नि:शब्द कल्लोळ! / नि:शब्द कल्लोळ!

आनंद विंगकर

Jul 29,2018 10:08:00 AM IST

एका वाचनात समजावी अशी माया पंडितांची कविता साधी आणि सोपी नक्कीच नाही. परत ती ऐकावी लागते, वाचावी लागते. तिच्याशी समरस व्हावे लागते, तेव्हाच ती आपल्या काळजाचा ठाव घेते. या संग्रहातील मला सगळ्याच कविता समजल्यात, असा मी दावा करणार नाही. काही ज्या कळल्या म्हणून आवडल्यात, अशा कवितांचा हा आस्थेवाईक उहापोह आहे...

थोर विदुषी, निर्भिड कार्यकर्ती, बुद्धिमान प्राध्यापक म्हणून माया पंडित ख्यातनाम आहेतच. आजवर शिवाजी विद्याापिठात इंग्रजीच्या प्राध्यापक म्हणूनही त्या विद्यार्थ्यांमधे लोकप्रिय होत्या. गेल्या काही वर्षापासून हैद्राबाद विद्यापीठात परदेशी भाषा केंद्रात त्या कार्यरत आहेत. मागील वर्षी बेळगाव येथे संपन्न झालेल्या ‘अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलनाचे’ अध्यक्षपद त्यांनी भूषविले. स्त्रियांच्या प्रश्नांवर काम करणाऱ्या संघटनात सक्रीय सहभाग, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरील अभ्यास, चळवळीतील कार्यकर्त्यांच्या प्रबोधनाचे त्यांचे निरालस काम दलित साहित्याच्या खंद्या समर्थक, कष्टकऱ्यांच्या चळवळीविषयी त्यांची अपार आस्था हे सारे सर्वश्रुत आहेच. बोलताना रोखठोक अन् वागताना फणसातील गरांसारख्या रसाळ असे त्यांचे व्यक्तिमत्वही मशहूर आहे.
इंग्रजी अन् मराठी भाषेमधील त्यांचे प्रभुत्व बिनतोड अन् वादातित आहे.

महात्मा फुलेंचा ‘गुलामगिरी’ हा ग्रंथ, सानियांची ‘त्यानंतर’ आण्णाभाऊ साठेंची ‘फकिरा’ ही कादंबरी, मुक्ता दीक्षितांचे ‘हुंडा’, दत्ता भगतांचे ‘वाटा पळवाटा’ गो.पु. देशपांडेंचे ‘आर्य चाणक्य’, संजय पवारांचे ‘कोण म्हणतो टक्का दिला?’ अशी प्रसिद्ध नाटकं, त्यांनी आजवर मराठीतून इंग्रजीत अनुवादित केलीत. बेबीताई कांबळे आणि उर्मिला पवार यांचे अनुक्रमे ‘आमचं हे जीणं’ अणि ‘आयदान’ हे आत्मचरित्र, प्रज्ञा पवार यांच्या ‘अफवा खरी ठरावी म्हणून’ या कथा संग्रहातील काही कथांचाही त्यांनी अनुवाद केलेला आहे. ही झाली मराठीतून इंग्रजीत केलेली भाषांतरे. पण ब्रेख्तचे एक नाटकही त्यांनी मराठीत आणले. ज्याचे नाव ‘ढुशिंगराव आणि त्याचा माणूस’. कोल्हापूरच्या ‘प्रत्यय’ने त्याचे काही प्रयोग काही केले आहेत. याशिवाय दारिओ फोच्या नाटकाचे ‘एका राजकीय कैद्याचा मृत्यू’ हे भाषांतर, असे हे मराठीतील त्यांचे काही अनुवादाशी निगडित योगदान आहे. ‘अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट’ या माझ्या कादंबरीवरची त्यांची विस्तृत समीक्षाही प्रसिद्ध आहे.

