आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मलावष्टंभ : इतर अाजारांसाठी कारणीभूत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तम आरोग्यासाठी व शरीरक्रिया सुस्थितीत चालण्यासाठी घेतलेला आहार हा रोजच्या रोज पचन होऊन मलस्वरूपात बाहेर पडणे गरजेचे असते. परंतु बऱ्याच कारणांमुळे मलत्याग रोजच्या रोज होत नाही किंवा मलप्रवृत्ती अधिक बद्ध स्वरूपात व कुंथून करावी लागते या लक्षणांनाच मलावष्टंभ/ मलावरोध/ बद्धकोष्ठता किंवा constipation म्हटले जाते. मलावष्टंभ हा स्वतंत्र आजार नाही, परंतु बऱ्याच आजारांची पार्श्वभूमी तयार करण्यासाठी कारणीभूत ठरतो. यामुळे सुरुवातीला मलावष्टंभ हा जरी किरकोळ वाटत असला तरी जास्त काळ राहिल्यास त्याची परिणती अनेक पचनाच्या किंवा इतर विकारांत होऊ शकते. आयुर्वेदानुसार अपान वायू हा आतड्यांच्या सुयोग्य हालचाली घडवून पचलेला आहार पुढे ढकलून मलप्रवृत्ती होण्यास कारणीभूत असतो. परंतु खाली वर्णन केलेल्या कारणांमुळ अपान वायू हा रुक्ष गुणाने प्रकुपित होऊन चल गुणाच्या कमतरतेमुळे आतड्यांच्या हालचाली योग्य होत नाहीत तसेच वाताच्या रुक्षत्वाने जलियांश शोषला जाउन मल शुष्क व पिच्छिल होतो असा मल आतड्यांना चिकटुन बसतो व मलप्रवृत्ती सकष्ट, अधिक बद्ध स्वरुपात व कुंथुन होते.अशा प्रकारे योग्य मलप्रवृत्ती न झाल्याने कुंथुन मलप्रवृत्ती करावी लागणे, पोट जड वाटणे व फुगुन येणे अशी लक्षणे दिसायला लागतात. सोबतच गॅसेस, नाभी खालच्या पोटाच्या भागात जडपणा वाटणे, भुक मंदावणे, कुठल्याही कामात उत्साह नसणे, उदरशुल, चिड-चिडेपणा, डोके दुखणे, मळमळ-उलटी, अनिद्रा अशी अनेक लक्षणे मलावष्टंभामुळे शरीरावर दिसुन येतात. व खुप काळ मलावष्टंभ राहील्यास त्याची परीणती पुढे मुळव्याध, भगंदर, हर्निया, ग्रहनी (IBS), कोलायटीस, शिरशुल, जुनाट सर्दी अशा अनेक आजारांमधे होऊ शकते. 

 

मलावष्टंभाची कारणे 
- पचण्यास जड, थंड, शिळे व फरसाण, चिवडा यांसारखे कोरड्या पदार्थांचा आहारात अतिवापर
- उपवास, अयोग्य वेळी आहार घेणे, भूक नसताना जेवणे, जास्त प्रमाणात जेवणे
- मांसाहार, अंडे, मासे, हॉटेलचे किंवा बाहेरचे खाद्य पदार्थ, फास्ट फूड- जंक फूड, डबाबंद खाद्यपदार्थ या सर्वांचा अतिवापर 
- बेकरीतील पदार्थ, अांबवलेले पदार्थ, इडली, डोसा, मेदूवडा, ब्रेड, पाव, मैद्याचे पदार्थ
- रात्री जागरण, रात्री उशिरा जेवण करणे, दिवसा झोपणे, व्यायामाच अभाव, अपचन, अग्निमांद्य
- सिगारेट, तंबाखू, मद्य यांचे सेवन, तुरट- कडू- तिखट पदार्थांचे अतिसेवन
- चिंता करणे, तणाव तसेच आहारात पालेभाज्या, फायबरयुक्त पदार्थांचा, तुपाचा अभाव


उपचार
- प्राथमिक काळजी घेऊनही मलावरोध तसाच राहिल्यास लवकर योग्य उपचार घेणे गरजेचे असते. उपचारामध्ये मलावष्टंभाच्या कारणांची चिकित्सा करणे अपेक्षित असते जसे, मलावष्टंभ तणाव-चिंता यामुळे असेल किंवा हार्मोन्सच्या imbalance मुळे असेल तर वेगवेगळी चिकित्सा करणे गरजेचे असते. 
- आयुर्वेदानुसार अपान वायुच्या रुक्ष व चल गुणात वैगुण्य आल्याने मलावरोध होतो त्यामुळे वाताच्या चिकित्सेसाठी अनुलोमक तैल, घृत यांचा मुखाने व मात्रा बस्ती द्वारे उपयोग केला जातो. तसेच पचनशक्ती वाढवुन मग त्रिवृत्त, आरग्वध, हरीतकी, द्राक्षा, सोनामुखी यांसारख्या अनुलोमक व मृदुविरेचक औषधांचा प्रकृती व दोष अवस्थेनुसार वापर केला जातो.


मलावष्टंभ टाळण्यासाठी 
- आहारात सकस, फायबर युक्त, स्निग्ध व ताज्या पदार्थांचा समावेश करावा तसेच पालेभाज्या, काकडी, गाजर, बीट, गाईचे तुप यांचे प्रमाण वाढवावे
- मलावष्टंभाच्या कारणांमधे सांगितलेला सर्व आहार विहार वर्ज्य करावा.
- रोज पायी किमान ४५ मिनीटे चालणे हा मलावष्टंभासाठी सर्वात चांगला व्यायाम आहे यामुळे आतड्याना बळकटी मिळुन त्यांच्या हालचाली सुयोग्य होतात.
- पचनशक्ती चांगली राहण्यासाठी आहारात मसाल्यांचा सुयोग्य वापर करावा, वातवर्धक आहार टाळावा तसेच आहाराच्या वेळा नियमित व योग्य ठेवाव्यात 
यामुळे योग्य पचन झालेला मल हा निस्सरणास त्रास होत नाही.
- तणाव व चिंता यांमुळे होणारा मलावरोध टाळण्यासाठी मेडीटेशन, प्राणायाम व योगासनांची अतिशय मदत होते. यासाठी अर्धमत्सेंद्रासन, पवनमुक्तासन, 
हलासन, बालासन ही आसने केल्यास लाभ होतो.
- गरम पाण्याचा पिण्यासाठी नियमीत वापर केल्यास आतड्यांच्या हालचाली अनुलोम दिशेने होण्यास मदत होते व मलत्याग सुलभ होतो.
- तसेच नाभीच्या खालच्या भागात कोमट तेलाने अनुलोम दिशेने मालिश केल्याने देखिल अल्प प्रमाणात असलेला मलावरोध दुर होतो.
- कधीतरी होणाबऱ्याच व अल्प प्रमाणात असलेल्या मलावष्टंभासाठी त्रिफळा+कोमट पाणी किंवा इसबगोल घ्यावे. परंतु बाजारात सहजपणे उपलब्ध होणारे व सवय लगणारे चुर्ण दिर्घकाळ घेणे टाळावे.


- डाॅ. याेगेश चव्हाण 
coryogesh@gmail.com