आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिनेमाची निव्वळ पुरुषी नजर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सडपातळ  बांध्यातही स्त्रीने सेक्सी दिसायला हवं, हीच तर माध्यमांची पहिली मागणी असते. माध्यमांमधल्या बहुतेक साऱ्या  तारका टिकून राहण्याच्या धडपडीत हेच तर करीत असतात. सौंदर्याच्या अशा चुकीच्या संकल्पनांना त्या बळी पडतात. आणि या संकल्पना माध्यमांनीच पेरलेल्या,  पोसलेल्या आहेत आणि महत्त्वाचे म्हणजे, त्या पुरुषी नजरेतून आल्या आहेत, हे भान मग आपण सारेच गमावून बसतो...


मा गच्याच आठवड्यात श्रीदेवीचे अकाली निधन झाले. बॉलिवूडमधील सौंदर्यसम्राज्ञी म्हणून तिने जाणीवपूर्वक आपली ओळख निर्माण केली होती. बराच काळ ती लोकांच्या लक्षात राहील. सुबक, सुडौल आणि देखणं दिसण्यासाठी तिने प्लॅस्टिक सर्जरी  केली होती, नि त्याचे दुष्परिणाम  टाळण्यासाठी मग सतत परदेशी दवाखान्यांच्या वाऱ्याही तिने केल्या, अशा वंदता आधीपासूनच पसरल्या होत्या. वय झालं तरी ते दिसू न देणं, सतत विशी-पंचविशीतलं तरूण व सुंदर दिसावं, याचा अट्टाहास नि त्यासाठी वाट्टेल ते करणं ही सुपरस्टार या ब्रॅन्ड साठीची गरजच असते. याच गरजेतून ते सगळं काही तिने केलं. सडपातळ बांध्यातही स्त्रीने सेक्सी दिसायला हवं, हीच तर माध्यमांची मागणी असते. माध्यमांमधल्या बहुतेक साऱ्या  तारका टिकून राहण्याच्या धडपडीत हेच तर करीत असतात. सौंदर्याच्या अशा चुकीच्या संकल्पनांना त्या बळी पडतात. आणि या संकल्पना माध्यमांनीच पेरलेल्या, पोसलेल्या आहेत आणि महत्त्वाचे म्हणजे त्या पुरूषी नजरेतून आल्या आहेत, हे भान मग आपण सारेच गमावून बसतो.

 

कॅलेंडर असोत की पोस्टर्स, जाहिराती असोत की चित्रपट. माध्यमांनी स्त्री सौंदर्याला  एक चौकट घातली आहे. नितळ व देखणा चेहरा, सुडौल बांधा, जबरदस्त सेक्स अपील-ही स्त्री सौंदर्याची परिमाणे निव्वळ पुरुषी आहेत. पुरुषी नजरेतून आली आहेत. समाजात सर्वठायी असणारी पुरुषप्रधानता माध्यमांच्या जगात, तर अधिकच उघडपणे आलेली असते. या संदर्भात स्मरण होतेय, ते ब्रिटिश विदुषी लॉरा मुल्वे यांचे. १९७५ मध्ये ब्रिटिश फिल्म मॅगझिन ‘स्क्रीन’मध्ये लॉरा मुल्वे यांनी एक लेख लिहिला होता - व्हिज्युअल प्लेझर अँड नॅरेटिव सिनेमा. यांत त्यांनी प्रामुख्याने त्या काळातील हॉलिवूडपटांचे विश्लेषण करून काही, धडक निष्कर्ष मांडले होते.

