आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विविधगुणी प्रभाकर साठे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संस्कृती या शब्दाला इतिहासाचा मुलामा अाहे. त्याचा विचित्र अन्वयार्थ काही वाईट घटनांमधून नुकताच प्रत्ययाला अाला. मात्र अनेकदा त्या संस्कृतीची पाळेमुळे नव्या विधायक स्वरूपात सामोरी येतात. प्रभाकर साठे यांची ‘गीतगीता' हे त्याचे उत्तम उदाहरण! ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम' समाजातील तशा संस्कृतीविषयक घडामोडींचा शोध घेऊन ते समाजासमोर मांडू पाहते.


प्रभाकर साठे हा माणूस विविधगुणी आहे आणि त्यांचे गुण, वय पंच्याऐंशी उलटले तरी अजून प्रकट होत आहेत. त्यांचे कायम वास्तव्य अमेरिकेत कॅलिफोर्नियात असते, परंतु ते त्यासाठी ऊर्जा भारतातून - तीही पुण्यामधून घेऊन जातात. त्यासाठी ते भारतात काही काळ येत असतात. ‘गीतगीता’ हे त्यांचे नवे अपत्य. त्याचे दोन प्रयोग अमेरिकेत केल्यावर, त्याची डीव्हीडी घेऊन ते भारतात तीन महिन्यांपूर्वी आले आणि येथील संधींचा शोध घेऊन अमेरिकेला परत गेले, ते परत येण्याचा मनसुबा ठेवून. ‘गीतगीता’ हा पुणे-कॅलिफोर्निया यांचा संयुक्त आविष्कार आहे. त्यामध्ये गीतेचे तत्त्वज्ञान गाण्यांमधून व पडद्यावरील दृश्यांतून लोकांसमोर मांडले जाते. साठे यांनी तो खटाटोप गीतेचे सार विद्वतजनांपर्यंत सीमित न राहता आमजनांपर्यंत पोचावे हे उद्दिष्ट घेऊन मांडला आहे.


साठे मूळ पुण्याचे. त्यांनी भारत सरकारमध्ये मोठी कारकीर्द गाजवली. त्यांनी नेपाळ, मंगोलिया, इराण या देशांमध्ये दूतावासातील अधिकारी म्हणून अत्यंत कसोटीच्या काळात काम केले. त्यांनी त्यांचा भारताच्या विदेश सेवेतील अनुभव ‘राजदुताची रोजनिशी’ या लेखमालेत (प्रसिद्धी - एकता, कॅनडा) शब्दबद्ध केला आहे. त्यांनी व त्यांच्या पत्नीने अमेरिकेत मिळेल ती नोकरी स्वीकारत नवा संसार थाटला व अखेरीस, संगणक शिक्षण घेऊन त्या क्षेत्रात रीतसर निवृत्तीपर्यंत नोकरी केली. त्यांच्या पत्नी, कौमुदी २००९ साली वारल्या.


साठे यांच्या चरित्रक्रमात धक्के अनेक आहेत. अनेक माणसे तसे धक्के नोकरीव्यवसायात पचवत असतात. साठे यांचे वैशिष्ट्य असे, की त्यांनी गुणदर्शनाचा मार्ग स्वीकारला व त्यांची अंगभूत कौशल्ये सुबक रीतीने लोकांसमोर मांडली. अंगभूत गुण कोणते? - तर कुतूहल-जिज्ञासा-धडाडी. त्यांना विमानदलातील सेवेपासून भाषाज्ञानापर्यंत सर्व गोष्टींत तरुणपणापासून आस्था होती आणि कोठे बिचकायचे नाही, उलट अग्रस्थानी जाण्याचा प्रयत्न ठेवायचा असा त्यांचा बाणा होता. त्यामुळे ते वेळोवेळी सर्वांगांनी प्रकटत राहिले. त्यांनी अमेरिकेत नाट्यप्रयोग केले, संगीतविषयात संशोधन केले, ‘बिलासखानी’ नाटक प्रस्तुत केले. लोकांची गरज म्हणून ज्ञानप्रबोधिनीच्या विधींनुसार लोकांच्या घरोघरी जाऊन पौरोहित्य केले - चक्क नव्वद लग्ने लावली! त्यांना त्यांचे ‘मराठी नाटकातील विनोदाचे स्थान’ आणि ‘मराठी नाटकातील संगीताचे स्थान’ हे दोन प्रयोग विशेष सांगावेसे वाटतात, कारण त्यामध्ये त्यांनी त्या दोन विषयांत केलेले संशोधन आहे - त्यासाठी घालवलेल्या चार फलदायी वर्षांचा मनोरम काळ आहे; त्या क्षेत्रातील मान्यवरांच्या गाठीभेटी आहेत आणि संहिता सिद्ध झाल्यावर त्यांचे रंगमंचावरील सादरीकरण आहे. साठे अभिमानाने सांगतात, की चिं.वि. जोशी हे त्यांचे आतेमामा. साठे यांनी ‘मराठी नाटकातील विनोदाचे स्थान’मध्ये वेगवेगळ्या शैलींचे सहा नाट्यप्रवेश निवडून ते सादर केले. त्यातून एक पोटकार्यक्रम निर्माण झाला तो सात निवडक फार्सचा - फार्स हेही मराठी रंगभूमीचे बलस्थान मानले जाते ना! त्यांनी त्या प्रयोगांत अमेरिकेतील पंच्याहत्तर कलाकारांना घेतले होते. त्यांपैकी पस्तीसजण तर प्रथमच स्टेजवर येत होते. त्यांनी ‘मराठी नाटकातील संगीताचे स्थान’ या प्रयोगासाठी नाट्यसंगीतातील नवरसांवर आधारित सत्तावीस गाणी निवडली व ती वेगवेगळ्या गायकांनी मूळ शैलीत सादर केली.


