आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रद्धा आणि बाजाराचे सम्यक दर्शन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘श्रद्धा आणि बाजार’ हे पुस्तक श्रद्धेची खिल्ली उडवत नाही. अंधश्रद्धेतील फोलपणा मात्र दाखवून देते. कठोर बुद्धिप्रामाण्यवाद्यांसारखे तर्ककर्कश लेखन हा पुस्तकाचा बाज नाही. तर प्रकाश जोशी यांची भटकंती, त्यांचे शास्त्रीय संशोधन क्षेत्रातील वावर आणि सामान्य माणसांशी नेहमी होत असलेला संवाद यातून  आकारास आलेला हा मनोवेधक अन्वयार्थ आहे.

 

देव मानत नाही, निसर्गाला मानतो हा प्रकाश जोशींचा स्थायीभाव या पुस्तकाच्या पानापानातून डोकावत राहातो. ते जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात गेले तरी तिथे आपल्या मूळ विचारांच्या कोनातूनच आजूबाजूची परिस्थिती पाहतात. 


श्रद्धा आणि बाजार हा सर्व क्षेत्र व्यापलेला विषय आहे. प्रत्येक क्षेत्रात श्रद्धा व अंधश्रद्धा असते. त्यांचा बाजार भरलेला असतो. तर बाजारही अनेकदा श्रद्धा व अंधश्रद्धेच्या हिंदोळ्यावर झुलताना दिसतो. डाॅ. प्रकाश जोशी शास्त्रज्ञ आहेत, त्यांचा देवावर विश्वास नाही. त्यामुळे ते रूढार्थाने नास्तिक आहेत. परंतु, त्यांना निसर्ग अधिक भावतो. निसर्गाच्या चक्रामुळेच जगात सारे काही घडत असते, अशी त्यांची भावना आहे. ते चिकित्सक बुद्धीने सर्व गोष्टींकडे बघत असले तरी ते कोरडे बुद्धिवादी नाहीत. त्यामुळे ते  समाजातील उत्तम मूल्यांचा आदर बाळगतात. या सगळ्या गोष्टी त्यांच्या लेखनातूनही दिसून येतात. त्याचेच प्रत्यंतर त्यांचे श्रद्धा आणि बाजार हे पुस्तक वाचताना आढळून येते. जोशी यांची आई धार्मिक होती पण ती उदारमतवादी होती. ते आपल्या आईशी कोणत्याही विषयावर चर्चा करू शकत असत. एकदा जोशी यांनी आपल्या आईला विचारले की, `तुमच्या परमेश्वराचे अस्तित्व तू सिद्ध करू शकतेस का?’ त्यावर आईने त्यांना प्रतिप्रश्न केला, `प्रत्येक गोष्टीला सिद्धता आवश्यकच आहे का?’ काही गोष्टी गृहीत धराव्या लागतात. त्यानंतर आई व मुलाची त्या अंगाने चर्चा सुरू झाली. घरातच हे सारे बाळकडू मिळाल्याने जोशी यांच्या अंगभूत जिज्ञासेला चौफरतेचे सखोल भान आले. एकदा जोशी ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन भागात फिरत होते. तिथे एकाहून एक देखणे बंगले. त्या बंगल्यांच्या अंगणात कीटकांनी चांगल्या हातभर जाळ्या बनवलेल्या होत्या. पण कुणीही या जाळ्या तोडत नसे. या जाळ्या म्हणजे नैसर्गिक कीटकनाशके. रासायनिक किटकनाशके का वापरा, हा विचार त्यामागे होता. पालीही हे काम करतात. त्यामुळे घरात पाली असणे म्हणजे शुभ या भावनेला श्रद्धेची किनार असल्याने त्याची अंधश्रद्धेत गणना होऊ लागली असे नमूद करून जोशी यांनी म्हटले आहे की, श्रद्धेचा वास सर्वच क्षेत्रांत आहे. या सर्व क्षेत्रांत बाजारानेही ठाण मांडले आहे. श्रद्धाळू अनुयायी की गिऱ्हाईक हा प्रश्न व्याखेचा असे ते म्हणतात.  


‘श्रद्धा आणि बाजार’ हे पुस्तक श्रद्धेची खिल्ली उडवत नाही व अंधश्रद्धेतील फोलपणा मात्र दाखवून देते. बुद्धिप्रामाण्यवाद्यांसारखे तर्ककर्कश लेखन हा पुस्तकाचा बाज नाही. तर प्रकाश जोशी यांची भटकंती, त्यांचे शास्त्रीय संशोधन क्षेत्रातील वावर, सामान्य माणसांशी नेहमी होत असलेला संवाद यातून त्यांना श्रद्धेविषयी जे समजले त्याचा अन्वयार्थ अगदी अलगदपणे लावून त्यांनी हे लेखन केले आहे. दोन वेगवेगळ्या धर्मप्रणालीचे किस्से प्रकाश जोशी यांनी वर्णन केले आहेत. ते लिहितात, `अवर लेडी ऑफ हेल्थच्या चमत्कारांच्या कथा चित्ररूपात सादर करण्यात आल्या आहेत. चर्चच्या एका टोकाला असलेल्या अवर लेडीज टँक या विहिरीच्या जलाने व्याधीमुक्ती मिळते ही श्रद्धा. एखाद्या जलात औषधी गुण असू शकतात परंतु सर्व व्याधीवर ते गुणकारी असू शकतं का, असा प्रश्न मला पडला. या पाण्याचे केमिकल अॅनालिसिस केले तर, असे एका सुशिक्षित भक्ताला विचारताच तो म्हणाला, बुद्धीचे काम विज्ञानात. हे श्रद्धेचे स्थान. तो भक्त नतमस्तक झाला.’ तसेच होमहवनातून प्रदूषण निर्माण होते का, असा प्रश्न जोशी यांनी आपल्या विज्ञानशिक्षक असलेल्या वडिलांना विचारताच ते म्हणाले होते, ‘ज्वलनातून प्रदूषण होते हे तुझे म्हणणे बरोबर आहे. आपल्या घरात हवनं होतात. हवनातून बराच धूर होतो. तुला घुसमटायला होते का?’ मात्र जोशी यांना आपली हवनामुळे घुसमट होते असा काही अनुभव आठवेना. त्यावर वडिलांनी उत्तर दिले की, हवन झाल्यावर मला तरी फ्रेश वाटते. कदाचित हे मानसिक समाधान असू शकते, असे त्या वेळी जोशींना वाटून गेले.  