त्यांचा कवितेचा प्रवास मात्र उशिरा लक्षात आलेली गोष्ट आहे. लिहिणारा प्रथम कविता, नंतर कथा नाटक अन् कादंबरी किंवा समीक्षेवरचे गंभीर लिखाण करतो. मराठी साहित्यात खूप कमी प्रतिभाव लोक ज्यांना त्यांच्या वार्ध्यक्यापर्यत कवितेनं सोबत केलेली आहे. कदाचित त्या खूप वर्षांपासून कविता लिहीत असतील. या आधी प्रसिद्ध केल्या नसल्यानेच वाचकांपर्यंत त्या उशीरा पोहचत आहेत.
आजवरच्या त्यांच्या वैचारिक, समीक्षात्मक, आणि इतर कवीलेखकांच्या पुस्तकांच्या अनुवादात, संस्कारातून आलेली’ स्व-भाषा त्यांनी हरवली, तर नाहीच. पण जगभरातील पुस्तकांच्या वाचनातून ती अधिक प्रगल्भ केल्याचा प्रत्यय त्यांच्या कविता वाचताना येतो. त्यांच्या भाषेवरील प्रभाव संत आणि पंडिती साहित्याचा जसा आहे, तितकाच तो घरंदाज अन् रोजंदार बायकांच्या चुलीपुढील वावरातील भाषेचासुद्धा आहे. रूढार्थाने माया पंडितांच्या कवितेवर पूर्वाश्रमीच्या कवीकवयित्रींचा प्रभाव दिसत नाही. पण त्यांच्या कवितेचा एकूण प्रवाह मात्र संत साहित्यातील जनाबाई, पहिली आधुनिक कवयित्री इंदिरा संत, अन् अनुराधा पाटील यांनी निर्माण केलेल्या पाऊलवाटेने आपला स्वतंत्र रस्ता तयार करताना दिसतो. आत्मरत जोडीदाराशी एक दीर्घ अखंडित संवाद, कधी स्वगत, तर कधी समदु:खी स्त्रियांशी बोलत असताना त्या दिसतात.

"भीषण कल्लोळांचे आवाज' या "तल्खली' संग्रहातल्या पहिल्याच कवितेत स्त्रीची अवस्था जणू एखाद्या सराईत गुन्हेगाराने खूनसदृश्य केलेली हत्या, जिचा अखेरचा जबाबसुद्धा अडखळता, मनात साठलेली कटुता मुखातून स्पष्ट बाहेर न पडणारी’, ‘फाशीच्या टोकाला घसटून यावेत केस’ अशी.
हा सराईत गुन्हेगार कोणीही पृथ्वीच्या पाठीवरील अवघा पुरूष, अगदी मीसुद्धा. कसले असतात, आपले स्त्री सोबतचे संबध? अश्मयुगीन, अहंकाराने नेहमीचे ताणलेले. तिचे मूक आकांत, नि:शब्द आर्त हाका, आपल्या जाणिवेच्या निर्वात प्रदेशात पोहोचतही नाहीत, कित्येकदा.
मला ही कविता एकावेळी पुरूषसत्ताक मानसिकतेविरोधाला मूक आकांत जशी वाटते. तशीच निरंकुश अधिसत्तेत तोंड दाबून मुकाट्याने मार सहन करणाऱ्या सामान्य माणसाच्या नि:शब्द कल्लोळाचे समपर्क प्रतीक म्हणूनही वाटते. जमेची गोष्ट एवढीच की त्यांच्या अमानुष अमानवीय अत्याचार अन् शोषणातही आपण जीवंत कसे, याचेच कौतुक अधिक.
शेतीचा शेध लागला, खाजगी मालमत्ता निर्माण झाली. अगदी तेव्हापासून आजवरच्या आपल्या या मानवी इतिहासात खरेच कोणी साधला स्वार्थ, गळ्यात दोर बांधून, आपल्या कूकृत्यात कोणाला बळजबरीने केले साथीदार? यात कुणाची होते, केवळ आयुष्यभराची फरपट? कोणी निर्माण केली महायुद्धं? ‘ताळमेळ’ कविता वाचताना, हे सगळे प्रश्न मी स्वतःला विचारतो. सर्वार्थाने उध्वस्त झाल्यानंतरही आपल्या भेगाळलेल्या वैराणतेत नेहमीच स्त्रियांनी स्वतःचं प्रताडित जगणं विसरून ओलाव्याचे कारूण्य ओतलेलं, ज्यातून परत हे जग बहरलं खरंतर.