प्रभाकर साठे यांच्या विविध गुणांत भाषाज्ञान हे मुद्दाम नमूद करायला हवे. त्यांना संस्कृत, नेपाळी, रशियन, जर्मन, उर्दू या भाषा येतात. ते म्हणाले, की ते रशियन भाषा इतक्या सफाईदारपणे बोलतात, की त्या भाषेतून संभाषण फोनवरून झाले तर दुसऱ्या माणसास साठे यांचे मूळ भारतीय-अमेरिकन रूप कळत नाही. माधवानंद हे पावस येथील स्वरूपानंदांच्या परंपरेतील गीतेचे अभ्यासक आहेत. माधवानंद अमेरिकेच्या व्याख्यानदौऱ्यावर दरवर्षी जातात. त्यांच्या २०१४ सालच्या दौऱ्यात त्यांची वेळ घेऊन प्रभाकर साठे यांनी ‘गीतगीता’चा कार्यक्रम योजला. त्यामुळे माधवानंदांचे निवेदन त्यात येऊ शकले.


प्रभाकर साठे यांच्या मनात गीतेच्या संगीत नाट्यरूपांतराची अफलातून कल्पना तीन वर्षांपूर्वी उद्भवली आणि ती २०१४ सालच्या एप्रिल महिन्यातील लॉस एंजेलिस व बे एरिया येथील प्रयोगांनी सिद्ध झाली. त्यांच्याच प्रयोगशील दिग्दर्शनाखाली ते प्रयोग घडून आले. अमेरिकेत कॅलिफोर्नियातील रंगमंचावर गीतेचा नाट्यरूप अवतार प्रकटला! बे एरियातील ‘महाराष्ट्र मंडळा’तर्फे सॅन रमोन येथे झालेल्या कार्यक्रमास साडेतीनशेच्यावर रसिक प्रेक्षक/श्रोते उपस्थित होते. सारे पावणेतीन तासांच्या सलग (मध्यंतर विरहित) कार्यक्रमात रंगून गेले. मुंबईचे नाना दातार (सध्या वास्तव्य अथश्री, बाणेर, पुणे) यांचे गीतेवरील बावन्न कवितांचे ‘गीत गीता’ हे पुस्तक १९८२ साली ‘गीता धर्म मंडळा’तर्फे प्रसिद्ध झाले आहे. कार्यक्रम त्या कवितांच्या आधाराने करण्याचे ठरले. साठे, स्वामी माधवानंद आणि दातार यांनी तीन वर्षें विचारमंथन करून कार्यक्रमाची संहिता तयार केली. दातार यांची गीते सोप्या पण विषयास अनुरूप अशा भारदस्त भाषेत आहेत. माधवानंद यांनी एकूण बावन्नपैकी चौदा गीते निवडली. त्याचबरोबर स्वरूपानंद आणि मुंबईच्या गीता पटवर्धन यांचेही एकेक गीत घेण्यात आले. टोरांटोचे संगीतज्ज्ञ नरेंद्र दातार यांनी गीतांना सुंदर, कर्णमधुर चाली दिल्या. साठे म्हणतात, की स्वामींचे निवेदन, नाना दातारांची गाणी आणि त्यांच्या मुलाचे - नरेंद्रचे दिग्दर्शन असा त्रिवेणी संगम उत्तम जमला आहे.


