आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मन एव मनुष्‍याणां...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंदिर ही केवळ कर्मकांड किंवा पूजा-अर्चा करण्यासाठीची जागा नाही, तर मनातील विकार-वासना मागे सारत ‘स्व’पलीकडे जाऊन परमेश्वराशी तादात्म्य पावण्याचे स्थान आहे. मंदिरांवरील सुरसुंदरींच्या शिल्पांमागे हाच विचार प्रबळ आहे... 


‘स्त्री आणि माकड’ असा या लेखाचा विषय आहे. मध्ययुगीन मंदिरांच्या बाह्यांगावर स्त्री  आढळते. कलाकारांच्या आवडीचा हा विषय असल्यामुळेही मंदिरावर ती वारंवार आढळते. शास्त्रग्रंथात ही आढळत नाही, हे खरे, पण ही आढळते, ती इतर सुरसुंदरींच्या समूहातच. म्हणून हिला सुरसुंदरी म्हणायचे. शिवाय सुरसुंदरींचे मंदिराच्या बाह्यभिंतीवर असण्याचे जे कारण असते, जे प्रयोजन असते, तसेच प्रयोजन हिच्या माध्यमातून शिल्पकाराने गोचर केलेले आहे. 


शिल्पांकित सुरसुंदरी या आकर्षक देहयष्टीच्या नाजूक कटिभागाच्या, उन्नत स्तनाच्या असाव्यात असे शास्त्रकार सांगतात. कारण समुद्रमंथनाचे वेळी इतर अप्सरांच्यासवे त्याही समुद्रातून बाहेर आल्या आहेत. त्या सर्व देखण्या, लोभसवाण्या, चेहऱ्यावर स्मित झळकणाऱ्या, अलंकार ल्यालेल्या असाव्या लागतात. या शिवाय मानवी भावभावना आणि कार्यमग्नता त्यांच्यात आढळली पाहिजे. या सुरसुंदरी पैकी काही राघू वा माकडसवे असतात, कोणी पायाच्या तळव्यातून काटा उपसून काढताना दिसतात, तर काही नाचून दमल्यामुळे नूपुरे उतरवून ठेवताना दिसतात आणि कोणी वाद्य वाजवताना आढळतात, कोणी काजळ घालताना दिसतात, त्या जे काही करत असतात ते आकर्षकपणे करत असतात. ते करताना ‘सहज तुझी हालचाल मंत्रे जणू मोहिती’ अशा त्या वाटतात. त्यांच्या भावपूर्ण चेहऱ्यामुळे आणि अर्थगर्भ हावभावामुळे त्या चित्ताकर्षक ठरतात, हे मात्र खरे. 

 रसिक मनाच्या भक्तांचे डोळ्यांचे पारणे फिटावे, असे त्यांचे विलोभनीय विभ्रम असतात.

 

आपल्या अस्तित्वाने त्या अनेकांचे लक्ष वेधून घेतात. या विषयावाचून काही । आणिक सर्वथा राय नाही ।। (ज्ञाने.२.१२०)

 

असे क्षणभर वाटते खरे, पण त्यांना सांगायचे असते, ते वेगळेच काहीतरी. स्त्री आणि माकड या शिल्पांकनाद्वारे येथे काय सांगितले जाणार आहे ते पाहू या. 


भारतीय कलाकारांनी कला निर्माण केली, ती जीवनासाठी तिचा काही उपयोग व्हावा यासाठी. कलेच्या माध्यमातून धार्मिक आणि नीतीविषयक काही साध्य होते का असा विचारही त्याने केलेला असतो. एका प्रमदेचे नेसूचे वस्त्र एक खट्याळ माकड ओढते आहे, असे एक दृश्य अनेक मंदिरावर शिल्पांकित केलेले आढळते. हा विषय कलाकारांच्या बऱ्याच आवडीचा आहे किंवा भक्तांच्या पुढे त्याचा आशय वारंवार आणला गेला पाहिजे, असे त्यांना वाटत असावे. 


