आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डागदरकीचे अनुभव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डाॅ. क्षमा शेलार बीएचएमएस असून पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील बेल्हा या गावात primary health provider म्हणून काम करतात. स्त्रियांच्या व मुलींच्या विविध समस्यांसाठी निःशुल्क समुपदेशन करतात. हे काम करताना आलेल्या अनुभवांतून त्या शिकतात तर नक्कीच, परंतु समाजाविषयी त्यांना खूप काही कळत जातं. या कळण्याविषयीचं हे सदर.

 

डॉक्टर होण्याआधीचे आणि झाल्यानंतरचे काही निवडक प्रसंग मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. डॉक्टर म्हणून जबाबदारीने स्थिर, गंभीर वागण्याची गरज आणि तरीही माणूस म्हणून आतून दाटून येणारी अगतिकता. कवयित्री म्हणून इतर माणसांपेक्षा तीव्र असणाऱ्या जाणिवा आणि ओघाने झालेला तितकाच तीव्र त्रास. या सगळ्याचा अर्क म्हणजे माझे हे अनुभव.


या अनुभवांमध्ये स्त्रीच्या बाजूने जास्त विचार केला गेलाय असं वाटू शकेल पण बाईपणाच्या आणि आईपणाच्या व्यथा मीही स्त्री असल्यामुळे मला जास्त भिडल्या असतील असे प्रांजळपणे वाटते. ग्रामीण भागात व्यवसाय करत असल्यामुळे टिपिकल शहरी बायकांचे संघर्ष हे मुद्दाम तयार केलेल्या समस्या वाटाव्यात इतपत ग्रामीण स्त्रीच्या अंगावर आदळणाऱ्या समस्या बघताना वाटून जातं.


इथे अजूनही कितीतरी जणींचं ‘आयुष्य तेच आहे आणि हाच पेच आहे’ असं वाटायला जागा आहे. ग्रामीण लोकांच्या स्वभावात असणारे काही अनाकलनीय पीळ मीही मूळची शहरी असल्यामुळे माझ्याही पचनी पडलेले नाही. त्यांचे स्वभाव, त्यातून येणारे काही पेचप्रसंग, अवघं आयुष्य व्यापूनही दशांगुळे उरणारी दुःखं, अधूनमधून घडणाऱ्या, त्यांच्या मनाला विरंगुळा देणाऱ्या काही गमतीजमती हे सगळं मी साक्षीभावाने बघते आहे. त्यांच्याइतका सोशिकपणा अंगी बाणवण्याचा प्रयत्न करते आहे. काही अवघड प्रसंगांतही आयुष्य आसुसून जगण्याची त्यांची लवलवती विजीगिषा बघून कितीतरी वेळा स्तिमित होते आहे. हे सगळं जमेल तसं शब्दात पकडण्याचा प्रयत्न करते आहे.


या लिखाणातून ग्रामीण स्त्रियांच्या दुर्लक्षित राहिलेल्या अथवा गृहीत धरल्या जाणाऱ्या अनेक महत्त्वाच्या बाबींवर प्रकाश पडावा असा मानस आहेच, शिवाय या लिखाणातून आपल्यासारख्या लोकांना आयुष्यातल्या छोट्या छोट्या संघर्षांमध्ये लढण्याची ऊर्जा मिळाली आणि वाचनाचा निर्भेळ आनंद मिळाला तर या सगळ्या आट्यापिट्याचं चीज झालं असं मी समजेन.
धन्यवाद!


