Home | Magazine | Madhurima | Akash Totare writes about education

शिक्षणाचा काय उपयोग?

आकाश तोतरे, औरंगाबाद | Update - Jul 24, 2018, 05:42 AM IST

प्रवासात खूप पाहायला/ऐकायला मिळतं. त्या अनुभवांतनं मनात आलेले विचार वाचक आम्हाला कळवत असतात.

 • Akash Totare writes about education

  आपल्यातले अनेक जण रोज प्रवास करत असतात. प्रवासात खूप पाहायला/ऐकायला मिळतं. त्या अनुभवांतनं मनात आलेले विचार वाचक आम्हाला कळवत असतात. त्यापैकीच एका प्रवासातला हा एक अनुभव.


  परवाची गोष्ट. वेळ सायंकाळी पाचची. औरंगाबाद शहरापासून माझ्या घराचं अंतर साधारण १५ किमी. घरी जाण्यासाठी मी एका खासगी बसमध्ये बसलो. तीन सीटची लाइन असलेल्या समोरून दुसऱ्या सीटवर. बसमध्ये तसे सात-आठच लोक होते.


  माझ्या बाजूलाच म्हणजे दोन-दोन सीटची लाइन असलेल्या सीटवर (अगदी दरवाज्यात असलेल्या) पुढच्या स्टॉपवर एक तरुणी येऊन बसली. खिडकी धरून तिची कॉलेज बॅग बाजूच्याच सीटवर उभी करून ठेवली होती तिने. बस ड्रायव्हर प्रवासी घेत-घेत चालला असताना एका स्टॉपवर एका आजोबांनी बस थांबवली. अंगावर मळकट कपडे, डोक्यावर तशीच मळलेली टोपी, पांढरी वाढलेली दाढी, डोक्यावर जड वाटणारं भलं मोठं गाठोडं आणि चेहऱ्यावर कसली तरी चिंता. काठीच्या आधाराने कसेबसे बसमध्ये चढले ते. आणि बस पुढे सुरू झाली. चालत्या बसमध्ये चालणं शक्य होणार नाही याची जाणीव असल्यामुळे आजोबांनी पहिल्याच सीटवर म्हणजे त्या तरुणीच्या बाजूला बसणंच पसंत केलं असावं. त्या तरुणीची कॉलेज बॅग त्या सीटवर उभी ठेवलेली असल्याने उरलेल्या अर्ध्या सीटवरच बसावं लागलं होतं त्यांना.
  ते आजोबा बाजूला बसलेले पाहून ती तरुणी एवढी अस्वस्थ झाली की, तिने सीटवर उभी ठेवलेली बॅगसुद्धा बाजूला घेण्याचे कष्ट घेतले नाहीत. (तिचा त्या अाजोबांप्रती राग तिच्या डोळ्यांत साफ दिसत होता, हो डोळ्यांतच... चेहऱ्यावर तर स्कार्फ बांधलेला होता ना!)
  ते आजोबा कसेबसे बसले होते, पायाजवळ त्यांचं गाठोडं आणि हातातली काठी हातातच. ड्रायव्हरने जर ब्रेक लावला तर त्यांचा तोल जाणं निश्चित होतं.
  हा संभाव्य धोका लक्षात घेऊन मी त्या आजोबांना माझ्या बाजूच्या सीटवर बसण्यास सुचवलं, मी दुसऱ्यांदा बोलल्यावर ते माझ्या बाजूला बसण्यास तयार झाले. त्यांचं गाठोडं आणि काठी देण्याची मी तयारी दर्शवली, पण त्यांनी त्यास नकार दिला. आजोबा तर माझ्या बाजूला येऊन बसले, पण त्या तरुणीने माझ्याकडे अशा काही नजरेने पहिले जशी काही मी एखादी मोठी चूकच केली होती. बहुतेक तिला तिच्या उर्मट वागण्याकडे माझे लक्ष असल्याचा राग आला असावा; असो.
  बस ड्रायव्हरचं प्रवासी घेणं सुरूच होतं. काही वेळात पुढच्या स्टॉपवर एक स्त्री तिचं वर्षभराचं बाळ घेऊन तिच्याच बाजूला येऊन बसली, या वेळी मात्र त्या तरुणीने तिची कॉलेज बॅग बाजूला घेतली.
  तिच्यात हा बदल होण्यामागे माझी त्या अाजोबांबद्दलची वागणूक कारणीभूत होती की त्या स्त्रीचा नीटनेटकेपणा म्हणजेच तिचे न मळलेले कपडे, तिच्या हातातलं ते छोटंसं बाळ की आणखी काही होतं, या प्रश्नांची उत्तरे शोधता शोधता माझा स्टॉप आला नि क्षणात मी त्या प्रसंगातून अदृश्य झालो.


  पण त्या तरुणीची त्या अाजोबांप्रती वागणूक कितपत योग्य होती? आपण सुशिक्षित होतोय म्हणजे आपल्यात नेमका बदल काय होतोय नि काय व्हायला हवा? शिक्षणाबरोबरच सामाजिक भान असणं महत्त्वाचं नाही का? आपण चांगल्या घरात जन्माला आलो म्हणून आपण गरिबांची, मळकट कपडेवाल्यांची खिल्ली उडवायची का? त्यांचा द्वेष करायचा का? वयोवृद्ध माणसं आपल्या घरात नसतातच का? असं जर असेल तर आपलं शिक्षण फक्त आपल्यासाठीच मर्यादित असेल आणि त्याचा समाजाला आणि आपल्या देशाला काही एक फायदा होणार नाही.

  - आकाश तोतरे, औरंगाबाद
  akashtotare@gmail.com

Trending