 

त्याचे म्हणणे थोडक्यात असे : मध्यवर्ती / व्यावसायिक चित्रपटांतील बहुतेक चित्रपटकर्मी (निर्माते, दिग्दर्शक) हे पुरुष आहेत आणि सहसा पुरुष प्रेक्षकांसाठीच हे चित्रपट बनवले जातात. कथानकातील मध्यवर्ती पात्रही पुरुषच असते. पुरुष हाच सहसा कथानकातला कर्ता असतो. तो काहीतरी महत्त्वाची कृती करतो आणि मगच कथानक पुढे सरकते. म्हणजेच पुरूष पात्र सक्रीय असते. त्या तुलनेत, स्त्री पात्राचे प्रत्यक्ष अप्रत्यक्षरीत्या वस्तूकरणच केलेले असते. नेहमीच्या प्रेमकथांमध्ये तर स्त्रीपात्र हे ऑब्जेक्ट ऑफ डिझायर  (निव्वळ वासनावस्तू ...जसे की, ‘तू चिज बडी है मस्त मस्त...’) म्हणूनच रंगवलेले असते. पुरूष स्त्रीला प्राप्त करण्यासाठी लढतो नि अंतिमत: तिला जिंकतो. ती म्हणजे जणू त्याच्या पराक्रमाचे त्याला मिळालेले बक्षीसच. त्याला अनुसरून स्त्री निव्वळ प्रेक्षणीय, आनंददायी व उपभोग्य (तिला निव्वळ पाहण्यात आणि न्याहाळण्यातही पुरूषांना आनंद मिळावा... म्हणजे, देखने की चिज है हमारी दिलरूबा...) अशीच पडद्यावर साकारलेली असते. लॉरा मुल्वे यांच्याच शब्दांत सांगायचे तर, "लोकप्रिय व्यावसायिक चित्रपट हे निव्वळ पुरुषी अहंला कुरवाळणारे, त्याला सुखावणारे असेच असतात.’ थोडक्यात सांगायचे तर, चित्रपट हे सहसा पुरूषी नजरेतूनच बनलेले असतात.

 

त्याअनुषंगानेच कॅमेऱ्याची हाताळणी केलेली असते. उदाहरणार्थ, स्त्रीकडे वखवखलेपणाने पाहणारे पुरूषपात्र, लगेचच पुढच्या दृश्यात, स्त्रीच्या अवयवांना न्याहाळत तिच्या देहभर फिरणारा कॅमेरा... यांतून ठळकपणे पुरुषी नजर आणि त्यांतील वासनाच अधोरेखित केली जाते. कॅमेऱ्याची ही नजर मग केवळ त्या पुरुषपात्राची राहत नाही. ती अवघ्या प्रेक्षकवर्गाचीच नजर बनते. यांत स्त्रियाही आल्याच. म्हणजे स्त्रीप्रेक्षकही पुरूषी नजरेतूनच स्त्री पात्रांकडे पाहू लागतात. कथानकातील असो की प्रत्यक्षातील, स्त्रीने सुंदर दिसलं पाहिजे, पण ते स्वत:साठी नाही, तर पुरूषांसाठी. कथानकातील असो की प्रत्यक्षातील, तिचं सगळं जगणंच पुरूषाभोवती केंद्रीत. प्रेमकथा असली तरी, नायक-नायिका कधीही तुल्यबळ असत नाहीत. प्रेमात अडचणी  येतात आणि नायक आपल्या पराक्रमाने त्या सोडवतो. संकटात सापडलेल्या नायिकेची सुटका करतो. त्याचे बक्षीस म्हणून खुद्द नायिकाच त्याला मिळते.

 

लॉरा मुल्वे यांनी चित्रपटातील ही पुरुषी नजर (मेल गेझ) कशी सर्वव्यापी असते, याचे सविस्तर विश्लेषण केले आहे. त्यांच्या मते, चित्रपटातील ही पुरुषी नजर तीन पातळ्यांवर रचली (व ठसवली) जाते. एक म्हणजे, कॅमेरा (म्हणजे त्यामागील दिग्दर्शक) निवडपूर्वक स्त्रीशरीराकडे कसे पाहतो... दुसरे, पुरुषपात्र (स्त्रीदेहाकडे विशिष्ट नजरेने) कसे पाहते, आणि तिसरे, खुर्चीतून प्रेक्षक (स्त्रीपात्रांकडे) कसे पाहतात... दिग्दर्शक, कथानकातील पात्रे व खुर्चीतील प्रेक्षक - या तीनही पातळ्यांवर ही पुरूषी नजर उपस्थित असते. नव्हे, किंबहुना ती सिनेमातून तशी जाणीवपूर्वक रचलेलीच असते.

