Home | Magazine | Rasik | ajay kulkarni article in rasik

'कान'सेंनाना नवी 'दृष्‍टी' देणारे लेखन

अजय कुलकर्णी | Update - Jul 29, 2018, 10:26 AM IST

गीत-संगीत हा हिंदी चित्रपटांचा आत्मा आहे. आजवर अनेक पिढ्यांना या गाण्यांनी भुरळ घातली आहे. मृदुला दाढे-जोशी यांचे ‘रहे न

 • ajay kulkarni article in rasik

  गीत-संगीत हा हिंदी चित्रपटांचा आत्मा आहे. आजवर अनेक पिढ्यांना या गाण्यांनी भुरळ घातली आहे. मृदुला दाढे-जोशी यांचे ‘रहे ना रहे हम' हे पुस्तक हिंदी चित्रपट संगीताच्या सुवर्णयुगातील १२ संगीतकारांच्या रचनांवर रसाळ भाष्य करणारे आहे. किंबहुना, संगीतकारांच्या अजरामर गाण्यातील सौंदर्यस्थळे उलगडून दाखवणारी ही एक दर्जेदार साहित्यकृती आहे...

  हिंदी चित्रपट संगीताच्या सुवर्णकाळातील १२ संगीतकार व त्यांची गाणी हा खरे तर खूप विस्तृत विषय आहे. सी. रामचंद्र, सलील चौधरी, शंकर-जयकिशन, मदनमोहन, रोशन, सचिन देव बर्मन, लक्ष्मीकांत-प्यारेलाल, ओ.पी. नय्यर, हेमंत कुमार, जयदेव, खय्याम आणि वसंत देसाई या संगीतकारांचे हे गाणे घ्यावे की ते गाणे निवडावे, असा संभ्रम निर्माण करणाऱ्या अविस्मरणीय रचना, त्यात डावे-उजवे करताना होणारी अडचण यावर मात करत लेखिका मृदुला दाढे-जोशी यांनी "रहे ना रहे हम' या पुस्तकाच्या निमित्ताने एक शिवधनुष्य पेलले आहे. लेखिकेने या पुस्तकांत त्या-त्या गाण्यांविषयी टिपलेली निरीक्षणे, व्यक्त केलेले विचार, त्या गाण्याच्या संगीतकाराचे गाण्याच्या रचनेविषयीचे, त्यासाठी वापरलेल्या ऑर्केस्ट्रेशनविषयीचे विचार तार्किकदृष्ट्या पटणारे आहे. पुस्तक वाचत असताना अनेक गाजलेल्या, अजरामर गाण्यांचे संदर्भ येतात. ते वाचताना, किंबहुना त्या गाण्यातील त्या ‘जागा' अधोरेखित होत असताना,आपल्या मनाच्या रेकॉर्डप्लेअरवर नकळत ते गाणे सुरू होते, अन् लेखिका सांगते त्या शब्द, सूरांची एक नवी ओळख पटते. अरे, हे खरेच तसे आहे, हे उमगत असतानाच, नवे गाणे सुरू होते. पुस्तक संपेपर्यंत ही मनातल्या मनात रंगणारी गाण्याची मैफल एक आगळाच अनुभव देते.
  एखादे गाणे खुलते, मनात घर करते. मात्र, त्यामागे नेमकी काय मेहनत त्या संगीतकाराने घेतली आहे? "सा-रे-ग-म'च्या पट्टीत, रागाच्या तालावर, शब्दांच्या खेळींवर, भावनांच्या कल्लोळात, गायकांच्या आवाजाचा पोत, नेमके आलाप, आरोह-अवरोहाची नाजूक नजाकत त्या-त्या संगीतकाराने कशी खुबीने लयदार केली आहे, हे सोदाहरण वाचताना तो सुवर्णकाळ पुन्हा नजरेपुढे उभा राहतो.


