Home | Magazine | Madhurima | An experience of a married woman

चुकलं कोण? आणि कुठे?

मधुरिमा | Update - Jul 24, 2018, 07:20 AM IST

मी एका सुसंस्कृत, सुखवस्तू घरातली मुलगी. एमएस्सीपर्यंत शिक्षण झालेलं. उपवर असल्यामुळे वरसंशोधन सुरू झालं.

 • An experience of a married woman

  मधुरिमाच्या वर्धापन दिन विशेषांकात बदलत्या विवाह व कुटुंब संस्थेचा आढावा घेणारे लेख प्रसिद्ध झाल्यानंतर एका वाचक मैत्रिणीने नाव न जाहीर करण्याच्या अटीवर पाठवलेला हा अनुभव.

  मी एका सुसंस्कृत, सुखवस्तू घरातली मुलगी. एमएस्सीपर्यंत शिक्षण झालेलं. उपवर असल्यामुळे वरसंशोधन सुरू झालं. अपेक्षा माफकच, पण मुलगा निर्व्यसनी असावा असा कटाक्ष. कित्येक वरपरीक्षा झाल्यानंतर अखेर मूळचा उस्मानाबाद जिल्ह्यातील छोट्याशा गावातला, पण कुटुंब मुंबईत स्थिरस्थावर झाल्यामुळे मुंबईत लहानाचा मोठा झालेला असा मुलगा मी पसंत केला. वडील ड्रायव्हर, एक मोठा भाऊ विवाहित, एक लहान भाऊ आणि तो स्वत: असं एकत्र कुटुंब. तिघे भाऊ जेमतेम पगारावर खासगी नोकरी करीत. सर्वच बाजूंनी मी त्याच्याहून सरस होते, पण मुलगा कष्टाळू आणि निर्व्यसनी वाटला, त्याच्या घरचे स्वभावाला गरीब वाटले. त्याने मला, ‘तू नोकरी कर किंवा घर सांभाळ, नोकरी केलीस तर तुझा पगार खर्चण्याचा सर्व अधिकार तुझाच असेल आणि तुला कसलंच बंधन असणार नाही,’ असं आश्वासन दिलं म्हणून मी लग्नाला तयार झाले. आम्ही त्याच्या मूळ गावी आणि मुंबईत जुजबी चौकशी केली असता परिस्थिती गरीब असेना का, पण माणसं खूपच चांगली आहेत, तुमच्या मुलीला कसलाच जाच होणार नाही म्हटल्यावर घरूनही लग्नाला होकार मिळाला. इतर मुलींप्रमाणेच मीही सुखी संसाराचे स्वप्न रंगवत बोहल्यावर चढले. वास्तव मात्र त्याहून वेगळं आणि भयानक होतं याची जाणीव मला लग्नानंतर काहीच दिवसांत झाली. नोकरी करणं तर लांबच, पण मला कामवालीसारखं राबवणं सुरू झालं. त्यात थोरल्या जावेला लग्नाच्या तीन वर्षांनंतर खूप इलाज/दवाखाने करून दिवस गेल्याने तिचा कौतुक सोहळा पाहत निमूटपणे काम करणं माझ्या वाट्याला आलं.


