आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्मक्लेशाचे अवतरण...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कादंबरी, आत्मकथन, प्रवासवर्णन, रिपोर्ताज, कविता आणि सिनेमाची पटकथा अशा नानाविध रूपबंधातून साकारलेली सईद मिर्झालिखित ही अजोड कलाकृती आहे. ती वाचताना आपण खरोखर समृद्ध होत जातो. विशिष्ट धर्माविषयीचे पूर्वापार संस्कारातून जोपासलेले गैरसमज गळून पडतात. लेखकाइतकीच कष्ट करणाऱ्या दुर्लक्षित माणसाविषयी आपली आस्था वाढत जाते... 


आणीबाणी नंतर सुरू झालेल्या ‘समांतर सिनेमा’ चळवळीच्या दुसऱ्या पिढीतील एक प्रसिद्ध सिनेमा दिग्दर्शक सईद अख्तर मिर्झा. मिर्झांच्या सिनेमातील जग फुटपाथवर राहणारा बेघर भिकारी, अकुशल तुटपुंज्या बिदागीत श्रम करणारा मजूर, फेरीवाला, लोकलमधे गाणं गाणारे आंधळे -पांगळे- लंगडे, पत्त्यावर जुगार खेळणारी बिन आयाबापांची अनाथ लहान-लहान पोरं, वेश्यांचे दलाल अन् पोलिसांचे खबरे अशा सर्व उपेक्षितांचे चित्रण करणारे. आपल्या लिखाणात अन् वागण्यात श्रम करणाऱ्यांशी आस्था बाळगणारे सईद मिर्झा एक सच्चे इन्सान म्हणूनही ख्यातनाम आहेत.


 ‘अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यो आता है’ हा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतरच्या एका दुपारी कुलाबा परिसरातल्या कुठल्याशा एका इराणी हॉटेलात प्रसिद्ध दिवंगत कवी मनोहर वाकोडे, भारत सातपुते सोबतीला परिवर्तनवादी साहित्य-सांस्कृतिक-राजकीय घडामोडींशी प्रत्यक्ष जैव संबंध असलेले सुबोध मोरे अन् उमेदीच्या वर्षात सगळं जग समजावून घेण्याची जिज्ञासा असलेला मी सईद मिर्झांशी संवाद करीत होतो. एक साधासा लखनवी सफेद कुर्ता, खाली पांढराशुभ्र पायजमा अन् पायात मोजडीसारखे चामड्याचे बूट असा त्यांचा पेहराव. पानीकम चहा अन् सिगारेट पिताना चिरूट ओढणाऱ्या बंडखोर गव्हेराची यावी आठवण, असा त्यांचा हसमुख चेहरा. ते स्वतः ज्यांचा ‘बुद्धिजीवी उच्च मध्यमवर्ग’ असा प्रस्तुत "लोकशाहीवादी अम्मीस... दीर्घपत्र' या कादंबरीवजा आत्मकथनात उल्लेख करतात, त्या ‘एलिट वर्गाचा’ कसलाही अाविर्भाव नसलेला साधासुधा हा उत्तर हिंदुस्तानी राजबिंडा गोरा माणूस मी जवळून समजून घेत होतो.


व्यक्त होण्याच्या अनेकविविध उत्क्रांत रूपबंधाने तयार झालेल्या, या संहितेला कुठल्या एका विशिष्ट साहित्यप्रकारात बसवणे सहज सोपी गोष्ट नाहीय. ‘लिव्हिंग टू टेल द टेल’ या आत्मकथनासारखीच "लोकशाहीवादी अम्मी'ला लिहिलेल्या या दीर्घ पत्राची सुरुवात आहे. पुस्तकाच्या शीर्षकात भूतकाळात जमा झालेले ‘आई’ हे पात्र केंद्रीय असले तरीही यात  मिर्झा अम्मीसोबत चर्चिलेल्या मुद्यांना वर्तमानाचे कसे कंगोरे आहेत, आपण जपलेल्या तत्त्वांना कसे तडे गेले आहेत, हे दाखवण्याचे काम करतात. आईच्या मृत्यूसमयी आईसोबत आपण नव्हतो, या अपराधी भावनेतूनच मिर्झा दिवंगत आईशी अक्षरातून संवाद साधतात, अन् हीच या पुस्तकाच्या निर्मितीमागील प्रबळ भावना होते.


प्रस्तुत पुस्तकाची सुरुवात संस्कारशील शरीफ मुलासारखीच ‘सलाम अलैकुम अम्मी’ या शब्दाने होते. ‘उद्देशिका’ या अनुबंधित रचनेखाली लिहिलेल्या, या दीर्घ पत्रात आईच्या अाकस्मिकपणे निघून जाण्याने झालेल्या एका क्षणीच्या अात्यंतिक भावनावेगी दु:खाला अधिक समजूतदार अन् शहाणपणा आलेला जाणवतो. 