श्रद्धा आणि बाजार या पुस्तकामध्ये जोशी यांनी जसे संशोधन कार्यातले काही अनुभव सांगितले आहेत तसेच आपल्या विविध देशांतल्या भटकंतीतील काही प्रसंगही वर्णन केले आहेत. त्या पुस्तकातील प्रतिष्ठा व प्रतिक हे प्रकरण तर खूपच रोचक आहे. जर्मनीत प्रकाश जोशी ज्यांच्या घरी राहात होते, त्यांच्या हॉलमध्ये एक मोठा पियानो होता. परंतु जोशींच्या मुक्कामात तो एकदाही वाजवला गेला नाही. जोशी राहात होते त्या कुटुंबाच्या मालकीची एक मोठी ट्रॅव्हल व्हॅन होती. तिचाही वापर या कालावधीत झाला नव्हता. तथापि या प्रतिष्ठेच्या बाबी. एवढं असूनही त्या कुटुंबाला एक खंत होती, कुत्रा पाळण्याइतकी ऐपत आमची नाही. (श्वानपालन हा तिथे मोठा खर्चिक शौक. म्हणून प्रतिष्ठेचाही) असे निरीक्षण प्रकाश जोशींनी पुढे नोंदवले आहे.  नशिब, नियती या संकल्पना आध्यात्मिक की गणिती? धार्मिक बाबतीत तसा मी श्रद्धाळू नव्हे. तथापि चार धाम, अष्टविनायक, बारा ज्योतिर्लिंग जी म्हणून श्रद्धास्थाने आहेत, बहुतेक सर्वांचे प्रकाश जोशी यांनी दर्शन घडले आहे आणि तेही विनासायास. श्रद्धाळू बहिणीने एकदा त्यांना विचारले, ‘मी श्रद्धाळू. मला अशा दर्शनांसाठी कितीतरी प्रयास घ्यावे लागतात. तुला बरं विनासायास दर्शन घडते?’ त्यावर जोशी यांनी मासलेवाइक उत्तर दिले की, देव अश्रद्ध जनांना आमंत्रण दिल्यासारखेे बोलावून घेतो, श्रद्धाळूंना बाकी देवाच्या कसोटीला उतरावे लागते.’

 
लेखक जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात गेले तरी तिथे आपल्या मूळ विचारांच्या कोनातूनच आजूबाजूची परिस्थिती पाहतात. तेथील श्रद्धा व अंधश्रद्धा, सामाजिक चालिरीती यांचे निरीक्षण करतात. त्यावर लेखनाच्या माध्यमातून प्रकटही होतात. मुळात आपल्याकडे ही एक धारणा असते की शास्त्रज्ञ म्हटला की, तो लोकसंपर्क टाळणारा, एकांतात काम करणारा वगैरे असतो. पण असे काहीच जण असतात. शेवटी शास्त्रज्ञ हाही माणूसच आहे. त्यालाही समाजातील इतर लोकांप्रमाणे भावभावना, श्रद्धा वगैरे आहेत. लोकांत राहून त्यांचे जीवन बारकाईने न्याहाळणाऱ्या, त्या निरीक्षणांचा आपले शास्त्रीय संशोधन कार्य करताना काही उपयोग होतो का याचा विचार करणाऱ्या लोकसहवासप्रेमी शास्त्रज्ञांमध्ये प्रकाश जोशी यांचा समावेश होतो. त्यातून या पुस्तकातले लेख लिहिले गेले आहेत. ज्यातील अनुभव सर्वसामान्य माणसांच्या जगण्यातील आहेत. अंधश्रद्धा की गैरसमज, सुई लक्षणीय आवाजात फिरायला हवी, अध्यात्म, गणित आणि विज्ञान, या इद्वानांनी लयी घोळ करुन ठेवलाय.. अशी आशयघन शीर्षके असलेले एकुण १३ लेख या पुस्तकामध्ये आहेत. प्रकाश जोशी यांची लेखनशैली प्रवाही आहे. त्यामुळे त्यांच्या अनुभवांशी वाचक म्हणून आपल्यालाही सहजतेने समरस होता येते. समाजातील श्रद्धा आणि त्यांचा बाजार यांचे सम्यक दर्शन घडविणारे हे पुस्तक समाजाचे वास्तव चित्र आपल्यापुढे साकारते म्हणूनही ते महत्त्वाचे आहे.  


पुस्तकाचे नाव - श्रद्धा आणि बाजार  
लेखक - डॉ. प्रकाश जोशी 
प्रकाशक - शर्वा प्रकाशन 
पृष्ठे - १५२, मूल्य - १६० रुपये


- मधुरिमा टीम, पुणे

बातम्या आणखी आहेत...