आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फिटे अंधाराचे जाळे...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ज्‍योती देशमुख. - Divya Marathi
ज्‍योती देशमुख.

शेतकरी आत्महत्या...गेल्या दोन दशकांपासून देशापुढील सर्वात गुंतागुंतीची ही समस्या. या समस्येची चर्चा तर खूप झाली. पण त्याचे उत्तर कुणालाही सापडताना दिसत नाही. अशा वेळी ज्यांच्या डोईवर संकटाचा डोंगर कोसळला, त्या शेतकऱ्यांच्या विधवा मात्र हरलेल्या नाहीत. येणाऱ्या संकटांना त्या हिंमत आणि जिद्दीच्या बळावर  तोंड देत आहेत. जागतिक महिला दिनानिमित्ताने त्यांचा असामान्य प्रवासाची ही नोंद...


...त्या शेतात निघण्यापूर्वी त्यांच्या घरी पोहोचायला हवं असा निरोप मिळाल्याने सकाळी आठच्या ठोक्यालाच ज्योती देशमुखांच्या गावात पोहोचलो. अकोला जिल्ह्यातील कट्यार हे ज्योतीताईंचे गाव. तीन भावांची ही एकुलती एक बहीण.  लग्नाआधी  दु:ख आणि संकट म्हणजे काय, हे त्यांनी कधी अनुभवलं नव्हतं. पण २००१ नंतर गेल्या अठरा वर्षात त्यांना एकापेक्षा एक भयंकर अशा संकटांचा सामना करावा लागला. पहिल्यांदा सासऱ्यांनी आत्महत्या केली, नंतर दिरांनी आणि अखेरीस पतीने. घरातल्या कर्त्या पुरुषांच्या सात वर्षात, तीन आत्महत्या. पदरात एक मुलगा, लहानी जाव आणि तिची मुलगी. त्यात ना शेतीची माहिती ना व्यवहाराची कल्पना. माहेरच्यांनी मायेची सूचना केली, शेती विकून माहेरी ये. दरम्यान, आत्महत्येची माहिती घेण्यासाठी आलेल्या तहसीलदारांनी धीर दिला. शेती सांभाळा. तुम्हाला जमेल. घरगडी म्हणून काम करणाऱ्या रामसिंग सोळंकींनी हिंमत दिली, ‘वहिनी, घाबरू नका. तुम्हाला जमेल.’  पतीचे तेरावे झाले आणि चौदाव्या दिवशी त्यांनी शेतात पाऊल ठेवले. तेव्हापासून आजतागायत मागे वळून पाहिलेच नाही.

 

ज्योतीताईंचा हा प्रवास निश्चितच सोपा नव्हता. नवऱ्याने बैलगाडीही गहाण टाकलेली. ज्योतीताईंनी भावांकडून पैसे उसने घेतले. रामसिंगबाबांच्या मदतीने पहिल्यांदा मूग पेरले. गहाण बैलगाडी सोडवून घेतली. पीक आलं, तेव्हा बाजार समितीत नेण्याची वेळ आली. तोपर्यंत मार्केट म्हणजे काय हेही माहीत नव्हतं. पुन्हा हिंमत करून मार्केट गाठलं आणि मूग विकण्यासाठी लिलावात उभ्या राहिल्या. तो दिवस त्यांना आजही आठवतो. ‘लोकांनी खूप नावं ठेवली... खूप वेदना झाल्या मनाला. प्रचंड मानहानी झाली, खच्चीकरण झाले. प्रसंंगी स्वत:ही आत्महत्या करण्याचा विचार येवून गेला. पण रामसिंगबाबा म्हणाले, तुझ्या पायात चप्पल आहे ना, कुणी काही म्हणालं तर...', ज्योती ताई सांगतात. भाऊबंदांना वाटत होतं, नवऱ्यानंं आत्महत्या केल्यावर ही बाई सगळं सोडून माहेरी जाईल आणि शेतजमीन आपल्याला मिळेल. पण ज्योतीताईंनी शेत कसायला सुरुवात केल्यावर पहिला विरोध त्यांनी केला. अडवणूक केली. घरावरची कौलं फोडली. दाराचे कडीकोयंडे चोरले. घरापर्यंतचा गाडीरस्ता नाकारला. पण ज्योतीताई हटल्या नाहीत. कापसाची गाठोडी त्यांनी डोक्यावरून वाहिली.

