आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आस्‍थांचे आकाश रुंदावणारी कविता

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंत:करणात अपार करुणा असलेला, पुस्तक आणि फेसबुकवरच्या फोटोवरून वाटावे, आयुष्यात वाळल्या पाचोळ्यावरसुद्धा पाय न ठेवलेला हा कवी ‘शतकांचे दबलेपण’ व्यक्त करतोय. ‘दगडी खांबांचे आकाश’ त्याच दबलेपणातून आलेल्या हुंकाराने व्यापले आहे...


सत्तरचे दशक हे महाराष्ट्राच्या इतिहासातील नव्याने सुरू झालेले विकासाचे पर्व. साधारणत: साठ बासष्ठच्या दरम्यान महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यांत वीज आली. प्राथमिक अन् माध्यमिक शिक्षण गावापर्यंत पोहचले. सर्वसामान्य जनतेत शिक्षणाविषयी आस्था वाढली. सरकारी होस्टेलमध्ये राहून ‘कमवा आणि शिका’ या बहुजन हिताय योजनांद्वारे बी.ए. बी.टी. एम.ए. पर्यंतचे शिक्षण घेऊन बहुजन समाजातील एक पिढी नोकरदार होऊन शहरात गेली. यातून खरे तर ग्रामीण मराठी साहित्याची चळवळ उदयाला आली असावी. 


सुरुवातीचे तिचे स्वरूप केवळ कृषी संस्कृतीचे उदात्तीकरण करणाऱ्या एका जात समूहाचे नव्हते, अन् नसावे. अण्णाभाऊ साठे, व्यंकटेश माडगुळकर, शंकरराव खरात या लेखकांनी कळत-नकळत गावाचे संपूर्ण अवकाश कवेत घेण्याचे, जे प्रयत्न केले होते, ते मराठीच्या भविष्यकालीन भाषिक अन् बहुविध जनसमूहांच्या स्वप्न आणि संघर्षाला प्रकाशात आणणारे असेच ठरले होते. मात्र, नंतरच्या नेतृत्वात लोकांचे हितसंबंध गुरफटल्याने तिच्या वैचारिकतेत ‘गांधीजींना अभिप्रेत असलेले गाव’ की ‘महात्मा फुलेंची शेतकऱ्यांविषयीची सर्वंकष भूमिका’ अशा स्वरूपाचे मतभेद होऊन ग्रामीण मराठी साहित्य चळवळ नंतरच्या काळात म्हणावी तेवढी फोफावू शकली नाही.


आपल्या सामाजिक-सांस्कृतिक पर्यावरणात जातींना अनन्यसाधारण महत्व आहे. गावांची रचनासुद्धा जाती अंतर्गत श्रेष्ठत्वानुसार.  मध्यवर्ती ठिकाणी जमीनदार पाटलांचे वाडे, सेवेशी सभोवताली गरीब कष्टकरी कुणबी अथवा दुय्यम गरीब मराठा समाजाची वस्ती, कोपऱ्यावर ज्ञानाची पूर्वापार मक्तेदारी असलेले जमीन मालक वतनदार, ब्राम्हणआळी, तिच्या आडोश्याला सोनार, महाजन वाणी, कोष्टी कासार, पलीकडे कधीतरी अार्थिक उलाढालीत महत्व असलेले राजे कुंभार, कुणब्यांच्या बगलेत आणि गावाच्या एका कडेला चर्मकार समाज अन् गावाच्या परिघावर गुरव, सुतार, लोहार, धनगरवाडा, नाभिक, परीट समाज, कडसरीला रामोशी, कोपऱ्यावर तांबोळी मुलाणी, शिकलगार यांचा खाटिक मुहल्ला, कडेलाच कुठं गरजेसाठी बुरुडांची घरं. वेशीच्या बाहेर महार आणि मातंग समाजाची उपेक्षित घरं. ओ.बी.सी. बी.सी. मिळून तयार होतो गावाचा ‘पाचवा पाय’.