पुरूषार्थाचे पोरखेळ/तुम्ही पदरात बांधून घेता/आणि घालत जाता/पृथ्वीवर/इतिहासाचा ताळमेळ...
मायाची कविता समजून घेताना अशी दमछाक करावी लागते, जीवाची. त्याशिवाय पर्याय नाही. खोटं नाही, जगातील सर्वश्रेष्ठ नाटककार शेक्सपियर. पहिल्या वर्षी ‘किंग लिअर’ अन्् ‘हॅम्लेट’ ही त्यांची दोन नाटकं, हेराल्ड पिंटरचे ‘केअर टेकर’, बर्नार्ड शॉ यांचे ‘सेंट जोन’ आणि एक दीर्घ कविता ‘वेस्ट लँड’ तेवढ्या अनमोल सामग्रीसाठी बँकेत असताना एम.ए.ला मी प्रवेश घेतलेला. थोडक्यात काय, तर कविता समजावून घेण्यासाठी एक नशा लागते दीर्घ अंमलाची.
आता एक सहज समजणारी अन् तितकीच आवडणारी कविताः ‘या काळ्या कालिंदीच्या काठी’.
पाणी आणि बाईचं तसं आदिम नातं. नदी तर सखी. तिच्याआत सगळी दु:ख तरंगतात स्त्रीची. तिचा केवळ स्पर्श अस्तित्वाच्या निचऱ्याची सुरुवात ठरतो. वर आसमंतात वाहणार वारं आणि क्षितिजापर्यांत तिचं वहात जाणं. नदीजवळच ती मांडते, आपल्या अंतरातले गाऱ्हाणे. कालिंदीला दंतकथीय अन् वास्तवाचासुद्धा एक पदर आहेच. काशीला वृद्ध आणि विधवा बायका पाठवल्या जातात म्हणे. गावापासून ती तीर्थक्षेत्रापर्यंतची आपली देवळं आणि मंदिरं या परित्यक्ता बायकांचा निवारा(!) आयुष्यभराच्या हालआपेष्टा, कष्ट, मानअपमान डोळ्यांसमोरची भ्रूणहत्या, केळात वरूटा घालून ढकलेलं विहरीत, नात्यांची बंधनं तोडून केलेली जबरदस्ती, आकांताची मुस्कटदाबी, अन् वार्ध्यक्यात आलेलं परावलंबित्व आपल्या सांस्कृतिक विरासतीने स्त्रीची अशी वासलात लावलेली. अन् कुठलाच पाश न उरल्याने पावलं कालिंदीकडे वळलेली...

साऱ्याच येतात इथे/आलीच आहेस तर ठेव उतरून/हृदयातले सारे सल/हरेक हाडातली चरचरती कळ/या हाडातील ‘चरचरत्या’ कळेचा शरीराच्या ठणकेशी जसा संबंध तसाच तो जाळाशीही. चरचर जळतं मांद. आयुष्याची धग तहानेशी जोडलेली. जवळपास प्रत्येकीच हेच आहे, निर्वाणीचं ठिकाण. या डोहाशी येणारी तूच काही पहिली, ना शेवटची. इथे आहेत तुझी आजी-पणजी गणगोतातील सगळी नाती. घे मूकपणे जाणून त्यांच्या अस्थींच्या/रांगोळ्यातील उदासी/आता कर मोकळी श्वासांची पोकळी... माया इथे आपल्या लेकीशी बोलतेय. अन् बाईच्या वाताहतीची सगळा इतिहास मांडते आहे.
स्त्रीमुक्तीची आपण कितीही चर्चा करोत. बदलो ही समाजव्यवस्था, पण स्त्रीच्या कष्टाला तिच्या, दुःखाला अंत नाही. मला वाटते, समाजवादी क्युबातील एक फिल्म आहे, ‘अ पोर्टेट ऑफ टेरेसा.’ त्याच्यातही समाजवादी व्यवस्थेत बायकांच्या शोषणसंदर्भात मांडणी केलेली आहेच. जीवनाविषयी आशावादी असलेला मी, माणूस म्हणून मायाची, अन् आपल्या सर्वांचीही स्वप्नं आहेत, अशा मानवी समाजाची ज्यात स्त्रीपुरूष समान असेल. पण तुर्तास तरी तो ‘युटोपिया'च म्हणावा लागेल. जरी ती कोणाच्या विरोधात बोलत नसली, तरीही मायाच्या या कवितेनं मी अंतर्बाह्य विदीर्ण अन् हताश होतो आहे.
‘म्हटलास’ या छोट्या कवितेत नोकरी करणारी मध्यमवर्गीय स्त्रीसुद्धा पुरूषाची कशी गुलाम आहे, याचाच प्रत्यय येतो. नवऱ्याच्या मर्जीनुसार वागताना तिचा पगार, तिची व्यक्तिगत स्वप्नं उध्वस्त होतात, इतकंच नाही, त्याचा बदफैली, जुगार मोडलेला डाव निमूटपणे पहाणे अन् हे सगळं सोसण्याशिवायचा तिच्याकडे दुसरा पर्याय नसतो. "दिवसांच्या बाहेर जाते/ओलांडते खिन्न टेकड्या/निरिच्छ निर्विकार झरे/आणि आत्महत्या करायला खुणवणाऱ्या नद्या/नोकरी करणाऱ्या स्त्रीची शारिरिक मानसिक कोंडी ‘या काळ्याभोर निर्घृण’ या कवितेत सुप्त मनात डोकावते.
सहनशीलतेचीसुद्धा एक मर्यादा असतेच. निर्वाणीच्या क्षणी ती निर्ढावून सांगतेच, ‘मी काही नदी नाही.’ एकदा कचराकुंडी ना वाहती, कुठली नदी, जिच्यात तू मनसोक्त मर्जीनं डुंबतोस अन्् तेवढ्याच निर्विकतेनं आपली सगळी अडगळ टाकतोस. येवढं करून तू किती असतोस प्रामाणिक, जे मला न सांगता जाणवतात तुझे आकार तुझे काच तुझे बंध/आणि पाण्यात माझ्या/तुझी पडतात/प्रत्यक्षातून वेगळी प्रतिबिंब...

