आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्याय्य हक्क स्वातंत्र्याचा यल्गार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अन्यायाविरोधात रस्त्यात उतरलेली अनवाणी धूळ भरलेली अन् परिस्थितीच्या फुफाट्याने टरारून फोड आलेली पावलं असतात, ‘हस्तक्षेप’. धमकवणाऱ्या सत्ताधीशांच्या विरोधात नाराजीचा साधा नोंदवलेला निषेधही असतोच, ‘हस्तक्षेप’. ‘हस्तक्षेप’ असतो, रस्त्याच्या कडेनं निमूट रडत जाणाऱ्या निराधार मुलाची, आपुलकीने केलेली चौकशी. हा हस्तक्षेप केलाय, वीरा राठोड यांनी. त्या हस्तक्षेपाला दिलेली ही दाद...

 

खंडप्राय पसरलेला आहे,आपला अवाढव्य देश. ज्यांनी अशिया अन् युरोपच्या सांस्कृतिक अन् अध्यात्मिक जीवनावर प्रभाव टाकला, असे या देशात निर्माण झालेले बौद्ध, हिंदू, जैनसारखे विराट प्राचीन धर्म. शैव, वैष्णव, लिंगायत, महानुभावी वारकरी असे, त्यातील नानाविध पंथ. मध्ययुगात स्थलांतरीत झालेले आणि नंतर या देशाच्या मातीलाच आपली उदरभरण करणारी जन्मभूमी’ म्हणून ज्यांनी अंगिकारले, असे इथले मुसलमान अन् ख्रिश्चन. धरतीला माता अन् आभाळाला बाप मानणारे इथले मूळ रहिवासी आदिवासी. उपवासाच्या घोर अनुष्टानाला बसणारे, दिशा, झाडं, माळ, दरा, डोंगर, दगडं अन् झऱ्याला देव मानणारे, सुगीलाच एका ठिकाणी तळ ठोकणारे, अन्यथा प्रत्येक दिवशी उशाची रात्र बदलणारे भटके-विमुक्त. 


या सगळ्यांची भाषा आहे अलग. अलग आहे, पेहराव. अलग रहनसहन, रीतिरिवाज. अलग आहेत, देवस्थानं, ठिकाणं आणि त्यांचे माहात्म्यं. अशा असंख्य आवाजांचे प्रतिनिधित्व करणारी आहे, आपल्या देशाची संसद. आज सारेच चित्र पालटलेलं आहे. ‘नावापुरती राहिलेली आपली लोकशाही. मूठभराच्या हातात आहे, अमर्याद सत्ता. त्यातूनच प्रामाणिक अन् न्यायी माणसं गिळंकृत करणारी व्यवस्था आकाराला येत आहे. एकूणच विश्वास  हरवून बसलाय...’ 


एका संवेदनशील सामाजिक उत्तरदायित्वाची जाण असलेल्या, एका तरूणाचे हे आहे, सार्वत्रिक चिंतन.सांप्रतकाळ हा प्रचलित व्यवस्थेविरोधात, अन्याय अत्याचाराविरोधात उतरलेल्या असंख्य निनावी आवाजांचा घणघणता घंटानाद आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची मुस्कटदाबी करणाऱ्या या सर्वंकष सत्रात सामाजिक प्रसारमाध्यामातून देशभरातील तमाम शिक्षित तरूण कोणत्याही राजकीय अथवा सामाजिक संघटनांच्या बळकट पाठिंब्याशिवाय व्यक्त होवू इच्छित आहेत. जात, धर्म, वंश, लिंग, प्रांत यांनी जरी सिमित वा पृथक असले तरी या सर्वांच्या आस्थेचा केंद्रबिंदू ‘परिवर्तन वा बदल हाच आहे. प्रत्येक भाषेत लक्षावधी अपरिचित आवाजांचा हा कोलाहल प्रत्येक दिवशी मिळेल त्या क्षणी प्रस्फुटित होत आहे. निषेधाच्या उग्र अभिव्यक्तींचा हा सर्वव्यापी दरवळ सोशल नेटवर्किंगच्या जगद्व्याळ अवकाशाला लगडत आहे. काही आवाज लुप्त झालेत, काही आज्ञातवासात गेलेत. म्हणून ते अकार्यक्षम झालेत अथवा त्यांनी पराभव स्वीकारलाय असे नव्हे. संगणकीय चिन्हांद्वारे ते असंख्यांच्या संख्येने पक्षधर होत आहेत. आणि इथूनपुढे  कोणत्याही यंत्रणेला ते थोपवता येणार नाहीत.


