Home | Magazine | Madhurima | Anant Vaidya writes about cancer patients

नैराश्य नव्हे जगण्याची उमेद द्या

अनंत वैद्य, बीड | Update - Jul 24, 2018, 06:59 AM IST

कर्करोगासारखे दुर्धर आजार बरे करण्यासाठी त्याच्या औषधांवर अत्याधुनिक संशोधन सुरू आहे. मात्र नातेवाईक, समाजाची साथ आणि

 • Anant Vaidya writes about cancer patients

  कर्करोगासारखे दुर्धर आजार बरे करण्यासाठी त्याच्या औषधांवर अत्याधुनिक संशोधन सुरू आहे. मात्र नातेवाईक, समाजाची साथ आणि प्रोत्साहन हाही अशा असाध्य आजारांवर मलमाचं काम करतो.


  ‘अगं बाई! बिच्चारी सोनाली, किती सुंदर दिसत होती, किती छान आयुष्य होतं तिचं. आता केस गळणार, त्वचा रुक्ष पडणार, चेहरा निस्तेज होणार. आणि काय माहीत किती दिवस हे सहन करणार.’
  ‘हो ना गं, आमच्या कॉलनीतील त्या शिंदे बाई नाहीत का, त्यांचंही असंच झालंय. सहा महिन्यांपूर्वी कॅन्सरचं निदान झालं, आता अगदी कृश झाल्यात. आता काही खरं वाटत नाही.’
  पाटोदा-बीड प्रवासादरम्यान शेजारील सीटवर बसलेल्या दोन बायकांतील ही चर्चा. आता ही निकाल लावणारी चर्चा ऐकायला सोनाली बेंद्रे किंवा शिंदे बाई हजर नव्हत्या हे बरं झालं नाही तर त्यांनी हाय खाल्ली असती.
  नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नोलॉजी इन्फर्मेशनच्या आकडेवारीनुसार भारतीय महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग होण्याचं सरासरी प्रमाण १ लाख महिलांमागे २५.८ इतके आहे, तर मृत्युदर १ लाख महिलांमागे १२.७ इतका आहे. याशिवाय इतर २०० प्रकारच्या कर्करोगाचे प्रमाणही वाढते आहे.


  एखादा आजार घेऊन जगणं हे भारतीय समाज व्यवस्थेत अनेकदा अतिशय कठीण होऊन बसते. आजारी व्यक्ती व तिचे कुटुंब मानसिक, आर्थिक अशा दोन्ही आघाड्यांवर संघर्ष करत उपचाराची बिकट वाट तुडवत असतात. मात्र, समाजातील घटक आपल्या बेजबाबदार वागण्याने आजारी व्यक्तीला कळत-नकळत निराशेजवळ नेतात. महिलांमध्ये तर हा प्रकार प्रचंड भीतिदायक आहे. कर्करोगग्रस्त महिलेला आधार देण्यासाठी म्हणून गेलेल्या महिला नको ते प्रश्न व नाही त्या शक्यता व्यक्त करून घाबरवून टाकतात. आपणही असे प्रसंग अनुभवले असतील.
  परिणामस्वरूप अनेक कुटुंबीय आजारी महिलेला कुणाशी भेटू देण्याचे टाळतात.


  मित्राच्या आईबाबत अनुभवलेला एक प्रसंग. त्यांच्या नात्यातील एका जणाकडे वास्तुशांतीचा कार्यक्रम झाला. त्यात किमोथेरपीचे उपचार घेत असलेल्या काकू सहभागी झाल्या होत्या. आपला आजार बाजूला ठेवून समाजाशी समरस व्हायचा प्रयत्न त्या करत होत्या. पण याच कार्यक्रमात तीन महिला त्यांच्या आजाराविषयी, त्यांच्याकडे हातवारे करत त्यांना ऐकू जाईल अशा पद्धतीने कुजबुज करत होत्या. आता संवेदनशील मनाच्या काकूंना ही बाब लक्षात आली. तो संपूर्ण कार्यक्रम होऊन घरी जाईपर्यंत तीन-चार वेळा असा प्रकार झाला. या प्रकाराने त्या कमालीच्या व्यथित झाल्या व सार्वजनिक कार्यक्रमात जायचेच नाही, असे त्यांनी ठरवले.


  ग्रामीण भागात तर आजारी महिलेची तर अधिकच अडचण होते. किमोथेरपीसारख्या उपचार पद्धतीतून शरीरावर दिसून येणारे बदल महिलांपुढे असंख्य प्रश्न वाढवून ठेवतात. त्यांची उत्तर देता देता मनावर ओरखडे उमटतात.


  ज्या आजाराचा सामना करण्यासाठी साथ आणि प्रोत्साहन देण्याची गरज असते तिथे या ‘सखी’ कच का खातात? हा प्रश्न खूप दिवसांपासून सतावतो आहे. सोनाली बेंद्रे असो की कॉलनीतील शिंदेबाई व्यक्तिगत स्तरावर स्वतःच्या व्याधींचा सामना करायला सक्षम आहेत, आणि एक जबाबदार व्यक्ती म्हणून त्यांच्यात उमेद जागवायला समाजानेही सक्षम व्हायला नको का?

  - अनंत वैद्य, बीड
  anant.vaidya1@dhrsl.com

Trending