आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एक शृंगार नायिका : स्वाधीन पतिका

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्व आणि भाव यांच्या द्वंद्वातून जे नाट्य आकारास येते ते मानवी वर्तनाचे नवनवे अंग प्रकाशात आणतेच, पण विविध कलांत निपुण कलाकारांनाही आव्हान देते. स्वाधीन पतिका ही अशीच एक नायिका. जिच्या स्वभावाचे विभ्रम मंदिरावरच्या शिल्पांत कोरले गेले आहेत...

 

सं स्कृत साहित्यातून, नाट्यशास्त्रातून आणि कामशास्त्रातून शृंगार नायिकांची वर्णने येतात. साहित्यकारांनी त्यांचे अनेक प्रकारात वर्गीकरण केलेले आहे. मात्र ढोबळमानाने पाहाता त्या आठ प्रकारच्या आहेत, असे दिसते. त्यापैकी एक जिला ‘स्वाधीन पतिका’ असे मानतात तिचा येथे विचार अभिप्रेत आहे.
‘शंृगारमंजरी’त आणि ‘रसमंजरी’वरील एका टीकेत नायिकेची व्याख्या केलेली आहे ती अशी :-
शंृगाररसालम्बनं स्त्री नायिका, किंवा ‘नयति वशीकरोति सा नायिका’ या दोन्हींचा आशय एकच आहे. जी नायकाची प्रेयसी, जी नायकाला वश करते, ज्याला शृंगाराचा मार्ग दाखविते, ती नायिका. अशा वा शृंगाराशी संबंधित अशा आठ नायिका आहेत. त्या म्हणजे स्वाधीनपलिका, खंडिता, कलहांतरिता, विप्रलब्धा, वासकसज्जा, प्रोषितभर्तिका, विरहोत्कंठिता आणि अभिसारिका.

 

यापैकी स्वाधीनपतिका या नायिकेची शिल्पे मंदिराच्या काही भागावर आणि इतरत्रही आढळतात. त्या अर्थातच वेगवेगळ्या प्रसंगातून आपल्यासमोर येतात.
प्रेमाच्या प्रसंगात ती वरचढ होते. प्रियकरावर तिची हुकुमत चालते, कारण आपल्या अत्यंत मनोहारी सौंदर्याने तिने त्याच्यावर ताबा मिळविलेला असतो. शिवाय ‘रतिगुणाकृष्ट: पति: पाश्व न मुग्चति’ विचित्रविभ्रमासक्ता स्वाधीनपतिका यथा’(शृंगारतिलक)
वेरूळ येथील कैलास लेण्यात तसेच कार्ले व कोण्डाणे येथील लेण्यातही तिचे शिल्पांकन आढळते. तसे ते मंदिरातही आढळते. तेव्हा आधी मंदिरातले पाहू या; म्हणजे स्वाधीनपतिकेची व्याख्याच समूर्त झाल्याचे कळेल.

 

ऐहोळे (जि. बागल्कोट) येथील एका मंदिरातील सभामंडपाच्या खांबावर एक श्रीमंत कुटुंबातील नवयौवना मंचकावरील लोडावर, उजव्या हाताचे कोपर टेकवून, पाय लांब करून पहुडलेली आहे. श्रीमंतांचे ते अंत:पुरच. सहाजिकच तिच्याभोवती सख्या गोळा झाल्या आहेत. अशावेळी तिचा पती तेथे प्रवेश करतो. तो तिच्या सौंदर्यावर, देहसौष्ठवावर लुब्ध झालेला असतो. तिची उजवी कहलीदलवत् मांडी उचलून तो ती स्वत:च्या मांडीवर घेऊन चेपून देतो आहे; आणि हे पाहून तिच्या सख्या लाजून चूर होऊन भिंतीकडे तोंड करतात. एकूण शिल्पकृतीवरून शिल्प विषय लक्षात येतो तो असा की, ही कृतक् कोपी झालेली आहे. कारण पती इतकी ‘सेवा’ तत्परतेने करीत असतानाही ती डाव्या हाताने त्याला दूर सारते आहे. शिवाय विरुद्ध दिशेकडे तिने तोंड वळवलेले आहे. आणि तो आपला तिची मनधरणी करतो आहे. काय करणार यौवनमस्त सौंदर्याने तो घायाळ झाला आहे!
मेघदूतातील अशा प्रसंगातील यक्षाचे कालिदासाने केलेले वर्णन साधारणत: येथे योग्य ठरावे.
वामश्चास्या : कररुहषदैर्मुच्यमानो मदीयै
मुक्ताजालं चिरपरिचतं त्याजितो दैवयत्य । (इत्यादी (२.३५)

 

