आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रभक्त भक्षकांची बेफाम खटलेबाजी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या चार वर्षात सत्ताधाऱ्यांनी चाटवलेली राष्ट्रवादाची मात्रा, आता खरे रंग दाखवू लागली आहे. रक्षकाचा मुखवटा घालून भक्षकांच्या टोळ्या सगळ्यांच क्षेत्रात यथेच्छ धुमाकूळ घालताहेत. त्यातली मीडिया-सोशल मीडियावर दादागिरी करणारी टोळी जणू आपला घटनादत्त अधिकार असल्यागत रोज नवे सावज शोधून तिथल्यातिथे फैसला करू लागली आहे. पडद्याबाहेरच्या आयुष्यात चुकांशिवाय दुसरं काहीच न केलेला, बेबंद नि बेपर्वा आयुष्य जगलेला नट संजय दत्त सध्या या टोळीचे लक्ष्य बनला आहे. देशद्रोही, दहशतवादी अशी ओळख सांगून रोजच संजय दत्तचं कोर्टमार्शल सुरु आहे. अर्थात, या सगळ्याचं मूळ ज्याच्यात आहे, तो राजकुमार हिराणीदिग्दर्शित "संजू' हा सिनेमा सार्वत्रिक निवडणुकांच्या तोंडावर नव्हे, तर दोनेक वर्ष आधी प्रदर्शित झाला असता आणि आताच्या इतका हिट न होता फ्लॉप ठरला असता तर सत्तासमर्थक देशभक्तांनी आणि मीडियाने संजय दत्तविरोधात खटलेबाजी करून शाब्दिक भोसकाभोसकी (वर्तमानातल्या भाषेत "लिचिंग') केली असती का, हाही याक्षणी लक्षवेधी प्रश्न आहे...

 

 रिकाम्या डोक्याची माणसं काहीच नाही जमलं तर विनाकारण राडा करत फिरतात, तसंच काहीसं सध्या मीडिया-सोशल मीडियावर दादागिरी करणाऱ्या तमाम देशभक्तांचं झालंय. बेकायदा शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी शिक्षा भोगून आलेला संजय दत्त आणि त्याच्या आयुष्यावर बेतलेला "संजू' हा सिनेमा या मंडळींसाठी मोठी फिस्ट म्हणजेच मिष्टान्न ठरला आहे. संजय दत्त हा कोणकोणत्या अँगलने देशद्रोही आहे, हे सांगण्यात या देशभक्तांमध्ये सध्या जोरदार चढाओढ लागलीय. 


खरं तर बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या, आरोग्य, दर्जेदार शिक्षण या समस्यांनी सामान्य माणूस पुरता बेजार झालेला असताना हा विषय ‘अत्यंत तातडी’चा नाही. जगण्या-मरणाचा तर नाहीच नाही. परंतु आज सत्तेच्या महत्वाकांक्षेपायी मीडिया-सोशल मीडियातल्या सहानुभूतीदारांना हाताशी धरून समाजात शाकाहारी विरुद्ध मांसाहारी, गरीब विरुद्ध श्रीमंत, उजवे विरुद्ध डावे, आस्तिक विरुद्ध नास्तिक अशी जाणीवपूर्वक दुही निर्माण केली जात आहे. याच कारस्थानाचा एक भाग म्हणून राजकुमार हिराणी दिग्दर्शित ‘संजू’वरून देशभक्त विरुद्ध देशद्रोही, अशी विघातक मांडणी करण्याचा डाव मीडिया-सोशल मीडियामध्ये खेळला जातोय. या खेळात राष्ट्रवादाची नशा चढलेले बिनचेहऱ्याचे लोक आहेतच, पण नामवंत वकील, पत्रकार, कलावंत, समाजसेवक, माजी पोलीस अधिकारी असे इतरही मान्यवर या शाब्दिक भोसकाभोसकीत सामील झाले आहेत.   

