Home | Editorial | Columns | column article about challenge of BJP-Sena in front of opposition

विरोधकांपुढे भाजप-सेनेचे आव्हान कायम

राजा कांदळकर | Update - Jul 03, 2018, 08:09 AM IST

विधान परिषदेच्या चार जागांसाठी निवडणुका झाल्या. मुंबई आणि नाशिक शिक्षक तर मुंबई आणि कोकण पदवीधर असे चार आमदार निवडून देण

  • column article about challenge of BJP-Sena in front of opposition

    विधान परिषदेच्या चार जागांसाठी निवडणुका झाल्या. मुंबई आणि नाशिक शिक्षक तर मुंबई आणि कोकण पदवीधर असे चार आमदार निवडून देण्यात आले. नाशिक, मुंबई आणि कोकण या टापूतील शिक्षक पदवीधर या मतदारांनी या निवडणुकीत मतदान केलं. काँग्रेस-राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष या निवडणुकीत निष्प्रभ ठरले आहेत.


    शिक्षक पदवीधर मतदारसंघातील निवडणुकांचे निकाल राज्यातील सर्वच प्रस्थापित पक्षांना धडे शिकवणारे आहेत. खासकरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या डोळ्यात अंजन घालणारे आहेत. विधान परिषदेच्या चार जागांसाठी निवडणुका झाल्या होत्या. मुंबई आणि नाशिक शिक्षक तर मुंबई आणि कोकण पदवीधर असे चार आमदार निवडून देण्यात आले. नाशिक, मुंबई आणि कोकण या टापूतील शिक्षक पदवीधर या मतदारांनी या निवडणुकीत मतदान केलं. काँग्रेस-राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष या निवडणुकीत निष्प्रभ ठरले आहेत. नागपूरला पावसाळी अधिवेशन पहिल्यांदा होत असताना हे निकाल लागले. शिक्षक पदवीधर असा सुज्ञ मतदार या निवडणुकीत मतदान करतो. संघटनात्मक सक्रिय कार्यकर्त्यांचं भक्कम पाठबळ असल्याशिवाय या निवडणुका जिंकता येत नाहीत, हे पुन्हा एकदा या निवडणुकांनी अधोरेखित केलं आहे.


    या निवडणुकांत शिवसेनेनं चारपैकी नाशिक आणि मुंबई अशा पदवीधर या दोन्ही जागा जिंकल्या. मुंबईतून विलास पोतनीस व नाशिकमधून किशोर दराडे विजयी झालेत. मुंबई पदवीधर मतदारसंघात विद्यमान आमदार आणि आरोग्यमंत्री दीपक सावंत यांना तिकीट नाकारून शिवसेनेनं पोतनीस या ७० वर्षांच्या उमेदवाराला उभे करून जोखीम स्वीकारली होती. मंत्री डॉ. सावंत नाराज होते. अशा अवस्थेत सेनेनं ही निवडणूक लढवून पोतनीसांना साडेअकरा हजार मतांनी निवडून आणलं. या मतदारसंघात सेना विरुद्ध भाजप अशी लढत झाली. भाजपचे अमित मेहता यांनी चांगली लढत दिली. पण मुंबईत सेनेची संघटना खूप मजबूत आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात सेनेचं नेटवर्क सक्रिय असल्यानं ते लष्करी शिस्तीने निवडणुकीत उतरतं. विरोधकांना पराभूत करण्यासाठी रात्रंदिवस सेनेचं नेटवर्क वरिष्ठांच्या आदेशानुसार काम करतं. असंच नेटवर्क मुंबईत भाजपकडेही आहे, पण सेनेची ताकद वरचढ ठरली. मराठी पदवीधर मतदारांची संख्या जास्त असल्याने सेनेचा विजय झाला. मेहतांची हार झाली.


    मुंबई पदवीधर मतदारसंघातून काँग्रेस, राष्ट्रवादी, शेतकरी कामगार पक्षाचे राजेंद्र कोरडे हे उमेदवार होते. पोतनीस-मेहतांच्या लढतीत ते पाचव्या क्रमांकावर फेकले गेले. एवढा त्यांचा दारुण पराभव झाला. कोरडे यांना पन्नासेक डाव्या संघटनांचा पाठिंबा होता. तीन मोठे राजकीय पक्ष, पन्नास संघटना बरोबर असूनही कोरडेंचा करुण पराभव झाला. यातून या पक्ष-संघटनांची राजकीय विश्वासार्हता किती खालावली आहे याचा प्रत्यय आलाय. शेतकरी कामगार पक्षाचं मुंबईत काही काम नव्हतं. पण काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षांची मुंबईतली संघटना ही दिशाहीन, ठिसूळ झाली आहे काय, असा प्रश्न या निमित्ताने उभा राहिला आहे.