वेरूळच्या कैलास लेण्यातील प्रदक्षिणापथावरील एका शिल्पचौकटीत एक मिथुन शिल्पांकित केले आहे. यातील पुरुषाने त्याच्या सखीच्या मेखलेवर डावा हात ‘रोवला’ असून तिच्या अंबाड्यावर ठेवलेल्या हाताने तिला आपल्या पुढ्यात ओढतो आहे, त्यामुळे पुढे आलेल्या तिच्या लोभसवाण्या गालावर त्याला चुंबनाचा ठसा उमटवणे सोयीचे ठरले आहे. तिच्या सौंदर्याने त्याला भुरळ पाडली होती, त्याला तो काय करणार बिचारा!
गाथासप्तशतीत तर स्वाधीन पतिकेची किती तरी वर्णने आलेली आहेत. एका फार गमतीच्या प्रसंगाकडे येथे लक्ष वेधायचे आहे. पति आपल्या पत्नीपुढे लोटांगण घालण्यासाठी वाकलेला असतो, नेमके त्याचवेळी त्यांचा लहान मुलगा त्याच्या पाठीवर बसून घोडा घोडा करतो आहे. (पादपतितस्य पत्यु: पृष्ठं पुत्रे समारूहृति । दृढपन्युद्नाया आणि दासो गृहिण्या निष्क्रान्त:।) एका गाथेतल्या प्रसंगाने स्वाधीन पतिका आपल्या देहसौष्ठवावर भाळलेल्या पतिराजापासून आपले सौष्ठव लपविण्याचा प्रयत्न करते आहे. नसता कामधाम सोडून त्याचे डोळे त्यावरच खिळून राहिलेले असते, ज्ञानेश्वरीतल्या ओवीतही हा भाव आढळतो. ‘ना जरी कुलवधू लपवी। भावेवाते’(१३२०५)

 

एवढेच, कशाला शिल्पातसुद्धा रामायाणातील एका प्रसंगावरून स्वाधीनपतिकेचे दर्शन घडते असे वाटते. कैलासलेणीत रामायणातील काही ठळक प्रसंगांचे अंकन झालेले आहे. श्रीराम वनवासाला अयोध्येच्या बाहेर पडतात, पंचवटीच्या रम्यस्थळी त्यांचा मुक्काम असताना मरीच या राक्षसाने सुवर्णमृगाच्या रूपाने सीतेला भुरळ पाडली. ‘हवाच मृग तो मला राघवा’ असा हट्ट तिने रामापुढे केला आणि वस्तुत: मरीचाचे कपट कारस्थान माहिती असतानासुद्धा सीतेच्या हट्टापायी त्याचा पाठलाग करून त्याला पकडून आणण्यास सीतेने रामाला भाग पाडले होते. असाच एक प्रसंग विदर्भातील मार्कंडी येथील मंदिराच्या परिसरातील एका पाषाणावरही आढळतो. मात्र कैलासातील प्रसंग अधिक बोलका आहे. रामाच्या पुढ्यात सीता बसलेली आहे. पाठमोरी आणि समोर विरहात असलेल्या मारीचाकडे अंगुलिनिर्देश करीत तिने मान वळवून रामाचे लक्ष तिकडे वेधले आहे. ‘हवाच मृग तो मला राघवा’ हे ती मराठीतच म्हणाली असती तर त्यात ‘गडे’ हा शब्द आलाच असता, असे तिच्या मान वेळावण्यामुळे वाटते.

 

स्वाधीनपतिकेच्या भूमिकेत आत्मविश्वास, तसाच अहंकारही असतो. आहेच माझा प्रियकर माझ्या मुठीत, मी त्याला केव्हाही माझ्या बोटावर नाचवीन, उगीच नाही. माझ्या अंगी आहेतच तसे गुण असे तिला वाटत असते.
यापेक्षा एका स्वाधीनपतिकेचे साहित्यदर्पणात आलेले मूळचे शृंगारतिलकातील वर्णन अधिक प्रत्ययकारी असून तशा प्रकारची शिल्पांकनेही यत्र-तत्र आढळतात. नायिका म्हणते -
स्वामिन्भंगुरयालं सतिलकं भालं विलासिन्कुरू
प्राणेश त्रुटितं पयोधरतटे हारं पुनर्योजन।
इत्युक्ला सुरतावसानसमये संपूर्णचन्द्रानना
स्पृष्टा  तेन तथैव जातपुलका प्राप्ता पुनर्मोहनम्।। म्
ही नायिका पतिला आज्ञापितेय की तिचे (विस्कटलेले) केस त्याने व्यवस्थित करावेत, कपाळावरची टिकली (कुंकू) नीट करावी आणि स्तनावरून घरंगळलेला मुक्ताहार जागीच बसवावा; असे म्हणणारी ही पत्नी स्वाधीनपतिकाच खरी, पण तिला आकांतनायिका म्हटलेले आहे. नागार्जुनकोण्डा येथील एका शिल्पपटात एक जोडपे दिसते. त्यातील प्रियकर त्याच्या पुढ्यात ओलंगून उभ्या असलेल्या प्रेयसीचे हर्षोत्फुल्ल मुख हिची हनुवटी हलकेच उचलून घेऊन तिच्या शिरोभूषणात हिऱ्याचे पदक तो खोचतो आहे, असे दिसते. ती सदत्संशयगोचरोदरी (राजा हर्षवर्धन)आहे. तिचे पीनस्तन निरंतर आहेत. तिच्या उजव्या हाती मोत्यांची लड आहे. ती त्याने तिच्या उरोजावर रुळेल अशी ठेवावी ही तिची इच्छा आहे. स्वाधीनपतिका एवढे लाड तर करून घेणारच!
अशी ही नायिका आपल्या रूपावर, यौवनावर, रतिकौशल्यावर लुब्ध झालेल्या पतिकडून लाड करून घेण्यात कुशल असते, असे शास्त्रकार सांगतात. आणि त्यांची इच्छा प्रत्ययकारीपणे जशीच्या तशी शिल्पाच्या माध्यमातून कलाकार कौशल्याने पुरी करतात, येथे पाहायला मिळतो तो समसमासंयोग!

 

udeglurkar@hotmail.com