 

संजय दत्तचं उदात्तीकरण करण्यासाठी, त्याच्याविषयी सहानुभूती निर्माण करण्यासाठी आणि त्याच्या कारकीर्दीला बळ देण्यासाठी "संजू'चा जाणीवपूर्वक घाट घातला गेल्याची एकजात या सगळ्यांची खात्री आहे. एका खलप्रवृत्तीच्या नटाला सभ्यतेचे, सज्जनतेचे शिफारसपत्र देण्यासाठी हा सगळा राजकारण प्रेरित (संजय दत्तला आगामी लोकसभा निवडणूकीत काँग्रेस तिकिट देणार हा वहीम या मागे आहे,) मामला असल्याचा आरोपही अनेकांनी करून बघितलाय. यात मुद्दा असा आहे की, कुणी उदात्तीकरण करतंय किंवा कुणी सहानुभूती निर्माण करतंय आणि एकजात सगळे खुळ्यासारखे त्यात अडकताहेत, ही स्थिती निदान सिनेमाच्याबाबतीत तरी आता राहिलेली नाही. दुसरं म्हणजे, ९० च्या दशकाच्या प्रारंभी नाम, सडक, साजन असे मोजकेच यशस्वी सिनेमे देणाऱ्या संजय दत्तची कारकीर्दीकडे सिरियसली बघणारा नट म्हणून कधीही ख्याती नव्हती. जसे अमिताभ बच्चन, शाहरुख खान यांच्या केवळ नावावर सिनेमे विकले जात होते, तसे संजय दत्त हा कधीही वितरक-प्रदर्शकांचा फेवरिट नट नव्हता. बेकायदा शस्त्रास्त्र बाळगल्यानंतर न्यायायलयीन खटले आणि तुरुंगवासाच्या काळात तर जवळचे दोन-चार लोक सोडले तर एकही निर्माता त्याच्यावर खात्रीने पैसे लावण्याच्या मन:स्थितीत कधीही नव्हता. आता वयाची साठी जवळ आल्यावर सभोवती कडक स्पर्धा असताना हा नट कारकीर्दीबाबत गंभीरपणे विचार करू लागला असेल आणि त्याला गंभीरपणे घेत कुणी मोठी रिस्क घेईल, हे व्यवहारिकदृष्ट्या काही संभवत नाही. 

 

त्यामुळे एका "देशद्रोह्या'ला सहानुभूती दाखण्यासाठी, एका "देशद्रोह्या'चं उदात्तीकरण करण्यासाठी  पदरचे पैसे खर्च करून लोक थेटरात जाताहेत. त्याचा जीवनावर बेतलेला सिनेमा डोक्यावर घेताहेत. ज्या नटाने अक्षम्य गुन्ह्यांसाठी  शिक्षा भोगलीय, त्याला काँग्रेस तिकीट देणार आहे, आणि लोक त्याला विजयी करणार आहेत, ही सगळीच गंमत आहे. याचं कारण, ज्या प्रेक्षकांनी शाहरूख-सलमान-आमिर खान यांच्या सिनेमांना तुफान प्रतिसाद दिलाय. त्याच प्रेक्षकांनी राजकीय नेत्यांच्या अमलाखाली येऊन या नटांचा निषेध म्हणून दंगलखोरीही केली आहे. भारतीय प्रेक्षक-मतदारांचा हा संशयास्पद मानसिक इतिहास पाहाता केवळ सहानुभूती म्हणून संजय दत्तला कोणी पक्ष तिकीट देईल, आणि दिलं की तो हमखास निवडून येईल, हे  ताणल्यामुळे तुटणारं गृहितक आहे.


हे खरं की, आपल्याला सरळसोट सज्जनापेक्षा खलनायकी प्रवृत्तीच्या बाया-माणसांचं नेहमीच आकर्षण वाटत आलंय. आणि याच आकर्षणापोटी आपण गब्बरसिंग आणि मोगँबोला टाळ्या-शिट्यांनी दाद दिलीय. अंडरवर्ल्डमधल्या क्रूर नि बिभत्स जगाचा सिनेमा-वेबसिरीजमधून अनेकदा आस्वादही घेतलाय. पण म्हणून थिएटरला जाऊन संजय दत्तला दाद देणारा प्रेक्षक मतदाराच्या भूमिकेत शिरल्यानंतर त्याच्या पारड्यात आपलं मत टाकीलच, याची शाश्वती कुणाला देता येत नाही. आजच्या सोशल मीडियाच्या खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं करण्याच्या "मोदी काळा'त पूर्वीइतकं ते इतकं सोपंही नाही.

