आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्केटिंग की अॅक्टिंग

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मार्केटिंगसारखं निश्चित आर्थिक उत्पन्न देणारं क्षेत्र आणि अभिनयासारखं सतत स्वत:ला शाबित करत राहावं लागणारं अनिश्चित क्षेत्र यापैकी काय करिअरसाठी निवडायचं हे निश्चित झालेलं असतानाही शिक्षणाचं महत्त्व जाणून ‘मार्केटिंग’ या क्षेत्रात एमबीए करणारा महाराष्ट्राचा लाडका अभिनेता भूषण प्रधान याच्याशी मारलेल्या गप्पा!  


ज्याला ‘हजारों दिलों की धडकन’, ‘चॉकलेट बॉय’, ‘handsome hunk’ आणि याशिवाय इथे उल्लेख करता येणार नाहीत अशा मिनिटाला १४३ रोमँटिक कॉम्प्लिमेंट्स मिळतात, अशा मराठी अभिनेत्याने मार्केटिंगमध्ये एमबीए केलंय हे कळलं की, आता त्याच्या फॅन पेजेसवर मेसेजेसची संख्या शेकडोंनी वाढणार! ‘पिंजरा’मधला सगळ्यांचा लाडका वीर, ‘पारंबी’मधला गंधार, ‘सतरंगी रे’मधला जयदीप कामत, ‘टाइमपास’मधला वैभव लेले, ‘कॉफी आणि बरंच काही’मधला अनिश, ‘आम्ही दोघी’मधला राम आणि आता ‘रे राया’मधला आदेश अशा अनेक भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणारा अभिनेता भूषण प्रधान याने अभिनयातच करिअर करायचं हे अगदी शालेय वयापासून ठरवलेलं असतानाही शिक्षणालाही अतिशय महत्त्व दिलं. शाळेच्या आठवणींविषयी भूषण सांगतो, “पुण्याच्या कमलनयन बजाज हायस्कूलमध्ये तिसरीत शिकत असताना ‘वाढदिवसाची भेट’ हे अत्यंत इमोशनल नाटक मी केलं होतं. त्या वेळी याला अभिनय म्हणतात हेही माहीत नव्हतं. पण माझं काम आवडल्यामुळे नंतर शिक्षकांमध्ये माझ्यावरच्या प्रेमापोटी भांडणं होत असत की मराठी, हिंदी आणि इंग्लिश यापैकी भूषण कुठल्या नाटकात काम करणार!” 


दहावी झाल्यानंतर अॅक्टिंगला वेळ मिळावा म्हणून त्याने कॉमर्स घेतलं. सिम्बॉयसिस कॉलेजतर्फे अनेक नाट्यस्पर्धाही गाजवल्या. ‘दोन भागिले शून्य’ या त्याच्या एकांकिकेला पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत पारितोषिकही मिळालं होतं. अभिनय क्षेत्रात करिअर करायचं हे ठाम ठरलेलं असतानाही तू मार्केटिंगमध्ये एमबीए का केलंस, या प्रश्नाचं उत्तर देताना तो म्हणाला, “पदवी मिळवल्यानंतरही अभिनय क्षेत्रात माझे प्रयत्न सुरू होते, पण एकदा अभिनय क्षेत्रातली वाटचाल सुरू झाली की, पुढे नंतर शिकावंसं वाटणार नाही, त्यामुळे शिक्षण पूर्ण करून घ्यावं. आपला बॅकअप प्लॅन रेडी असावा आणि मग तो पूर्ण झाल्यावर पुन्हा अभिनयाकडे वळावं, असं मी ठरवलं. कुठल्याही क्षेत्रात करिअर करायचं तर शैक्षणिक बाजू भक्कम असलेली चांगली. शिक्षणामुळे आपला आत्मविश्वास चांगला राहतो. दुसरं काही आपल्याकडे करायला नाहीये म्हणून आपण हे करतोय असं नसून जे आपण करतोय ती आपली निवड आहे, नाइलाज नव्हे, हा आत्मविश्वास तुमचा तुम्हाला खूप मदत करतो. तसंच आज कुठलंही करिअर अनिश्चित आहे. करिअरमध्ये काही चढउतार आलेच तर दुसरा पर्याय गाठीशी असतो आणि कम्युनिकेशन स्किल्स, मार्केटिंग मॅनेजमेंट यांसारख्या ‘एमबीए’मध्ये शिकलेल्या गोष्टींचा मला अभिनय क्षेत्रातही उपयोग होतो. त्यामुळे शिक्षण घ्याल तेवढं कमीच आणि ते प्रत्येक क्षेत्रात वापरता येतंच.’ 