नद्यांच्या दुआबात जिथे शेती, आकारास आली, नगरांचा विकास झाला आणि व्यापार वाढला तिथेच संस्कृतीने आपली सुरुवातीची पावलं उमटवलीत. मिथकं, महाकाव्य, धर्मग्रंथ अन् मौखिक परंपरेतून विदित झालेला आहे,या देशाचा काहीसा अपूर्ण तुटपुंजा सांस्कृतिक इतिहास.पण जी आजवर निसर्गाशी एकरूप होवून कमीतकमी साधनांत आपलं जीवन व्यापन करीत होते, त्या आदिवासीय जीवनप्रणालीतून तयार झालेली भाषा, रितीरिवाज, ऋतूंशी निगडीत  सण यातून निर्माण झालेल्या कथा-कविता अाख्यानं प्रत्येक भाषेतील वेगळी महाकाव्यं फारशी कोणाला माहीतच नव्हती. ज्यांनी निसर्गाशी सुसंवाद राखीत पर्यावरणाचे संवर्धन केले, त्यांच्यावरच आक्रमण करणाऱ्या स्वदेशी अन् परकीय धनदांडग्या सोबतचा संघर्षाचा इतिहास विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत तसा अनभिज्ञच राहिला होता.


देशाच्या एकूण लोकसंखेच्या जवळपास पाव हिस्सा असलेल्या आदिवासी अन् भटकेविमुक्तांच्या जगण्याची आजवर पुरेशी दखल घेतलेली नव्हती. अर्थात अठराव्या आणि एकोणिसाव्या शतकात वसाहतवादी देशातील पाश्च्यात विचारवंतांनी ‘समाजजीवन, मानसशास्त्रा’च्या अनुषंगाने जगभरातील आदिवासी अन् भटक्या विमुक्त समाजाचा माहितीवजा काही अभ्यास केला असेल. परंतु त्या उपेक्षित समुहाचे रोजचे खडतर जगणे, त्यांची पिळवणूक, त्यांचे जंगल जमीन पाण्यापासूनच हकनाकचे विस्थापन याविषयी  आवाज उठवण्यात आलेला नाही. अठराशे एकाहत्तरला स्वतंत्रपणे मीठ-मसाल्याचा व्यापार करून उदरनिर्वाह करणाऱ्या या समूहांवर ब्रिटिशांनी एतद्देशियांना हाताशी घेवून गुन्हेगार जमातीचा कायदा लादला. तिथून पुढे जन्मजात कोंडवाड्याचे आयुष्य त्यांच्या नशिबी आले. पुनर्वसन अन् सुधारणांच्या नावाखाली जनावरांसारखे त्यांना राबवून घेण्यात आले. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत एकजात त्यांना गुन्हेगार ठरवण्यात आले. देश स्वतंत्र झाल्यावर एकतीस ऑगष्ट एकोणीसशे बावन्न साली, या गुन्हेगार समजले गेलेल्या या असंख्य जनसमूहांना माणूस म्हणूनची केवळ मान्यता मिळाली.


 आदिवासी अन् विमुक्त समुहांना सामाजिक न्याय मिळवून देण्याचे देशपातळीवर काही मोजक्याच लोकांनी आयुष्यभर काम केले ज्यात महाश्वेतादेवी, गोदुताई परूळेकर, रमणिका गुप्त, आणि गणेशदेवी यांचे योगदान महत्वाचे आहे. त्यातील एक आवाज आहे, वीरा राठोड. 
 
 
 "सर्वतोपरी न्यायाची लढाई लढणाऱ्या न्यायाचा आवाज आपल्या लेखनीतून मांडणाऱ्या लेखणीच्या शिपायांना आणि माणूस उभा करणाऱ्या जगातल्या सर्व खंबीर हातांना"...‘हस्तक्षेप’ या स्फुटलेखांची अर्पणपत्रिकाच मुळी मोर्चातील लोकांनी हातांच्या मुठी वळवून अवाढव्य आकाशाच्या निरंकुश दरवाज्यासमोर समुहांचा यल्गार घोषित करणारी अशी आहे. मराठी सारस्वतांना  काहीसे अपरिचित असलेल्या "सेन सायी वेस’ या गोरमाटी बंजारा बोलीभाषेच्या शीर्षकाद्वारे  ख्यातनाम झालेला हा मूळचा कार्यकर्ता कवी वीरा राठोड ‘हस्तक्षेप’ लिहिण्यामागची आपली मनोभूमिका कवितेतूनच व्यक्त करतो.
 