"वहिवाट', "या हमरस्त्याने' या दोन कवितांमधे रस्ता वाट ही प्रतीकं स्त्रीसाठी वापरलेली आहेत. भरभक्कम ओझ्यांचा कलंडणारा गाडा/वाट ओढून नेते सारे काही/जशी बाई. पाणंद, पांद, पाऊलवाट, वाट प्रत्येकीचे वेगळं व्यकितमत्व, कोणी माळवरल्या, तर कोणी सावलीतल्या गोड आंब्याच्या वनराईतल्या, की आंबट चिंचेखालच्या घनगर्द सावलीच्या? या सगळ्या बालपणीच्या सख्या संसाराच्या रहाटगाड्याला जोडल्यावर निजी व्याक्तिमत्व उध्वस्त झालेला हमरस्ताच होतो. "एक ना दोन होत्या अगणित वाटा/झाल्या साऱ्याच सपाट/हमरस्ता विधुळवाटा/साऱ्या पोटाखाली घालीत आता निघाला बाजारा’
माया पंडितांच्या कवितांना एवढ्या छोट्या अवकाशात मला न्याय देता येणार नाही. बाईच्या दुःखाच्या असंख्य छटा कविता वाचताना पानोपानी दिसतात. यात ना आक्रोश, ना कसला उरस्फोट. प्रतिकार विरोध तर दूरच, किंचित निषेधाची नोंद. तिचं हे दास्य, दुःख, अवहेलना, उपासमार, ओरबड करणारे कोण, तर ते तिचं उपांग ‘औरतने जनम दिया, मर्दोंको, मर्दोने उन्हे बाजार दिया’... अशातील गत तिरस्कार करावा असा जो, तिचा शत्रू नाही. वाचणाऱ्याला ती जाब विचारत नाही, ना कसला प्रश्न. निमूटपणे केवळ मांडत राहते, तिची पिळवणूक आणि आणि आपली करतूत. अपराधबोधाने वाचकानेच अधिक सजग संवेदनशील आणि समजूतदारपणे पूर्वापारची पुरूष मानसिकता बदलली, तरच तिच्या स्वप्नांना नवीन धुमारे फुटतील.
मुखपृष्ठावरील चित्रासहित ‘शब्द प्रकाशन’ने हे पुस्तक देखणं काढले आहे, हे ओघाने आलेच.

[email protected]
लेखकाचा संपर्क : ९८२३१५५७६८

X
COMMENT