अस्थिर माकडाच्या रूपाने मानवी मनाची चंचलता दाखविण्याचा, मनावर ठसविण्याचा कलाकाराचा प्रयत्न आहे. अशा विषयाचे मंदिरावरील अंकनाचे प्रयोजन हे की, तेथे जाणाऱ्या भक्तजनांनी काम, क्रोध इत्यादी विषयांपासून मनाला परावृत्त करावे. जसे वस्त्राला हिसडा देणाऱ्या माकडाला हुसकावून लावणाचा प्रयत्न या शिल्पविषयातील पुरंध्री करीत असते. हा उपदेश बहुधा नरनारी या दोघांसाठीही असावा. वनितांनी त्यांचे मन विषयामागे न भरकटू दिले पाहिजे आणि पुरुषांनी मोहाला बळी पाडणाऱ्या साक्षात रतीस्वरूपी यौवनेपासून स्वतःला दूर ठेवले पाहिजे.  


मैत्रायणी उपनिषद (१४.१३) सांगते ते असे: 
मन एवं मनुष्याणां कारणम्् बंधमोक्षयो: । 
बंधाय विषयासक्तं मुक्त्यै निर्विजयं स्मृतम ।। 


(मन हेच माणसाला बंधनात टाकणारे वा मोकळे करणारे आहे. विषयासक्त बंधनात अडकतो. मात्र, विषयासक्त नसणाऱ्याला मुक्ती प्राप्त होते, असे म्हणतात.) 
अशा या प्रतिमा आपणास पानगाव येथील विष्णू मंदिरावर, होट्टलच्या सिद्धेश्वर मंदिरावर, निलंगा येथील नीळकंठेश्वर मंदिराच्या भिंतीवर खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरावर एक माकड सुस्वरूप स्त्रीशी ‘माकडचेष्टा’ करत असल्याचे दृश्य आहे. येथे मोहक सुंदरी आणि चंचल माकड विलक्षण परिणामकारकपणे शिल्पांकित केले आहे. पालमपेठ येथील रामप्पा मंदिरातील स्तंभावर शालभंजिकेच्या भूमिकेत अशीच एक सुंदरांगना भेटते. अर्धसंस्थानक पद्धतीने त्रिभंगात ही नाजूक ललना उभी असल्यामुळे अधिकच आकर्षित दिसते आहे. लवचिक देहाला मुरड घालून व मान वळवून माकडाकडे पाहत ती उजव्या, वर उचललेल्या चपेटदानमुद्रेतील हाताने तिच्या वस्त्राला झोंबून तिला नग्न करू पाहणाऱ्या, तिच्या पायाशी असलेल्या चावट माकडाला धमकावते आहे. तिचा कटी भागावरचा देह सुघटित असून, स्तनद्वयही सुघड आहेत. उजव्या पायावर शरीराचे सर्व ओझे तिने टाकल्यामुळे तिच्या ओटीपोटाचा भाग अधिक उठून दिसतो आहे. 


आणखी एका जागी याच मंदिरावर हाच विषय शिल्पित केलेला आहे. मंडपाच्या उघड्या प्रवेश मार्गाच्या ठिकाणीच्या बाजूच्या भिंतीवर एक चामरधारिणी माकडासह दिसते. थोडीशी उफाड्याची असली, तरी लयबद्ध देह सौष्ठवाची ती आहे. मोजकेच दागिने ल्यालेल्या या पुरंध्रीचे वस्त्र तिच्या डाव्या पायाशी रेंगाळणाऱ्या कपीने ओरबाडणे सुरु केले आहे. मोठ्या प्रयासाने ती ते सावरून धरते आहे आणि माकडाला घालवून देण्याच्या प्रयत्नात ती आहे. या गडबड घाईत तिची खोल नाभी, आवर्तशोभा, त्रिवली आणि त्याही खालचे ओटीपोट उघडे पडले आहे. तिच्या उत्तरियाने (दुपट्टा) तिच्या देहाच्या वळणानुसार वळसे घेतले आहेत. हे एक फार बोलके शिल्प आहे. ती आपले चामरधारीणीचे कर्तव्य तर बजावीत आहेच, पण त्याच बरोबर पवित्र मंदिरात प्रवेश करताना भक्तांनी तृष्णा आणि विषयवासना बाजूला ठेवायची असते, असेच ती माकडाला बाजूस सारून, सूचित करत असते. 


- डॉ. जी. बी. देगलूरकर 
udeglurkar@hotmail.com

बातम्या आणखी आहेत...