 

प्रत्येक दिवस नवीन संकट घेवून उजाडत होता. एका संध्याकाळी शेतात कपाशीची वेचणी झाली होती. संध्याकाळ होत आलेली. आभाळही भरून आलेलं. पण बैलगाडी घेवून जाण्यासाठी मजूरच येेईनात. शेवटी मजूर बायांनी साथ दिली. ज्योतीताईंनी बैल गाडीला जुंपले, कापसाची गाठोडी गाडीत भरली आणि हळूहळू गाडी गावात घेवून आल्या. त्या दिवशी त्यांनी ठरवलं, शेतातल्या कोणत्याच कामासाठी कुणावर अवलंबून राहायचं नाही. मजूर आले तर ठीक, नाही आले तरी प्रत्येक काम स्वत:ला आलं पाहिजे. त्यातूनच त्यांनी शेत फवारणी शिकल्या आणि टॅक्टर चालवणंही.

 

आज त्यांच्या शेतात कपाशी, हरभरा आणि सोयाबीन आहे. मुलगा इंजिनिअरिंगला आहे आणि पुतणीला डॉक्टर करायची आहे. ज्योतीताईंनी स्वत:चा ट्रँक्टर घेतला आहे. दररोज वीसेक मजुरांना त्या काम देत आहेत. आज यशस्वी प्रगतीशील शेतकरी म्हणून त्यांनी पंचक्रोशीत ख्याती मिळवली आहे. त्यांच्या या यशाचं गमक, त्या एका वाक्यात सांगतात, ‘पुरूष शेतकऱ्याकडे १० रुपये असतात तेव्हा तो ५० रुपये खर्च करतो आणि माझ्याकडे पन्नास रुपये असतील तर मी त्यातले १० रुपयेच खर्च करते...'
यवतमाळच्या सुनीता पेंदोरे त्यांच्या दुकानातच वाट बघत होत्या. २०१२ पासूनची नापिकी आणि अवकाळी पाऊस याला कंटाळून २०१५ मध्ये त्यांच्या पतीने आत्महत्या केली. दोन मुुली पदरात. भाऊबंदांसोबतचा वाद त्यांनाही चुकला नाही. तुला एवढे नऊ एकर काय करायचे, तुझं तीन एकरात भागेल, असं सांगत त्रास देणाऱ्यांविरोधात त्यांंना पोलिसातही जावं लागलं. पण त्या हरल्या नाहीत. दीनदयाल प्रसारक संस्थेच्या माध्यमातून मिळालेल्या मदतीतून त्यांनी गावात एक दुकान सुरू केलं. शासनाकडून मिळालेल्या मदतीतून माल भरला. स्टेशनरी आणि कटलरीचं दुकान उभं केलं. खर्च पेलेना म्हणून मुलीला डिप्लोमातून काढून नर्सिंगला घातलं. दुसरी दहावीत आहे. सरळ काहीच नाही. दुकानात बसताना लोकांच्या नजरांचा सामना करावा लागला. माल खरेदीसाठी तालुक्याला जायचं म्हणून त्यांनी मंगळसूत्र घालायला, टिकली लावायला सुरुवात केली, तर त्यावरून टोमणे ऐकायला लागले. मुलीसाठी स्थळ आले तर शेती जावयाच्या नावावर करून देणार का, अशी विचारणा झाली. शेत बटाईने द्यायचे, तर भाव पाडून मागितला गेला. पण सुनीताताई हरल्या नाहीत. मुलींच्या भवितव्यासाठी दुकानाचा धंदा आणखी वाढवायचा आहे, शेती व्यवस्थित करायची आहे, हे त्यांचे पुढचे नियोजन आहे.