अध्यात्मिक लोकशाहीचा गजर करणाऱ्या लेकुरवाळ्या विठुरायाचे चित्र याहून वेगळे नव्हते. ज्या कृषी संस्कृतीच्या आड जमीनदारीचे आणि सरंजाम मानसिकतेचे आपण उदात्तीकरण करतो, ती शेती जरी मूठभर साधन अन् श्रीमंत शेतकऱ्याकडे असली तरी, तिला पूरक साधनं उपलब्ध करून देणारी यंत्रणा, तिची संपूर्ण निगराणी, पेरणी, भांगलन, टोकण काढणी अन् मळणीसाठी लागणारी अवजारे आणि श्रम पुरवणारे गरीब कुणबी सर्व ओबीसी अन् शेतमजुरांत अस्पृश्य समाजातील तीनचार जाती. या सर्वांच्या सामुदायिक श्रमातून आकाराला आलेली आपली ग्रामीण शेती. गावातील मागास अन् इतर मागास जनसमूहांसाठी प्रत्येकाला एक पूर्वापार व्यवसाय आहे. हे जातीनिहाय धंदे कोणालाही सोडता येत नाहीत. उपजीविकेसाठी काहींकडे नावाला तुटपुंजी शेती असते. या उपर सुगीला एका किरकोळ मिळकतीचे आमिष ज्याला आपण म्हणतो, ‘बलुतं’. हंगामात पाटीवर पोतं टाकून हे वर्षभर बिनबोभाट राबणारे बलुतेदार पायली दोन पायली धान्यासाठी गाव शिवारातील शेतात विनम्र होऊन अजूनही फिरत असतात, कुठे ना कुठे. या सर्वांनी पारंपारिक व्यवसायातून काही कौशल्य हासिल केलेले आहे. कुंभार  माती कामासोबत चित्रकलेची आवड, सुतारांचे काष्ठशिल्पात काही कसब, नाभिकात हजरजबाबीपणा सोबत नाटक -नकलांत आवड, लोहार-सुतार समाजात भजनी मंडळ तसेच नाटकात आवड, धनगरांच्या ओव्या गाजी अन् ढोल, मातंगात कुस्तीसोबत हलगी अन् दिमडी, याशिवाय प्रत्येकाची वेगळी परिभाषा. प्रत्येकाच्या वेगळ्या चालीरीती.


या सर्वांनी महाराष्ट्रातील स्थानिक देव-देवतांची सांस्कृतिक विरासत जिवंत ठेवली. शतकानुशतके आपल्या खांद्यावरून पंढरीची वारी वाहिली. मात्र हेटाळणी अन् अवहेलनेशिवाय त्यांच्या कलाकौशल्यांचे फारसे कौतुक झाले नाही. वाट्याला आले फक्त शतकांचे दबलेपण. दिवसांची तोडमिळवणी करताना होणारी ससेहोलपट. घरातील गुलाम बायकांसारखे प्रतिष्ठा नाकारलेले त्यांचे श्रम. अभिमानाने त्यांनी आपल्या जातीचे उच्चारण केलेले नाही. या सर्वांच्या अनुभवाचे संचित म्हणावे, तेवढे मराठी साहित्यात प्रकर्षाने कुठे दिसलेले नाही. लिहिण्याने प्रश्न सुटत नसले, तरी ते ऐरणीवर येतात, हे एक आणि दुसरे, त्यांच्या जगण्यातील परिभाषा अनुभवातील विविधता जोवर अभिव्यक्त होत नाही, तोवर भाषिक स्तरांवर मराठीचा विकास म्हणावा तेवढा, संपन्न आणि समृद्धसुद्धा होण्याची शक्यता नाही. 


पांडुरंग सुतारांचा “दगडी खांबांचे आकाश’ हा कवितासंग्रह वाचताना पुढील सर्व गोष्टींची आठवण होते. त्यांच्या सोबत साधलेल्या संवादातून हे शतकांचे दबलेपण मला प्रथमच जाणवलं. अंत:करणात अपार करुणा असलेला, पुस्तक अन् फेसबुकवरील त्यांच्या फोटोवरून अगदी सालस वाटणाऱ्या या पापभिरू माणसाने त्याच्या उभ्या आयुष्यात वाळल्या पाचोळ्यावरसुद्धा कधी पाय ठेवला नसावा. सहज बोलताना ते म्हणाले, ‘आजवर गावात तसा दबूनच वावरलोय मी, आयुष्यात पहिल्यांदाच एवढ्या मनमोकळेपणाने आपणाशी दीर्घ बोलतोय”. 


मूलतः साहित्य ही गोष्टच बहिर्मुख. लिखाण म्हणजे सांगणं, बोलणं, प्रकट होणं. आणि या माणसाचा वयाच्या साठीपर्यंत फारसा कुणाशी संपर्क नाही आलेला. पाचवीपासूनचे सर्व शिक्षण गावापासून दूर होस्टेलमध्ये. नोकरीच्या निमित्ताने गाव सुटलं ते कायमचंच. नशीब आमच्या पिढीच्या ‘उन्ह उतरणीला’ लोकांशी जोडणारी ही प्रसारमाध्यमं तरी उपलब्ध झालीत. 