हुशारी ही प्रगतिपुस्तकातल्या गुणांसारखीच अंगी असलेल्या गुणांवरसुद्धा मापली जायला हवी. भूषणशी गप्पा मारताना लक्षात येतं की, हा दुसऱ्या विभागातला मुलगा आहे! शाळेत असताना तू स्कॉलर होतास का, असं विचारल्यावर त्याने एक किस्सा सांगितला. 

 

तो म्हणाला, ‘दहावीचा रिझल्ट लागला होता. मला ७१ टक्के मिळाले होते आणि शेजारच्या काकूंनी विचारलं गणितात किती मिळाले? मी म्हटलं, ९६. तर त्या खूप खुश झाल्या. मला कळे ना की या एवढ्या का खुश झाल्या आहेत. पण नंतर लक्षात आलं की त्यांना वाटलं होतं मला १००पैकी ९६ मिळाले होते. पण ते खरे १५०पैकी होते, जे अजिबात चांगले मार्क नव्हते! मी पहिला वर्ग मिळवायचे इतकंच, ‘स्कॉलर’ वगैरे म्हणण्याइतपत हुशार नव्हतो. मला पुस्तकी अभ्यासापेक्षा प्रॅक्टिकल अभ्यास फार आवडायचा. सिम्बॉयसिस कॉलेजमध्ये ‘बेस्ट प्रॅक्टिकल्स आणि प्रेझेंटेशन’साठी मी ओळखला जायचो. एमबीए करत असताना एका प्रसिद्ध मोबाइल कंपनीसाठी मार्केटिंग स्ट्रॅटेजी डिझाइन करण्याचं प्रोजेक्ट आम्हांला दिलं होतं. ते प्रोजेक्ट इतकं सुंदर झालं होतं की, त्या कंपनीपर्यंत आमची कीर्ती पोहोचली होती आणि एमबीए पूर्ण व्हायच्या आधीच माझ्या हातात जॉब ऑफर होती. पण आयुष्यातला प्रत्येक निर्णय हा पुढे आपल्याला अभिनय करायचा आहे याच अनुषंगाने घेत गेल्यामुळे ती नोकरी स्वीकारण्याचा प्रश्नच नव्हता.’


एखादा नायक किंवा नायिका देखणा/सुंदर दिसत असला/ली की ‘hot’, ‘beautiful’, ‘handsome’ अशी विशेषणं आपण सहज आणि अर्थात उत्स्फूर्तपणे देतो. पण असं दिसण्यामागे प्रचंड सातत्य आणि मेहनत असते. भूषण प्रधानच्या फिटनेस प्रेमाबद्दल आपल्याला सोशल मीडियावरून कळत असतं. याबाबत विचारलं असता तो म्हणाला, ‘मी १७ वर्षांचा असताना व्यायामाला सुरुवात केली. मी खूप बारीक होतो. आपण फिट असणं गरजेचं आहे हे मला कळत होतं. पण मला ‘सिक्स पॅक अॅब्स’चं वेड कधीच नव्हतं. आजही १० वर्षांच्या करिअरमध्ये मी एकही बेअर बॉडी फोटोशूट केलं नाहीये. तरी मी फिटनेस फ्रीक म्हणून ओळखलो जातो, याचा मला आनंद आहे. मला माझ्या फिटनेसचा माझ्या करिअरसाठी उपयोग होतो, पण मी जरी या क्षेत्रात नसतो तरी मी फिटनेस लव्हर असतोच. मी फिटनेसकडे लक्ष देतो म्हणून मला माझ्या आवडीचं सगळं खाता येतं कारण मी ते सहज पचवू शकतो. माझ्या आवडीचे चांगले कपडे घालता येतात. मुळात शरीरावर नियंत्रण असल्याने भूमिकेच्या गरजेप्रमाणे मी शरीरामध्ये थोडे बदलही करू शकतो. म्हणजे टाइमपासमध्ये मी एका ‘बॉडी बिल्डर’ची भूमिका केली होती, तर आता पुढच्या ‘रे राया’ या सिनेमामध्ये एका अॅथलेटिक्स प्रशिक्षकाची भूमिका आहे. त्यामुळे आत्तापर्यंत मी ज्या फिटनेसच्या गोष्टी शिकलो त्याचा मला या भूमिका करताना खूप फायदा झाला. याचबरोबर मी योगासनं, स्ट्रेचिंगही करतो. फिट राहणं ही ‘सवय’ असावी, जी सगळ्यांनी स्वतःला लावून घेतली पाहिजे; स्वतःसाठी.’कोणीतरी योग्यच म्हटलंय, There are some men having brain with brawn!

 

- भक्ती आठवले भावे, मुंबई 
bhaktiathavalebhave@gmail.com

बातम्या आणखी आहेत...