 

यवतमाळच्या शुभांगी जिरपुरेंच्या पतीने शेतीला कंटाळून आत्महत्या केली, तेव्हा त्यांचं वय १९ वर्ष होतं आणि तेरा महिन्यांचा मुलगा पदरात. घरच्यांनी पाठिंबा दिला म्हणून, त्यांनी त्याच वर्षी डीएडला प्रवेश घेतला. पण नंबर बुलढाण्यात लागला. मुलाला घेवून बुलढाण्यात राहाणं अशक्य म्हणून जागा बदलीसाठी विनंतीअर्ज केला. पतीनिधनानंतर सांत्वनासाठी येवून फोटो काढून गेलेल्या आमदारांच्या शिक्षण संस्थेत प्रवेश होता. तो बदलून देण्यासाठी त्यांनी तीस हजार रुपये मागितले. शुभांगीताईंनी बांगड्या विकून ते पैसे दिले आणि प्रवेश बदलून घेतला. मुलाला आईकडे ठेवून डीएड पूर्ण केले. गेल्या आठ वर्षांपासून त्या शिक्षिका म्हणून नोकरी करीत आहेत. सोबतच बीए केलं, एमए केलं. वाट्याला आलेली सासरची जमीन विकून मुलाच्या नावावर घराजवळ जमीन घेतली. सध्या नोकरीही करतात आणि शेतीही. मोलमजुरी करणारी प्रत्येक बाई हे करू शकत नाही. पण सरकारने त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा तरी खर्च उचलावा,' अशी त्या विनंती करतात.

 

बुलढाण्यातल्या मेहकर तालुक्यातल्या वडाळी गावच्या वनमाळा शिंदे. एकट्या मेहकर तालुक्यात ४५० एकल महिलांची नोंद सावित्रीबाई फुले महिला मंडळानं केली आहे. त्यात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवांची संख्या सर्वात जास्त. वनमाळाबाईंचं ४ एकरचं क्षेत्र. तूर आणि सोयाबीन ही पिकं. आधी पतीनं आत्महत्या केली आणि नंतर मुलानं. पतीचे पोस्टमार्टेम झाले नाही, त्यामुळे त्यांची आत्महत्या शासकीय मदतीस अपात्र ठरली. शेताचा सातबारा आपल्या नावावर करण्यासाठी त्यांना ५ हजारांची लाच द्यावी लागली. मात्र, नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरेंच्या ‘नाम फाउंडेशन’तर्फे त्यांना पाण्याची मोटार मिळाली. तेव्हापासून त्यांनी गव्हाची लागवड सुरू केली. सावित्रीबाई संंस्थेच्या माध्यमातून त्यांना पाच शेळ्या मिळाल्या. एका वर्षात त्यांच्या त्यांनी १६ शेळ्या केल्या. आता गावातल्या १० एकल महिलांचा गट त्यांनी तयार केला आहे. त्यातून १ लाखांच्या शेळ्या घेण्याचे त्यांचे नियोजन आहे.

 

मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र या परिसरातील प्रत्येक गावात अशी एखादी ज्योतीताई, एखादी शुभांगी परिस्थितीशी झगडत आहे. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची जेवढी चर्चा होते, त्या तुलनेत त्यांच्या पश्चात त्यांच्या विधवांचे काय हाल होतात याची खातरजमा मात्र क्वचितच. आत्महत्येची घटना झाल्यावर सरकारी पंचनाम्याचे सोपस्कर पार पडतात. कधी प्रकरण पात्र होते, कधी अपात्र. अपात्र ठरले तर काहीच नाही, पात्र ठरले तरी ३० हजार हातात आणि ७० हजार फिक्समध्ये. दहाव्या-बाराव्यापर्यंत नातेगोते सोबत, तेरावं उरकलंं की सगळे पसार. या साऱ्यात एकच आधार तो ठिकठिकाणी मदतीचा हात देणाऱ्या सामाजिक संस्थांचा.  परंतु फाटलेल्या आभाळाला सावरण्यास ती ढिगळं अपुरी पडत आहेत. तरीही फक्त हिंमत, जिद्द आणि चिकाटी याच्या जोरावर त्यांनी त्या संकटांनाच शिंगावर घेतले आहे. कधी सासरचे तर कधी माहेरचे, जशी मिळेल, ती साथ घेवून त्या धीरोदात्तपणे पुढे चालल्या आहेत. कालचा अंधार मागे सारून, उद्याच्या उजेडाच्या दिशेने पावलं टाकत आहेत...

(डॉ. य. दि. फडके संशोधनवृत्तीअंतर्गत केलेले वार्तांकन)

 

dipti.raut@dbcorp.in

 

बातम्या आणखी आहेत...