साठच्या दशकात शब्दांच्या दुनियेत आलेल्या पांडुरंग सुतारांच्या कविता म्हणजे ‘अास्थांचे आख्यान’. कवितेसाठी कोणत्या अमूर्त वा अबोध अनुभूती अथवा व्यक्तिकेंद्री दु:खांचा त्यांना पाठपुरावा करावा लागत नाही, त्यांच्यासाठी कविता ही सकाळपासून शेतात राबणाऱ्या जीवाला, झाडाच्या सावलीत चटणी भाकर खाताना दिलासा म्हणून मातीच्या घागरीतील थंडगार पाणी असते. मंदिराच्या पायऱ्या चढणाऱ्या म्हातारीच्या पाठीवर फिरणाऱ्या अदृश्य हातांचा स्पर्श असते. आदल्या दिवशी उपाशी पोटाने डोंगरातील जमवलेली जांभळं-करवंद दुपारी शहरात विकणाऱ्या पोराच्या पोटातील भूक असते.. दुष्काळात काम करणाऱ्या ओल्या बाळांतिणीच्या सावलीत चिरगुटात टांगून ठेवलेलं, धूळभरलं इवलंसं रूप, चुकलेली गुरं शोधणाऱ्या अनवाणी मुलाच्या आर्त हाकेतील ‘कासाविसी’, प्रार्थनांचे सुरांनी भरलेलं आसमंत, सांजेला श्रमजीवींची घरी परतण्याची ओढ असते, कविता.


सर्वसामान्य माणसाविषयीचे प्रेम व्यक्त करणाऱ्या अशा नानाविध दृश्यात्मक समर्थ प्रतिमाच कवितेचा आशय बनून जातात. सर्वांभूती प्रेम करणारे हे कवी व्यक्तिगत जीवनाविषयी मात्र अभावानेच बोलताना दिसतात. ते म्हणतात ‘काय सांगायचं स्वत:विषयी? सांगून का ते सरणार आहे?’ लहानपणातील त्यांच जग म्हणजे आई ,मित्र आणि कवितेसाठी अनामिक शब्दांची ओढ. खरंतर हीच असते, अव्यक्त प्रेमाची तऱ्हा. प्रेमात पडलेली व्यक्तीच शब्द शोधात असते. याला धर्मसंस्थापक, संत, शास्त्रज्ञ, प्रेमी अथवा तत्ववेत्ता अपवाद नाहीत, तसे फुलपाखरू, पशूपक्षी हे सजीव चराचरही अपवाद नाही. संतांच्या कुळातील ही अंतकरणाला लागलेली आगीची घालमेल, त्यांच्या प्रत्येक कवितेतून जाणवते. कवीची आंतरिक आत्मियता कष्ट करणाऱ्या  सामान्य माणसांच्या उन्नत आशाअकांक्षाशी निगडीत असली तरीही, कवीच्या सृजनशीलतेवर प्रभुत्व गाजवणारे प्रस्थापित साहित्य स्थितीशील, नियतीला शरण जाणारे असल्यानेच बहुदा जीवनाविषयीचे गतिमान वास्तव समजून न घेता काल्पनिक अद्भुतरम्य पलायनवादाकडे  त्याचा कल दिसत आहे. म्हणूनही संग्रहातील बहुतांश कविता केवळ भावनिक मानवतावादी वाटतात. आजच्या प्रश्नांच्या समोर जाण्याची त्यांच्या कवितेत अजून तरी म्हणावी, तेवढी रास्त क्षमता दिसत नाही. कवीची ही विकल अवस्था व्यक्तिगत आहे, असं नव्हे. सर्वंकष बदलाच्या जथ्यात उभं राहण्यासाठीसुद्धा समूहाच्या मोर्च्यात ‘आपले’ म्हणून कोणीतरी असायला हवे असते. सांप्रत समूहाचा आवाज थोडा क्षीण आहे, तरीही या ‘दिक्काल धुक्याच्या वेळेत’ पांडुरंग सुतार अन् बालाजी सुतारांसारखे एकांडे शिलेदार आवाज देत आहेत, ही उज्वल उद्यासाठी खचितच आशादायी गोष्ट आहे. 


पाब्लो नेरुदांची ‘लोक’ नावाची जगविख्यात कविता सुतारसरांच्या कविता वाचताना सातत्याने मला अाठवत होती. अथवा तो असेल शवपेटी बनवणारा सुतार . जो प्रेतयात्रेत सर्वांच्या शेवटी विमनस्कपणे चालत आहे. 
असा जो एक अनामिक 
ज्याला स्वत:चे नावही नाही...
मला वाटते, नजीकच्या काळात साहित्य अन् सामाजिक मुक्तीच्या प्रवाहात या उपेक्षित जनसमूहाचा आपला म्हणून एक नक्कीच आवाज असेल...


- आनंद विंगकर
anandwingkar533@gmail.com

लेखकाचा संपर्क : ९८२३१५५७६८

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, आणखी फोटो...

 

बातम्या आणखी आहेत...