    कोकण पदवीधरची निवडणूक राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी प्रतिष्ठेची केली होती. पूर्वी राष्ट्रवादीच्या तिकिटावर आमदार झालेले निरंजन डावखरे भाजपमध्ये गेल्याने शरद पवार चिडले होते. काही करून डावखरे यांना पराभूत करायचेच, असा पवित्रा पवारांनी घेतला होता. त्यासाठी त्यांनी या मतदारसंघात प्रचार मेळावे घेतले. नवी मुंबईत वाशी येथे राष्ट्रवादी, काँग्रेस, शेकाप यांचा संयुक्त मेळावा घेतला होता. त्यात शरद पवार म्हणाले होते, 'डावखरे यांच्या विरोधात मी स्वतः उभा आहे असं समजा. डावखरे जिंकले तर मी हरलो असं होईल. माझी प्रतिष्ठा पणाला लागली आहे.' हे शरद पवार का सांगत होते? राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये जाऊ इच्छिणाऱ्यांना ते इशारे देत होते काय ? पण कोकणात काँग्रेसचा प्रभाव नाही. राष्ट्रवादी हा पक्ष घराण्यांमध्ये वाटला गेलाय. पवारांच्या सरदारांचा पक्ष झालाय. सामान्य जनतेचा पक्ष राहिला नाही. त्यामुळे या मतदारसंघातले राष्ट्रवादीचे उमेदवार नजीब मुल्ला हे तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. याउलट या मतदारसंघात विजयी डावखरेंविरोधात सेनेच्या संजय मोटे यांनी चांगली लढत दिली. ही लढतही अर्थात सेनेची संघटना गावोगाव बळकट असल्याने देता आली हे उघड आहे. पण डावखरेंच्या विजयाने पवारांच्या प्रतिष्ठेला धक्का बसला आहे. राष्ट्रवादी हा पक्ष मोठ्या घराण्यांतल्या युवराजांसाठी काम करतो. पण घराण्याबाहेरच्यांसाठी सक्रिय होत नाही हे या निवडणुकीत स्पष्ट दिसलं.


    नाशिक पदवीधरची निवडणूक उमेदवारांनी पैठणी, पैसे वाटल्याने वादग्रस्त ठरली. नाशिक जिल्ह्यात येवला इथं पैठणी तयार होते आणि याच जिल्ह्यात मालेगाव इथं नऊवारी लुगडे तयार होतात. पण उमेदवारांनी पैठणी वाटण्यास पसंती दिली. शिक्षकांसारख्या शिकलेल्या मतदारांनी पैठण्या, पैसे स्वीकारले म्हणून टीकाही झाली. निवडणूक आयोगाकडे तक्रारही केली गेली. माध्यमांत चर्चा, बातम्या झाल्या. पैठण्या मतदारांनी जाळण्याचेही प्रकार झाले. सर्वच उमेदवार श्रीमंत होते. त्यांनी पैठण्या, पैसे वाटले असं बोललं गेलं. आता मतदारांनीच अशा उमेदवारांना धडे शिकवावेत असं आवाहन सामाजिक कार्यकर्त्यांनी केलं. सामाजिक कार्यकर्ते व शिक्षक हेरंब कुलकर्णी यांनी त्यात पुढाकार घेतला होता. निवडणुकीत जसे गैरप्रकार झाले तसे त्याविरोधात आवाजही उठला. हे या निवडणुकीत शिक्षक जागृत असल्याचेच प्रतीक म्हणता येईल. या निवडणुकीत सेनेचे किशोर दराडे विजयी झाले, तर काँग्रेस, राष्ट्रवादीने पाठिंबा दिलेले संदीप बेडसे यांचा पराभव झाला. बेडसे यांना टीचर डेमोक्रेटिक फ्रंट (टीडीएफ) या शिक्षकांच्या संघटनेने पाठिंबा दिला होता. एकेकाळी महाराष्ट्रात या शिक्षक संघटनेचा दबदबा होता. आता या पुरोगामी विचाराच्या संघटनेची शकले झालीत. पैसेवाले उमेदवार या संघटनेच्या नेत्यांना विकत घेतात आणि त्यांना वापरतात, हे चित्र या निवडणुकीत जास्त दिसलं. ही संघटना आता विचारशून्यता आणि फाटाफुटीने शेवटच्या घटका मोजत आहे की काय, असा प्रश्न उभा राहिला आहे.