 

पण यात आणखी एक गंमत आहे. ती  म्हणजे, ‘संजू’ सिनेमा त्याच्यावर बेतलाच तो संजय दत्त या तमाम देशभक्तांच्या नजरेत गुन्हेगार आहे, देशद्रोही आहे. पण तो दिग्दर्शित करणारा, राजकुमार हिराणी देशद्रोही नाही. निर्माता म्हणून गुंतवणूक करणारा विधू विनोद चोप्रा देशद्रोही नाही. आजवर संजय दत्तसोबत काम केलेले अमिताभ बच्चनपासून आपल्या महेश मांजरेकरपर्यंतचे एकही नट-नटी वा दिग्दर्शक देशद्रोही नाहीत. देशद्रोही कोण आहे, एकटा संजय दत्त!  राजकुमार हिराणीने याच संजय दत्तला घेऊन दहा-बारा वर्षांपूर्वी "मुन्नाभाई एमबीबीएस' नावाचे दोन सिनेमे निर्माण केले, तेव्हा याच देशभक्त वर्गाने गांधीगिरीचं पुनरुज्जीवन करणारे म्हणून हिराणी - संजय दत्त यांना डोक्यावर घेतलं, पण तेसुद्धा संजय दत्तच्या प्रतिमेचे आडवळणाने का होईना  उदात्तीकरणच होते, याचा वास या देशभक्त मंडळींना तेव्हा आला नाही. 

 

खरं तर विचार करण्याची क्षमता असलेल्या कुणाही सुबुद्धाला हे पटेल की, वर्तमानातल्या वादाचं मूळ असलेला "संजू'हा सिनेमा संजय दत्तच्या आयुष्याच्या प्रत्येक क्षणाचा  लेखाजोखा नाही. तर सभ्य नि सुसंस्कृत कुटुंबात वाढलेल्या पण वासना-विकारांनी पछाडलेल्या एका वलयांकित पण कलंकित माणसाची निवडक प्रसंगांवर बेतलेली ही चित्तवेधक कहाणी आहे. दिग्दर्शक हिराणीने सर्जन-स्वातंत्र्य घेत ती अत्यंत परिणामकारकरित्या पडद्यावर साकारलेली आहे. त्यातून संजय दत्त हा अपेक्षा आणि उपकारांच्या ओझ्याखाली दबून कुणाच्याही जाळ्यात सहज अडकणारा, जगाचं कसलंही भान नसलेला, बौद्धिकदृष्ट्या अत्यंत कमकूवत, मनाने अत्यंत दुबळा, भित्रट, कमालीचा असुरक्षित, एकच चूक पुन:पुन्हा करणारा आणि त्याची जराही खंत वा खेद न बाळगणारा, असा  गुणावगुणाचं आगर असलेला  इसम आहे, अशी डोकं थाऱ्यावर असलेल्याची पक्की खात्री होईल. परिस्थितीपुढे हतबल, असहाय्य नि अपयशी पित्याच्या न सांगितलेल्या पण तितक्यात मनोवेधक ठरू शकणाऱ्या कहाणीकडेही दिग्दर्शक  हिराणी आपलं  प्रेक्षक म्हणून लक्ष वेधू पाहतोय, हेही त्यांना जाणवेल. व्यसनी संजय दत्तच्या उत्तुंग व्यक्तिमत्वाच्या पित्याची हतबलता आसपासच्या उदाहरणांमुळे या विवेकी मंडळींना एका पातळीवर समजूनही घेता येईल. पण पटकथेच्या अंगाने त्यात अनेक दोषछिद्रंही त्यांना सापडतील. उदा.संजय दत्त  एका चुकीची अद्दल घडूनही बेपर्वा आयुष्य का जगत राहतो? किंवा तो असा का बनतो, याचं स्पष्टीकरण सिनेमात कुठेही येत नाही, शिवाय,जो काही दोष आहे, तो मीडियाचा असं सूचवून शेवटाच्या गाण्यात लेखन-दिग्दर्शकाने पलायनवादी भूमिका घेतल्याचं लपून राहात नाही. या पलीकडे जाऊन असंही लक्षात येईल की, यापूर्वीच्या मुन्नाभाई,थ्री इडियट्स, पी.के.आदी सिनेमांतून हिराणी देऊ पाहणारी शिकवण प्रेक्षक-समीक्षकांनी तेव्हा आनंदाने स्वीकारली. पण इथे हिराणींचा हा प्रयत्न ढोंग ठरवला गेला आहे.