 

चित्रपटांची कथानके स्त्रियांचे चित्रण पारंपरिक पद्धतीने करताना दिसतात. त्यातील स्त्रिया सहसा आई, बहीण, बायको, प्रेयसी, मैत्रीण अथवा उपभोग्य शरीर म्हणूनच रंगवलेल्या असतात. त्या त्याग करणाऱ्या, कुटुंबकेंद्री, दुर्बळ (परिणामी पुरूष शक्तीवर सहसा अवलंबून असणाऱ्या)... अशात असतात. कॅमेरा स्त्रियांकडे सहसा वरून खाली पाहतो (पुरुषाचे स्थान एकदा का वरचे गृहीत धरले की त्याचा तिला न्याहाळण्याचा कोनही असाच वरून खाली... हीच ती पुरूषी नजर. यांत अप्रत्यक्षपणे पुरूषी सत्ताच दृश्यांकित केली जाते.) पुरूषांकडे मात्र हाच कॅमेरा खालून वर म्हणजे, स्त्री पात्रांच्या नजरेतून पाहतो. स्त्री देहाला संथ (चविष्टपणे) न्याहाळत फिरणारा कॅमेरा... थोडक्यात, चित्रपटातील कॅमेऱ्याची संपूर्ण नजर हीच पुरूषी नजर म्हणून हाताळलेली असते. जाणीवपूर्वक रचलेली असते.

 

दृश्य कुठलेही असो, अनेक पातळ्यांवर स्त्रीला न्याहाळणारे कॅमेऱ्याचे विविध कोन, कॅमेऱ्याच्या हालचाली, प्रकाशयोजना, रंग, दृश्यरचना... यांतून चित्रपट हे माध्यम ‘व्हिज्युअल प्लेझर’ निर्माण करीत असते. स्त्रीदेह हाही तसाच व्हिज्युअल प्लेझर म्हणूनच त्यात हाताळला जातो. या सर्वामागे ‘मेल गेझ’ म्हणजे पुरूषी नजर प्रभावी असते, हे अमान्य करता येणारच नाही. उदाहरणार्थ, श्रीदेवीला आजवर काय तऱ्हेने पडद्यावर रंगवले गेले, हे आठवून पाहिले तरी हा मुद्दा स्पष्ट होईल. अलिकडच्या काळात काही चित्रपट अपवादात्मकरीत्या नायिकाप्रधान आहेत. पण तो अपवादच. नियम नाही. हॉलिवूड असो की बॉलिवूड, मराठी असो की बंगाली वा तमिळ... किती स्त्री दिग्दर्शक आपल्याला दिसतात, किती पटकथाकार-गीतकार-संगीतकार-तंत्रज्ञ स्त्रिया आहेत... हे पाहिले तरी सिनेमाच्या क्षेत्रात स्त्रियांना नेमके काय स्थान आहे, हे स्पष्ट होते. सिनेमाच्या आत नि बाहेरही ही पुरूषी नजर ठायीठायी दिसते. प्रेक्षकांना प्रभावित करते. आणि म्हणूनच सर्वार्थाने समानता प्रस्थापित करणारा सिनेमा यायला हवा. श्रीदेवीच्या अकाली नि काहीशा अगम्य जाण्यानंतर तरी हे भान माध्यमावर पकड असलेल्यांमध्ये झिरपायला हवं.

 

abhimedh@gmail.com

 

बातम्या आणखी आहेत...