आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वृथा ही बढाई सुकार्याविणें

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जानेवारीच्या पूर्वार्धात आपण मराठी भाषा पंधरवडा साजरा केला. फेब्रुवारी २७चा ‘मराठी भाषा दिन’देखील आपण नेहमीच्याच उत्साहात साजरा करणार आहोत. उत्सवी असायला आपल्याला आवडतेच. मायमराठीचे अभिमानी गोडवे गात, निव्वळ हातात भाषिक अस्मितेचे झेंडे घेऊन नि राजकीय लाभापुरते खळ्ळखट्याक् करून मराठीचे भले साधेल का, हा प्रश्न आपण त्यांना आणि त्याहूनही जास्त, भाषाभिमानी नागरिक म्हणून स्वत:ला विचारलाच पाहिजे... 


नुकत्याच मराठी माध्यमाच्या १३०० सरकारी शाळा बंद झाल्या. नवीन मराठी शाळा सुरू करायला सरकारची परवानगी नाही. पण, दुसरीकडे राजकीय नेत्यांनीच शिक्षणसंस्था स्थापून धूमधडाक्यात विनाअनुदानित खासगी इंग्रजी शाळा सुरू करून पैसे कमवायला सुरुवात केली आहे. जुन्या मराठी शाळांचे अक्षम्य हाल सरकारच करत आहे. बहुतेक खासगी मराठी शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. या कटामागचे उद्देश स्पष्ट आहेत. मराठीत नोकऱ्या मिळतातच कुठे, असे हळूच कुजबुजत आपणही मग मराठी सोडून पोरासोरांना कौतुकाने इंग्रजी माध्यमात घालत सुटलोय. वाहिन्यांवरच्या वेळकाढू रंजक मालिकांपुरता मराठीचा संबंध आपला. राजकीय मुद्दा निघाला की, मात्र तावातावाने मराठीची बाजू घेणारे दुटप्पी लोक आपण. तथाकथित, एक सोडून दोन, मराठीवादी राजकीय पक्षांनाही मराठीचा खरा प्रश्न कळलेलाच नाही. मग ते तरी काय करणार. त्यांचं उत्तर सोप्पंय... करा खळ्ळखट्याक्. फोडा कुणावर तरी खापर... की संपलं आपलं काम. आपणही टाळ्या वाजवणार. अस्मितेचे झेंडे मिरवणार. पुन्हा मुद्दा येईतो, विसरून जाणार. जणू काही आपलं देणंघेणंच नाही. 


जगातल्या सुमारे साडेपाच हजार भाषांमध्ये सर्वाधिक बोलली जाणारी भाषा म्हणून मराठी सोळाव्या क्रमांकावर नि भारतात अवघी चौथ्या क्रमांकावर आहे. सुमारे दोन हजार वर्षांचा भाषिक-सांस्कृतिक इतिहास आणि आधुनिकतेचा भाषेत किंचित शिरकाव (होय, किंचितच) - निव्वळ या भांडवलावर तगणे कठीण आहे. आधी मान्यच करायला हवे की, मराठी भाषा गंभीरपणे आजारी आहे. अर्थात, आपल्या मराठी बाण्याला अनुसरून यावरदेखील आपले एकमत नाही. ‘ज्या भाषेत ज्ञानेश्वर-तुकाराम जन्माला आले, ती भाषा मरेलच कशी...’, ‘मराठी भाषेचा प्रश्न हा फक्त काही शहरी मध्यमवर्गीयांनी निर्माण बागुलबुवा आहे. त्यांची मुले इंग्रजी शिकून अमेरिकेत गेली. आता मायमराठी जगवण्याची जबाबदारी ते आमच्यावर टाकताहेत. आमची मुले इंग्रजी शिकून पुढे जाऊ नयेत, असाच त्यामागे डाव आहे...’ ‘इंग्रजी आणि हिंदीच्या आक्रमणामुळे मराठी भाषेसमोर आव्हान निर्माण झाले आहे...’ थोडक्यात, मराठीच्या प्रश्नाबद्दलदेखील आपले एकमत नाही. मग उत्तरे तर दूरचीच. आधी हे लक्षात घ्यायला हवे की, मराठीचा हा भाषिक मुद्दा भावनिक करून पुरेसा कळणारही नाही नि सुटणार तर त्याहूनही नाही. 