 

मीडिया-सोशल मीडियात सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत नैतिकतेचे धडे देणाऱ्यांना आपल्या या विरोधाभासी वागणुकीत जराही इंटरेस्ट नाही. कारण यात इंटरेस्ट घेतला की, देशभक्त-देशद्रोही अशी दुही निर्माण करणं शक्य होत नाही. तर्कसंगत मांडणी करायचं म्हटलं की, लोकांमध्ये फ्रेंझी निर्माण करता येत नाही. ‘संजू’ची बेगलाम चंपी करणाऱ्यांच्या बाबतीत नेमकं हेच घडत आहे. 

पण कुणी काहीही म्हणत असलं, तरीही चार-आठ दिवसांत संजू सिनेमाने २००-२५० कोटींची कमाई केल्याच्या बातम्या येताहेत. या बातम्या ‘संजू’ अद्याप न बघितलेल्या प्रेक्षकांवर प्रभाव टाकण्याच्या इराद्यानेही पेरल्या असण्याचीही शक्यता अधिक आहे. धंद्यातले डावपेच म्हणून हे यापूर्वीही, अनेक सिनेमांच्याबाबतीत घडलंय. त्यामुळे यात आश्चर्य नाही. गंमत ही आहे की संजय दत्त हा काँग्रेसचे एकेकाळचे लोकप्रिय नेते, सुनील दत्त यांचा मुलगा आहे. संजय दत्त हा काँग्रेसचीच माजी खासदार प्रिया दत्तचा भाऊ आहे. पण तेच सुनील दत्त काँग्रेसऐवजी संघ-जनसंघ वा भाजपचे नेते असते, प्रिया दत्त भाजपची खासदार असती. तर देशद्रोही विरुद्ध देशद्रोही हा खेळ खेळला गेला असता का? आणि अत्यंत गंभीर गुन्ह्याची शिक्षा भोगून (काहींच्या मते चुकवून)आलेल्या संजय दत्तला पुन्हा पुन्हा देशद्रोही असा शिक्का मारून आरोपीच्या पिंजऱ्यात उभंही केलं गेलं असतं का? बहुदा नाहीच. कारण, आणीबाणीविरोधात शंख करताना मोदी आणि मंडळी केवळ इंदिरा गांधींना लक्ष्य करताहेत. पण, विद्यमान केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांचे दिवंगत पती आणि सत्ताधाऱ्यांना सध्या नकोसे झालेले पण अजूनही भाळी भाजपचा टिळा असलेले खासदार वरुण गांधी यांचे पिता (ज्यांनी अत्याचाराची सूत्रे सांभाळली होती, असा सगळ्यांचाच आरोप आहे.) संजय गांधी यांच्या नावाचा मात्र उल्लेखही करत नाहीयेत. पण मनेका-वरुण भाजपमध्ये नसते तर हे औदार्य मोदींच्या बोलभांड समर्थकांनी दाखवलं असतं का?

 

सगळ्यात शेवटी, आणखी एक गंमत - भाजपचे विद्यमान खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदींचे खंदे समर्थक, ‘देशद्रोही लेखिका' अरुंधती रॉयना दगडफेक्या काश्मिरींप्रमाणे लष्कराच्या जीप बांधून गावभर फिरवायला हवे, असे म्हणणाऱ्या परेश रावल यांनी ‘संजू’ या "काँग्रेसी समर्थन-पाठबळ' असलेल्या सिनेमात, त्याच्या बापाची म्हणजे, सुनील दत्त यांची भूमिका आपल्या लौकिकास जागत अत्यंत प्रभावीपणे साकारली आहे. पण, ते या सगळ्या गदारोळात मोदींप्रमाणे सूत्रबद्ध मौन धारण करून आहेत. हिराणींच्या या अक्षम्य गुन्ह्याबद्दल त्यांचं काही म्हणणं आहे की नाही? एका देशद्रोही नटाच्या जीवनावर बेतलेल्या सिनेमात त्याच्या बापाची भूमिका करणारे परेश रावल देशभक्त कसे ठरताहेत? असा प्रश्न एकाही देशप्रेमी सत्तासमर्थकाने अद्याप विचारलेला नाही.
सगळीच गंमत आहे. गेल्या चार वर्षात बाकी कशात नसेल, पण अशा गमती-जमती करण्यात सत्ताधाऱ्यांनी आणि त्यांच्या एकनिष्ठ भक्षक खटलेबाजांनी खूप मोठी प्रगती साधलीय, हे कुठलाही अहवाल वा सर्वेक्षणाची मदत न घेता उघड सत्य आहे. "संजू'च्या निमित्ताने ते चव्हाट्यावर आलं आहे, इतकंच.

 

बातम्या आणखी आहेत...