त्याला देखणेपणा आला तो साठे यांच्या प्रयत्नांतून. त्यांनी पडद्यावरील इलेक्ट्रॉनिक इफेक्ट तर महाभारताला शोभेसे अचूक मिळवलेच, पण रंगमंचावरील ‘प्रॉपर्टी’देखील कोठून कोठून पैदा केली. श्रीकृष्ण-अर्जुनाचा बारा बाय बाराचा रथ चक्क पुण्यात बनवून घेतला व फोल्ड करून अमेरिकेत नेला. धृतराष्ट्र (सुशील करमरकर) कुरुक्षेत्रावरील हकिगत विचारत आहे, संजय (निखिल करमरकर) दोन्ही बाजूंच्या सैन्यांचे वर्णन करत आहे हा व्हिडिओ-चित्रित भाग पडद्यावर दाखवण्यात आला. त्या दृश्याने व त्याबरोबरच्या गीताने श्रोत्यांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली. तिकडे अरुणाने सूर्याचा रथ पूर्व क्षितिजावर आणला आणि त्याच वेळी इकडे श्रीकृष्णाने अर्जुनाचा रथ कुरुक्षेत्रावर उतरवला. धावणार्‍या घोड्यांच्या टापांचा टप् टप् आवाज ऐकू येत होता. कृष्णार्जुन रथातून उतरले. पार्थाचे मन त्याचे बांधवच युद्धभूमीवर असलेले पाहून करुणेने व्यापून गेले. तो व्यथित स्वरांत म्हणू लागला - कसा मी मारू या स्वजना?...


अर्जुनाच्या भूमिकेत होते सुबोध करमरकर. नचिकेत यक्कुंडी हे कानडी गायक कृष्ण झाले होते. त्यांचा आवाज मधुर, लवचीक आणि उंच आहे. त्यांची गायकी श्रेष्ठ प्रतीची आहे. त्यांची विविध रागांतील सारी गाणी उत्तम झाली. गीतेतील विश्वरूप-दर्शन हा भाग नाट्यमय आहे, पण त्याचे प्रत्यक्ष दर्शन प्रेक्षकांना घडवणे हे दिग्दर्शकाच्या दृष्टीने आव्हान आहे. साठे यांनी ते आव्हान समर्थपणे पेलले. तो एकंदर कार्यक्रमातील सर्वोत्तम भाग ठरला. साठे आणि तंत्रज्ञ सल्लागार अतुल वैद्य यांनी त्या प्रसंगासाठी कोठून कोठून विविध प्रकारची अद्भुत दृश्ये, व्हिडिओ-चित्रित करून ठेवली होती! पडद्यावर भूकंप, ज्वालामुखी, अंतराळातील कित्येक अकल्पित गोष्टी, सृष्टीतील विविध आश्चर्ये इत्यादींची भव्य चित्ताकर्षक रंगचित्रे दाखवली जात होती. प्रेक्षक-श्रोत्यांना ते अक्षरश: अद्भुत-भीषण विश्वरूपदर्शनच घडून आले! गीतेतील शब्दांचा भावार्थ व्यक्त करणारा तो भाग पडद्यावर पाहणे हा उपस्थितांसाठी रोमांचकारी अनुभव झाला. गीतेचे तत्त्वज्ञान यथार्थ रीत्या मांडण्याकरता माधवानंद यांनी निवेदने केली.


‘गीतगीता’ कार्यक्रमाची दीड-दोन तासांची व्हिडिओ दाखवण्याचा कार्यक्रम पुण्यात गीता धर्म मंडळ, स्वरूपानंद हॉटेल येथे झाला. तेथील श्रोतृवर्गाचा प्रतिसाद साठे यांना सुखावून गेला. परंतु त्यांना हेतुसिद्धीचा खरा आनंद झाला तो त्यांच्या व्हिडिओ फितीचा कार्यक्रम येरवडा तुरुंगातील चारशे कैद्यांसमोर झाला तेव्हा. साठे यांनी निवेदन त्यांच्यासमोर मुद्दाम हलकेफुलके केले. मुख्य तुरुंगाधिकारी विठ्ठल जाधव यांनी औत्सुक्याने तो कार्यक्रम कैद्यांसमोर योजला. त्याचा कैद्यांच्या मनावरील चांगला प्रभाव पाहून तुरुंगाधिकारी समाधान पावले. जाधव म्हणाले, की त्यांनी तुरुंग प्रमुखपदाचा ताबा घेतल्यानंतर त्यांना सर्वांत गरज जाणवली ती बंदिवानांच्या मन:स्वास्थ्याची. कैदी शिक्षा भोगत असतात. त्यांच्या भौतिक गरजा भागवण्याचा प्रयत्न होत असतोच, परंतु घरापासून दूर राहिलेले कैदी नातेसंबंध, चांगुलपणा यांपासून वंचित असतात व म्हणून मानसिक दृष्ट्या अस्थिर राहतात. त्यांच्यासाठी महाराष्ट्रातील विविध तुरुंगांत सांस्कृतिक कार्यक्रम योजले जातात. त्यांचा सुपरिणाम कैद्यांच्या मन:स्वास्थ्यावर होतो.


- दिनकर गांगल
(लेखक व्हिजन महाराष्ट्र फाऊन्डेशनचे मुख्य संपादक आहेत.)
प्रभाकर साठे यांचा संपर्क ९५११८७६९५६ (भारत), ४०८८०६९८१४ (कॅलिफोर्निया) 
pkarsathe@gmail.com
लेखकाचा संपर्क : ९८६७११८५१७

बातम्या आणखी आहेत...