अथ डिसेक्शनाध्याय:।
१: मेडिकल कॉलेजला प्रवेश मिळाल्यानंतरचा सगळ्यात मोठा प्रसंग म्हणजे ‘डिसेक्शन’. अभ्यासासाठी केली जाणारी शवचिकित्सा.
कॉलेजजीवन तर थोड्याफार फरकाने सगळ्यांचं सारखंच असतं, पण जी इतर शाखांच्या विद्यार्थ्यांच्या वाटेला येत नाही अशी मोठी नवलाईची आणि तितकीच भीतीदायक गोष्ट म्हणजे डिसेक्शन.
कॉलेजचे पहिलेवहिले दिवस आणि मनात भीती डिसेक्शनची.
अजूनही लख्ख आठवतो तो दिवस.
नक्की काय काय बघावं लागेल या भीतीने प्रत्यक्ष अनुभवाच्या आधीच काय काय (?) बघून झालेलं अर्थात् स्वप्नात.
तर बॉडी आली, म्हणजे, आणली गेली. स्त्रीचा देह होता. तरुण होती बिचारी. कशानं गेली असेल? का तिला घ्यायला, तिचे रीतसर अंत्यसंस्कार करायला कोणी आलं नसेल? खरंच ती बेवारस असेल?
सगळ्या शरीरावर मरणकळा साकळलेली, तरीही मूळचा रंग गोरा असावा हे सहज लक्षात येत होतं. अचानक...
तिच्या हाताकडे लक्ष गेलं. कशी कोणास ठाऊक पण तिच्या हातात एक डाळिंबी रंगाची बांगडी तशीच होती. कधीतरी कोणासाठी तरी कित्ती हौसेनं भरली असेल!


२: पहिल्या काही प्रॅक्टिकलना अगदीच चिलखत घातल्यासारखे वावरणारे आम्ही हळूहळू डिसेक्शन जरासं हलकं घ्यायला शिकलो होतो. एका मेल बॉडीचे पाय खूप खराब झाल्यामुळे ते घोट्यापासून कापून टाकले होते. डोक्यावरच्या केसांच्या जटा झालेल्या होत्या. त्याही काळजीपूर्वक काढून टाकल्या. बॉडीची खूप दुर्गंधी येत होती. सर अजून आले नव्हते. त्यामुळे सगळा आम्हा नवशिक्यांचाच कारभार. त्या दुर्गंधीसाठी काय करावं असा यक्षप्रश्न आमच्या समोर होता. उणीपुरी १८-१९ वर्षांची आम्ही मुलं. समोर सगळं कधी न पाहिलेलं, अमानवी वाटणारं दृश्य. आमच्यातल्या काहीजणी तो ताण असह्य होऊन चक्कर यायच्या बेतात.
शिपाईमामांनी हे हेरलं. कदाचित दुर्गंधी तोंडावाटे येत असावी असं वाटून त्यांनी बॉडीच्या तोंडात डेटॉल ओतलं आणि तणाव हलका करण्यासाठी उखाणा घेतला, डिसेक्शन पाहून होतात दिलाचे तुकडे डेटॉल देतो आजोबा चेहरा करा इकडे आणि डिसेक्शन रूममध्ये मोठा हास्यस्फोट झाला.


३: आज चेहऱ्याचं प्रॅक्टिकल.
चेहरा - माणसाची ओळख.
त्यावर स्काल्पेल कसं चालवायचं म्हणून माझ्यातली कवयित्री मात्र चिंतेत पडलेली. बाकीचं शरीर बॉडी छिन्नविच्छिन्न झालेलं होतं. चेहराच तेवढा नीट. ती बॉडी चेहऱ्यानेच तर आम्ही ओळखत होतो. आज तो चेहराही जाणार. सर ग्लोव्हज चढवताहेत आणि मी मात्र त्या चेहऱ्याकडे बघत काय काय विचार करत बसल्येय.
काळासावळा राकट चेहरा. कुठल्याही कष्टकऱ्याचा असावा तसाच. वय फार तर फार ४०-४५. कधीतरी याही चेहऱ्यावर कुणी जीव ओवाळून टाकला असेल. याच चेहऱ्याने मिशीतल्या मिशीत हसत प्रतिसाद दिला असेल. या जाड्याभरड्या ओठांनी कुणाशी गुजगोष्टी केल्या असतील.
तेवढ्यात सरांच्या आवाजाने माझी तंद्री भंगली.
‘चलो! लेट्स स्टार्ट!’
आणि सरांनी निर्विकारपणे ओठ छाटला.
इति।


- डॉ. क्षमा शेलार, बेल्हा, पुणे
shelarkshama88@gmail.com

बातम्या आणखी आहेत...