावे लागेल. शिवाय त्याला ‘मिशनरी’ वृत्तीची जोडदेखील आहे. १९५२ या वर्षी पुण्यात ‘सवाई गंधर्व संगीत महोत्सव’ आयोजित करणे, ही त्यांची दूरदृष्टीच होती. आज देशात संगीत महोत्सव होणे, ही फार मोठी गोष्ट राहिलेली नाही. परंतु गेल्या सहा दशकांपासून ‘सवाई’ हा देशातील प्रतिष्ठित महोत्सवांपैकी एक म्हणून गणला जातोय. कलेचा प्रसार करायचा असेल किंवा तिचे संवर्धन करायचे असेल, तर इंग्लिशमध्ये म्हणतो तसं we have to create a space for it. याच ‘सवाई’ने एक मोठा श्रोतावर्ग तयार केला आहे, ज्याच्यामुळे गायन, वादन, नृत्य या कलांना योग्य प्रतिष्ठा मिळाली आहे. पन्नासच्या दशकात जेव्हा ‘कलाकार’ या व्यक्तीला समाजात विशेष सन्मान नव्हता, तिथपासून, ‘अरे मी दर वर्षी सवाईला जातो’ असं आज उत्साहाने म्हणणारा सामान्य माणूस, हा प्रवास अत्यंत महत्त्वाचा आणि मोलाचा आहे. आजच्या कलाकारांनी आणि श्रोत्यांनी भीमसेन जोशी यांचे या गोष्टीसाठी आभार मानले पाहिजेत. 


मैफलीत आलेल्या प्रत्येक श्रोत्यांचा विचार करणं, त्याला/तिला संगीताचा आनंद घेता यावा हा विचार त्यांनी सतत केला. त्यामुळे त्यांच्या कार्यक्रमात रागदारीव्यतिरिक्त ठुमरी, अभंग, भजन हे प्रकार आवर्जून असायचे. पण श्रोत्यांना समजावे म्हणून त्यांनी आपल्या गायकीचा दर्जा कधीच कमी केला नाही. श्रोत्यांच्या टाळ्या मिळविणे, हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून बरेच कलाकार आवाज टिकविणे, सतत सरगम करत बसणे, लयीच्या आणि तालाच्या कसरती करत बसणे हे प्रकार मैफलीत समाविष्ट करतात. भीमसेन यांनी त्यांच्या मैफलीत असे प्रकार केले नाहीत. श्रोत्यांना गाणं सोपं करून समजावणं याचा अर्थ ते भेसळ करणं असं होत नाही. त्यामुळे पंजाबमधला अभंगाची फर्माईश करणारा, चेन्नईमधला दाक्षिणात्य संगीतच ऐकणारा, बिहार आणि उत्तर-प्रदेशच्या सीमारेषेवरच्या गावी राहणारा किंवा ब्राझीलहून ‘तीर्थ विठ्ठल’ आवडतं हे आवर्जून सांगणारा - यांच्यात समान काय आहे? एक, ही सारी सामान्य माणसं आहेत. आणि दुसरं, हे सगळे लोक भीमसेनांच्या गळ्यातून निर्माण होणाऱ्या एका उच्च दर्जाच्या सुराने आणि संगीताने प्रभावित झालेले आहेत! 


- आशय गुणे,
gune.aashay@gmail.com  
लेखक सामाजिक-सांस्कृतिक विषयाचे अभ्यासक आहेत

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, आणखी फोटो...

बातम्या आणखी आहेत...