  या संगीतकारांनी रागदारीचा कसा वापर केला, याची माहितीही या पुस्तकांतून मिळते. उदाहरणार्थ - बागेश्रीवर अण्णांचं (सी. रामचंद्र) विशेष प्रेम दिसून येत असलं (राधा ना बोले, जाग दर्द-ए-इश्क जाग) तरी भीमपलास (ओ निर्दयी प्रीतम, मेरे मन का बावरा पंछी), जौनपुरी (जब दिलको सताए गम), भैरवी (कैसे आउं जमुना के तीर), पहाडी (गया अंधेरा हुआ उजाला ), दरबारी कानडा (कितना हंसी है मौसम), मालकंस (तू छु पी है कहाँ) तर सलील चौधरी बसंत बहार (छम छम नाचक आयी बहार), बागेश्री (आ जा रे मै तो), खमाज (ओ सजना) तर शंकर-जयकिशन यांनी यमन (रे मन सुर मे गा), शिवरंजनी (ओ मेरे सनम), जोगिया (दिल एक मंदिर है), मांड (अजी रुठकर अब) तर मदनमोहन यांची नंद (तू जहाँ जहाँ चलेगा), मधुवंती (रस्म-ए-उल्फत को निभाएँ), रागेश्री (कौन आया मेरे मनके द्वारे) तर रोशन यांची गौडमल्हार (गरजत बरसत सावन आयो), कलावती (काहे तरसाए जियरा), भैरवी (लागा चुनरी मे दाग) आणि सचिन देव बर्मन यांची काफी (घायल हिरनिया), खमाज (नजर लागी राजा), अहिर भैरव (पुछो ना कैसे मैने) तसेच ओ. पी नय्यर यांनी ‘फागुन’मधली सगळी गाणी कशी, पिलू रागात बांधली याची माहिती रसिकांना मिळते. लेखाच्या शेवटी गाण्यांचे तपशील दिल्याने संदर्भ सुलभ होतो.

  त्या-त्या संगीतकारांच्या गाजलेल्या गाण्यांची, त्यातील ‘एंट्रो'पासून ते शेवटच्या अंतऱ्यापर्यंतची सगळी वैशिष्ट्ये, त्यातील बारकाव्यांसह सहज एका लयीत, एका तालात आपल्या समोर येतात. लेखिका सांगतात, लक्ष्मी-प्यारेंची द्वंद्वगीतं ही खऱ्या अर्थाने द्वंद्वगीतं नसतात, त्यात तिसरा अत्यंत महत्त्वाचा फॅक्टर असतो, तो म्हणजे त्यांचं ऑर्केस्ट्रेशन. ‘ये दिल तुम बिन, कही, लगता नही, हम क्या करे', हे गाणं लताचं, काही प्रमाणात रफीचं आणि तेवढंच त्या ऑर्केस्ट्रेशनचं. त्या व्हायोलिन्सचंही. तुम्ही त्याला वेगळं काढूच शकत नाही.

  खय्यामच्या बाबतीत त्या म्हणतात - सारंगी, संतूर, व्हायोलिन, पियानो, मेंडोलिन, अॅकॉर्डियन, हार्मोनिका अशा वाद्यांना खय्यामच्या गाण्यात स्वतंत्र अस्तित्व अाहे, त्यांना काही रोल आहे. त्या वाद्यांना फक्त अस्तित्व नसतं, तर ती वाद्यं शब्दांचा हात हातात घेऊन जातात. हेमंतकुमारच्या संदर्भात त्या सांगतात, ‘वो शाम कुछ अजीब थी’सारख्या गाण्यात "वो शाम'आणि "ये शाम' मधला फरक किशोरकुमार आपल्या आवाजातून कसा दाखवतो, ते ऐकण्यासारखं आहे. "वो' म्हणताना जो आवाज भूतकाळात जाऊन कातर होतो. पाश्चात्त्य कॉयरमुळे हे गाणे मनाच्या हळव्या कोपऱ्यात जाऊन बसतं. वसंत देसाई, सलील चौधरी, जयदेव आणि खय्याम या संगीतकारांच्या रचनांची वैशिष्ट्यपूर्ण माहिती हे या पुस्तकाची ‘यूएसपी’ ठरावा अशा रीतीने आले आहे. वृत्तपत्रातील सदराचे पुस्तकात रूपांतर करताना वाचकांचा हिरमोड होणार नाही, याची काळजी घेतल्याने ‘रहे ना रहे हम' ताजे, टवटवीत झाले आहे.

  ‘रहे ना रहे हम...’ वाचल्यानंतर ती गाणी ऐकताना आपणही गाण्यांना सौंदर्य बहाल करणाऱ्या त्या जागांकडे आवर्जून लक्ष द्यायला लागतो. इतर गाणी एेकताना त्या गाण्यात, अशा कोणत्या जागा आहेत, याचा शोध घेण्याचा ‘नाद’ लावून घेतो. त्या अर्थाने, हे पुस्तक कानसेनांना गाणी ऐकण्याची नवी ‘दृष्टी’ देणारे ठरले आहे...


  - पुस्तकाचे नाव : रहे ना रहे हम
  - लेखिका : मृदुला दाढे-जोशी
  - प्रकाशक : रोहन प्रकाशन
  - किंमत : ३०० रुपये

  ajay.kulkarni@dbcorp.in

Trending