 
अन्यायाविरोधात रस्त्यात उतरलेली अनवाणी धूळ भरलेली अन् परिस्थितीच्या फुफाट्याने टरारून फोड आलेली पावलं असतात, ‘हस्तक्षेप’. धमकवणाऱ्या सत्ताधीशांच्या विरोधात नाराजीचा साधा नोंदवलेला निषेधही असतोच, ‘हस्तक्षेप’. ‘हस्तक्षेप’ असतो, रस्त्याच्या कडेनं निमूट रडत जाणाऱ्या निराधार मुलाची, आपुलकीने केलेली चौकशी. अरूण काळेसारखाच अक्षरं सुधारण्यासाठी कविता न लिहिणाऱ्या परंपरेतील या संवेदनशील तरूण कार्यकर्ता कवी-लेखकाचे पावणेदोनशे पानांचे, हस्तक्षेप हे पुस्तक सांप्रतकाळाच्या दस्तऐवजाचे काम करते. आदिवासी अन् भटक्या विमुक्तांच्या अलिखित शौर्यगाथा आणि निसर्गासोबत जगण्याची महान नैसर्गिक जीवनप्रणालीद्वारे भारतीय इतिहासाचीच तो पुनर्मांडणी करतो. वसाहतवादी ब्रिटिशांना या देशाची लूट करण्यासाठी रस्ते अन् रेल्वे निर्माण करण्याचे जे घोरण आखले त्यात पूर्वापार जमीन कसणाऱ्या आदिवासींचे सक्तीचे विस्थापन केले. जंगलं तोडली.

 या सर्व वसाहातिक अन्यायाविरोधात सर्वप्रथम इथल्या आदिवासींनी केलेल्या प्रखर विरोधाची नोंद फारशी कुठे झालेली नाही, याची वीरा या पुस्तकातून जाणीव करून देतो. जल जमीन जंगल या आज सर्वपरिचित नाऱ्याचा आक्रोश, हा आदिवासीच्या एकूणच जीवनप्रणालीचा भाग आहे. खूप पूर्वीपासूनच आदिवासींची इथल्या अरण्याचे संवर्धन करीत इथल्या पाण्याचे स्त्रोत बळकट ठेवून आपले जीवनव्यापन कलेले आहे. दुर्दैवाने, आपल्या भांडवली विकासात जंगलतोड करून पर्यावरणाचा आपण ऱ्हास करीत आहोत. परदेशी कंपन्यांना आपल्या खनिजसमृद्ध जमिनी, आपल्या नद्या विकत आहोत. आणि त्याच्या रक्षणासाठी लढणाऱ्या मूळ रहिवाशांना आपण नक्षली ठरवित आहोत. ‘अदिवासी अब्रुची लत्करे’ या लेखात हताश होवून वीरा राठोड विचारतो, खरेच आम्ही त्यांना देशाचा नागरिक असल्याची कोणती बांधीलकी दिलीय? हक्क आणि अधिकारांचे कोणते दरवाजे सताड मोकळे केले आहेत?
 
 
या पुस्तकातील प्रत्येक लेख वाचकाला अंर्तमुख होण्यास भाग पाडतो. एकाच वेळी तो आदिवासी भटक्यांच्या एकूण लोकसंखेचे आकडे सादर करतो. बदल्यात या देशाच्या संसदेत आणि प्रशासनातील त्यांच्या यःकिंचित सहभागाची नोंद करतो. आदिवासी भटक्यांचे राहणीमान, कुपोषण, शिक्षण आरोग्य निवारा अन् रोजगार यांच्या निवारणाची कोणती तजवीज आपण केलेली आहे, असा भाबडा सवालही तो करतो. वीरा केवळ  कवी नाही, प्रत्यक्ष चळवळीत त्याचा सहभाग आहे. त्यामुळे मानवमुक्तीच्या इतर चळवळीशी तो स्वत:ला सहज जोडून घेतो. या उपेक्षित समूहांसाठी लिहिणाऱ्या-लढणाऱ्या दक्षिण बजरंगी, पूर्णा मालावत, नागराज मंजुळे, महाश्वेता देवी, गणेश देवी आणि रोहित वेमुला विषयी तो आस्थेनं लिहितो. यासंदर्भात गणेश देवींची त्याने घेतलेली मुलाखत फारच महत्वाची अन् प्रत्येकाने वाचावी अशीच आहे. आदिवासींविषयी गणेश देवी म्हणतात, ‘जीवनाचा आनंद कसा घ्यावा, हे मी त्यांच्याकडून शिकलोय. मानवी विकास करीत असताना पृथ्वी जीवंत ठेवण्याची जबाबदारी आदिवासी सभानतेने संभाळतात. त्यांच्यात काम करताना मला विकासाची नवी दृष्टी मिळाली.’ या विधानाला जोड म्हणून मी म्हणेन हे पुस्तक वाचून लेखकाच्या जबाबदारीची मला नव्याने जाणीव झाली. म्हणूनच बांधिलकी मानणाऱ्या लिहित्या लेखक अन् वाचकाने हे पुस्तक वाचणे गरजेचे आहे.

 

- आनंद विंगकर

anandwingkar533@gmail.com

लेखकाचा संपर्क : ९८२३१५५७६८

 

बातम्या आणखी आहेत...