मँडेरिन व स्पॅनिशखालोखाल इंग्रजी ही जगात सर्वाधिक बोलली जाणारी तिसऱ्या क्रमांकाची भाषा आहे. मँडेरिन ही चीनची भाषा जगात सर्वाधिक बोलली जाते, याचे कारण चीनची लोकसंख्या जगात सर्वाधिक आहे. ती अर्थातच, चीन या देशातच सर्वाधिक बोलली जाते. स्पेन हा युरोपातील छोटासा देश, पण ऐतिहासिक घटनाक्रमांत ती भाषा सर्वदूर पोहोचली. इंग्रजी ही लोकसंख्येच्या दृष्टीने तिसऱ्या क्रमांकाची भाषा असली तरी, दुसऱ्या महायुद्धापर्यंत, सुमारे दोनेकशे वर्षे जगावर अधिराज्य गाजवणारा इंग्लंड आणि १९५० नंतर आंतरराष्ट्रीय पटलावर राजकीय आणि आर्थिक प्रभाव निर्माण करणारा अमेरिका - या दोनही देशांच्या निमित्ताने इंग्रजी जगात अक्षरश: फोफावली, पण त्याबरोबरच इंग्रजीने सर्व देश व संस्कृतीतील संचित रिचवत स्वत:ला ज्ञानसमृद्ध केले, आधी आर्थिक व नंतर राजकीय प्रभाव वाढवत जीवनव्यवहाराच्या सर्व क्षेत्रांत आपले बस्तान बसवले. त्यामुळे लोकसंख्येच्या दृष्टीने जरी इंग्रजी जगात तिसरी असली, तरी तीच आज आंतरराष्ट्रीय संपर्कभाषा म्हणून सुस्थापित झाली आहे. व्यापार, उद्योग... यासह ज्ञानव्यवहार आणि तंत्रज्ञानाची ती जगातली पहिल्या क्रमांकाची भाषा आहे. उदाहरणार्थ, इंटरनेटवर इंग्रजीच सर्वाधिक वापरली जाते. सगळ्यात जास्त वेबपेजेस, लेखन, विविध विषयांवरील खरी-खोटी माहिती, सामाजिक माध्यमांतील वापर यात इंग्रजीच पुढे आहे. मँडेरिन व स्पॅनिश यांबाबत, इंग्रजीच्या जवळपासही पोहोचत नाहीत. या पार्श्वभूमीवर आपल्या भाषिक प्रश्नांकडे बघायला हवे. 

 
मराठी ही सर्वाधिक बोलली जाणारी जगातली सोळाव्या क्रमांकाची भाषा आहे, हे आपल्यासाठी भूषणावह असले तरी भाषा टिकण्यासाठी, विस्तारण्यासाठी लोकसंख्या हा एकमेव निकष होऊ शकत नाही. अर्थव्यवहार, ज्ञानव्यवहार, तंत्रव्यवहार, कला व संस्कृतिव्यवहार - याबाबत जागतिक पटलावर आपण कुठे आहोत, हे खरे कळीचे मुद्दे आहेत. मराठी ही व्यापार व उदिमाची भाषा कधीच नव्हती नि नजीकच्या भविष्यकाळात तशी ती होईल, याचीही सुतराम शक्यता दिसत नाही. इंग्रजी नावाची पाहुणी आपल्या घरात राहायला आली, त्याला आता बरोबर दोनशे वर्षे झाली आहेत. विषय म्हणून आणि माध्यम म्हणून  ज्ञानव्यवहारात ती फोफावली, रुजली. त्यालाही कैक वर्षांचा इतिहास आहे. पण इंग्रजीतून विविध विषयांतले ज्ञान घेत ते मराठीत आणण्याचे कार्य जे आधीच्या पिढ्यांनी सुरुवातीला केले, ते आता जवळपास बंद झाले आहे. विविध क्षेत्रांतील अद्ययावत आणि सखोल ज्ञान मराठीत उपलब्ध नाही. जे दिसते, ते वरवरचे आहे. कला व वाणिज्य शाखांमध्ये काही विषयांपुरते का असेना, पदवी व पदव्युत्तर स्तरांवर मराठीत काही पुस्तके आहेत, पण त्यातली बहुतांश निव्वळ कामचलाऊ आहेत. विज्ञानात मात्र शालेय पातळीनंतरच मराठीची बोंब सुरू होते. उदाहरणार्थ, एखाद्याला समजा, बारावी विज्ञानाचे सर्व विषय संपूर्ण मराठीत शिकायचे, तर परिभाषा व तशी पुस्तकेदेखील मराठीत नाहीत. अभियांत्रिकी, वैद्यकशास्त्र, तंत्रज्ञान, तर सोडाच, पण इतिहास, अर्थशास्त्र, मानसशास्त्र, तत्त्वज्ञान आदी मानव्यविद्यांमधील ज्ञानही पदवी व पदव्युत्तर स्तरांवर अभ्यासापुरतेही मराठीत पुरेसे आलेले नाही. हे किंवा आदी विषय शिकवणाऱ्या मराठीभाषक प्राध्यापक वा तज्ज्ञांनादेखील हे विषय मराठीत आणावेत, त्या त्या विषयांतील मूलभूत महत्त्वाची पुस्तके भाषांतरित करून मराठीत भर घालावी, परिभाषा तयार करावी, या विषयावर इंग्रजीतले वाचून पण मराठीत सखोल चर्चा शक्य करावी, अशी निकड वाटली नाही. ना यांपैकी कुठल्या विषयावर आपण मराठीत मौलिक स्वरूपाचे जागतिक दर्जाचे ज्ञान निर्माण केले आहे, की जगाने ज्याची आवर्जून दखल घ्यावी. या प्रकारचे काम करणारे विद्यापीठ ग्रंथ निर्मिती मंडळ होते , पण ते बंद पडूनही आता तपे लोटली आहेत. इतिहासाचार्य राजवाडे, ज्ञानकोशकार केतकर - यांसारखी एकहाती कामे आता इतिहासजमा झाली आहेत. 