अापल्या आईवडिलांच्या प्रथम भेटीची आणि नंतरच्या वृद्धिंगत होणाऱ्या प्रेमाची कथा सांगत असताना विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या सामाजिक, राजकीय, अन् सांस्कृतिक अशा अलिखित फाळणीपूर्व भारतीय इतिहासाचाही मिर्झा शोध घेतात. त्यातून आपल्या असं लक्षात येतं की, तिसरे ते बाराव्या शतकातील इराण, इराक, अफगाणिस्तान इथपासून दक्षिण आंध्र कर्नाटक अगदी केरळापर्यंतच्या अफाट भूभागवर पसरलेल्या भारतीय उपखंडावर एक प्रगत संस्कृती नांदत होती. मध्यपूर्वेतील देशांत तर मानवी इतिहासातील मोठा देदीप्यमान असा हा काळ समजला जात होता. शेकडो कवी, विद्वान,गूढवादाचे अभ्यासक आदींनी या काळात मोठं मोलाचं योगदान दिलं होत. युरोपात वैज्ञानिक युग येण्यापूर्वीच पौर्वात्य देशात अशा प्रागतिक विचारांची अन् शोधांची सुरुवात झालेली होती.  


 सईद मिर्झांच्या मते, प्रेमाविषयीच्या धारणा जरी पारंपरिक असल्या, तरीही व्यापक सार्वत्रिक कौटुंबिक अनुभवांचा त्यांना ठोस आधार असतो. ते म्हणतात, विशिष्ट स्त्रीपुरुषाने जीवनप्रवासात एकमेकांच्या सोबतीने किती अंतर कापले, यावरून त्यांच्या प्रेमाचे मोजमाप व्हावे. सुखदु:खाच्या अशा दीर्घ प्रवासात सोबत करणाऱ्या साथीदारामुळेच वैवाहिक जीवन अधिक संपन्न होत असते.  क्वेट्टासारख्या सरंजामी वातावरणात वाढलेल्या, वयात येण्याआधीच बुरखा वापरणाऱ्या जहाँआराचा मुंबईसारख्या अाधुनिक शहरापर्यंतच्या आपल्या पतीसोबतच्या प्रवासात किती अामूलाग्र बदल होत गेला, याचा वृत्तांत छोट्यामोठ्या आठवणीतून ते सांगतात. नुसरत बेग अन् जहाँआरा यांच्या वैवाहिक जीवनातील तपशील तसे लेखक मिर्झांकडे अल्पसेच, तरीही प्रदीर्घकाळ एकत्रित पतीपत्नीच्या मैत्रीपूर्ण पर्वाचा ते ‘बुनियाद ः द फाउंडेशन’. असा यथोचित गौरव करतात. कसलाही आधार वा ओळखीचे कोणी नसताना, चार मुले अन् शहाणे समंजस प्रगल्भ पती-पत्नी मुंबईसारख्या दूर परक्या शहरात एक बेहतर जीवन जगतात,  ‘वक्त’ आणि ‘नया दौर’ सिनेमाच्या पटकथा लिहून ते नावलौकिकास येतात. आपल्या मुलांनाही धर्मजातीच्या पलीकडचे मानवीय जगणे शिकवतात. या संस्कारांतूनच सईद मिर्झा सारखा संवेदनशील सामान्य माणसांचा पक्षधर दिग्दर्शक हिंदी चित्रपटसृष्टीला मिळतो.
पदवीनंतर स्वतंत्र जीवन जगणाऱ्या नवपरिणीत जेनिफर अन् सईद मिर्झांचे जगणे तसे कष्टप्रदच. काही काळ सईदने जाहिरात कंपनीत नोकरी केलेेली. सत्तर-ऐंशीच्या दशकात ते प्रागतिक विचारसरणीने प्रभावित झालेले, तोवर लोकशाही धर्मनिरपेक्षता अंगीकारणारे देशातील सामाजिक-सांस्कृतिक वातावरण धर्मांध विचारसरणीने दूषित होत आलेलं. अशा एका निर्णायक वळणावर पत्नीच्या संमतीने त्यांनी ‘एफटीआयआय’मध्ये  प्रवेश घेतला आणि एका नवीन पर्वाला सुरुवात झाली. या काळात जगभरातील बदललेले सिनेमे त्यांनी पाहिले. त्यांच्या लक्षात आले, कथनात्मकता अथवा कथानक या गोष्टीच चित्रपटाच्या केंद्रवर्ती नसतात, तर त्या बाह्यपरिघावरील असतात. त्यानंतर तुटपुंज्या बजेटमधील त्यांच्या अनेक चित्रपटांनी सातत्याने अस्तित्व टिकवून ठेवणाऱ्या मानवी ऊर्जेचा शोध घेतला.