    शिवसेना-भाजपचा झंझावात काँग्रेस-राष्ट्रवादी या मोठ्या पक्षांना अडवता आला नाही. पण मुंबईत हा झंझावात रोखण्यात लोकतांत्रिक जनता दलाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आमदार कपिल पाटील यांनी यश मिळवलं. कपिल हे गेली दोन टर्म मुंबई शिक्षक मतदारसंघाचे आमदार आहेत. १२ वर्षांपूर्वी भाजपच्या ताब्यातला हा मतदारसंघ त्यांनी खेचून आणला. दोन टर्म टिकवला. शिक्षणाचं खासगीकरण, शाळांचं कंपनीकरण याविरोधात ते सडकेवर आणि विधिमंडळात लढत राहिले. विनोद तावडे शिक्षणमंत्री झाल्यानंतर त्यांनी तावडेंच्या शिक्षकांना छळणाऱ्या हडेलहप्पी कारभाराला एकाकी विरोध केला होता. त्यामुळे तावडेंचा त्यांच्यावर राग होता. या निवडणुकीत काही करून कपिल पाटील यांना पराभूत करायचंच या हेतूने तावडे निवडणुकीच्या मैदानात उतरले होते. तावडेंनी या निवडणुकीत साम, दाम, दंड, भेद ही नीती वापरली. भाजप उमेदवार अनिल देशमुख यांना बळ दिलं. सत्ता देशमुखांमागे उभी केली. दुसऱ्या बाजूला शिवसेनेनंही कपिल यांच्या विरोधात उमेदवार दिला होता. उद्धव ठाकरे यांनी सेनेची सगळी ताकद या उमेदवारामागे उभी केली. मतदान दिवसाच्या अगोदर दोन दिवस या मतदारसंघातही शिक्षकांना एका मताला ५ ते १० हजार रुपये वाटल्याच्या तक्रारी पुढे आल्या होत्या. सत्ता, पैसा यांच्या ताकदीला मुंबईचे शिक्षक बधले नाहीत. कपिल पाटील यांनी चार हजार पन्नास मतं तिसऱ्यांदा घेत हॅट‌्ट्रिक केली. तिसऱ्यांदा विधान परिषदेत पोचले. शिक्षक भरतीच्या चळवळीच्या बळावर हे शक्य झाले. वैचारिक स्पष्टता आणि सामान्य माणसांच्या हिताचा अजेंडा असेल तर लोक बळ देतात, हा धडा कपिल पाटील यांच्या विजयातून काँग्रेस-राष्ट्रवादीला घेता येईल. अन्यथा या निवडणुकीचे निकाल दोन्ही काँग्रेसला धडकी भरायला लावणारे आहेत. या निवडणुकांतून हे पक्ष काही शिकले नाहीत, तर त्यांना भाजप-सेनेचा सामना करणं अवघड जाणार आहे.


    कोकण पदवीधरची निवडणूक राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी प्रतिष्ठेची केली होती. पूर्वी राष्ट्रवादीच्या तिकिटावर आमदार झालेले निरंजन डावखरे भाजपमध्ये गेल्याने शरद पवार चिडले होते. काही करून डावखरे यांना पराभूत करायचेच असा पवित्रा पवारांनी घेतला होता. त्यासाठी त्यांनी या मतदारसंघात प्रचार मेळावे घेतले. नवी मुंबईत वाशी येथे राष्ट्रवादी, काँग्रेस, शेकाप यांचा संयुक्त मेळावा घेतला होता. त्यात शरद पवार म्हणाले होते, 'डावखरे यांच्या विरोधात मी स्वतः उभा आहे असं समजा. डावखरे जिंकले तर मी हरलो असं होईल. माझी प्रतिष्ठा पणाला लागली आहे.' हे शरद पवार का सांगत होते?


    - राजा कांदळकर (राजकीय विश्लेषक)
    rajak2008@gmail.com

Trending