  लग्न जमवताना, आम्हाला कसलीच अपेक्षा नाही, आम्हाला केवळ मुलगी द्या, असं बोललं गेलं आणि प्रत्यक्षात सालंकृत कन्यादान करून, अगदी थाटामाटात लग्न केलेलं असतानाही रुखवतच नाही, भांडीच दिली नाहीत, हुंडाच दिला नाही, असे टोमणे मारले जाऊ लागले. सासूने आम्हा दोघांत भांडण लावणे, नवऱ्याचे कान भरणे सुरू केले, त्यामुळे आमच्यातील तणाव वाढत गेला. पाच महिन्यांनंतर मला दिवस गेले, वाटलं आता सगळं नीट होईल, पण तसं न होता उलट मला मानसिक त्रास देणं सुरू केलं. मला आराम करू न देता जावेच्या बाळंतपणाच्या वेळी सर्व घरकाम माझ्या एकटीवर सोडले. सासऱ्याने दारू पिऊन रोज तमाशा करावा, सासूने टोमणे मारून घायाळ करावे, या गोष्टीला मी कंटाळले. अगदी आत्महत्येचा प्रयत्न केला, मात्र माझ्याच्याने धाडस झाले नाही. बंड करावे तर ‘मोठ्या घरातील मुलगी नांदणार नाही, उलट उर्मटपणे वागून निघून गेली’ अशा बदनामीला मी घाबरले, आणि माझं वैवाहिक आयुष्य टिकावं म्हणून निमूटपणे सगळं सहन करत गेले. मी गरोदर असताना पण थकव्यामुळे भांडी घासण्यास नकार दिला तर ‘घराबाहेर हो’ म्हणून सांगण्यात आलं. पण या वेळी नवऱ्याने मला साथ दिली. दरम्यानच्या भांडणात माझ्या आईवडिलांचा, त्यांची शिकवण आणि संस्काराचा, खानदानाचा यथासांग उद्धार केला, पण नवऱ्याकडे बघून मी शांत राहिले.


  सातव्या महिन्यात मी माहेरी आले, मला मुलगा झाला. बाळंपणानंतरही त्यांच्या वर्तणुकीत बदल झाला नाही. मुलाकडे दुर्लक्ष करणे, मला आराम करू न देणे, मुलाला हिसकावून मला हाकलून द्यायची भाषा करणे सुरूच होते. हे सर्व मी घरी सांगितल्यावर माझ्या वडिलांनी माझ्यासाठी स्वखर्चाने माझ्या मालकीचं घर मला बांधून दिलं.


  यानंतरही त्रास सुरू होता, मी अजून घराचं काम पूर्ण न झाल्याने मुंबईतच होते. मी घर सोडेना म्हणून शेवटी मला घरातून हुसकावून लावण्यात आलं. माझ्या मागोमाग नवराही आला. वाटलं आता सगळं सुरळीत होईल. माझ्या हक्काच्या घरात मी सुखाने संसार करीन, पण पुन्हाही हा विचार फोलच ठरला. सासूबाईने रडून कांगावा करून मुलगा घर सोडून गेला असं सांगायला सुरुवात केल्यामुळे प्रत्येक जण त्याला कॉल करून बडबडे. त्यातच त्याची मावशी, लहान भाऊ, शेजारी यांनी फोनवरून त्याला मानसिक दबावाखाली आणला. परिणामी, नवऱ्याने माझ्या आईवडिलांशी आणि माझ्याशी असभ्य वर्तन करायला सुरुवात केली. त्याला आम्ही वारंवार समजावलं, पण तो आमच्याशी भांडला आणि ज्या सासू-सासऱ्यांनी त्याला आई-बापापेक्षा जास्त मायेने सांभाळला त्यांच्याविषयी अश्लील भाषेत बोलून अखेर त्याने घर सोडले.


  वरील सर्व अपमानाच्या प्रसंगांत मी कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार नोंदवू शकत होते, पण नवऱ्याने दर वेळी सर्वांची अवहेलना सहन करून तो माझ्या बाजूनेच आहे, असे दाखवले. त्यालाही खूप मनस्ताप दिलेला, परंतु त्याने माझी मनधरणी केली आणि मी दोघांचा अपमान गिळून टाकला, कारण मला नवऱ्याला गमावायचं नव्हतं. मी शेवटपर्यंत माझा संसार टिकवण्यासाठी झटले, पण माझ्या गप्प बसण्यामुळे माझ्या सासरच्यांचा मुजोरपणा वाढत गेला, आणि परिणामी माझा संसार मोडला. नवरा स्वत:चा आणि माझा अपमान विसरून शेवटी त्यांच्यातच सामील झाला. ते जिंकले आणि मी हरले. आता मला पश्चात्ताप होतोय. मन विचारतंय, ‘अखेर चुकलं कोणं? आणि कुठे?’

Trending