 ‘नसीम’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट. सहा डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशीद  पाडल्यानंतर देशातील सांप्रदायिक सद‌्भावनेचा माहोल दूषित झाला. हजारो निरपराध लोक मारले गेले. मुंबईच्या बॉम्बस्फोटात रोजीरोटीच्या शोधार्थ बाहेर पडलेल्या शेकडो लोकांना हकनाक मृत्यूला सामोरे जावे लागले. देशभरातील संवेदनशील बुद्धिजीवींना एका सामूहिक उदासीनतेनं ग्रासले. मुंबईवर  ज्याने  दिलोजान  प्रेम  केलं त्या मिर्झांसारख्या असंख्य अल्पसंख्याक  बांधवांना असुरक्षिततेने घेरले. फेब्रुवारी ९३ मधल्या एका उदास रात्री मिर्झा आपल्या दिवंगत अम्मीच्या कबरीवर अश्रू ढाळीत म्हणाले, ‘अम्मी हे शहर तुझ्यायोग्य राहिलेलं नाही...  पुढे ते असंही म्हणाले, मुस्लिमांची ईद, हिंदूंची दिवाळी आणि ख्रिश्चनांचा ख्रिसमस सर्व सण सारख्याच उत्कटतेने साजरी करणारी अशी एक स्त्री इथे राहत होती. तिने कुठल्याही धर्मीयांच्या भावना कधीच दुखावलेल्या नव्हत्या.’ 
एका क्षणी जगण्याचा केवळ उबग आलेले मिर्झा मन:शांतीसाठी प्रवासाला निघतात. या प्रवासाचा त्यांचा उद्देश असतो, ‘सर्वसामान्य जनतेशी संवाद.’ त्यांचा हा लोकविलक्षण अन् मनाला उल्हसित करण्याचा अनुभव मीसुद्धा ‘माणदेश दरसाल दुष्काळ’ या पुस्तक निर्मितीच्या काळात घेतला आहे. इथे मिर्झा ‘स्टड्स टर्केल’या अमेरिकन लेखकाचा उल्लेख करतात. खरे पाहता कोणत्याही देशाविषयी, जगण्याच्या आदिम धडपडीविषयी सामान्य माणसेच प्रातिनिधिक प्रवक्त्यासारखे बोलतात. जे आपल्या जगण्यातील आशा अधिक प्रबळ करतात. मिर्झांनी घेतलेल्या मुलाखती संवेदनशील वाचकाने वाचायलाच हव्या, अशा ठरतात. 


पुस्तकाच्या शेवटी ‘द फर्स्ट लेडी’ आणि ‘दहशतवादी’ ही त्यांनी स्वतः लिहिलेली पाच अंकी  चित्रपट संहिता आहे. अमेरिकेची पार्श्वभूमी असलेल्या संहितेचा काळ सन २००२ आणि नंतरही पुढचा. एक अफगाण प्रोफेसर ज्याच्या पत्नी अन् मुलाला तालिबानने मारलेय अाणि जगण्यासाठी म्हणून तो अमेरिकेत आलाय. पण इथे केवळ त्याचेच नव्हे, तर अमेरिकेला परकीय असलेल्या इतर देशातील सर्व लोकांचे जगणे कमालीचे असुरक्षित, अपमानित झाले आहे. या संशयवादी, गुन्हेगारीला प्रवृत्त करणाऱ्या वातावरणातसुद्धा उपेक्षित सर्व एकमेकाला आधार देऊन भातृभाव वाढवत राहतात. म्हणाल तर ही संहिता नाटक म्हणूनही सादर करता येईल, अशी आहे. कादंबरी, आत्मकथन, प्रवास वर्णन, रिपोर्ताज, कविता आणि सिनेमाची पटकथा अशा नानाविध रूपबंधातून साकारलेली ही अजोड कलाकृती वाचताना आपण खरोखर समृद्ध होतो. विशिष्ट धर्माविषयीचे पूर्वापार संस्कारातून जोपासलेले गैरसमज गळून पडतात. दुर्धर परस्थितीशी चिरंतन संघर्ष करीत टिकून राहणारी, मानवीय जिजीविषा आपल्यात वाढीला लागते.  ‘रोहन प्रकाशन’च्या मिलिंद चंपानेरकर यांनी मूळ इंग्रजी पुस्तकाचा अप्रतिम अनुवाद केल्यामुळेच सर्वोत्कृष्ट अनुवादासाठीचा साहित्य अकादमीचा पुरस्कार मागेच प्राप्त झाला आहे. मराठीत धार्मिक संशयवादी वातावरणावर तसंही अभावानेच कोणी लिहिले आहे. अशा प्रसंगी एका बुद्धिजीवी मुस्लिमाचे आपल्या देशाविषयीचे मनोगत समजून घ्यायला अभिव्यक्तीच्या अनुषंगाने ही मुक्त रचनेची कलाकृती वाचायलाच हवी अशी आहे. आजच्या दुभंगलेल्या काळात या साहित्यकृतीचे मोल अनन्यसाधारण असे आहे...

 

- आनंद विंगकर
anandwingkar533@gmail.com
लेखकाचा संपर्क : ९८२३१५५७६८

बातम्या आणखी आहेत...