मराठीतल्या विचारवंतांनी साठ-सत्तरच्या दशकापर्यंत आवर्जून मराठीत लेखन केले. भर घातली. ते आता खुंटले आहे. जयंत नारळीकरांसारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाचा शास्त्रज्ञ मराठीतही लिहितो.पण त्यानंतरच्या काळात विविध क्षेत्रांतले शेकडो मराठीभाषक शास्त्रज्ञ जगभर असतील, त्यांचे कामही मोलाचे असेल, पण ते मराठीपासून दूर गेले आहेत. पर्यायाने मराठी भाषा मूलभूत ज्ञानव्यवहारापासून दूर गेली आहे. आता निर्माण होतात ती फक्त परिचय करून देणारी गाइडं आणि आपण त्यातच अल्पसंतुष्ट आहोत, हे आपले सामाजिक करंटेपण. मराठी विश्वकोश मंडळ, साहित्य संस्कृती मंडळ, मराठी विज्ञान परिषद, मराठी अर्थशास्त्र परिषद, साहित्य अकादमी, नॅशनल बुक ट्रस्ट. वा काही तुरळक खाजगी संस्था वा व्यक्ती यांची कामे व त्यांची गती सध्याच्या अजस्त्र ज्ञानव्यवहारापुढे मुळीच पुरी पडणारी नाही. मराठीत इंटरनेटवरचे आपले कामही नगण्य आहे. तात्पर्य, गेल्या अनेक वर्षांत ज्ञानाची गती, ज्ञानाचा आवाका, त्यांत मौलिक भर वा विस्तार - याबाबत आपण मराठी भाषा म्हणून मागे आहोत.  


मराठी टिकवायची असेल, तर आधी शैक्षणिक पातळीवर मराठीचा सर्वस्तरीय विकास साधला पाहिजे. मराठीतला ज्ञानव्यवहार समृद्ध झाला पाहिजे. प्रसारमाध्यमांत मराठी वाढल्याचे चित्र जरूर दिसते, त्यामुळे मराठीही जगभर पसरलेल्या मराठी भाषकांपर्यंत सहजपणे पोहोचली आहे,  पण इंटरनेटवरचा मराठीचा अर्थपूर्ण वापर वाढला पाहिजे. तिथे इंग्रजीत सहज उपलब्ध असलेले जागतिक माहितीचे भांडार मराठीत आणून खुले केले पाहिजे. जगभरातल्या भाषांशी निरंतर देवघेव करून, आपल्याच बोलींना पुन:प्रतिष्ठा देत आपले शब्दभांडार विकसित केले पाहिजे. व्यवहाराच्या विविध क्षेत्रांत पोटापाण्याशी भाषेचा जिवंत संबंध जोडावा लागेल, राजकीय आणि त्यापेक्षाही सामाजिक इच्छाशक्तीच्या बळावर भाषिक नियोजन करून ते  कठोरपणे अंमलात आणले पाहिजे. एक भाषा नष्ट झाली तर तिच्यासोबत तिच्यात अंतर्निहीत जीवनदृष्टी, संस्कृतीची एक समग्र सृष्टी नष्ट होते. तसे होऊ नये, यासाठी भावनिक कढ उपयोगाचे नाहीत, मराठी भाषेला अभिजात भाषा म्हणून दर्जा मिळाल्यानेही हे प्रश्न सुटणार नाहीत. जागतिकीकरणात भाषा म्हणून उद्ध्वस्त होण्याचा, समूळ नष्ट होण्याचा धोका आहे , तशीच आणि तितकीच कधी नव्हे इतकी भाषाविकासाची संधीही जागतिकीकरणाने उपलब्ध झाली आहे. या आव्हानाचे संधीत रूपांतर करणे हे अर्थातच, आपल्या सामाजिक व राजकीय इच्छाशक्ती व कृतिशीलतेवर अवलंबून आहे. अन्यथा भाषिक अस्मितेच्या आपल्या बढाया पोकळच ठरणाऱ्या आहेत.  


- प्रा. अभिजित देशपांडे 
abhimedh@gmail.com 
लेखकाचा संपर्क : ९८१९५७४०५०

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, आणखी फोटो...

 

बातम्या आणखी आहेत...